Monday 31 October 2016

मिसाल-ए-हिम्मत - नादिया मुराद

 ब्रिटनने इराकवर युद्ध लादले तेव्हा 'ती' केवळ 8 वर्षांची होती. देशावर संकट कोसळलंय पण आपल्यासाठी पुढे आणखी काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही तेव्हा तिला आला नसावा. 2014 - दिवसेंदिवस अस्थिर होत कोलमडून पडलेल्या इराकी शासन व्यवस्थेचा सोयीस्कर गैरफायदा घेत धर्माच्या भ्रामक कल्पनेवर जगणाऱ्या 'इसिस' सारख्या खुंखार आतंकवादी संघटनेने तेथे आपले पाय पसारायला सुरुवात केली. हळूहळू कित्तेक भागावर जोम बसवला, तेथील दुर्बल घटकांवर विशेषतः गैरमुस्लिम याझिदी वंशाच्या लोकांवर अत्याचार होऊ लागले. अनेक यजिदी देशोधडीला लागले, अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. अजूनही इराकमध्ये रक्ताचे पाट वाहतच  आहेत. ज्या लोकांनी जीव वाचवून पळ काढला ती नशीबवान ठरली, पण जी माणसं त्यांच्या तावडीत सापडली  ती एकतर जीवे गेली किंवा या अतिरेक्यांच्या क्रौर्याचे शिकार झाले. २०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना आयसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. अश्याच इसिसच्या तावडीत सापडलेल्या आणि नरकयातना भोगून परत आलेल्या एका 23 वर्षांच्या साहसी तरुणीची नादिया मुरादची हि चित्तथरारक कथा! ती ऐकतांना कुठल्याही पापभिरू माणसांचा कंठ दाटला नाही तरच नवल.

तिचा जन्म इराकमधल्या जिंजर प्रांतातला. अवघ्या हसण्या खेळण्याच्या वयात नादियाने जगाचा भेसूर चेहेरा अनुभवला. त्या भोगलेल्या यातनांना धाडसाने तोंड देतांना ती स्वतः मात्र प्रगल्भ होत गेली. आज ती याझिदी वंश हक्क कार्यकर्ती म्हणून नावाजली जाते आहे. तिचे नोबेल पारितोषिक व साखारोव पुरस्कारासाठी नामांकन देखील झालेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाची सदिच्छादूत म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा एकदा ती प्रकाश झोतात आली. नादिया सोबत झालेल्या भयावह अत्याचारांबद्दल तिने 2015 च्या यूएन सेक्युरिटी कौन्सिलमध्ये खुलासा केला होता. याझिदी महिलांवर बळजबरी, छळवणूक आणि लैंगिक शोषण करत क्रौर्याच्या सर्व सीमा लंघून पाशवी अत्याचार केले जातात. गैरमुस्लिम असल्याने याझिदी समाजाच्या महिलांना मरणयातना दिल्या जातात. असे ती ओरडून जगाला सांगते आहे.

तिची करुणकहाणी ऐकतांना अंगावर शहारे येतात. इसिसचे प्रस्त कायम व्हावे म्हणून या अतिरेक्यांनी दंडुके वापरून निर्दोषांचा हकनाक बळी घेऊन उच्छाद मांडला होता. त्या काळात तिच्या संपूर्ण कुटुंबाला घरात घुसून घेऊन जाऊन गुलामगिरीत ठेवण्यात आले होते. 300 पुरुषांसमोर तिलाही ताब्यात घेण्यात आले, काही दिवसांनी तिच्या डोळ्यादेखतच तिच्या आईवडिलांना मारून टाकण्यात आले. तिच्या आठपैकी सहा भावांना ठार करण्यात आले. नंतर दोन बहिणी,  दोन चुलत बहिणी व पुतणी यांना आयसिसच्या दहशतगरदांची वासना शमवत, बलात्कार करतच मोसुलला पाठवण्यात आले. तिच्यावर एकेक दिवसात अनेकानेक पुरुषांनी कित्तेकदा पाशवी बलात्कार केले, तिच्या शरीराचे लचके तोडले जायचे, मारहाण सहन करावी लागायची. बलात्कार केलेल्या पुरुषांची ओळख तिला कधीही पटू दिली नाही. तीन महिने ती इसिसच्या तावडीत सेक्स स्लेव्ह (लैंगिक गुलाम) म्हणून राहिली. तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला पण ती पकडली गेली. शिक्षा म्हणून सहा सुरक्षा रक्षकांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला, आणि नंतर तिच्यावर होणारे अत्याचार अधिकच वाढत गेले. एकदा ती एकटी असतांना तिने तिथून पळ काढला. मोसूलच्याच एका मुस्लिम परिवाराच्या मदतीने ती कुर्दीस्थानात पोचली. शरणार्थी शिबिरातही न्याय मिळवायला ती लढत राहिली. कित्तेक महिन्यांनी जर्मन सरकारने या शरणार्थीपैकी 1000 लोकांची मदत करण्याचे घोषित केले. नादिया त्यापैकी एक नशीबवान ठरली आणि तिने जर्मनीची शरणागती पत्करली. तिच्यावर उपचार होत असतांना तिथल्याच एका स्वयंसंघटनेने तिला यूएन मध्ये जाऊन आपबिती सांगण्याचा सल्ला दिला आणि नादिया जगासमोर बोलती झाली.

इसिसच्या माजोरड्या दहशतवादी थैमानाच्या कथा सांगून सारे विश्वच असुरक्षित असल्याचा संकेत देत नादियाने संयुक्त राष्ट्राला यावर कार्यवाही करण्यास चेतवले आहे. नादियाच्या जिद्दी, चिकाटी अन साहसी प्रवृत्तीचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. तिच्या भाषणाचाच असर कि काय कि, 'इराकवर आम्ही लादलेल्या युद्धामुळेच इसिससारख्या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला' अशी धडधडीत कबुली ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिली आहे. टोनी ब्लेअर यांनी इराकवरील हल्ल्याची केवळ चूकच कबूल केली नाही तर इराकवर लादलेल्या युद्धाबद्दल सपशेल माफीही मागितली आहे....
नादिया आज ब्रिटनमध्ये राहते आहे आणि तिच्यासारख्याच पीडित अत्याचारग्रस्तांसाठी धैर्याने कार्य करते आहे..




1 comment:

  1. Thank you for sharing...
    खूप माहितीपूर्ण लेख...

    ReplyDelete

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...