स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत…. तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि से'… तुम्हाला ऑस्कर मिळाला त्याचाही आनंद झाला होताच पण आपल्या देशातला हा सर्वोच्च अवार्ड आपल्या आवडत्या कलाकाराला मिळावा यातला आनंद शब्दातीत आहे.
मानवी भावभावनांचे स्पंदन त्यांच्या लेखणीतून असे काही उतरते कि "सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो... प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो..हमने देखी है उन आंखों कि महेकती खुशबू" सुंदर कल्पना आणि सुरेख शब्दांची मेजवानी वर्षानुवर्ष अनुभवून आताशा गुलजार देशाच्या नसानसात भिनले होते, नाही भिनले आहेत आणि तसेच भिनले राहतील आणि असाच हृदयस्पर्शी मनोरंजनाचा तोहफा देऊन जगणे सोपे सुंदर करण्यास मदत करत राहतील. त्यांच्या शब्दात रंग आहे, गंध आहे, त्यांच्या शब्दांचे बादल बनतात, शब्दांतून तितलियां उडतात, प्रेयसीला ते गुलमोहर संबोधतात तर कधी फुल. गुलजार लिहित नाहीत ते जाणीवा जागृत करतात. एखाद्या व्यक्तीने काय काय करावं प्रत्येकाच्या मर्यादा असतातच हो, पण काहींना विशिष्ट शक्तींच प्राप्त असावी का ? कविता, कथा, दिग्दर्शन, गीत लेखन, गझल आणि हो 'खराशे'सारख्या नाट्यसंहितादेखील लिहाव्या हा चमत्कारच नाहीये का? त्यांनी दिलेला हा प्रचंड मोठा सुंदर खजिना आपल्याला अनेक कठीण मार्गातून मार्गक्रमण करतांना साथ देत आलाय, मरगळलेल्या मनाला पुन्हा फुलवून जगण्यासाठी बाध्य करत आलाय.
'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रातभर नही गुजरा' , ' दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन' किंवा मग'कहीं किसी रोज यूं भी होता, हमारी हालत तुम्हारी होती,जो रात हमने गुजारी मरके वो रात तुमने गुजारी होती
बडी वफा से …' प्रत्येकाच्या मनातली अस्वस्थता अशी स्पष्ट शब्दात मांडायचे कसब असू दे किंवा मग साधारण माणसांची काल्पनिक स्वप्न सत्यात उतरवावे असे हृदयस्पर्शी गीत गुलजारची लेखणी तुमच्या आमच्या मनातल्या वाटेने प्रवास करत असावी किंवा मग तुमच्या आमच्या विचारांच्या शाईने भरली जात असावी इतकी ती आपली वाटते.
दिल दर्द का टुकड़ा है, पत्थर की डाली सी है
एक अँधा कुवा हैं या, एक बंद गली सी है
एक छोटा लम्हा हैं , जो ख़त्म नहीं होता
मैं लाख जलाता हूँ, वो भस्म नहीं होता
माचिस फिल्म चे हे गाणे 'छोड़ आए हम वो गलियाँ' एकेकाळी प्रचंड गाजलेले. आजही मनाचा ठाव घेते. आणि अश्या सोडून दिलेल्या अनेक घटना मग आठवत राहतात. त्यांच्या शब्दात जादूच तशी आहे. 'चांद' हि गुलजार साहेबांची लाडकी उपमा त्यांच्या बऱ्याच गीतात तो कुठूनतरी झाकून बघतांना दिसतो, जाणवतो. अनेकांनी तर गुलजार आणि चांद असे समीकरणच असल्याचे संबोधिले आहे. चंद्राशी हे गुलजार चे नाते इतके जवळचे कि चांद म्हणजे लज्जा, चांद म्हणजे दिवा, चांद म्हणजे आत्मीयता आणि चांद म्हणजेच गीत सुद्धा….
'बदली हटा के चंदा, चुपकेसे झांके चंदा...'
जसे 'चांद' शी नाते तसे पाण्याशीही
'खामोश सा अफसाना पानी पे लिखा होगा, ना तुमने कहा होगा ना हमने सुना होगा' हे गीत असू दे किंवा मग जगजीत सिंग सारखा मित्र गमावल्यानंतर लिहिलेला शायराना अंदाज.
'आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतह पर टूटता भी है, डूबता भी है,
फिर उभरता है, फिर से बहता है,
न समंदर निगल सका इसको, न तवारीख़ तोड़ पाई है,
वक्त की मौज पर सदा बहता'
आहह! काय ते शब्द आणि कसल्या त्या प्रतिमा आणि उपमा फिल्मी गैरफिल्मी गझल, नज्म नाही तर 'कजरारे कजरारे' किंवा 'नमक इश्क का' सारखे आयटम सॉंग अगदी त्यांनी लिहिलेल्या त्या विशिष्ट जाहिराती सुद्धा त्यांनीच लिहाव्यात इतरांचे कामच नाही, काम सोडाच कम्पेरिझनच नाही. प्रत्येक नव्या कामातले नाविन्य आणि स्वतःचे वेगळेपण त्यांनी ठायी ठायी जपले आहे. आणि दिग्दर्शनाबद्दल तरी काय बोलावे एकसे बढकर एक संहिता माचिस, हुतुतू, आंधी, मौसम, अचानक, अंगूर, लेकीन, मेरे अपने, खुशबू, किनारा जेवढी नावं तेवढे विविध विषय तशी हाताळणी आणि म्हणूनच त्यांचा प्रत्येक सिनेमा गर्दी बाहेरचा ठरतो आणि पाहणाऱ्यांच्या आठवणीत जाउन विसावतो. त्यांच कुठलंही गीत नसावं तुम्ही आम्ही ऐकले नाहीये एकदा नाही अनेकदा. काही गाणी तर अजरामर गटातलीच ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' या गाण्याने तर सगळे रेकॉर्ड तोडले असावे इतके ते वाजले आणि गाजले. सगळ्याच पिढीला स्पर्श करणारे.
'एक सौ सोलह चांद की राते
एक तुम्हारे कांधे का तील...
गिली मेहंदी कि खुशबू
झूटमुट के शिकवे कुछ...!'
हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, बासू भट्टाचार्य या दिग्दर्शकांपासून ...सलील चौधरी, जयदेव, हेमंत कुमार, खय्याम आणि सर्वांत लाडका त्यांचा 'पंचम' आर. डी. बर्मन...यांच्याशी गीतकार म्हणून जमलेली जोडी...आत्ता तीच केमिस्ट्री नवा संगीतकार ए. आर. रहमान आणि विशाल भारद्वाज सोबतही आहे त्यांची. त्यांच्या शब्दांना वेळेचे, काळाचे बंधन नाही. पिढीशी जुळवून घेण्यासाठी धडपड करावी लागत नाही. त्या शब्दातच एक रुहानी ताकद आहे, पाण्यासारखे सगळ्यात मिसळून जाण्याची जादू आहे.
गुलजार साब तुमच्याबद्दल आणखी काय काय बोलावे आणि किती किती, तुम्ही म्हणजे निव्वळ वेड आहात आणि या वेडात जगायची सवय झालीये आताशा. तुम्ही असेच लिहित राहा आणि आमचे आयुष्य अधिक सुखद समृद्ध करत राहा ही सदिच्छा. आमचे जगणे जास्त सोपे अन सुंदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आम्हाला फार आभिमान आहे तुमचा.
(जुलै 2016 च्या 'एफसी रोड' या डिजिटल मासिकात प्रकाशित लेख)
वाह !
ReplyDeleteवाह!
ReplyDeleteप्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)
Delete