Monday, 26 July 2021

स्त्री-स्वातंत्र्याचा लढा कि तिढा ..

बाई, बुब्स आणि ब्रा' या आशयाची खळबळ माजवून देणारी, चर्चेला ऊत आणणारी आणि नेटकरांसाठी चर्वित चर्वणाला खाद्य पुरवणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिची एक फेसबुक पोस्ट अत्यंत वायरल झाली आणि पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर येऊन उभा राहिला. तिच्या एका व्हिडीओवरून सुरु झालेला हा वाद आता स्त्रीस्वातंत्र्याच्या विषयापर्यंत येऊन चिघळला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. ''स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,'' असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. सोशल मीडिया हा आजच्या खऱ्या जगाचा आरसा आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.. यावर वाहणारे चर्चेचे, ट्रेंड्सचे आणि ट्रॉलिंगचे वारे आजच्या पिढीच्या वैचारिक वळणांचे तंतोतंत प्रतिबिंब दाखवत असते. गेल्या दोन-तीन वर्षात 'हैशटैग मी टू' ने सोशल मीडियाचा फार मोठा भाग आणि काळ व्यापला होता. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते आणि तिथून सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपाचे रूपांतर आंदोलनाच्या स्वरूपात जगभर पसरत गेले, वर्ष-दोन वर्ष सरता सरता हे आंदोलन फक्त चित्रपट सेलिब्रिटीजपुरते मर्यादित न राहता, लेखक, पत्रकार, सैन्यातले अधिकारी, राजकारणापासून ते न्यायमूर्तीपर्यंत चिघळत गेले. अंतर्राष्ट्रीय खेळाचे रिपोर्टींग करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ वायरल झाले, अनेक एमएमएस, ऑडिओ नोट, मॅसेजेस चव्हाट्यावर आणले गेले. पण हे किती महत्वाचे होते हे हळूहळू लक्षात येऊ लागले आणि ही साधी दिसणारी मोहीम जगव्यापी आंदोलनात परावर्तित झाली. हा ट्रेंडही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सुरु झाला होता. अभिनेत्री हेमांगी कवी हिने अंतर्वस्त्रावरून ट्रोल करणाऱ्यांसाठी पोस्ट टाकली आणि त्यावरून ती अधिकच ट्रोल होऊ लागली. ''बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो, मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही'' हे हेमांगी कवीच्या पोस्टमधील वाक्य वाचून मला सोनम कपूरची प्रकर्षाने आठवण आली. सोनम कपूरने लग्नानंतर सासरचेही नाव तिच्या नावासह जोडले होते तेव्हा स्त्रीवादी ट्रॉलर्सनी तिच्या नावाने शंख फुंकायला सुरुवात केली होती. ती सासरचे नाव जोडते आहे म्हणजे तिने आता पारतंत्र्य स्वीकारले आहे आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग राहिलेला नाही अश्या अर्थाने तिच्यावर ताशेरे ओढले गेले होते, त्याचे प्रत्यत्तर म्हणून एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' असे वक्तव्य करून आणखीनच गदारोळ उडवून दिला होता. सोनमने 'स्त्रीवाद' म्हणजे फेमिनिज्मचा खरा अर्थ काय हे प्रत्येकीने समजून घेणे आवश्यक आहे स्त्रीवादाचे ढोंग करणे म्हणजे स्त्रीवाद नाही असे परखडपणे सांगितले होते. स्त्रीवादी असण्याचा खरा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीत समानता. स्त्री म्हणून जगणे-वागणे सोडून देऊन पुरुषांसारख्या मिश्या वाढवून जगणे हा काही स्त्रीवादाचा अर्थ नाही. अनेक अभिनेत्रींना स्त्रीवादाचा खरा अर्थच समजलेला नाही. आता बदलत्या काळानुसार सर्वांनीच स्त्रीवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अश्या खड्या शब्दात तिने ट्रोलर्सचा समाचार घेतला होता. पण आजच्यासारखाच तेव्हाही 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' तिच्या या वाक्याचा बुरा-भला प्रभाव व्हायचा तो झालाच आणि सोशल मीडिया ढवळून निघाले होते. स्त्रीवादाचा जो काही नवा अर्थ सोनमच्या वक्तव्यातून उद्धृक्त झाला होता त्याचेही महत्व समजून घेणे महत्वाचे आहे, हेमांगी कवी यांच्या वक्तव्यावरून होणाऱ्या चर्चेचा त्यानिमित्ताने आढावा घेणे देखील महत्वाचे ठरते.


समाजात स्त्री-पुरूष असा भेदभाव आहे. यात बदल होईल अशी आशा आहे. अनेकांचा या दृष्टीने प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र हेमांगी कवीने ज्या पद्धतीने विषय चव्हाट्यावर मांडला आहे ते मांडण्याची गरज होती का ? असाही एक सूर यानिमित्ताने आळवला जातो आहे. स्त्री म्हणून आपल्याला खरंच स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळाला असता तर लोकं काय म्हणतात ह्याला इतकं महत्व देत बसण्याची गरज उरली नसती. आपल्याला जे योग्य आहे असे वाटते आणि तसे वागावे वाटते ते कुठलीही बाष्कळ बडबड न करता कुणाच्याही आरोप-प्रत्यारोपांना महत्व न देता, उत्तरं न देता करत-वागत राहणं जास्त रास्त ठरत असतं. याबाबत मला ऑगस्ट २०१५ साली घडलेला एक किस्सा मुद्दामहून सांगावासा वाटतो. किरण गांधी नावाच्या २६ वर्षीय क्रीडापटूने तिची मासिक पाळी सुरु असतांना पॅड न घेता मॅरेथॉनची स्पर्धा पूर्ण केली होती. स्पर्धा पूर्ण होऊन ती गंतव्यस्थळी पोचली तेव्हा तिचा गुलाबी ट्रॅकपॅन्ट रक्ताने पूर्णपणे माखलेला होता. हे फोटो जगभर वायरल झाले तेव्हा किरण ह्यांनाही अनेक माध्यमातून ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. या सगळ्या प्रश्नांना प्रत्युत्तर देतांना ती म्हणाली कि '' वर्षभर स्पर्धेसाठी प्रचंड कष्ट आणि अभ्यास केल्यावर फक्त मासिक पाळी आलीय म्हणून स्पर्धेतूनच बाहेर पडणे किंवा काढून टाकले जाणे संयुक्तिक नाही, उलट ते अन्यायकारक आहे. एवढेच नाही तर वर्षभराच्या इतक्या मेहनतीनंतर फक्त पॅड घेतल्यामुळे स्पर्धेत धावतांना निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे मागे पडणं मी का मंजूर करावं ? पॅड न घेतल्याने माझ्या कष्टाला मला न्याय देता येणार असेल तर मी साहजिक तसे वागायला हवे. फारफारतर काय होईल कपड्यावर ओघळणारे डागच दिसतील आणि हे नैसर्गिक आहे याची जाणीव बघणाऱ्यांनी ठेवायला हवी '' किरण गांधींच्या या वक्तव्यावरही उलट-सुलट चर्चा झडल्या मात्र नको त्या ठिकाणी नको त्या क्रिया न करता, नको तशी वायफळ बडबडही न करता, तेव्हाच्या गरजेच्या वेळी तिला जे वाटतंय ते तिने निःसंकोच करून दाखवले होते..आणि स्पर्धा जिंकून त्याचे महत्वही उदाहरणासह सिद्ध केले होते. स्त्रीस्वातंत्र्याचा खरा अर्थ बोलण्यापेक्षा वागण्यात आहे हे अश्याच पद्धतीने सिद्ध केले गेले पाहिजे अशी हि घटना होती. .


एकीकडे स्वतःचे स्त्रीत्व नैसर्गिकपणे मान्य करून ते सांभाळत आपले हक्क ओळखून, त्यासाठी लढा देऊन ते मिळवून शैक्षणिक-वैचारिक-बौद्धिक-आर्थिक उन्नती करून घेत अधिकाराने सन्मानाचे-आदराचे आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया आहेत. तर दुसरीकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आणखी एक वेगळा गट तयार होत चालला आहे जो स्त्रीत्वाची संपूर्ण कातडीच ओरबाडून काढून नवा उन्मादी मुखवटा चढवण्याला किंवा पुरुषांसारखे वागण्याला स्त्री-स्वातंत्र्य समजून बसल्या आहेत. पुरुषांसारखे कपडे घालणे, सिगारेटी फुंकणे, मोटार-बाईक उडवणे किंवा दारू पिऊन धिंगाणे घालणे हे सर्रास दिसू लागले आहे. या बाबत मधल्या काळात विद्या बालनने देखील ''स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा देणे म्हणजे स्त्रीने पुरुषी होणे नव्हे; तर जन्मतः मिळालेले स्त्रीतत्त्व सांभाळत माणूस म्हणून जगण्याचे समान अधिकार मिळवणे आहे'' अशी मोहीम चालवली होती.


नुकतच युरोकप-२०२० ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेनंतर इटली जिंकल्याच्या आनंदात एका इटालियन महिलेने टॉपलेस होत नाच करतानाच एक व्हिडिओ वायरल झाला होता.. आनंदाच्या भरात उर्स्फुर्तपणे घडलेली ही एक प्रतिक्रिया असू शकते, अनेकदा अश्या प्रतिक्रियांविषयी आक्षेप घेतला जात नाही कारण त्या अनैसर्गिक नसतात. मात्र पूनम पांडे सारख्या काही अभिनेत्रीचे जाणीवपूर्वक असं घडवून आणणं किंवा त्यासाठी गाजावाजा करणं मात्र अनैसर्गिक आणि तत्वाला धरून नसल्याने त्यावर साहजिक गदारोळ उडतो.


१९६८ साली ७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका सौन्दर्यस्पर्धेत स्त्री-समानतेच्या हक्कासाठी २०० स्त्रीवादी महिलांनी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त केला होता, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निषेध आंदोलनाचा उद्देश ''स्त्रियांच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित व्हावे आणि तिच्याकडे मानवतावादी दृष्टीने पाहिले जावे'' असा होता. आज ५३ वर्षांनंतरही हेमांगी आणि सोनामसारख्या स्त्रियांना वेगवेगळ्या कारणांसाठी 'जगू द्या' अशी आरोळी ठोकत स्वातंत्र्याची मागणी करावी लागते याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.


काळ सरता सरता आज इथवर पोचेपर्यंत अश्या चळवळीचे स्वरूप बदलत गेले असले तरी समस्या सुटली नाही, मुद्दा कायम आहे बदललेल्या काळाचे स्वरूप समजून घ्यायला अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या स्त्री आंदोलनांची काही उदाहरणं पाहणं महत्वाचं ठरेल.


> २०१० ऑगस्टमधे लॉस अ‍ॅन्जलेसच्या सुप्रसिध्द व्हेनिस बिचवर एक मोठा चळवळीचा ग्रुप, विशेष म्हणजे स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी एकत्र जमला होता. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे संघटन होते. 'गो टॉपलेस इक्वालिटी राइट्स' हा या आंदोलनाचा विषय होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार 'अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.' त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्याप्रमाणे, अमेरिकेसारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टीसाठी दंड होणे, हाकलून लावणे, अपशब्द ऐकावे लागणे अश्या अपमानास्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मात्र पूर्ण मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्सवर आणलेली गदा वाटते.


> बळजबरी किंवा परंपरेच्या नावाखाली बुरखा घालायला लावणे यावर अनेकदा आंदोलनं झाली मात्र या विरुद्धही काही पाश्चात्त्य देशात 'बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या बऱ्याच मुस्लिम महिला आहेत, 'इफ आय कान्ट वेअर बुरखा, इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांच ते समर्थन करतात. त्या स्वतः बुरखा घालतातच असेही नाही, काही हिजाबही घालतात. पण पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्यासारखे वाटते हे विशेष.


हा सुरुवातीपासूनचा सगळा काळ स्त्रीअधिकाराच्या आंदोलनाच्या संघर्षाचाच काळ नव्हता तर प्रस्थापितांच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेला मोडणारी स्त्री म्हणून त्या मोबदल्यात पुरुषसत्ताक समाजाकडून अवहेलना सहन करण्याचाही काळ होता. ही जखडलेली बंधने झुगारतांना तिने उचललेला पवित्रा हा त्या स्त्रियांना पुरुषविरोधी स्त्री किंवा समाज चौकट लांघणारी बाई असं संबोधन करू लागली तिच्याबाबत नकारात्मक भाव पोसू लागला. इतकेच कशाला, तिच्या केसांच्या-कपड्यांच्या लांबीवरून, लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून, एवढेच नाहीतर आता चक्क अंतर्वस्त्रांवरून तिच्या चारित्र्याचे मोजमाप करण्याची मानसिकता आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच सुरुवातीपासून समानतेचा लढा देतांना स्त्री-पुरुष समान कसे ह्याचे पुरावे देण्यासाठी अनेक सोंगे तिला घ्यावी लागली. पुरुषांच्या सवयी स्वीकारण्यापासून त्याच्यासारखा पेहेराव करण्यापर्यंत.. त्याच्यासारखी नोकरी-व्यवसाय करण्यापासून ते त्याच्यासारखी व्यसनं कारण्यापर्यंतही तिने मजल मारली. मात्र हे करतांना स्त्रीची नकारात्मक छबी प्रस्थापित होऊ लागली. या सर्वांपलीकडे पाहणारी आजची स्त्री पुन्हा बदलतांना दिसते आहे. मी पुरुषासारखीच आहे म्हणून मला समान अधिकार द्या असे म्हणून लढा देणारी स्त्री आज मी स्त्री आहे मला त्याचा अभिमान आहे एवढेच नाही तर स्त्री म्हणून पूर्ण स्वतंत्र आणि मनासारखे जगायचा अधिकारही आहे हे निक्षून सांगते आहे. आज तिचा लढा प्रथा-परंपरा किंवा पुरुषविरोधी नाही, तर त्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा, बाईपणाचं स्वत्व जपण्याचा देखील आहे.

- रश्मी पदवाड मदनकर

(लेख ७ जुलै २०२१ च्या महाराष्ट्र टाइम्स दैनिकातील मैफल पुरवणीत सर्व आवृत्तींमध्ये प्रकाशित झाला आहे)








Tuesday, 6 July 2021

कशाकशाला पारखे झालोय आपण..?



अक्खी दुनिया, प्रेम, मैत्री नाती सगळं काही फक्त 'विश्वास' या एका गोष्टीवर टिकून आहे. कुणावर तरी पूर्ण विश्वास असणं, विश्वासाची माणसं आपल्या अवतीभवती असणं, आपल्यावर विश्वास ठेवणारी अनेक माणसं आयुष्यात असणं या गोष्टी आनंददायी जगण्यासाठी खूप खूप आवश्यक असतात. विश्वास गमावणं, विश्वासघात होणं .. कुणावर विश्वास ठेवूच न शकणं अश्या गोष्टी घडायला लागल्या तर जगणं किती कठीण होऊन बसेल ह्याची कल्पनाही न केलेली बरी ...
सध्या होतंय मात्र असं ..
 
किती कशाकशाला पारखे होतोय आपण. कोरोना संक्रमण काळानं जगण्यात अनेक बदल घडवून आणले चांगल्या सवयी भिनवल्या पण काही गोष्टी निष्ठुरपणे हिरावूनही घेतल्या... त्यातली महत्वाची गोष्ट हिरावली गेलीय ती म्हणजे विश्वास - स्पर्शातला विश्वास, एकमेकांवरचा विश्वास .. आपल्याच माणसांवरचा विश्वास... अगदी स्वतःवरचाही विश्वास.
लाॅकडाऊनमुळे एकमेकांच्या भेटीगाठी बंद झाल्या होत्या.. व्हिडीओ कॉलवर एकमेकांना पाहता येत असले तरी भेटीतली स्पर्शातली जादूच न्यारी असते. मधे माझ्या ५ वर्षाच्या भाचीची खूप आठवण येत होती. तिला भेटावं जवळ घ्यावं लाड करावे वाटत होते, पण मी बाहेर निघून काम करत असल्याने ती रिस्क घ्यावी वाटत नव्हती. मग अनेकदा आईच्या घराजवळ जाऊनही तिच्या सुरक्षेचा विचार येऊन आईच्या घरी गेलेच नाही. पण एकदिवस उगवला पिल्लाची अतिशय आठवण आल्याने जाऊन ठेपले.. पिल्लाला भेटायला खूप व्याकुळ होऊनही तिला स्पर्श करायचा नाही दुरून बघून निघून जायचे असेच ठरले होते. डोळे भरून आले 'मनू तुझी फार आठवण आली गं' असे म्हणताच ती धावत येऊन बिलगली हे इतक्या क्षणभरात झाले कि भीती वाटत असूनही या मिठीची उब दोघींनाही जास्त गरजेची वाटली होती. आपल्याच लेकरांना आपण जवळ घेऊ शकत नाही हा स्वतःवरचाच विश्वास गमावून बसणं किती वाईट आहे...असाच दुसरा प्रसंग एवढ्यातच कुठल्याश्या व्यवहाराचे पैसे नेऊन द्यायला संध्याकाळी ऑफिस नंतर एका मैत्रिणीकडे गेले होते. एरवी आम्ही भेटलो की एक छान झप्पी वगैरे व्हायची .. हात धरून आत घेऊन जाणं, अगदी ओट्यावर बसून खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करत गप्पा मारणं व्हायचे. मला दारात पाहून सखी आनंदीही झाली पण मीच तिला बाहेर अंगणात बसायला खुर्ची मागितली. पाणी-चहा दूरच ठेवायला सांगितले. आम्ही खूप दूर दूर राहून बोलत राहीलो. दोघींच्याही डोळ्यात नकळत पाणी आले...हातातले पैसे तिच्या कारच्या टॉपवर ठेवून हे तासाभराने उचल सांगून मी अंगणातूनच निघून गेले..नंतर कित्येक तास मन भारी होत राहीलं.
बरेचदा रस्त्याने जाताना गरजू दिसणाऱ्या स्त्रियांना लिफ्ट द्यायची आधीची सवय. परवा भर उन्हात छोटं तान्हुलं कडेवर घेऊन चालत रखडत जाणाऱ्या त्या आईला मात्र मदत करावी वाटली नाही .. आपल्यामुळे तान्हुल्याला रिस्क नको. लाॅकडाऊन नंतर इतक्या महिन्यानंतर एक एक मैत्रीण ऑफिसला जॉईन होतेय पण एकमेकींना पाहून कितीही आनंद झाला तरी झप्पीबिप्पी सोडाच प्रत्येकजण तोंडाला मास्क लावलेले आणि अंतरावर उभे राहून बोलतायत .. चेहेऱ्यावर ओसंडणारा आनंद तर सोडा साधे स्मित बघायला एक दिवस तरसायला लागणार हा विचारही किती भीतीदायक वाटतो. काल आईला बरे नसताना डॉक्टरकडे नेण्यात आले ज्या डॉक्टरांच्या मायेच्या स्पर्शानेही बरेचदा मानसिक आजारपण पळून जायचे .. आज तिनं साधी नाडी तपासणी देखील केली नाही बीपी तपासले नाही, मग कितीही महागडे औषध देऊन काय उपयोग रोग्याला स्पर्शातला दिलासा बरा करणार होता त्याला तर तो पारखाच राहिला.
 
कामावरून थकून भागून गेलेल्या बापाचा थकवा घरात पाय ठेवताच चिमुकल्यांच्या मिठीत विरघळून जायचा. दिवसभर डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या म्हाताऱ्या आई-वडिलांच्या जवळ हातात हात घेऊन बसले की त्यांना समाधान मिळायचे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवर टीचर्सची शाबासकी पडली की केवढे प्रोत्साहन मिळायचे. एखाद्या मित्राची आधाराची थाप मिळाल्याने केवढे बळ दाटून यायचे. प्रियेच्या मिठीत, आईच्या कुशीत, बापाच्या खांद्यावर सहज विसावता यायचे, मित्रांच्या हातावर टाळ्या देता यायच्या- खांद्यावर हात घालून दूरवर न अडखळत चालत जाता यायचे.
 
कशाकशाला पारखे झालोय आपण.. प्रेम, मिठी, कुशी, विश्वास, आधार, शाबासकी, आधाराची थाप, हातात हात, हातावर टाळी.. आणि रडायला खांदा. मरण्यापासून दूर पळताना जिवंत राहायच्या संघर्षात.. संघर्षाला बळ देणाऱ्या गोष्टीच हिरावले जातायेत कि काय असे वाटायला लागले आहे... असे जगणे जगणे नव्हेच केवळ जिवंत राहणे होईल.. नाही का ?
©रश्मी पदवाड मदनकर

Sunday, 4 July 2021

राधा-अनय



शिरीन कुलकर्णी यांचा एक आवडलेला लेख -




' त्रिधा राधा ' या पु.शि. रेग्यांच्या कवितेने मनावर घातलेली मोहिनी किती वर्षं कायम आहे. राधा-कृष्णाच्या अधिकाधिक तरल आणि सखोल होत जाणाऱ्या नात्याचे पदर अजूनही हळुवारपणे उलगडावेसे वाटणारे ! राधा - कृष्णाची जादू अजूनही भारतीय साहित्यावर पसरून राहिलेली ! अरुणा ढेरे यांची 'अनय ' ही कविता वाचली आणि सवयीच्या वाड्यातले एक अनोळखी दालन एकदम उघडावे, तसे काहीसे वाटले. राधेचा पती 'अनय ' याचे कायमच धूसर राहिलेले चित्र उजळून निघाले आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या या अनोख्या दर्शनाने मन चकित आणि हर्षभरित होऊन गेले . राधेला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श जितका उत्कट, तितकीच तीव्र अनयाची तिला समजून घेण्याची क्षमता !
राधा तर नक्षत्रांच्या गावातून अनयाच्या घरात उतरली होती. तिला तो दिव्य निळा स्पर्श लाभलेलाच होता आणि निळेपणाच्या मूर्त रूपावरून आपल्या जिवाची कुरवंडी करण्यासाठीच ती पृथ्वीतलावर अवतरली होती .
देवत्वाचे अधिष्ठान म्हणजे आभाळ असे जर म्हटले, तर कृष्णाचा रंग आभाळासारखा मेघश्याम असणेही ही स्वाभाविकच आणि नक्षत्रांच्या गावातून उतरलेल्या राधेच्या रक्तातच मेघश्याम आभाळाची अनावर ओढ असणेही साहजिकच. (पुन्हा पु. शि.रेगे - आकाश निळे तो हरि, अन् एक चांदणी राधा ) अनयाला हे सगळे 'पहिल्यापासून' समजले होते. पहिल्यापासून म्हणजे केव्हापासून? अनयाला स्वतःच्या जीवनाचा अर्थ आधीपासूनच ठाऊक होता ?
त्याला स्वतःच्या अगदी आतून आतून खोल मनातून राधेचा 'बाईपणा' कळला होता. आपण स्वीकारली आहे ती वीज आहे, तिला शेजेला घेण्याचा हट्ट आपण केला, तर आपल्याला जळून जायचे आहे. यापेक्षा तिचे तेज लांबूनच पाहावे. कृष्णाच्या मस्तकावर डोलणारे मोरपीस आणि राधेची स्वप्ने त्या मोरपिसासारखी; झिळमिळ करणारी, मृदू मुलायम ! नुसती बोटे फिरवली तरी सुखाची लवलव जाणवावी. पण अनयाचे समजूतदारपण जगावेगळेच. त्या मोरपिसांवर आपले डोळे कोरण्याचा प्रयत्न त्याने कधीच केला नाही; ना त्याने तिच्या शरीरात सतत हेलावणाऱ्या मदिरेप्रमाणे धुंद उन्मन करून टाकणाऱ्या कृष्णरूपी निळ्या तळ्याला गढूळ करण्याचा प्रयत्न केला.
त्याचे आयुष्य मातीचे होते ; तर तिला स्वर्गीय स्पर्श होता. त्याच्या घरात तिची पावले विशिष्ट उद्दिष्ट घेऊनच पडली होती ; पण त्या पावलांना चढलेला अळत्याचा लाल रंग हा अमरत्वाचा होता. म्हणूनच सर्वसामान्यांच्या समवेत असूनही त्यांच्या क्षितिजाच्या पलीकडे असणाऱ्या कृष्णाबरोबर तिचे नाव जोडले गेले आणि आणि ते अमर झाले. तिच्या अस्तित्वाचा गंध अविनाशी होता, म्हणूनच राधा अविनाशी ठरली . कृष्ण सगळ्यांचाच होता . राधा मात्र फक्त कृष्णाची होती तरीही अविनाशी , अमर होती .(पुन्हा पु.शि.- जलवाहिनी निश्चल कृष्ण; बन झुकले काठी राधा ) असे हे तेज आपल्याला सांभाळायचे आहे , असे हे दिव्यत्व आपल्या आसपास वावरत आहे ; या जाणिवेने त्याचे मन काठोकाठ भरून गेले होते . ही संधी त्याला मिळाली होती, म्हणून तो तिच्याशी कृतज्ञ होता.
तिचे कृष्णार्पण होणे त्याने फार जवळून पाहिले होते. रात्रीचा हा काळा अंधार म्हणजे जणू तिच्या कृष्णसख्याचा कृष्णवर्णच ! कसा आहे कृष्ण, तो तर 'रसज्ञ' आहे ! सर्व रस जाणणारा. त्या कृष्णवर्णाशी एकरूप होणारा राधेचा गौरवर्ण ही अनयाने पाहिला होता. खरे तर मधुर वाटणारे असे हे विष होते आणि आणि राधा ते खुळ्या ओठांनी तृप्त होईपर्यंत वेड्यासारखी पीत होती. ते विष जणू तिच्या रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत होते आणि तिला आणखी धुंद करीत होते. स्वतःच्या प्रेमासाठी राधा स्वतःचे अस्तित्व झोकून देत होती , बेभानपणे ! ती तृप्तही होत होती आणि तरीही ती तृप्तीच तिला पुन्हा अतृप्तीकडे ओढत होती .


अनय हे सारे पाहत होता . रोजच्या वाटेवरील आयुष्यभर येणारे एकटेपण जणू त्याला जाणवले होते. तिच्या दुःखी, जखमी काळजाची पराकोटीची तडफड त्याला उमजत होती. दूर असूनही त्याला स्त्रीची प्रेमातली दोन्ही रूपे दिसली होती; भरून आलेली आणि सरून गेलेली ! त्याला जाणवले की, या वाटेवर ती हरली आहे ;पण निरर्थकतेच्या भरकटत्या वाटेवर हरवून गेली नाही. तिचे तेजच असे होते की, त्या तेजाचे मीपण जपत, धडपडत ती त्यातूनही शिल्लक राहिली, उरली. नाकारणारे, सोडून जाणारे , दुःखाच्या गर्तेत लोटणारे , आयुष्यभर दुःखाच्या चिमट्यात पकडून ठेवणारे पुरुष असतात. राधेला भेटलेला पुरुष हा स्वप्नवतच होता. तो तिला क्षमा करून उपकृत करत नव्हता , क्षमा करण्याच्या उपकारांचे ओझे तिच्यावर लादत नव्हता ; की तिला नाकारून कमीही लेखत नव्हता ; उलटपक्षी तिला समजून घेऊन तिला सावरत होता, छाती फुटून बाहेर येणाऱ्या तिच्या दुःखाला आवरत होता, आणि उराशी धरून तिला स्वतःच्या आधाराचा विश्वास देत होता. जी स्वप्ने त्याची कधीच नव्हती ; त्या स्वप्नांनाही तो स्वतःच्या काळजात घर देत होता. राधेचा पुरुष असा होता. तिच्या कोसळत्या स्वप्नांना आपल्या आधाराचे पंख देणारा असा हा राधेचा पुरुष स्वप्नवतच होता.
या कवितेने राधेच्या अनयाने मनात घर केले. राधा-कृष्णाच्या प्रेममय नात्याची ही अनोखी दिशा मनाला अस्वस्थ करणारी होती . हेही चित्र असू शकते , ही शक्यता सुखावणारी होती; पण कृष्ण सोडून गेल्यानंतरच्या राधेच्या जीवनाकडे , राधा- अनयाच्या नात्याकडे डोळ्यांत पाणी येईल तोवर पाहायला लावणारी होती आणि प्रत्येक नात्यांमधल्या वेगवेगळ्या दिशा , वेगवेगळ्या शक्यता शोधायला लावणारी, तपासायला लावणारी होती.
शिरीन कुलकर्णी


अनय
नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.
त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.
कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!
– अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

Saturday, 3 July 2021

#विविध_भारती





~~~~~~~~~
#विविध_भारती देश की सुरीली धड़कन कहीं जाने वाली भारत का मात्र एक ऐसा चैनल विविध भारती भारत में सर्वाधिक क्षेत्र के आकाशवाणी की एक प्रमुख प्रसारण सेवा है भारत में रेडियो के श्रोताओं के बीच सर्वाधिक सुनी जाने वाली पहला रेडियो चैनल विविध भारती है !!

इसकी शुरुआत 3 अक्टूबर 1957 में हुई थी इसके केवल दो केंद्र हैं प्रथम मुंबई दूजा मद्रास प्रसारण दो केंद्रों से दिया जाता था जैसे-जैसे लोकप्रियता बढ़ती गई वैसे वैसे हिंदुस्तान के हर शहर में इसकी ध्वनि सुनाई देने लगी हिंदुस्तान में इतना लोकप्रिय और कोई चैनल नहीं विविध भारती की जब शुरुआत हुई थी और कोई चैनल नहीं था
#विविध_भारती_की_विशेषताएं
विविध भारती की खास विशेषताएं हिंदी गाने नाटक विज्ञापन ज्ञान स्पोर्ट रेसिपी आदि
#लोकप्रिय
सबसे ज्यादा लोकप्रिय बिनाका गीतमाला जिसकी प्रस्तुति आवाज के जादूगर #अमीन_सयानी करते थे
भाइयों और बहनों इनका खास डायलॉग था इसके बाद सबसे खूबसूरत अल्फाज कहे जाने वाले #यूनुस_खान भी पीछे नहीं #मनोज #छिब्बर #शैलजा #सिंह #शाइस्ता #नाआज #ममतासिंह #कमलशर्मा #रेनू #बंसल #राजेंद्र #त्रिपाठी #शहनाज #अख्तर #अमर #कांत #दुबे #निम्मी #मिश्रा #यह #मुख्य #प्रसारण करते थे
#मुख्यकार्यक्रम
गीतमाला हेलो फरमाइश बाइस्कोप की बातें हमारे मेहमान s.m.s. के बहाने आज के फनकार हवा महल भूले बिसरे गीत त्रिवेणी जयमाला फौजी भाइयों सखी सहेली चित्रपट संगीत मनचाहे गीत पत्रावली समाचार विज्ञापन इंटरटेनमेंट सेंट परसेंट जिज्ञासा हर किसी का अपना अपना बेहतरीन अंदाज था पेश करने का लोगों को इंतजार भी रहता था !!!
#दौर
वह भी एक दौर था यह भी एक दौर है उस दौर में कहानियों किससे किताबें रेडियो और कई तरह के साधन थे कई तरह के खेल आज वह नहीं रहा मैं आज भी पुराने लम्हों को याद करता हूं उन्हीं में खो जाता कहते हैं ना वक्त किसी का इंतजार नहीं करता अब हम उस दौर में नहीं जा सकते पर वह बेहतरीन दौर को याद कर सकते हैं !!!
#यादें_याद_आती_है


Naushad Hindustani


Ye bhi padhe
https://satyagrah.scroll.in/article/110147/vividh-bharti-turns-60

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...