Sunday 6 November 2016

एक खूबसूरत दर्द 'शरबत गुल'

फगाणिस्थान युद्धाच्या वेळी तिथून जीव वाचवून पळून आलेल्या हजारो कुुुटूूंबाात एक कुुुुटुंब हिचंही होतं. त्यावेळी अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियन आणि मुजाहिदींन यांनी युध्‍दभूमीच साकारली होती. अनेक परिवार पाकिस्तानमधल्या निर्वासित छावणीत वास्तवास आले होते. आपली घरे-दारे सोडून देशोधडीला लागलेल्या,अफगाण युद्धाच्या झळा सोसणाऱ्या शरणार्थींची बातमी करतांना 1984 साली छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्यूरीने निर्वासित छावणीत एका किशोरीचे छायाचित्र कॅमे-यात कैद केले होते. नॅशनल जिओग्राफ‍िक मास‍िकात ते प्रसिद्ध झाले आणि छायाचित्रकारालाही अपेक्षा नव्हती तेवढे ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले, हिरव्या रंगाच्या डोळ्याची 'अफगाण गर्ल' सर्वत्र चर्चेचा विषय झाली. त्यावेळी तिचे नाव कुणालाही माहिती नव्हते. 'अफगाणी मोनालिसा' अश्याच नावाने तिला ओळखले जाऊ लागले. छायाचित्रकाराच्याही करिअरचा तो टर्निंग पॉईंट ठरला. हळूहळू युद्धाचे वारे निवळले, तो काळ लोटला आणि ती हिरव्या डोळ्यांची निर्वासित मुलगी विस्मरणात गेली. पण ज्या चित्राने त्याला प्रकाशझोतात आणले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले अशी ती चित्रातील हिरव्या डोळ्याची अफगाण बाला छायाचित्रकाराच्या विस्मरणात मात्र कधीच गेली नाही. त्या छायाचित्राची आठवण सांगतांना स्टीव्ह सांगतो 'ती अफगाणिस्तानमधील तथाकथित कट्टर परंपरावादी समाजातून येत होती, जिथे अनोळखी माणसाला चेहरा दाखवणे हा गंभीर गुन्हा ठरतो.स्ट‍िव्हला तिचे डोळे आणि निष्‍पाप चेहरा आवडला होता. त्याने खूप विनंती केल्यानंतर तिने छायाचित्र काढण्‍यास परवानगी दिली होती.' ती नेमकी कोण आहे आणि सध्या कुठे असेल काय करीत असेल या प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले. आणि 2002 साली नॅशनल जिओग्राफिक टेलिव्हिजन अँड फिल्म्स आणि मॅक्युरीने पुन्हा एकदा त्या मुलीचा शोध करत अफगाण‍िस्तान पालथे घातले, आणि तब्बल 17 वर्षांनी तिचे खरे नाव जगाला माहित झाले. यानंतर मॅक्यूरीने पुन्हा एकदा त्या पश्‍तुन आदिवासी जमातीतील मुलीचे म्हणजेच 'शरबत गुलचे' छायाचित्र काढले आणि मासिकाच्या मुखपृष्‍ठावर पुन्हा ती एकदा सर्वत्र झळकली. 

शरबत गुल आता पुन्हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे. त्याचे कारण म्हणजे तब्बल दोन वर्षांच्या तपासाअंती पाकिस्तानने तिला खोटे दस्तऐवज बाळगून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात वास्तव्य करण्याच्या गुन्ह्यात 23 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तिच्यावर खटला चालू असतांना दोनदा तिची जामिन देखील नाकारण्यात आली. तिला 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. शरबतने एप्रिल 2014 मध्‍ये पेशावर शहरात शरबत बीबी नावाने ओळखपत्रासाठी अर्ज केला होता. तिने निवेदनात सादर केलेल्या कागदपत्रात घोळ असल्याचे प्रशासनाला लक्षात आले आणि शरबत गुलला अटक झाली. तिचे वकील सांगतात तिची लवकरच सुटका होणार असून त्यानंतर निर्वासित म्हणून तिच्यावर लागलेला शिक्का पुसला जाऊन तिला पुन्हा अफगाणला तिच्या मूळ गावी परत पाठवण्यात येणार आहे. 

शरबत लहानपणापासूनच संघर्षमय आयुष्य जगते आहे. अफगाणिस्तानमध्‍ये सततच्या युध्‍दाने लोकांचे सर्वकाही हिसकावून घेतल्यावर 90 च्या दशकात सोव्हिएत लष्‍कर अफगाणिस्तानमध्‍ये दाखल झाले होते. तेव्हा ती 6 वर्षांची होती. एक बॉम्ब विस्फोटात तिचे आई-वडील मृत्यू पावले. शरबतचा भाऊ कशर खान आणि ती दोघेच उरले. तेथील नागरिकांची स्थिती जनावरांपेक्षाही खराब होत चालली होती. या कारणामुळे या दोघे बहीणभावासकट अनेकांनी अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानातं आसरा घेतला होता. तेव्हापासूनच तिचा निर्वासित असण्याचा संघर्ष संपतच नाहीये. 

शरबत 16 वर्षांची असतांना तिचे लग्न झाले. सासरचे आयुष्यही सुखी नाही. विवाहानंतरही तिच्या आयुष्‍यात काही बदल झाला नाही. शरबतने तिचे पहिले सुप्रसिद्ध झालेले चित्रही पहिले नव्हते. तिचे चित्र जगभर प्रसिद्ध झाले हे देखील तिला माहिती नव्हते. जगाला वेड लावणारी शरबत स्वतः मात्र तिच्या गुरफटलेल्या संघर्षमय जीवनात कुठेतरी नावाप्रमाणेच 'गुल' आहे. तिला लवकरच जामिन मिळेल आणि तिचा हा संघर्ष संपून तिच्या गावी ती पुढले आयुष्य सुखाचे काढेल हिरव्या डोळ्याच्या या 'अफगाण मोनालिसा' ला याक्षणी याच शुभेच्छा ....  



(नागपूर दैनिक सकाळच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)




2 comments:

  1. जगाच्या कानाकोप-यात अश्या कितीतरी शरबत गुल खितपत पडल्या असतील ना....

    ReplyDelete
    Replies
    1. होय ना ... आणि त्यांची दखल घेणारेही कुणी नसतं

      Delete

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...