Friday, 9 April 2021

मूकबँग -



पण काही खात असताना किंवा गिळताना तोंडाचा जो आवाज होतो त्या आवाजाला ASMR (autonomous sensory meridian response) म्हणतात. जगभरात हा आवाज ऐकायला आणि आवाज येताना पहायला नेटकरी झुंबड करतात. अशा व्हिडिओजला ‘सॅटिसफॅक्टरी व्हिडिओ’ म्हणतात; म्हणजे अश्या दृकश्राव्य गोष्टी ज्या तुमच्या मेंदूपर्यंत पोचतात आणि नंतर संपूर्ण शरीरभर समाधान पोचवतात. जे परत परत पाहावे वाटतात आणि ह्याला मेंदूचा मसाजदेखील बोलले जाते. हा अर्थ माझा १४ वर्षांचा मुलगा मला समजावून सांगत होता. हे खरंच काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक दोन व्हिडिओ मी पण ओपन केले होते आणि त्याचा त्रासच वाढला. गेले काही दिवस फेसबुक किंवा यु-ट्यूब उघडले कि चायनीज किंवा कोरियन सुंदर सुंदर बाला खूप मोठ्या प्रमाणात चपर-चपर आवाज करत अन्न खाताना दिसतायेत. यात खरंच पाहण्यासारखं काय आहे ह्याचा विचार करतानाच लक्षात आले कि या व्हिडिओजचे व्ह्यूज करोडोच्या घरात आहेत. ह्याचाच अर्थ बिंदास व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळे पदार्थ (त्यांच्या भाषेत चांगले अन्‌ माझ्या मते प्रचंड हिडीस) खात, खात नव्हे भकाभक गिळत ही मंडळी अब्जोपती होतायेत.


२०१० साली कोरिया या देशात ह्याचा मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरु झाला. हे असे काही पाहायला लोकांना, विशेषतः तरुणांना प्रचंड आवडतंय हे लक्षात आल्यावर या ट्रेंडचा फायदा घेत दक्षिण कोरियात 'मूकबँग' नावाने एक शो सुरु करण्यात आला. ज्याचं प्रसारण आता संपूर्ण जगात केलं जात आहे. हा एक ऑनलाइन ऑडिओव्हिज्युअल ‘फूड शो’ आहे ज्यामध्ये सहभागी कलाकार (खादाड) प्रेक्षकांशी संवाद साधता-साधता मोठ्या प्रमाणात अन्न सेवन करतात. याचे अनेक भाग पाहताना जाणवतं कि फक्त शोमध्ये भाग घ्यायला मिळावा म्हणून किंवा त्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी किशोरवयीन किंवा खूप तरुण वयातली मंडळी जबरदस्तीने अत्यंत हिणकस पद्धतीने स्वतःला अधिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतात. यांच्या पुढ्यात एकावेळी दहा माणसांना पुरेल इतके वेगवेगळे पदार्थ मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेले असतात. कॅमेरा सेट करून, माईक कॉलरला लावून खाण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येईल अश्या पद्धतीने सगळी तयारी केली जाते. मग या शोचा होस्ट परफॉर्मर म्हणजे खाणारा व्यक्ती एकावेळी दोन्ही हाताने पदार्थ उचलून भरभर तोंडात घालत जातो, कुठल्या-कुठल्या प्राण्यांचे मांस (ते बहुदा त्यांचे अन्न असावे), सूप, सॉस, भाज्या, पिझ्झा, बर्गर आणि काय काय निव्वळ भकाभक तोंडात कुचकतो आणि ते न चावता, न चघळता गटागटा गिळत जातो आणि हे करतांना तो व्ह्यूवर्सबरोबर गप्पाही मारत असतो. हा जवळजवळ अर्धा पाऊण तासांचा शो असतो. या शो च्या नियमांचा तो भाग असावा किंवा 'वेल परफॉर्मर' म्हणून स्वतःला सिद्ध करायचे असेल. कारण काहीही असले तरी आपण माणूस म्हणून जगतो आणि पशूंपेक्षा आपल्या जगण्याचे, एकत्र समाजात राहण्याचे आणि सभ्य समजले जाण्याचे काही सर्वांच्या भल्यासाठीचे नियम असतात आणि ते आपण जबाबदार नागरिक म्हणून पाळले पाहिजे हे समजून घेणे आवश्यक आहे.
हे जे काही आहे ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. यु-ट्यूब आणि सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवरून पैसे कमावण्याची संधी मिळालीच म्हणून काहीच्या काही व्हिडिओ तयार करून अपलोड केले जात आहेत. अनलिमिटेड नेट अवैलेबल आहे म्हणून आणि सतत या व्हिडिओजचं प्रमोशन होत राहिल्याने ते वारंवार समोर येतात म्हणून ते पाहिलेही जातात. व्ह्यूवर्सचा आकडा हजार, लाखांत, करोडोत वाढत जातो आणि त्या अनुषंगाने मेकर्स पैसे कमावतो. सध्या काळजीचा विषय म्हणजे टिनेजर्स आणि तरुण पिढी यात खूप जास्त इनव्हाल्व होत चालली आहे. फावल्या वेळात ज्ञानार्जन किंवा स्वतःला डेव्हलप करण्याच्या वयात ते निव्वळ टाईमपास किंवा असे झटपट पैसे कमावण्याच्या मागे लागले आहेत. हे सगळे करण्याच्या परिणामांची त्यांना चिंता नाही. त्यासाठी स्वतःचे आरोग्य, संस्कार, प्रतिमासुद्धा पणाला लावताहेत. याहून अधिक हा खेळ आता फक्त पैसे कमावणे किंवा व्ह्यूवर्स मिळविण्यापर्यंत सीमित राहिला नाहीये तर, एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात यापेक्षा सनसनाटी किंवा भन्नाट काय करता येईल म्हणून संवेदनशीलतेच्या सगळ्या सीमा पार करत ही तरुण पिढी माणुसकीला लाजवेल असे व्हिडिओ देखील तयार करायला लागले आहेत. हे सगळे व्हिडिओ चाळताना अगदी किशोरवयीन मुले जिवंत प्राणी थेट अग्नीवर ठेवून शिजवताना दिसतायेत. काही कच्चे जिवंत वळवळणारे प्राणी थेट दातांनी तोडून खाताना दिसताहेत. त्या प्राण्यांचे ओठांवरून ओघळणारे रक्त एखाद्या विक्रमवीरासारखे पुसून पुन्हा दुसरा प्राणी तोंडात घालताना दिसताहेत. क्रूरतेची परिसीमा गाठताना त्याला विकृत रूप देणाऱ्याचे आणि ते होत असताना लाखोंच्या संख्येने ते ऑनलाईन पाहणे आणि करमणूक करून घेणारी ही कुठली वृत्ती, ही कुठली जमात, ही कोणती मानसिकता आहे, हा प्रश्न उभा राहतो. ही विकृत मनोवृत्ती आज अनेक देशात पाय पसरतेय. याकडे कोणाचेच लक्ष का जात नाही किंवा एकंदरीतच सगळ्यांच्या संवेदना बोथट होत चालल्यात की काय ?

आपण अनेकदा असं म्हणतो कि 'आजची पिढी अत्यंत हुशार आहे'. दुसरीकडे असेही बोलले जाते की आजच्या पिढीला सगळ्या सोयी सवलती सुलभतेने मिळाल्यात. तंत्रज्ञानानं त्यांचं आयुष्य आधीच्या पिढीपेक्षा अधिक सुकर केलंय. पण मग आपल्याला मिळालेल्या सुविधांचा वापर आपण नेमका कशासाठी करतो, यावर एका अख्ख्या पिढीचं भवितव्य अवलंबून असते.‌ चांगली संधी मिळणार असेल तर त्याचा फायदा चांगल्यासाठी, सकारात्मक बाबींसाठी करून घेता आला पाहिजे. आपले चांगले-वाईट आपल्याला समजणार नसेल तर त्यात फक्त आपले नुकसान‌ नाही. एक फळी, अख्खी पिढी आणि पर्यायाने देशाचंही यात नुकसान होणार असतं.

यु-ट्यूब आणि सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवरून पैसे कमावण्याची संधी मिळालीच म्हणून काहीही कन्टेन्ट बनवणारे, त्या कन्टेन्टसाठी शिक्षण, कामधाम सोडून वणवण भटकणारे, त्याचे व्हिडिओ तयार करून अपलोड करणारे कुठल्या वाटेवर चालले आहेत, हे त्यांचे त्यांनी एकवेळ तपासून पाहायला हवे.. अनलिमिटेड नेट अवैलेबल आहे म्हणून आणि सतत या व्हिडिओजचं प्रमोशन होत राहिल्याने ते वारंवार समोर येतात म्हणून ते पाहिलेही जातात. व्ह्यूवर्सचा आकडा हजार करत लाखाच्या संख्येत वाढत जातो आणि त्या अनुषंगाने मेकर भरमसाठ पैसे कमावतो. या पैशांसाठी पुन्हा तरुणांना भरीस पाडले जाते, प्रतिष्ठेचे भ्रम तयार केले जाते, श्रीमंतीचे आमीष दाखवले जाते. या सगळ्यातून ‘कट थ्रोट’ स्पर्धा तयार होते आणि 'सर्वायवल ऑफ थे फिटंटेस्ट' सारखी होड सुरु होते.


अनेकदा तर आपली मुलं इंटरनेटचा वापर कश्यासाठी करतायत हे सुद्धा पालकांना माहिती नसतं. पालकांचं याबाबतीत दुर्लक्ष होण्याची अनेक कारणे सांगता येण्यासारखी आहेत. प्रत्येकवेळी निव्वळ त्यांना दोष देणे हा उपायही होऊ शकत नाही. उपजीविकेसाठीची धावपळ, मुलांच्या भवितव्यासाठी जुळवाजुळव आणि त्यासाठीच्या तजविजी करण्यात ते अत्यंत व्यस्त असतात. मुलांना संस्कार लावणे हा इतकाच भाग त्यांना सांभाळायचा नसतो, शिवाय कोणीही पूर्णवेळ डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष ठेवू शकत नाही. किशोर वयानंतर मुलांनी स्वतःच स्वत:ची जबाबदारी ओळखून आता वागायला हवे आहे. याशिवाय आजच्या शिक्षण व्यवस्थेत ह्या मूल्यांचा समावेश असायला हवा. शासन, प्रशासन आणि पालकांनी मिळून आता या पिढीबाबत एकजुटीने सकारात्मक नियम बनवून प्रयत्न करायला हवेत, असे मला गांभीर्याने वाटू लागले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...