Thursday 19 June 2014

पटतंय का बघा ....

पर्वा पर्यंत प्रणव दवाखान्यात भरती होता...अवघ्या १०-१२ वर्षांचा असेल...सायकलीने घरी येत असतांना कुण्या तरुणीने भरधाव गाडीने सायकलीला कट लावला प्रणव रस्त्यावर पडला आणि पायावरून मागाहून येणाऱ्या कारचे चाक गेले ...'मल्टीपल फ़्रेक्चर' झाले आणि हा चिमुकला महिन्यांपर्यंत दुखणे सहन करत राहिला....काही महिन्यात प्लास्टर निघाले पण जन्माचे दुखणे मात्र पाठी लागून राहिले....श्वेता मुलाच्या शाळेतून 'पालक शिक्षक मिटिंग' करून परत येत होती , मेन रोड वरून शंभर एक पावलांच्या अंतराने आत तीच घर. पूर्ण घरापर्यंत ऑटो नेण्यापेक्षा इथेच उतरू म्हणजे तेवढच आपलं चालणं होत. म्हणून रोडवरच उतरली आणि घराच्या दिशेने चालू लागली. मागून येणाऱ्या भरधाव बाइक ने एवढ्या जोरात धडक दिली कि श्वेता उंच उडून कितीतरी दूर फेकली गेली...काय होतंय हे समजायच्या आत अंशतः शुध्द हरपली. जाग आली तेव्हा घोळका भोवती जमा होता. धडक कोणी आणि कशी दिली हे समजण्याची तिची मानसिकताच नव्हती....तिला दवाखान्यात नेले  तेव्हा तिच्या डोक्यात ब्लडक्लोट्स झाले होते आणि चेहेऱ्यापर्यंत रक्त उतरले होते..शरीराला प्रचंड मूक घाव होते...घरातल्या सर्व जवाबदार्या सांभाळणारी आणि लहान मुल असणारी श्वेता यानंतर जवळ जवळ ४ महिने डोक्याच्या  आणि शरीराच्या  मरणप्राय वेदना सहन करत राहिली.  आणि तिच्या सोबतीने तिची चिमुकली सुद्धा  सफर होत राहिली......
अनुराग वयवर्ष १८ च्या घरात, सरळ मार्गाने वागणारा ..परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण वर्ष मरमर करत अभ्यास करणारा अनुराग ..संध्याकाळी क्लासवरून घरी निघालेला...सकाळ पासून उपाशी, पोटात भुकेने कावळे ओरडत होतेत.. तसे आईला फोन करून सांगितले होते... .. आई सुद्धा घरी आतुरतेने वाट पाहत होतीच .....कुणाच्या तरी क्षणिक आनंदाखातर भरधाव वेगात घेऊन जाणार्या आणि मस्तीच्या धुंदीत सिग्नल तोडून पळू पाहणाऱ्या बाइकच्या आवाक्यात आला...अतिशय हुशार आणि भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा अनुराग तीन महिने कोमा मध्ये होता..अनेक ठिकाणची हाड तुटलेली..अनेक लाइफ़ सेविंग ऑपरेशन नंतर अनुराग जीवाने वाचला पण त्याचा स्मृतीभश झाला..आजही अनुराग नीट बोलू शकत नाही आपण बोललेले त्याला कळत नाही, क्षणात आपली माणसं तो ओळखतो तर क्षणात तीच लोक अनोळखी असल्या सारखा वागतो...त्याच्या अभ्यासच आणि भविष्याच काय झाल असेल हे तर वेगळे सांगणेच नको....
आताच परवा परवा शंकर नगर मध्ये दोन तरुणांना आपल्या चारचाकी गाडीखाली तुडवणारया दोन तरुणी कदाचित बेल वर सुटून घरी पालकांसोबत परत नॉर्मल आयुष्य जगू लागल्या असतील  पण त्या दोन तरुणांच्या घरचे मात्र कायमचे त्यांच्या अपत्यांना मुकले...त्यांचे दुःख बोलून दाखवण्या इतके सोप्पे तर नक्कीच नाही...
वर्षभरापूर्वी असेच दहा दिवसा पूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा दोन चाकी गाडीखाली येउन मृत्यू झाला...पोरगा जीवाने गेला आणि नवे स्वप्न डोळ्यात साठवून आलेल्या त्या नव्या नवरीवर काय आघात झाले असेल कल्पना सुद्धा करवत नाही.....शाळेतून परत येणाऱ्या ६-८ वर्षीय दोन सक्ख्या बहिण-भावांना गाडीने धडक देऊन त्यांचा अंत आणणाऱ्या त्या इसमाला खरच काहीच वाटत नसेल का आज...त्या दोघांचे आई-वडील मात्र कसे दिवस रेटत असेल विचार सुद्धा भयंकर वाटतात.....
कस असतं ना....कुणाच्या तरी मस्तीसाठी, क्षणभर दाखवू पाहणाऱ्या स्टाईल साठी किंवा मग क्षणभर होणार्या विलंबासाठी कोणता दुसरा जीव कायमचा लाचार,अपंग होतो..वेदनेच्या गर्तात जन्मभर डुंबून जातो, त्यांच्या भविष्याचे स्वप्न धुळीला मिळतात किंवा काही कायमचे आपल्या माणसांपासून दूर निघून जातात......छोट्याश्या मस्तीने त्या चालकाला तरी काय मिळवून दिले ना?? अश्या प्रसंगानंतर कुणीही स्वस्थ, शांत जीवन जगू शकत असेल काय ?...
मित्रांनो...आपल्या आई-वडिलांनी महेनतीच्या पैशात आपल्याला घेऊन दिलेली वाहने आपल्या सोयीसाठी आहेत....कोलेजला, क्लासेस ला, कामावर जातांना आपल्याला त्रास होऊ नये हा त्यांचा उद्देश...पण आपण कुठेतरी भावनाशुन्य होऊन वागू लागतो, वेगळेपणा दाखवायला, स्टाइल म्हणून किंवा इम्प्रेशन टाकायला आपण जे करतोय त्याने कुण्या चिमुकल्याचा..एखाद्या आईचा किंवा कुणाच्या एकुलत्या अपत्याला जीव गमवावा लागावा हि अतिशय दयनीय, निंदनीय आणि दुखद घटना आहे...अशी घटना आपल्या हाताने घडावी??..आपण सुद्धा अशा घटनेनंतर सुखाने जगू शकत नाही.....म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे...आपले तारुण्य, अंगात असलेल्या कला आणि स्टाइल चांगल्या कामासाठी वापरावी पण ज्यात कुणाचे नुकसान होणार असेल...कुणाला वेदना मिळणार असतील अश्या देखाव्यात काहीही मोठेपणा नाही हे समजून घेतले पाहिजे ....
तुमची इतरांबद्दलची संवेदनशीलता, नम्रता, प्रेमळ स्वभाव आणि केअरिंग असणेच तुमचे वेगळेपण सिध्द करते ...हे असे असणे म्हणजेच तुम्ही नुसते वेगळे नाहीतर चांगले सुद्धा आहात आणि यातूनच इतरांवर इम्प्रेशन पडत असतं ....चांगुलपणाचे इम्प्रेशन लास्टलॉंग ठरत असतं ...तेव्हा स्टाइलीश होण्यापेक्षा केअरिंग होऊया ...सुपरफास्ट होण्यापेक्षा संवेदनशील आणि नम्र होऊया.....अस वागणंच  आपलं वेगळेपण आणि आपले संस्कार सिध्द करतील आणि समाजात होणारे अपघात किंवा इतर अनेक चुकीच्या गोष्टींचा पायंडा न बसता चांगल्या संस्कारित गोष्टींचे बीज रोपण आपल्या तरुणांच्या हातून घडत राहील........मोठे लोक सांगतात ते ऐकतांना समजून न घेतल्यास ते समजण्यासाठी एखादा अनुभव घडून यावा असे घडणे हिताचे नाही....हे आपल्या हाताने घडणे किंवा मग आपल्याच बाबतीत घडणे दोन्ही बाजूने दुखदच आहे....तेव्हा या वळणावर थांबून जरा विचार करूया आणि आत्ता याक्षणापासून समजून उमजून वागूया.........   


(सकाळ 'युवा' च्या विदर्भ आवृत्तीत दि. ०१ एप्रिल १४ ला प्रकाशित माझा लेख) 

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...