Tuesday 17 June 2014

लग्न :- सर्वांग सुंदर सहप्रवास


लग्न म्हणजे दोन जीवांचा दोन मनांचा दोन परिवारांचा आनंद सोहळा. दोन संस्कृतींना एकत्र एका धाग्यात बांधू पाहणारी समाजाने निर्माण केलेली व्यवस्था. लग्न दोन भिन्न विचारधारांना सामंजस्याने एकाच वाटेवरून चालायला लावणारी आयुष्याची पायवाट. हिंदू संस्कृतीप्रमाणे सोळा संस्कारातील एक संस्कार.  स्त्रीपुरूषांमध्यें कायदेशीर प्रकारानें पतिपत्नीचें नातें निर्माण करून त्यांच्यामधील शारीरिक, धार्मिक व नैतिक संबंध निश्चित करणारी पध्दति म्हणजे विवाह होय. विवाहानंतर दोन लोकं एकत्र येतात एकत्र जगू लागतात त्यातून कुटुंब तयार होतं आणि समाजाचा प्रवाह अखंड रीतीनें वाहता राहण्यास मदत होते. पण म्हणून लग्न म्हणजे काही निव्वळ सामाजिक आणि शारीरक अनुबंध मात्र नाहीये. विवाह म्हणजे निव्वळ स्वप्नील, सुंदर,रम्य आयुष्य नाही प्रत्येक मनुष्यात उणीवा आहेत कुणीही परिपूर्ण नाही आणि या उणीवा समजून घेऊन एकमेकांच्या अपुर्णत्वाला आपल्या गुणांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हीच लग्नाची खरी सुंदरता.  विवाहानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या अनुषंगाने ग्रहण करावयाची समजदारी 'लग्नसंस्थेचा' हा मुख्य गाभा आहे. वरवरचं रंग-रूप, पैसा श्रीमंती या सर्वांनी संपूर्ण आयुष्य सुखमय होऊ शकत नाही. आयुष्याला हवी असते ती अंगीभूत गुणांची संपत्ती संस्काराची शिदोरी ती भरून असेल तर कृत्रिम आणि तात्पुरत्या सुखाचा हंडा स्वबळावर भरायला वेळ लागत नाही. म्हणून लग्नाच्या मंडपात आधी या गुणांना पारखून घेणे महत्वाचे आहे.       

 कधीतरी प्रत्येकाला लग्न करायचंच असतं तसा अलिखित नियमच आहे जगायचा इथे . मग कुणाबरोबर तरी जीवन घालवायचेच असेल आणि त्या व्यक्तीच्या गुण-दोषाबरोबर जगायचेच असेल तर ते गुण आणि दोष पारखून घेऊन का निवडू नये ? कुठल्या तरी दोषांबरोबर तडजोड करायचीच असेल तर ते असे असावेत ज्यामुळे अगदीच संपूर्ण आयुष्यावर फरक पडणार नाही. किंवा असे गुण स्वीकारू नयेत जे काही दिवसात संपुष्टात येणार असतील. आणि मग आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येईल. एखादा व्यक्ती  फार श्रीमंत नसेल, फार देखणा नसेल तरीही आयुष्य चालू शकेल पण देखणं असूनही चरित्र्यशिल नसेल, व्यसनी असेल तर मात्र त्या तात्पुरत्या टिकणाऱ्या गुणांशी आयुष्य निभावणं कठीण होऊन बसतं. 

असं म्हणतात लग्न जुळवतांना मुलाचा खिसा पहिला जातो आणि मुलीचा चेहेरा. पण हे जरा विनोदीच नाहीये काय ? मुलाच्या खिशात आज असणारा पैसा आणि मुलीच्या चेहेर्यावर आज दिसणारं सौंदर्य चिरकाळ आहे ह्याची काय शाश्वती ? उद्या मुलाचा पगार वाढत जाणार आणि मुलीचे सौंदर्य ढळत, किंवा कदाचित अगदी ह्याच्या उलटही घडू शकेन,  मग पुढे काय ?? मग काय बघावं तर 'अंगात रग' असणारा पुरुष जो कधीही कुठेही गेला तरी निदान आयुष्यात कधीही रस्त्यावर येऊ देणार नाही, दोन वेळचं जेवण मिळत नाहीये निदान अशी वेळ, अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही.अगदी काहीही झाले तरी पुरुषी आधार बनून पूर्ण साथ देईल. आणि पुरुषानं स्त्री मध्ये काय बघावं तर 'समाधान' कमी जास्त कुठल्याही परिस्थितीत स्वतः तग धरून उभी राहून सोबत करणारी अन परिवार सावरून घेणारी अशी जीवनसंगिनी. 

 याबरोबर दोघांचेही शिक्षण महत्वाचे. आपल्या देशात मुलं नौकरी मिळावी आणि त्या नौकरीच्या भरवशावर चांगली मुलगी मिळावी म्हणून शिकतात तर मुली चांगली नौकरी करणारा, शिकलेला मुलगा मिळावा म्हणून शिकतात. खरच शिक्षणाचं एवढंच मोल आहे, एवढंच औचित्य ?? शिक्षण स्वतःकरता घ्यायचं आहे स्वतःला अधिकाधिक प्रगल्भ बनवण्यासाठी आणि झालंच तर पुढे आपल्या हातून घडणाऱ्या नव्या पिढीला वैचारिक आणि बौद्धिक दृष्टीकोन देता यावा या उद्देशाने शिक्षण घेतलं तर शिक्षण घेतल्याचे उद्देश कधीच संपुष्टात येणार नाही औचित्य संपणार नाही. घेतलेलं ज्ञान सतत स्वतःस आणि पर्यायाने समाजास कामी येत राहील किंबहुना वाढीस लागत राहील.     

विवाह जुळल्यानंतर घरातली मोठी मंडळी अनेक कामांच्या तयारीला लागतात. विवाह किती धुमधडाक्यात करायचा, किती किती आणि कोणा कोणाला बोलवायचं, लग्नाचा हॉल, दागिने , मुला-मुलीचा कपडा, डेकोरेशन सगळंच कसं उंची आणि तोलामोलाचं असावं, जेवणाचे पदार्थ किती जास्तीत जास्त आणि वेरायटी असावेत हे आणि काय काय पण या सर्वांवर वेळ आणि पैसा घालवतांना हीच मोठी मंडळी मुलांचे पुढले आयुष्य कसे चांगले जावे, त्यांनी एकमेकांना किती आणि कसे समजून घ्यावे, आल्याच अडचणी तर त्यांना कसे सामोरे जावे? एकदिवसाच्या धुमधडाक्याच्या पलीकडे आयुष्य एकमेकांसमवेत जास्तीत जास्त सुखी आणि आनंदी करण्यास काय प्रयत्न करावेत आणि त्याहीपलीकडे लग्न ग्रेसफुली कसे टिकवावे या सर्व बाबी बोहल्यावर उभ्या मुला मुलींना सांगण्यास पुढे होऊ धजतात काय ?? या सर्व गोष्टींचा जरा थांबून विचार करायला हवा नुसतेच लग्न लावून देऊन मोकळे होता येत नाही. जबाबदारीने जबाबदारी निभावायला शिकवणे हि सर्वात महत्वाची जबाबदारी दुर्लक्षित राहू नये यासाठी प्रयत्न केले जायलाच हवे. 

सरते शेवटी काय तर विवाहात उपस्थित इतर सर्व मातृतुल्य पितृतुल्य आणि मित्र मंडळी हे शुभेच्छा अन सदिच्छा देण्यासाठीच आलेले असतात. उभयंतानी आता पुढील आयुष्यात अतिशय आनंदपूर्ण सहजीवन घालवावं हा एकमेव उद्देश सर्वांच्याच मनात असतो त्या सदिच्छा मनात साठवून आणि या संपूर्ण आनंदाचा ठेवा कुपीत घेऊन वर-वधूंनी नवं आयुष्याची आनंदाने सुरुवात करावी स्वत्व जपूनही जोडीदार आणि परिवार यांच्यात संपूर्ण एकांगी होऊन एकत्र जीवनाला नवा आयाम द्यावा… दोघांच्या मध्ये कुठेही अहं भावना न येऊ देता अहंकार आणि स्वार्थ यांना दूर दूर पर्यंत स्थान न देता सहजीवन सुखकर करण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत राहायचा. विवाह म्हणजे एका दिवसाचा उत्साही उत्सव नाही तर आयुष्यभरयाचा सर्वांग सुंदर सहप्रवास आहे. या प्रवासाठी उत्सुक असणाऱ्या किंवा निघू घातलेल्या सर्व प्रवास्यांना मनःपूर्वक शुभेच्छा .   


(सार्वजनिक विवाह संस्थेच्या नागपूर आवृत्तीतून प्रकाशित लेख)

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...