Monday, 30 November 2015

पांढरे डाग- समज गैरसमज



वैद्यकीय कामानिमित्त एकदा कुठल्याश्या गावी जावे लागले. काम वगैरे आटोपून परतीच्या प्रवासाच्या वेळी नेमकी गाडी बंद पडली आणि नाईलाजास्तव बस ने प्रवास करावा लागला. नेमकी संध्याकाळची वेळ असल्याने बरीच गर्दी होती. बस गच्च भरलेली आणि बरीच माणसं उभी देखील होती. इतक्या गर्दीतही एक सीट मात्र खाली होती. येताजाता लोक त्याकडे बघत होती, बसायला म्हणून जात होती पण तिथे बसत मात्र नव्हते. असं का होतंय? मुळात जिज्ञासू असणारी वृत्ती जागृत झाली आणि मी प्रत्यक्षच तिथे बघायला गेले. तिथे जे काही बघितले ते आश्चर्यकारकच नाही तर धक्कादायक देखील होते. तिथे एक मध्यमवयीन इसम बसलेले होते, त्यांच्या शरीराचा बराचसा भाग पांढऱ्या डागांनी व्यापला होता. आणि म्हणूनच कुणीही त्यांच्याजवळ बसायला तयार नव्हते. पांढरे डाग ज्याला बोलीभाषेत 'कोड' असे संबोधतात. अश्या व्यक्तीला स्पर्श झाला तर ते डाग आपल्यालाही होतील अश्या बिनबुडाच्या कल्पनेने, भ्रामक विचारांनी लोकं किती ग्रासली आहेत या विचाराने मन सुन्न झाले.

 आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रापर्यंत भरारी मारत असतांना. पांढऱ्या डागांसारख्या अतिशय साधारण अन अजिबात घातक नसलेल्या विकाराबद्दल लोकांमध्ये किती गैरसमज अजूनही कायम आहेत. अनेक घातक, जीवघेणे रोग येतात आणि कित्तेकांचा जीव घेऊन जातात. पण त्या रोगाहूनही जास्त आपण या अश्या साधारण त्वचारोगास अवास्तव महत्व देतो त्याविषयी टोकाचे गैरसमज पाळतो. आजारपण आणि विकार दोन्हीत फरक आहे. पांढरे डाग म्हणजे रोग किंवा आजारपण नाही तो एक विकार किंवा उणीव आहे आणि त्याकडे खरतर त्याच दृष्टीने बघितले जायला हवे. पण असे घडत नाही.

पांढरे डाग (कोड) ज्याला इंग्रजीत 'ल्युकोडर्मा' असे म्हणतात. 'पांढरे डाग' बस एवढ्या नावातच ह्या विकाराचा खरा अर्थ गर्भित आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे आडवे-उभे पसरणारे डाग म्हणजे हे 'कोड'. या विकारामुळे शरीराच्या अंतर्गत संस्थानांवर काहीही प्रभाव पडत नाही. शारीरिक अंतर्बाह्य सर्व क्रिया सुरळीत चालू असते हा फक्त त्वचेवर होणारा पिग्मेटेशन विकार आहे जे शरीरातील मिलानोसाईट्स नावाचे सेल्स नष्ट झाल्याने किंवा हे मिलानीन सेल्स उत्पन्न न करू शकणाऱ्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला विकार आहे. हे सेल्स नष्ट का होतात किंवा अचानक उत्पादन का मंदावते ह्याचे वैद्यकीय विषयात दार्शनिक असे स्पष्ट कारण देता येत नाही. परंतु आयुर्वेदानुसार विरुद्धदर्शी आहार किंवा पचनसंस्थेतील बिघाड हि दोन मुख्य कारणे सांगण्यात आली आहेत.
हा विकार पूर्णतः अनुवांशिक नसला तरी वंशपरंपरेने हा विकार पुढल्या पिढीत उतरण्याची शक्यता वाढलेली  असते. श्वेतवर्णाचे हे डाग शरीरावर दिसायला लागले कि रुग्ण शारीरिक व्याधीपेक्षाही जास्त मनाने खचतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आणि समाजात वावरण्यास त्यांना संकोच वाटू लागतो. समाजही त्यांना सहज स्वीकारत नाही म्हणून ते सतत मानसिक दडपणातच जगत असतात.

आज आयुर्वेदाने या विकारासाठी अनेकानेक उपचार शोधून काढले आहेत. आता पांढऱ्या डागांसाठी रुग्णांनी निराश होण्याची गरज नाही, गरज आहे ती पूर्ण धैर्याने सामोरे जाण्याची आणि योग्य ते उपचार घेण्याची. साधारणतः फोटोकिमोथेरपी, कॉस्मेटिक सर्जरी, स्टीराईड थेरपी असे काही नामी उपचार वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत परंतु शरीर शास्त्रानुसार हे उपचार करवून घेण्यावर काही मर्यादा आहेत आणि त्यांचे दुष्परिणाम देखील असतात. आयुर्वेद हि प्राचीन वैद्यकीय पद्धती आहे आणि कुठलाही जटील रोग सुद्धा मुळातून घालवण्यासाठी प्रचलित आहे. पांढरे डाग विशेषज्ञ (ल्युकोडर्मा स्पेशलीस्ट) या नात्याने मी आजवर अनेक क्लिष्ट रुग्णांना बरे केले आहे. योग्य उपचार आणि पथ्य पाळून या विकारातून पूर्णतः बरे होता येते आणि पुन्हा डाग होण्याची शक्यता देखील कमी असते हे मला माझ्या प्रयत्नांनी दाखवता आले. ह्याचे मला समाधान आहे अनेक वर्षांच्या परिश्रमाने चांगल्या उपचार पद्धती शोधून काढता आल्या आणि आता मी फक्त पांढऱ्या डागांवर उपचार करण्यात कार्यरत आहे. रुग्णांना बरे करण्यात मिळणारे सुख इतर कुठल्याही सुखापेक्षा माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.


डॉ. स्नेहा राठी
(ल्युकोडर्मा स्पेशलीस्ट)
शब्दांकन :- रश्मी प. म.

(सकाळ वृत्तपत्रात 'ल्युकोडर्मा डे' ला प्रकाशित झालेला लेख)

Thursday, 19 November 2015

तृष्णा ...!!

'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय श्रावणी.. हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज '

'…… हम्म   ' 

'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस' 

श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला' 
बराच वेळ कॉटवर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली  … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली

 तोंडावर उतरलेले केस मनगटाने मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.   
तिने नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही.  डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले. 
भरलेल्या डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन उचलल्याचे लक्षात येताच ती आवाज सावरत बोलु लागली

 ' रावी हे बघ ऐक एकदा माझे…हे बघ मला राहवत नाहीये गं , तू तरी समजून घे, अक्खी रात्र पालटली आता दुपार झालीय पण तनुलचा काहीच पत्ता नाही… काहीतर बोल गं ' 

 ' हे बघ श्रावणी या विषयाला काहीच अर्थ नाहीये आता … जे व्हायचं ते होऊन गेलंय'

 ' अस नको म्हणूस ना ग … प्लीज … माझ्यासाठी एकदा तू … हेलो हेलो … रावी… हेलो रावी'

ती पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. हातातला फोन तिने बेड वर फेकून दिला … रडत रडत खाली बसली आणि भिंती लगत डोकं मागे टेकून शून्यात ध्यान लावून बसून राहिली तशीच कितीतरी वेळ … डोळ्यातून अश्रू वाहत राहिले तसेच .डोळे सताड उघडे …  

दरवाजा वाजला … तिची पापणी सुद्धा हलली नाही… दरवाजा जोरजोरात वाजू लागला. ती नाही हलली जागची

आईने आवाज दिला बराच अन बाहेर ये अशी ताकीद देऊ लागली…. 

विजेच्या ताकदीने श्रावणी उठली जागची…  झपझप पावले टाकत दाराजवळ आली, झर्रकन हात कडी जवळ नेत कडी उघडली आणि हवेच्या गतीने दार उघडलं  …. आई भयचकित होऊन दारात उभी होती. श्रावणीने लालेलाल अश्या भरल्या डोळ्याने काळीज चिरत जाणारी करारी पण रागीट नजर टाकली आईवर …. काही सेकंद तसेच खिळलेले …. आणि आईला काही कळायच्या आत तिने तेच दार प्रचंड वेगाने भिरकावले बंद करण्याकडे …. खा~~डड  असा आवाज झाला आणि ते पुन्हा त्याच वेगाने सुरु होण्याआधी तिने दुसऱ्या हाताने लगेच कडी लावून घेतली. दाराच्या पलीकडल्या आईची काय मनःस्थिती झाली असेल ह्याची जणू तिला जराही पर्वा नव्हती. 

जेवढ्या वेगाने गेली तेवढ्याच संथपणे ती हुंदके देत कॉट जवळ आली. विखुरलेले केस हाताने वर करून तिने फोन उचलला आणि पुन्हा श्रेयस ला फोन लावला. फोन उचलला गेला हे कळताच ती रडतच बोलू लागली

 'श्रेयस ऐक रे एकदा फोन ठेवू नकोस … प्लीज जीव जाईल माझा '
 'काय बोलायचं शिल्लक ठेवलायेस श्रावणी ? आणि का ऐकायचं तुझं? कोण आहेस तू ?'
'श्रेयस अरे मी मैत्रीण आहे तुझी निदान आजपर्यंत मैत्रीच्या खातर तरी …'
 'मैत्री~ ~ मैत्री …. तू बोल् तेयेस हे श्रावणी ?' 
 'श्रेयस अरे चुकले रे मी, माझा नाईलाज झालेला आई- बाबांसमोर, त्यांच्या बोलण्यात आले. त्यांचा त्यांच्या त्या सो कॉल्ड समाजाचा विचार केला ,…. आणि … आणि '
'आणि तनुलला चक्क तुझ्या घरच्या लोकांसमोर अपमानित केलंस, तुझ्या आईने नको नको ते काय काय घालून पाडून नाही बोलून घेतलं त्याला….  आणि तू … तू गप्प होतीस ? घरच्यांनी अपमानित केलं म्हणून नाही ग तो दुखावला … तुझं वागणं … तुझं वागणं दुखावून गेलं त्याला, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय काहीही सुचायचं नाही त्याला तुझ्या सुखासाठी, चैनीसाठी पैसा हवाय त्याला म्हणून नौकरी साठी धडपडत राहिला तो … तीच जगण्याचं एकमात्र माध्यम असणारी त्याची जिवलग त्याला ऐन वेळेवर निघून जा सांगते?? मी माझ्या पालकांच्या शब्दाबाहेर नाही अस बोलते…. तुझा माझा संबंध नाही यापुढे … मला विसरून जा म्हणते?? …. कसं , कसं जमलं गं हे सर्व तुला? '

 'श्रेयस अरे मला कळलंच नाही रे हे सर्व कसं घडून गेलं, मी घाबरले होते… त्याच्या जीवाला काही नको व्हायला होतं मला …  मला वाटलं तनुल सावरेल स्वतःला … पण काल संध्याकाळी हे सगळं घडल्यापासूनच त्याचा काहीच पता नाहीये, तो फोनही उचलत नाहीये, त्याच्याशिवाय जगण्याचे हे काही तास मी मरण यातना सहन करतेय…. माझा तनुल मला परत कर रे … सांग एकदा तो कुठे आहे ? सुखरूप आहे तो बोल एकदा … एकदाच हवं तर' 

'अगं जा~~ गं, तुझ्या कुठल्याच शब्दांवर आता विश्वास ठेवावा वाटत नाही…. फक्त तनुलचंच नाही माझं अन ओवीचहि मन तोडलंय तू… तनुल चे अश्रू बघवले नाही आम्हाला त्याला एकांत हवा होता म्हणूनच त्याला तसेच सोडून निघून आलोय आम्ही सकाळी तृष्णेवरून …. त्यानंतर तर त्याने आमचाही फोन उचलला नाहीये. …… हेल्लो … ह … हेल्लो श्रावणी'

श्रावणी ने फोन ठेवला होता … तिला आता निव्वळ तृष्णा दिसत होती. अंगावरल्या घरच्याच कुर्त्यावर तिने नुसताच स्कार्फ ओढून घेतला, खोलीच्या दाराबाहेर पडतांना टेबलवरच्या गाडीची किल्ली उचलुन घेतली आणि 'कुठे निघालीस' अस विचारणाऱ्या आईच्या एकही शब्दाला उत्तर न देता धावतच घराबाहेर पडली. 

'तृष्णा'  तनुल-श्रावणीचा आवडता स्पोट. एका चौकोर तलावाच्या मध्यभागी हिरवाई असणारी बाग, छोटेखानी बेटंच जणू … तिथल्या पुलावरील तालावाशेजारच्या झाडांच्या सावलीतल्या दगडांवर बसायला फार आवडायचं तनुलला…श्रावणीची वाट बघत आणि ती उशीरा आल्यावरही न रागावता तिचा हात हातात घेऊन तासान तास  बसायचा तो तिथे. 

 तो पूल ते एकावर एक रचलेले दगड श्रावणीच्या डोळ्यासमोर गिरक्या घेऊ लागले.  १५ KM दूर … पण श्रावणीच्या डोळ्यांना आणि गाडीच्या चाकांना आज वेग लागला होता. दोघांनाही काही केल्या थांबता येईना…. तृष्णेवर  पोचायला लागेल तेवढा संपूर्ण वेळ तिच्या भरलेल्या डोळ्यासमोर तनुल दिसत राहिला, आपल्या चेहेर्यावर एक स्मित दिसावं म्हणून धडपडणारा तनुल…. सालस -समंजस-हुशार तनुल, मित्रांमधला लाडका तनुल … आई-बाबांनी एवढा अपमान केल्यावरही एका शब्दानेही त्यांना उलट न बोलणारा तनुल …. मी आई बाबांचं ऐकायचं ठरवलंय अस सांगितल्यावर मौन झालेला आणि दुखावला गेलेला तनुल.' 

ती तृष्णेवर पोचली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. दिवसभर तापलेलं उन्ह उतरणीला आलेलं. पश्चिमेला जरा जरा तांबड फुटलं होतं. आणि तृष्णे वरून वाहणाऱ्या वाऱ्यांत जरा गारवा जाणवत होता…या कशातही लक्ष नसणाऱ्या श्रावणीचे डोळे फक्त तनुलला शोधत होते. मिळेल त्या जागेवर गाडी पार्क करून ती धावतंच आत शिरली. पुलापर्यंत जायला आणखी पाच मिनिट लागणार होते. तेवढा त्राणही आता तिच्यात उरला नव्हता. ती पोचली पुलावर तिची नजर भिरभिर शोधत राहिली तनुलला …. पण नाही … नाही दिसला तनुल. नजर जाइल तिथपर्यंत शोध घेऊन झाला आणि श्रावणीचे उरले सुरले सगळेच धैर्य खचले. ती गुढग्यांवर मट्टकन  खाली बसली …. आणि 'तनुल~~ ' अशी आर्त हाक घालून हुंदके देऊन रडू लागली. वातावरणात प्रचंड शांतता, पाण्यावरून वाहणाऱ्या हवेचा हलकासा हुंकार आणि हुंदक्याचा आवाज ……….  

……… शाणु 

श्रावणी च्या कानावर शब्द पडलेत तिने मान उचलली …. पुढ्यात तनुल उभा होता. त्याला बघून ती अधिकच हुंदके देऊन रडू लागली. 

तनुलच्या डोळ्यातूनही टपकन थेंब ओघळला गालावर …. त्याने दोन्ही हात पुढे केले अन भरल्या डोळ्याने स्मित दिले तिला … 

क्षणाचाही विलंब न करता श्रावणी धावतच कुशीत शिरली त्याच्या …….          




(सकाळ जळगाव एडिशनच्या 'शब्ददीप 2016' दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा.)   


Saturday, 14 November 2015

भरून आलेले आभाळ पहिले कि
पावसाचे अंदाज बांधतोस तू ..
वेधशाळेच्या बड्या कारभारावर
तिरकस ताशेरे ओढतोस तू...

माझं मनाचं आभाळ ओसंडू लागूनही
कळत नाहीत अंदाज तुला
बुद्धीच्या खुळ्या कारभारावर
भावनांची गळचेपी करतोस तू

सगळं समजल्याचा आव आणू नकोस
नाहीच कळत काही तुला ...

Wednesday, 11 November 2015

गिमिक...



''hey ! gd mrng mom..HANDA MU TC :)'' रमा काकूंचा जर्मनीला असणाऱ्या मुलाचा रोज सकाळी मेसेज येतो. सकाळची सुरुवात अश्या कुठल्याश्या गुंतलेल्या शब्दांच्या एसेमेसने होते. मुलाला सांगू वाटणाऱ्या सगळ्या भावना अश्या थोडक्या शब्दात पुरत्या तो आईपर्यंत पोचत्या करतो अगदी छानश्या स्माईली सकट. आता हे रोजचंच झालंय रमा काकुंनाही पत्राऐवजी आता हेच सोयीचं अन 'कु~~ल' वाटायला लागलंय. हि आजच्या पिढीची सांकेतिक भाषा. आता वाटलं तर भावना समजून गोड मानून घेता येते नाहीतर नुसताच गुंता समजून गुंडाळूनही ठेवता येते.… मला आमचं लहानपण आठवतं. आपण बोलतोय ते सगळ्यांना कळू नये म्हणून आम्ही भावंड काही निवडक जिवलग मित्रांसोबत मिळून स्वतःची भाषा तयार करायचो. शब्दांची मोडतोड, काही शब्दांची गुंतवणूक ,शब्द्फोड आणि लहेजा (टोन) बदलून आम्ही आमच्यात संवाद साधायचो. 'च' ची भाषा. रफरची' भाषा, उलटशब्दी किंवा 'म' ची भाषा अश्या अनेक सांकेतिक भाषा हि त्यांची जाहीर उदाहरणं. पण तेव्हा मोठ्यांच्या दुनियेत त्याची ती स्वीकारार्ह कि अस्वीरार्ह अशी जाहीर चर्चा होत नसे. बाललीला समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाई. आजच्या तरुण पिढीनेही त्यांना समजेल अशी अन उमजेल अशीच त्यांची त्यांच्या सोयीची अशी शोर्ट शाब्दिक भाषा तयार करून घेतली आहे तिला 'slang' असे म्हणतात. जी एसएमएस, व्हाटसअप, फेसबुक, ट्विटर सारख्या कुठल्याही सोशल मिडियासाठी वापरली जाते. 'इतकं हसायला येतंय कि मी हसून हसून जमिनीवर लोळायला लागलेय' असं लांबच्या लांब वाक्य म्हणण्यापेक्षा चार अक्षरांचं ROFL ( Rolling On Floor Laughing) किंवा तीनाक्षरी LOL (laughing out loud) म्हणणे त्यांना जास्त सोयीचे वाटते. यातून कमी शब्दात भावना पुढल्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवता येतात आणि मर्यादित जागेत संपूर्ण कथाही ऐकवता येते.


सोशल मीडियाचा परिणाम आज जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करतोय. नाण्याला दोन बाजू असतात तसे या माध्यमाला देखील आहेत. सोशल मिडीयाचा वापर कुणी कशासाठी करावा हे व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे. माध्यम चांगली किंवा चुकीची नसतात त्याला स्वतःचे गुणावगुण नाहीयेत ते व्यक्तीसापेक्ष आहे. पण भाषेच्या बाबतीत म्हणाल तर आजची नवपिढी वापरत असलेली सांकेतिक भाषा पाहिली आणि त्यांच्या पिढीची गरज ओळखून ते वापरीत असलेली साधनं म्हणजेच सोशल मिडिया हे आजच्या पिढीला मिळालेलं खणखणीत नाण ठरत. भाषा कधीच स्थायी नसते इतिहास पाहिल्यास लक्षात येते कि पिढीनुरूप आवश्यकतेनुसार भाषेत सोयीस्करपणे बदल घडत आले. फरक इतकाच कि आता ती पूर्वीपेक्षा जास्त गतीने बदलते आहे आणि हा बदल कुठलीही आडकाठी न आणता ना-नुकुर न करता आजच्या नव्या अन कालच्या युवा पिढीने हसत स्वीकारली आहे.


गेल्या पिढीत म्हणजे आमच्यावेळी अगदीच पाच-सात वर्षाआधी पर्यंत ...(हल्ली ज्या गतीने पिढींचे वागणे-बोलणे, आवडी-निवडी आणि विचार बदलतात त्या अनुषंगाने Generation Gap आता एवढ्याच वर्षांची झालीये म्हणलं तर वावगं ठरणार नाहीं) बालसुलभ गमती सोडल्यातर तरुण पिढीला प्रत्येकाला स्वतःचे असे भाषेचे स्वधर्म नसायचे तेव्हा भाषेचे दोनच प्रकार आम्हाला माहिती होते. एकतर 'बोलीभाषा' अन दुसरी शास्त्रशुद्ध, चौकटीतली मान्यताप्राप्त, साजूक तुपातली पुस्तकी 'प्रमाण' भाषा. यात अगदी ठप्पा मारून ठरवून दिलेली भाषाच वापरायची असा अलिखित कायदा असायचा. तुम्हाला तुमच्या मताचे स्वतः तयार केलेले शब्दांचे विविध वर्शन वगैरे वापरणे संस्कार बाह्य होते किंवा मग तसे काही करता येते अशी आईडियाची कल्पना एखाद्याच सुपीक डोक्यात त्यावेळी आलेली असणार. भाषेचा संबंध जाती-धर्माशी किंवा संस्काराशी जोडला जायचा. जन्मापासूनच बाळाच्या मानसिक जडणघडणीचा प्रवास असा भाषेपासून सुरु व्हायचा. पुढे भाषेची अनेकविध स्थित्यंतरे घडत गेली. खरतर भाषा हे माध्यम आहे संवादाचं ते साध्य नाहीये. साध्य गाठण्यासाठी, अविर्भाव व्यक्त करण्यासाठी किंवा विचार पोचवण्यापुरता तिचा उपयोग केला जात असेल तर ती कश्या पद्धतीने वापरली जाते आहे ह्यावर पिढ्यानपिढ्या इतका काथ्याकुट करणं कितपत योग्य आहे हा चर्चेचा विषय असू शकतो .. नाकारायचा मात्र नाही.


आज संपर्काचं लोकप्रिय माध्यम म्हणजे सोशल मिडिया. त्यात आजची तरुण पिढी तर या माध्यमाने भारावून गेली आहे. तो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहिला आहे. सतत सायन्स ऍण्ड टेक्‍नोलॉजीत वाढणारी आजची युवा पिढी Gadget च्या नावाखाली हातातल्या घड्याळीपासून ते मोबाइलपर्यंत सतत टेक्नोलोजीच्या संपर्कात असते. जन्मापासून सुरु होणाऱ्या आयुष्याच्या धावपळीत वाढती कामे, अभ्यास,स्पर्धा आणि यासर्वात कमी पडणारा वेळ यात ताळमेळ बसवतांना त्यांची तारांबळ उडते. अश्यात समाजाशी जुळून राहण्यासाठी, अध्यायावत राहण्यासाठी आणि त्यांच्या विचारांच्या देवाणघेवाण संबंधी संपर्काच माध्यम म्हणून त्यांनी हा सोप्पा सरळ मधला मार्ग शोधून काढलाय. आता तर शब्दांसोबत काही इमोटीकॉन्सही संवादाला मदत करतात हसणे, रडणे, हाव-भाव, थम्सप- थम्सडाऊन एवढेच नाहीतर गिफ्ट्स, केक, फुगे, प्राणी, पाऊस, खाणे वगैरे चित्र रुपात वापरता येतात. या तरुण पिढीच्या तरुण भाषेला त्यांच्या जीवन प्रणालीला नावे ठेवणाऱ्या महानुभावांनी एकदा हा बुद्धिवादी संवादाचा खेळ खेळून बघावा शेवटी काय आपल्या माणसाला समजून घ्यायला मौनाची भाषाही पुरते असे आपण मानतोच ना … मग मनापासून या पिढीच्या मनापर्यंत पोचायला या एसेमेस च्या भाषेचा गोडवाही चाखूया आणि त्यांच्यातलेच एक होऊन पाहूया. काय माहिती जनरेशन मधील हि gap अशीच भरून निघेल.


रश्मी(c)
१८ ऑग. २०१५



('दैनिक सकाळ' २०१५ ''सोशल मिडिया विशेष'' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...