Tuesday, 30 August 2016

माणुसकीचा बोन्साय ...



जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि काय नेमके काय करून मरायचे हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगतांना येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असणारा माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या 'मृत्यूला' मात्र घाबरतो,. खरतर आयुष्यच  माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग ...  मृत्यू.
कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात  'इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  ... पण ज्यांनी जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यासारखे निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही अश्या अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये? मृतदेहाचीही विटंबना व्हावी... स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा हि कसली नियती? सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा अन मृतदेहालाही ठेचकाळत, डुचमळत जावे लागावे.  वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा.  गरिबीच्या झळा माणसाला कुठवर सोसाव्या लागाव्या? हे कसले भोग आणि हे कसले नशीब. हे भोग नियतीचे नव्हतेच, भोग होते बौद्धिक बाता करणाऱ्या असंवेदनशील समाजाच्या तथाकथित नैतिक जबाबदारी झटकून पळ काढणाऱ्या वृत्तीचे. हे भोग होते माणसाचे माणूसपण गहाळ झालेल्या नुसतच पोकळ उरलेल्या संस्कृतीचा धोशा मिरवणाऱ्या बेगडी सामाजिक मूल्यांचा.

असेच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या बायकोचे कलेवर खांद्यावर घेऊन गाव गाठू पाहणाऱ्या दाना मांझीची हि हृदय पिळवटून टाकणारी घटना. ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातल्या भवानीपटना येथील दाना मांझी या माणसाची पत्नी क्षयरोगावर उपचार घेत असतांना रूग्णालयात मरण पावली. प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या दाणाला पैसे लावून गाडी करून तिला 60 किलोमीटरवर असणाऱ्या गावी पार्थिव घेऊन जाणे शक्य नव्हते. रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय अधिकारी सगळ्यांना त्याने गावापर्यंत ऍम्ब्युलन्सची सोय करून द्यावी म्हणून विनंती केली. पण मुळात पाषाण झालेल्या यंत्रणांना पाझर फुटेल कसा?? अखेर मांझीने मृत पत्नीचे शव खांद्यावर लादले सोबत आपल्या मातेच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करणारी त्याची १२ वर्षांची मुलगी चौला अश्रू ढाळत मागे चालत राहिली आणि सुरु झाला प्रवास सरणावरच्या यातनांचा.

अपघात होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, संकटात सापडलेल्या, दुःखाने हतबल झालेल्या माणसांच्या अनेक कथा रोज आपण ऐकतो. पण आमच्या आतल्या संवेदना जाग्या होत नाहीत. आमच्यातल्या 'माणुसकी' नावाच्या संवेदनेचा बोन्साय झालाय. असे काही घडले कि आम्ही शासनाला दोष द्यायला आणि त्यांच्या माथी सारे आरोप मारून सोयीस्करपणे आमचा 'ढिम्मपणा' जपायला पुन्हा मोकळे होतो. मांझींचा 12 किलोमीटर पर्यंतचा प्रवास बघ्यांच्या मनोरंजनाचा विषय ठरला. सोशल नेटवर्किंग वरून त्यावर मस्करीही करण्यात आली. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवरून संतापाच्या प्रतिक्रियाही गाजल्या, पण प्रत्यक्षात अश्या भयंकर परिस्थितीतही एखाद्या गरजूला मदतीचा हात कुणीही पुढे करू नये हि शोकांतिका नाहीये का? सुदैवाने एका स्थानिक पत्रकाराने याचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविल्याने भराभर सूत्र हलली आणि पुढील ५० किलोमीटरसाठी वाहन उपलब्ध होऊ शकले.

दाणा मांझीने त्याच्या पत्नीचे शव खांद्यावर लादले होते त्याच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असल्याचे ते लक्षण होते. पण आम्ही आमच्या बधिर झालेल्या संवेदना अन स्वतःच मारून टाकलेल्या माणुसकीचे पार्थिव खांद्यावर घेऊन जगतो आहोत कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिप्त राहून मजा बघण्याची आत्ममग्न राहण्याची हि अधम प्रवृत्ती वाढीस लागते आहे. हे कुणाच्याच हिताचे नाही हे लक्षात घ्यायला हवे. वेळीच जागे व्हायला हवे अन्यथा खूप वेळ होईल .... खूप वेळ होईल

रश्मी पदवाड मदनकर / २९ऑग.१६











No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...