मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Friday, 9 April 2021
पुस्तक परीक्षण
दोन पुस्तकं
'शेवटाचा आरंभ' आणि 'हँगमन'
लेखिका - ज्योती पुजारी
कल्पनेच्या भराऱ्या घेऊन लिहीलेल्या अनेक कथा कादंबऱ्या आपण वाचत असतो. एखादे कथाबीज घेऊन केवळ कल्पनेच्या धाग्यांवर एखादं तलम वस्त्र विणावं तश्या कादंबऱ्या तयार होतात.. पण सामाजिक विषयांवर, परिश्रम पुर्वक, प्रत्यक्ष भेटी घेऊन, संशोधन करून अभ्यासपूर्ण मांडणीतून वास्तववादी लिखाण करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतकी कमी आहे. अश्या पुस्तकांच्या वाचकांची संख्या तुलनेने कमी असली तरी, हे वाचक वेगळ्या आवडी-निवडीचे, बुद्धिवादी किंवा विचारवंत असतात. अश्या वेगळ्या वाचनाची आवड असणाऱ्या मास पेक्षा क्लास वाचकांसाठी अशी मूठभर पुस्तकं म्हणजे पर्वणीच असते.
अश्याच वेगळ्या धाटणीतलं लेखन करणाऱ्या लेखिका म्हणजे ज्योती पुजारी. टेबलखुर्चीवर बसून कल्पनेचे घोडे दौडवण्यापेक्षा, भोवतालचा खराखुरा चेहेरा स्पष्ट करणारा, सत्यातला एखादा विषय निवडून, त्यावर अभ्यास करून, प्रत्यक्ष स्थळी जाऊन विषयाची उंची-खोली तपासत, पात्रांची भेट घेऊन त्यांचं आयुष्य समजून घेत.. सगळे बारकावे टिपत, त्यांची कथा-व्यथा साध्या सोप्या शब्दात वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम ज्योतीताई त्यांच्या या आगळ्या वेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या माध्यमातून करताना दिसतात. मी आजवर त्यांची दोन पुस्तकं वाचली आहेत.. एक ' शेवटाचा आरंभ' आणि दुसरे नुकतंच वाचलेले 'हॅंगमन'. वरकरणी ही दोन्ही पुस्तकं कादंबरीचं रूप घेऊन अवतरलेल्या दिसत असल्या तरी या पुस्तकांची जातकुळी सामाजिक समस्यांचे वास्तववादी रूप अनेक सत्य घटनांचे संदर्भ देत जगासमोर आणणारी आहेत.
शेवटाचा आरंभ ही नायिकाप्रधान कादंबरी आहे. गौरी हसबनीस ही तरुणी या कादंबरीची नायिका आहे. या पुस्तकात बलात्कार पीडित महिलेच्या जगण्याचा संघर्ष, घायाळ तनामनासह लढत राहाणं, समाजाने लादलेल्या रीती-परंपरांचे ओझे, मध्यमवर्गीयांची मानसिकता, ते फेस करत जगण्याचा तिढा यावर भर दिला आहेच शिवाय ही कथा पुढे नेत असताना आजवर झालेल्या आणि गाजलेल्या बलात्काराचे दाखले देत, न्याय-अन्याय, कायदे, त्यातले राजकारण अश्या अनेक गोष्टींचा उलगडा या कादंबरीत लेखिका करू बघतात.
हँगमन हि कादंबरी मात्र अगदी जगावेगळ्या विषयावरची आहे. डोळ्याने दिसणाऱ्या अनेक गोष्टींकडेही आपले फारसे लक्ष नसते तर हा कधीच फारसा पुढे न येणार विषय .. यावर, यांच्या जगण्यावर त्यांच्या समस्येवर, मानसिकतेवर एक अक्ख पुस्तक लिहायला हवे हे फक्त ज्योती ताईंनाच सुचू शकतं. हँगमन आपल्या नेहेमीच्या भाषेत बोलायचे झाले म्हणजे जल्लाद. फाशीची शिक्षा झालेल्यांना प्रत्यक्ष मृत्युदंड देणारा माणूस. ही कथा आहे सरावन कचरू नावाच्या हँगमनची. आपल्याशी वैयक्तिक काहीही वाकडं नसताना केवळ पोटभरायला करावी लागणारी ड्युटी म्हणून कुणाचीतरी हत्या करावी लागणं, श्वास संपेपर्यंत, गुदमरून जीव जाईपर्यंत 'हँग टील डेथ' ऑर्डरची अंमलबजावणी करणाऱ्या या हँगमनच्या मानसिक अवस्थेची आणि त्या अनुषंगाने त्याच्या आयुष्यात होणाऱ्या उलथापालथीची ही कथा आहे. हे पुस्तक लिहिताना देखील खऱ्या जल्लादाशी भेटणे, त्याचे काम, वैयक्तिक आयुष्य समजून घेणे हे सगळं ज्योती ताईंनी परिश्रमपूर्वक केल्याचे जाणवत राहते. त्यामुळेच विस्तृत नोंदी, तपशील यामुळे कादंबरीची रचना वेगळ्या स्वरूपाची झाली आहे हे पानोपानी जाणवतं.
प्रवाहापेक्षा वेगळ्या निवडलेल्या दिशा त्यातून शोधून काढलेले हे अनवट विषय आणि त्याला दिलेली संवेदनशीलतेची जोड ज्योती पुजारी यांच्या लिखाणाची खरी ताकद आहे. सामाजिक लेखन प्रवाहातल्या साहित्यात त्यांच्या पुस्तकांचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण असणार आहे हे निश्चित.
©रश्मी पदवाड मदनकर
पुस्तक #अमेझॉन वर उपलब्ध आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...
-
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...
No comments:
Post a Comment