Tuesday 13 September 2016

स्क्रिझोफ्रेनिया





आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची माणसे आपण रोज पाहत असतो. जितकी माणसे, तितकेच निरनिराळे स्वभाव. "जितक्‍या व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती', अशी म्हणच आहे. या सगळ्यात आपण सामावून गेलो असतो. त्या सगळ्यांना स्वीकारले असते. स्वतःलाही त्यांच्यात सामावून घेतले असते. पण, कधीतरी विचित्र वागणारी माणसे दिसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात समन्वय नसतो. सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळ्याच हालचाली ते करीत असतात. असंबंध बडबडत असतात. त्यांना आपण विक्षिप्त किंवा पागल ठरवून मोकळे होतो. पण, त्यांना असे का झाले असावे, त्यामागची कारणे काय, त्यावर उपाययोजना काय, याचा विचारही आपण करत नाही. अनेकदा अशी लोक स्क्रिझोफ्रेनियाचे रोगी असू शकतात.

काय आहे हे स्क्रिझोफ्रेनिया प्रकरण?
स्क्रिझोफ्रेनिया हा रुग्णाच्या विचार, भावना व वर्तणुकीवर परिणाम करणारा मानसिक आजार आहे.
हा विकार दीर्घ काळ चालणारा, गंभीर व मानसिक संतुलन बिघडविणारा आजार आहे. या आजारात रुग्ण जीवनातल्या वास्तविकतेपासून दूर होत जातो. त्याला वास्तविकता व भ्रम यात फरक समजून येत नाही. बऱ्याचदा तो काल्पनिक जीवनात रममाण होतो आणि तसेच वर्तन करतो. त्यामुळे त्याच्या एकंदरीतच वागण्यात विक्षिप्तपणा येत जातो.

स्क्रिझोफ्रेनिया होण्याची निश्‍चित कारणे अजूनही शोधता आली नाहीत. तरीही आनुवंशिकता, मुळात विस्कळीत व्यक्तिमत्त्व असणारी, वास्तविक जीवनापासून दूर राहून पुस्तके, चित्रपट यात रमून स्वतःचे वेगळे विश्‍व निर्माण करणारे, सतत मानसिक दडपणाखाली जगणारे, बाळंतपण किंवा एखाद्या गंभीर आजारातून-अपघातातून होणारे शारीरिक-मानसिक बदल, अशी कारणे यासाठी सांगितली जातात. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही मानसिक आजार होतात. पण, स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते.

स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणे म्हणजे, खूप एकापाठोपाठ एक दिवास्वप्न पाहणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे/बडबड करणे, कारण नसताना हसणे व रडणे, लहान मुलांप्रमाणे वर्तणूक करणे, काहीतरी विचित्र क्रिया करणे, नकारार्थी भूमिका घेणे, पुन:पुन्हा तेच शब्द उच्चारणे, अंगस्थिती विचित्र ठेवणे, विक्षिप्त हावभाव करणे, इच्छाशक्ती कमी, उद्देश, ध्येय नसते, रोजचे दैनंदिन कामदेखील करण्याची इच्छा नसते. घरातील नातलग किंवा मित्रमैत्रिणी यांच्यात बोलायला आवडत नाही. निर्णय घेता येत नाही. भावना बोथट झालेल्या असतात. काहींच्या मध्ये त्या अतिशय उथळ असतात. इतक्‍या की त्या व्यक्ती भावनावेग आवरू शकत नाहीत. सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा काहीही नसतो. उदा. रडण्याची परिस्थिती असेल तर तिथे ते खूप हसावयास लागतात. बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णामध्ये अगदी विविध भावनात्मक जाणिवा निर्माण होतात.

असा रुग्ण आढळल्यास त्याच्या वागणुकीने वैतागून न जाता त्याला मानसिक तज्ज्ञांकडे नेऊन योग्य उपचाराची गरज आहे हे ओळखले पाहिजे. त्याला सहृदयची वागणूक दिली पाहिजे. प्राथमिक स्वरूपातील आजार लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात. अन्यथा मानसिक रोग बरे होण्यास बराच काळ लागतो तितके दिवस धीर धरून उपचार सुरू ठेवणे गरजेचे असते.


No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...