Thursday, 19 June 2014

मोठ्ठ होण …. म्हणजे !!



शेजारच्या घरी गेले दोन दिवस तणाव दिसत होता…शुभम पण जरा फुगलेलाच होता रोज मजल्यावर खेळायचा तो कालपासून दिसलाच नाही … काय होतंय कळत नव्हते पण विचारणार कसे ?…. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या घरात आवाज वाढला. शुभम च्या आईचा रडायचा आवाज येत होता आणि त्याच्या बाबांची त्याला आणि त्याच्या आईला उद्देशून बडबड सुरु होती…. असे कधीही यापूर्वी त्यांच्या घरी झाले नव्हते… माझा धीर सुटलाच जेव्हा शुभम धाडकन दरवाजा आदळून घराबाहेर पडला आणि तंनतनत  एवढ्या रात्री घरातून चालता होऊ लागला … नेमकं काय होतंय हे विचारायला मी त्यांच्या दरवाजावर थाप देणारच होते तोच शुभम बाहेर पडतांना दिसला आणि त्याच्या मागाहून त्याची आई डोळ्यात अश्रू घेऊन…शुभम तनफनत निघून जाणार तोच मी त्याचा हात धरला आणि त्याच्या आईकडे प्रश्नार्थक नजर टाकली…. 'अग बघ न हा कस वागतोय आमच्याशी …. काल पासून जेवला सुद्धा नाहीये ' एवढच बोलून त्यांनी डोळ्याला ओढणी लावली….
मी नजेरेनेच वहिनींना शांत होण्यास सांगितले आणि शुभम चा हात धरून माझ्या घरात घेऊन आले …. आतून दार लावून घेतले…. शुभम अजूनही रागाने संन होता माझ्या इशाऱ्यावर तो बसला सोफ्यावर काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हताच, मी पाणी आणले तो नाही म्हणाला तरी प्यायला सांगितले…. पाणी पिउन थोडा शांत झाला पण बोलायला तयार नव्हता …. 'काय खातोस? जेवलास का? का जेवला नाहीस? तुझ्या आवडीची पनीर भुर्जी केलीये जेवणार का?' अश्या साध्या साध्या बोलण्या नंतर शुभम जरा नॉर्मल झाल्याचे जाणवले…. त्याने थोड खाउन घेतले आणि धीर सोडून मी विषयाला हात घातलाच….

शुभम ने यंदा दहावीची परीक्षा दिली होती पुढल्या वर्षात कुठल्या क्षेत्रात पाउल टाकायचे, कोणत्या कॉलेजला जायचे हि सर्व आपल्या आईबाबांचे टेन्शन्स असे समजणारा शुभम…. त्याला स्मार्ट फोन सारखा लेटेस्ट अड्वांस फोन हवाय म्हणून दोन दिवसांपासून हट्टाला पेटला होता …. एवढ्या लहान वयात हे सर्व नको नाहीतर त्याचे अभ्यासातून लक्ष कमी होईल म्हणून मुलांचे असे लाड पुरवायचे नाही इति शुभम चे बाबा …. आणि आई दोन्ही बाजूने कोंडी झाल्याने भ्रमात अडकलेली ……

'अरे पण शुभम स्मार्ट फोन वगैरे हवाय कशाला रे एवढ्यात… तुला आता पुढे वेळ तरी कितीसा मिळणार? .... क्लासेस, कॉलेज आणि अभ्यास खूप काही असेल करायला फोन हवा पण सध्या साधा फोन वापर वेळ आली कि देतील रे बाबा स्वतःच घेऊन ' इति अस्मादिक
शुभम ' असं कसं म्हणतेस माझ्या सर्व मित्रांकडे महागडे फोन आहेत शिवाय आईपाड, घरी पर्सनल लापी हे सगळं वेगळं…माझाकडे साधा स्मार्टफोन असू नये …. मी मोठा झालोय आता कधीपर्यंत मोठ्यांचच ऐकायचं ?'

'मी मोठा झालोय … किती काळ मोठ्यांचच ऐकायचं?" त्याच्या या प्रश्नाने मी जरा स्तिमितच झाले...
मोठे होण्याच्या या मुलांच्या कल्पना किती भ्रामक आहेत …
मोठे होणे म्हणजे फक्त मनासारख्या वस्तू बाळगणे, हक्क गाजवणे, मोठ्यांचे ऐकायचेच नाही किंवा मग रागराग करणे एवढाच होतो ?
मोठेपणाला आलेल्या जवाबदार्या, निभावायला लागणारे कर्तव्य, वागण्यातला मेचुअर पणा हे काहीच यांच्या लेखी महत्वाचे नाही ?

आमच्याच सोसायटीची श्रुती तिचाही नूर वेगळाच होता…. मोकळे केस, घुटण्यापर्यंत स्कर्ट हाताशी गाडी आणि सतत मोबाइल
ला चिकटून आईने जरा काही सांगायला गेले कि 'तुला यातलं काय कळतंय… तू तुझ काम कर… मी आता लहान राहिलेले नाही मला कळतं मी काय करायला हवं ते ' असा सूर …. वेळी अवेळी मित्र-मैत्रिणींचे फोन … मुलगी घरात असूनही आई सतत एकटी पडलेली आणि मुलगी घरात एकटी बसलेली असली तरी सतत फ्रेंड्स ने घेरलेली ……

कपड्यांवर आक्षेप घेऊ नये म्हंटले तरी कपड्यांमधून आलेल्या कल्चर वर वागण्यावर आक्षेप आहेच ना ? आणि का असू नये …. आपण अश्या युगाची, अश्या संस्कृतीची कल्पना तरी केली होती का ?….  कुठे जात आहोत आपण?? विकासाकडे, प्रगतीकडे कि पुन्यांदा अधःपतनाकडे …. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर,त्यांच्या जीवनशैलीवर तोपर्यंत कुठलीही तक्रार उठू शकत नाही जोपर्यंत ती मर्यादेच्या अखत्यारीत असेल… यात युवा पिढीही आलीच …. आता प्रश्न हा पडतो कि मर्यादा आखल्या आहेत कुणी ? माणसांनीच ना ? मग ते म्हणाले तसेच का वागावे ?

नाही मर्यादा या सहजासहजी कुणीतरी आले आणि आखल्या अस झालेलं नसतं वर्षानुवर्ष आलेले अनुभव त्यातल्या अडचणी चुकीचे परिणाम आणि त्यातून भोगाव्या लागलेल्या शिक्षा हे पाहता आपोआप पडत गेलेला पायंडा असतो …. आणि हाच पायंडा बरोबर आहे हे सांगणारे अनेक जिवंत, अनुभवी उदाहरणे आपल्या अवती-भोवती बघायला मिळतात. ….
हे आजच्या तुमच्या आमच्या पिढीने समजून घ्यायलाच हवे... 

आपल्या पालकत्वाचा अधिकार न गाजवता व्यापक दृष्टीने समाजाकडे बघण्याची वेळ आली आहे … आजच्या काळानुरूप मुलांच्या गरजा ओळखून पण चांगल्या वाईटाची ओळख योग्य वेळी योग्य वयात मुलांना व्हावी यासाठी पालकांनी दृष्टीकोन बदलावा आणि बऱ्या - वाईटाची, योग्य - अयोग्यतेचि समज परिपक्व व्हावी यासाठी मुलांनी देखील त्यांच्या दृष्टीकोनाची बाजू पालटून पहावी …. अपटूडेट राहन्यासाठी निव्वळ भंपक कपडे अन वस्तू कारणीभूत नसतात त्यासाठी त्या लेवल ची समज अन एडजस्टमेंट करण्याचे कसब अंगी भिनले पाहिजे …

Maturity maturity म्हणतात ती दिखाव्याने येत नाही त्यासाठी समजदारी आणि बुद्धीचा योग्य ताळमेळ हवाच …. पण त्याही आधी पाल्य आणि पालकांमध्ये संबंधांचा योग्य ताळमेळ असणारा पूल बांधायला हवा …एकमेकांपर्यंत पोचणारा …त्यापलीकडे पार न करता येणारा …. नाही का ??    



(सकाळ 'युवा' च्या विदर्भ आवृत्तीत दि. २२ जुलै १३ ला प्रकाशित लेख  )

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...