Wednesday, 27 February 2019

आतल्या मास्तरीण बाई - पत्र 4



जरा नरव्हस व्हायला झालं ना की आतल्या बाईंचे हे शब्द आठवतात आणि पुन्हा जगण्याची उभारी येते...

#आतल्यामास्तरीणबाई

पत्र -4

आयुष्याचं सोनं कर

सोनं खूप तापलं ना की अधिकच चकाकतं म्हणतात. आयुष्याचही तसंच काहीसं असतं आयुष्यात कधीतरी खूप चटके खावे लागतात होरपळून निघतोय आपण असे वाटत असतांनाच आपण तावून सुलाखून बाहेर पडलेले असतो.…. एकदा दोनदा आणि अनेकदा प्रत्येकवेळी नवे चटके आणि त्याबरोबर आलेली नवी झळाळी. इतकं सगळं पाहून, भोगून, सोसून झाल्यावर एक काळ येतो आयुष्यात जेव्हा आपसूकच स्वतःवरचा अंतर्गत विश्वास इतका प्रगाढ झालेला असतो की पुढे भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही दुःखाच, संकटाच अप्रूप वाटेनासं होतं. कुठलीही भीती आता भीती म्हणून उरतच नाही. दुःखाला दुःखाची किनारच नसते आणि संकट नावालाही हादरवत बिदरवत नाही.

आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना निव्वळ संधी वाटू लागते स्वतःला लिफ्ट करायला. तांदळातून खडा काढून सरकवावा किंवा दुधातून माशी काढून फेकावी इतक्या शुल्लक वाटू लागतात आयुष्यातल्या अडचणी. मग रोजचे चाललेले आयुष्य त्यात रोजच्या व्यापासोबत, संसाराच्या रहाटगाड्या सोबत स्वतःला खुश ठेवण्याचं स्किल आपसूक आत्मसात होत जातं … इकडे समांतर अडचणीचा गाडा पिच्छा पुरवत असतो. तो काही पाठ सोडत नाही. साथ सोडत नाही, पण आताश्या त्याला सोयीस्करपणे लेट गो करता यायला लागतं किंवा वेळात वेळ काढून त्याचाही पत्ता लावता येऊ लागतो. जगता जगता या स्तराला या स्थितीला येउन पोचणे ही साधारण अवस्था नाही.

यासाठी खरच आयुष्याचे अनेक तप पार करावे लागते. हे घडू लागले कि समजावे आपण आयुष्यात खूप मोठ्या साधनेतून 'वर' प्राप्त केला आहे. आपल्या आयुष्यातले समुद्र मंथन पार पडले आहे… आणि आता कुठलाही विषाचा प्याला आपल्याला पचवता येऊ शकतो. आयुष्याच्या अनेकानेक परीक्षा पार करून आता आपण पदवीधर होऊन आचार्य पदवी घेऊन बाहेर पडलो आहोत. याही पुढे आयुष्य सरकत जाणार आहे आणि आपण यात सिद्धी प्राप्त करणार आहोत. आयुष्याच्या या घडीला आपण पार केलेल्या या प्रवासाच्या या वळणावर जरां थांबून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतलीच तर त्यात काहीच गैर नाही. या वळणावर येणाऱ्या वाटेवर आनंद उचलत जाऊच, फुलांचे ताफे पाहू, पहाड, हिरवळ आणि सौंदर्य नव्या सुखद अनुभवांचा पुढे नवा सिद्धांत मांडू. समांतर येणाऱ्या वाटेवर अनुभूतींचा खजाना आहेच, अडचणींचा, समस्यांचा नवा अनुभव आहे. या वळणावर हातात हात घेऊन पुढे निघू …. रस्त्याच्या टोकाला आत डोकावतांना काय गवसतं हे बघण्यात सुख असणार आहे हे नक्की…

आतल्या मास्तरीण बाई - 6



पत्र


#आतल्यामास्तरीणबाई


कधीकधी बोलतांना किती सहज आपण बोलून जातो ना आवाज कसला गोड़य तिचा पण उंच स्वर नाही लागत जरा कनसुरी आहे किंवा चित्र छान काढलय पण रंगसंगती चुकलीच बघ. कथा अत्यंत सुरेख आहे पण काही ठिकाणी शुद्धलेखन गंडलंय. हे साहजिक आहे पण असा विषय असला ना कि आतल्या मास्तरीण बाई आठवतात. त्या एकदा म्हणाल्या होत्या ...


प्रिय सखे ,

कलेचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर त्या कलेची आवड असायला हवी त्याबद्दलची जाण असायला हवी पण त्याचे ज्ञान मात्र असायला नको बघ. फार ज्ञान असले की कलेतील उणीवा, खाणा-खुणा आणि चुका आधी नजरेला, कानाला अन स्पर्शाला जाणवतात. आस्वाद घ्यायचे दूरच राहते.


बघण्या, ऐकण्या अन वाचण्याच्या बाबतीत एक हमखास होतं अगं अधिक चांगल्या गोष्टी बघत वाचत ऐकत गेलो की आपल्या अपेक्षा आपल्या आवडी-निवडीपेक्षाही जास्त वाढतात. दर्जेच्या उद्देशाने नसलेल्या अगदी शुद्ध मनोरंजनात्मक गोष्टी सुद्धा आपण ज्ञान आणि दर्जा अश्या कसोटी वर घासून बघतो. मग आपले ज्ञान आपलीच आवड आपल्यालाच मुक्त गोष्टींचा मुक्तपणे आस्वाद घेऊ देत नाही. पुन्हा पुन्हा असे घडत राहिले की मिळेल तिथून आनंद मिळवण्याच्या स्वभावात कमीपणा येतो अन रुक्षपणा वाढत जातो. ह्याची परिणीती 'काहीही' न आवड्ण्यामध्ये होते. अन कुठेतरी मानसिक एकाकीपण वाढू लागतो. अज्ञानात सुख असते म्हणतात ना ते हेच अगं. लक्षात असू दे.

तुझ्याच
#आतल्यामास्तरीणबाई

Thursday, 21 February 2019



*मन अँप्यूट करता येईल का?*

डॉक्टरांनी विचारलं , "काय होतंय?"

हताश आवाजात मी उत्तरले,

"श्वास कोंडतो..
डोळे वाहत रहातात...
खूप भीती वाटते...
हातपाय लुळे पडलेत असं वाटत रहातं.."

"कधीपासून होतोय हा त्रास?"

"सगळ्यात पहिल्यांदा, किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा त्रास जाणवला होता.
तेव्हा काय करावं ?कुणाला सांगावं ?कळालं नाही.
मग कधीतरी आपोआपच त्रास थांबला.
आई म्हणायची खूप विचार नको करत जाऊ बाळा.
नंतरही कोलंबिया कोसळलं तेव्हा कितीतरी वेळ देवासमोर रडत बसले होते.

होस्टेलच्या रूममेट्स म्हणाल्या
'वेडी आहेस की काय तू?
हे सगळं चालणारच.
सोडून द्यायचं.
त्यात काय?"


नंतर वेळोवेळी कारणाकारणानं त्रास होत गेला.
काही कारणं लोकांना पटली...
काही नाही पटली..
मी रडत राहीले...
रात्रीचे प्रहर टक्क डोळ्यांनी पिंजत राहिले..


फिल ह्यूज गेला..


माळीण घडलं...


पाकीस्तानात कोवळी पोरं मारली गेली..


शुभम शहीद झाला...


सगळेजण जाती,धर्म,सीमा ह्या गोष्टींच्या आड लपत *क्याल्क्युलेटेड* शोक करत राहिले.


नवरा म्हणाला,
" वेडाबाई कशाचाही त्रास करून घेतेस.''


मी त्याच्या कुशीत अजूनच स्फुंदत राहिले...


मग बातम्या बघणं बंद केलं,
पेपर वाचणं बंद केलं..
तरीही त्रास होतोच हो डॉक्टर..


काय करु?"


डॉक्टर म्हणाले,
"हल्ली असा त्रास होणारे कमी रुग्ण सापडतात.
त्यांना मन नावाचा एक अनावश्यक अवयव असतो.
पूर्वी तो अवयव वापरला जायचा. पण आता माणूस(?) उत्क्रांत (?)
होत चाललाय नं तसा तो अवयवही अपेंडिक्स सारखा व्हेजेटेटिव अवयव झालाय.."


माझे डोळे आशेनं लुकलकले.


"मग आपण अपेंडिक्स काढून टाकता ऑपरेशनने. तसंच मनही काढून टाकता येईल का हो?
फार त्रास होतोय मला."


डॉक्टर खेदानं म्हणाले,
"दुर्दैवानं मन अँप्यूट नाही करता येत आम्हाला. मर्यादा पडतात. कायमस्वरूपी असा काही उपाय नाही त्यावर.."
निराश होऊन घरी आले...आणि *असिफा* तुझ्याबद्दल कळलं गं.


आता परत माझा
श्वास कोंडतो आहे...
भीती वाटते आहे...
डोळे वाहताहेत...
हातपाय लुळे पडतायत
फार त्रास होतोय..

तुम्हा कुणाच्या ओळखीत

मनाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर असेल तर बघा हो.
मला खरंच खूप त्रास होतोय...


क्षमा (Kshama Goverdhan Shelar)

Saturday, 16 February 2019

विदेशात महिला राजसत्तेची भरारी ..

गेल्या महिन्यात तुलसी गॅबार्ड या भारतीय हिंदू अमेरिकन महिला काँग्रेसवर (अमेरिकेतील लोकसभा) निवडून आल्याची बातमी वाचली होती आणि एक स्त्री म्हणून त्यात भारतीय म्हणूनही उर अभिमानानं भरून आला होता. गेल्या आठवड्यात भारतीय त्यातही विशेषतः महाराष्ट्रातल्या असणाऱ्या नीला विखे पाटील यांना स्वीडनच्या पंतप्रधानपदी निवड झालेले सोशल डेमोक्रेटिक पार्टी-ग्रीन पार्टी या आघाडीचे नेते व पंतप्रधान स्टीफन लोफवेन ह्यांनी आपल्या राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची बातमी वाचनात आली. नीला यांच्याकडे अर्थ विभागातील सल्लागार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून करप्रणाली, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घरबांधणी क्षेत्राबाबत त्या पंतप्रधानांना सल्ला देतील. या बातमीनं केवळ आनंद झाला नाही तर भारतीय महिला त्यांच्या नेतृत्वाचे ठसे आता स्थानिक पातळीवर किंवा विधिमंडळ, संसेदेचं सभागृह एवढ्यापुरतं मर्यादित न राहता अंतर्राष्ट्रीय स्तरावर उमटवू लागल्या असल्याची जाणीव अधिक प्रखर होत गेली.
खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे त्यांच्या राजकीय हक्कांची लढाई त्यासाठीचा संघर्ष सोपा कधीच नव्हता. धोरण ठरवणाऱ्या राजकीय यंत्रणेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत या अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व हाताच्या बोटावर मोजण्याइतकंही नव्हतं, याचा नुसता विचार होण्यासाठीही स्वातंत्र्यानंतर चार दशकं उलटावी लागली. १९९३ मध्ये पंचायत राज कायदा झाला. त्यानंतर ७३वी घटनादुरुस्ती झाली. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळालं. २००९ मध्ये घटनेच्या कलम २४३ ड मध्ये पुन्हा दुरुस्ती झाली आणि हे आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलं. स्त्री आणि पुरुष विषमतेच्या निर्देशांकामध्ये जगामध्ये भारताचा क्रमांक १४८ पैकी १३८ वा आहे. लोकसभेत स्त्रियांचे प्रमाण सातत्याने १०-११ टक्केच राहिलेले आहे. परिणामी इंटरनॅशनल पार्लमेंटरी युनियनच्या अनुक्रमानुसार भारताचे स्थान १०५ वे आहे. आकडेवारीचा विचार केला तर लोकसभा व विधानसभा यांच्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण १९९५ मध्ये ११ टक्के होते, ते आता २१ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे व तळागाळातील लोकशाही म्हणजे स्थानिक पातळीवर स्त्रियांचा सहभाग ५० टक्के झाला आहे. १९९५ ते आजवर जवळजवळ २५ वर्षांत स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढला, गुणवत्ता वाढली व त्यांच्या अपेक्षांनाही आकांक्षेचे पंख मिळाले आहेत. हे पंख आता त्यांना विदेशातील राजकारणापर्यंत घेऊन गेले असून त्यांनी स्वतःला सर्व स्तरात सिद्ध करून दाखवले आहे. स्त्रिया राजकारणात आल्या, निर्णयप्रक्रियेला समजून घेऊ लागल्या एवढेच नाही तर  स्त्रियांना निर्णय घेता येतात, ती अधिकार गाजवू शकते, किंबहुना स्त्री एक उत्तम प्रशासक असू शकते अशी ओळख तिने स्वकर्तृत्वाने मिळवली आहे. गेल्या दोन दशकात महिलांचं नेतृत्व असं परिपक्व होत गेलंय.

फार काळ ही ऊर्जा स्थानिक पातळीवर दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. या स्त्रियांनी राजकारणात संधी मिळाल्यावर अधोरेखित केले की, चौकटीबद्ध, प्रस्थापित, परंपरावादी राजकीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन बुद्धी-परिश्रम-वेळेचा नियोजनबद्ध उपयोग करून  स्वनिर्णयावर या क्षेत्रातही देश विदेशापर्यंत यशाचे झेंडे रोवणार असल्याचा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर विदेशात राजकीय ठसा उमटवणाऱ्या तुलसी गॅबर्ड यांच्याबद्दल भारतीयांना अभिमान वाटणं साहजिक आहे.

 तुलसी गॅबार्ड या डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्य आहेत. ३७ वर्ष वय असलेल्या तुलसी ११ जानेवारी २०१९ रोजी हवाई प्रांतातून होनोलुलूचे महापौर मुफ्ती हनेमन यांचा पराभव करून अमेरिकन प्रतिनिधीसभेवर सिनेट सदस्य म्हणून ५५% मताधिक्याने निवडून आल्या आहेत. अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी २०२० साली होणाऱ्या निवडणुकीत आपण उमेदवार असल्याचे त्यांनी जाहीरही केले आहे. अमेरिकेतील काँग्रेसवर निवड झालेल्या तुलसी या पहिल्याच भारतीय असून त्यांच्या हिंदू विचारप्रणालीवरून अमेरिकेतील धार्मिक कट्टरवाद्यांनी त्यांच्याविरुद्ध जंग छेडली आहे. अमेरिकेतील अनेक माध्यम समूहांनी त्यांची कट्टर हिंदुराष्ट्रवादी अशी छबी जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला आणि ती धोकादायक असल्याचे दावे केले. या अपप्रचाराला उत्तर देतांना तुलसी अत्यंत संयतपणे आणि संस्कारक्षम पद्धतीने वागतांना दिसतात. देशाशी आणि स्वतःच्या संस्कृतीशी असणारी त्यांची बांधिलकी त्या मोठ्या अभिमानाने अमेरिकेतील नागरिकांसमोर मांडताहेत. अमेरिका भारत या दोन देशात सैनिकी व्यूहरचनाविषयी झालेली भागीदारी आणि त्या निमित्ताने होत गेलेली मैत्री, भारताच्या पंतप्रधानांबरोबर असलेले अमेरिकी राज्यप्रमुख आणि इतर राजकारण्यांचे मैत्रीपूर्ण संबंध याचा दाखल ती वेळोवेळी देत, इतिहासाचा अभ्यासपूर्ण संदर्भ देत स्वतःसह स्वतःच्या देशाचीही गरिमा टिकविण्याचा मोठ्या शिताफीने प्रयत्न करीत आहेत.  

तुलसी गॅबार्ड यांनी युद्धकाळात इराकमध्ये सेवाकार्य केले. हवाई आर्मी नॅशनल गार्ड सैन्यदलाच्या मेडिकल युनिटमध्ये देखील दीर्घकाळ काम केले आहे. त्यांना मेजर म्हणून बढती देखील मिळाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तिचा जगभरातल्या प्रसिद्धीचा आणि तेवढाच संघर्षाचाही काळ सुरु झाला आहे  त्यातून राजकीय गटबाजी, पुरुषांची स्पर्धा- असूया, राजकीय उतरंडीतून निर्णयांच्या सर्वोच्च ठिकाणी आपले काम दखलप्राप्त करायचे या सर्व आव्हानांना तिला सामोरे जावे लागते आहे. निवडणुकीला अजून बराच काळ जावा लागणार असला तरी, राजकारणात स्वतःचा ठसा उमटविणे आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठीच्या तुलसीच्या धडपडीला मात्र भारतातल्या समस्त नागरिकांचा पाठिंबा आणि शुभेच्छा असणार आहेत.

-रश्मी पदवाड मदनकर 




Tuesday, 5 February 2019

कुमारीमाता' एक गंभीर समस्या ..




महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाच्या सीमेवर वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, झरीजामणी, मारेगाव, वनीसारखे तालुके आणि त्याच्या भोवताल वसलेली आदिवासी लोकांची वस्ती असलेली छोटी मोठी जवळ जवळ १२७ गावे. आदिवासी लोकांचा चरितार्थ येथे शेतीच्या भरवशावर चालतो. मिरची हे मुख्य पिक असलेला हा परिसर. हि गावे संपूर्ण भारतासाठी मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या आदिवासी भागात जवळ जवळ ९९ टक्के अशिक्षिततेचा रेशो आहे. हि लोकं गावातून बाहेर पडत नाहीत म्हणून चौकटी बाहेरील ज्ञानाने येणारं शहाणपण, हुशारी यांच्या गावीही नाही. अजूनही हि लोकं आपल्यापेक्षा कितीतरी शतकं मागे जगत आहेत असं जाणवत राहतं.

इथे भारतभरातून व्यापारी येतात विशेषतः आंध्रमधून. … व्यापारासाठी आलेली लोकं भाव समजून घ्यायला, माल भरायला, पाठवायला आणि बाजारपेठेचे स्वरूप जाणायला म्हणून पंधरा दिवस, महिना महिना येथे मुक्काम करतात. अश्यात त्यांना या आदिवासी लोकांच्या पोड्यावरच (येथील आदिवासी लोकांच्या वस्तीला पोडे असे म्हणतात) राहावे लागते कारण अजूनही मागासलेल्या या भागात हॉटेल वगैरे मिळणे शक्य नाही. हे सुरुवातीच्या काळात आणि आता त्यांना तशी गरजही भासत नाही त्यांना पोडेच आवडायला लागलेत, का ते पुढे वाचून लक्षात येईलच … . तर …… पूर्वी हे व्यापारी इथे राहत असतांना त्यांना त्यांच्या सर्व गरजा पुरवायच्या असायच्या अश्यात त्यांच लक्ष असायचे ते त्या गावातील किंवा ते राहत असलेल्या त्या व्यापारी माणसाच्या घरातील अल्पवयीन मुलींवर. हे व्यापारी तेवढ्या काळात त्या मुलींबरोबर हवीतशी मज्जा करून निघून जात ते पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. बाहेरहून आलेल्या व्यापाऱ्याच्या राहणीवर पैशांवर भूलायच्या या मुली… कारण गरीबीच तशी आहे आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षण नसल्याने कोणत्याही गोष्टीची जागृकताच नाही या लोकांमध्ये मग संस्कार अन शिस्त या गोष्टी खूप दूर राहिल्यात. मुलींनी कसे वागावे बोलावे कुणाशी बोलावे कुणाशी बोलू नये असे शिक्षण बिक्षण तिथे नव्हतेच कधी…. परिणाम दिसू लागल्यावर जरा सावरलेत लोकं पण अजूनही समस्या कायम आहे…. आणि नुसती कायम नाहीये तर ज्या गतीने वाढत जातेय ती गती थांबवली नाहीतर त्याचे परिणाम पुढल्या १५-२० वर्षात भयंकर फना काढून पुढे येतील आणि मग ते सावरणं कठीण होऊन बसेल.


आधी दोन चार प्रकरणं सापडत असावी अशी. व्यापारी निघून गेल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे कळते पण आता जबाबदारी घेणारं कुणीही नसतं मागासलेपण इतके कि दवाखाने, औषधपाणी अश्या सर्व गोष्टींचा त्यांना स्पर्शही नाही. अंधश्रद्धा कुटून भरलेली. हळूहळू हि प्रकरणं वाढीला लागली. काही मातापित्यांनी त्या १४-१५ वर्षाच्या मुलींना घरातून हाकलून लावलं. मग ती तान्ह्या लेकराला घेऊन वेशीवर तंबू ठोकून, मातीची लेपलेली खोली बांधून राहू लागली. पोट भरायला काहीतरी करावं लागणार होतंच. काहीवेळेला पोट भरायचे साधन म्हणून, थोडा पैसा मिळतो म्हणून आणि काहीवेळेला एकटी आहे तिच्या मागे तिला वाचवणारं कोणीच नाही म्हणून पुन्हा पुन्हा तिच्यावर प्रसंग घडत राहिले आणि एकाचे दोन आणि दोनाचे चार चार पोरं घेऊन ती जगू लागली. कुमारी मातेचा असा हा वाढत जाणारा वंश. बरं हि सगळी पोरं अनौरस ज्यांना त्यांचा बाप माहितीच नाही. बाप माहिती नसणं हा मोठा मुद्दा नाही. पण आईचीही ओळख कुठे आहे. ती ठार अशिक्षित. जन्माच्या दाखल्यापासून ते जातीच्या प्रमाणपत्रापर्यंतचा एकही कागद नाही तिच्याकडे… कागद नाही मग सरकारी योजना मिळतील हि आशा तिथेच संपली मुळात अश्या काही योजना असतात हे ज्ञान सुद्धा तिला नाहीये. तिथे शिक्षण नाही जागृतता नाही. जगतांना आवश्यक असा एकही कागद त्यांच्याजवळ मिळणार नाही. अज्ञान इतके कि आपल्यासाठी काय चांगले काय वाईट ह्याची जाण नाही. त्यांच्या अज्ञानाचा बाहेरच्यांनी अनेकदा फायदाच घेतलाय. त्याची भीती त्यांच्या मनात बसलीय. ते सहसा कुणाला सहकार्य करत नाही. शासनाचे त्यांच्याकडे लक्ष नाही परत अनौरस मुलांची संख्या इतकी वाढत चाललीय कि त्यांच्यासाठी काही करायचे म्हंटले तरी सर्वात आधी अडथळा ठरतील ती शासन दरबारचे नियम यांचा जन्म सिध्द करणं आणि इतर गोष्टी करत बसायलाच कित्तेक वर्ष निघून जातील … आधार कार्ड , इलेक्शन कार्ड जातीचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला …. असे काही असते हे सुद्धा तेथील लोकांना माहिती नाही ते समजून सांगणे सुद्धा कठीण ते करून घेणे तर दूरच.


मग शाळेत मुलांच्या दाखल्याचा प्रश्न तर फार फार दूर राहिलाय ….


हे असंच चालत राहिलं वर्षानुवर्ष शासनाचं त्या भागाकडे कधी लक्ष नव्हतंच, जणू हा भूखंड आपल्या नकाशावर नाहीचेय. प्रकरणं वाढत गेलीत. २०१० साली या कुमारीमातांचा आकडा ३५० च्या घरात होता आज तो १५०० वर पोचलाय आणि प्रत्येकीला निदान ३-४ मुलं. प्रत्येकीची हि अशीच कहाणी. तेथील लोकं सरावली आताशा या सर्व प्रकरणांना. व्यापारी आणि नवनवीन निर्माण होणाऱ्या कुमारी मातांच त्यांना आता विशेष वाटेनास झालंय आता कित्तेक आईवडील ह्या कुमारीमाता मुलींना घरीच ठेवतातही आणि त्यांच्या मुलांनाही सांभाळतात-वाढवतात. त्यांना भीती वाटते ती बाहेरून येणाऱ्या इतर लोकांची जी शासनाच्या नावाखाली, प्रशासनाच्या नावाखाली काही बातम्यांसाठी काही सिनेमांसाठी तर काही पुस्तक लिहायला इथून कहाणी घेऊन जातात… आश्वासनं देऊन जातात पण करत काहीच नाही. सगळे एकाच माळेचे मनी. आम्ही जगतोय तसे जगू द्या आम्हाला आमच्या परिस्थितीत तसेच सोडून द्या असे त्यांना वाटत राहते आणि म्हणून आपल्यासारखी लोकं तिथे गेलीत कि ते शंकेच्या नजरेने बघतात …एकही बोलायला तयार होत नाही.


एखादीच सरला तरतर चालत येते 'काऊन तुमी माया घरी कावून आलते जी इचाराले' असं समोरून येउन विचारते… बडबड करत आपल्याला तिच्या मागेमागे चालत तिच्या घरी घेऊन जाते. दोन माणसं सरळ झोपली कि बाजूला उभे राहायलाही जागा उरणार नाही इतक्याश्या त्या मातीच्या तुटक्या खोलीत आपण वाकून आत शिरतो तेव्हा उघडाबंब उपडा झोपलेला तीन वर्षाचा मुलगा कोपऱ्यात आईच्या फाटक्या साडीच्या पदराला धरून निजलेला दिसतो. दुसरा ५ वर्षाचा बाहेर अंगणात मातीत खेळतांना दिसतो. …. आणि तिथेच डाव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेली चूल आणि त्या शेजारी उपडी ठेवलेली मोजून काळी पडलेली दोन भांडी ….चूल सताड थंड पडलेली… गेल्या कित्तेक दिवसात हि चूल पेटलेली नाही हा मागमूस मनाला लागतो आणि रोजगार मिळवायला तिला काय खटपट करावी लागतेय ह्या तिच्या सतत चाललेल्या बडबडीकडे लक्षही न देता आपलेच डोळे कधी वाहायला लागतात कळत देखील नाही…दारिद्र्य दारिद्र्य म्हणतात ते हेच का ?… तुम्हाला जावं वाटत नाही आणि जावंही लागतं.…. ह्यांच्यासाठी काहीतरी करायचंच अशी मनाशी गाठ बांधून आपण बाहेर पडतो …. पण बाहेर पडतंच नाही…. खरतर पडताच येत नाही. गुंतून पडतो आणि गुंथाच होत जातो सारा. मनाचाही आणि विचाराचाही.

-रश्मी पदवाड मदनकर 











Friday, 1 February 2019



कोणी साताचे सत्तर करतो
कोणी घामाचे अत्तर करतो !


तावुन सुलाखून आयुष्याला
नशिब कोणी बलवत्तर करतो !


चुकली असेल अनेकदा ती, पण
प्रेम तिच्यावरी निरंतर करतो !


हरतो,पडतो अन पडून उठतो
जगणे माझे बेहत्तर करतो !



शंभर मैलाचा दगड गाठण्या
प्रवास माझा मी खडतर करतो !



व्यथा मनाच्या झरू लागल्या की
मी या दिलाचाच पत्थर करतो !



- रश्मी मदनकर
#गझल

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...