Tuesday 13 September 2016

माजघरातले रुदन ..

अतिशय कर्तृत्ववान, हुशार, देखणी असलेली स्वकर्तृत्वाच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवून सांस्कृतिक क्षेत्राची लाडकी झालेली. करिअरच्या उत्तुंग शिखरावर असतांना आयुष्यात घेतलेल्या एका चुकीच्या वळणाने आयुष्यच श्राप बनून बसलेली डॉली. गुणी निवेदिका म्हणून नागपूरकरांच्या घराघरात पोहचलेला एक सुंदर चेहरा तिच्या चाहत्यांच्या आणि एकंदरीतच समाजासमोर मोठा प्रश्नचिन्ह सोडून आज ब्रेनडेड होऊन निपचित पडलेली आहे. तिची हि करून कहाणी. 
 ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण आयुष्यच समर्पित केले अश्या माणसाने फसवणूक केली. सात महिन्याआधी सप्तपदी चालून ज्याच्या उंबरठ्या आत पाऊल ठेवले त्या नवऱ्यानेच दगा दिला. पैशांसाठी, हुंड्यासाठी पिळवणूक केली. शारीरिक मानसिक अत्याचार केले. म्हणून वाढदिवसालाच फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉलीला तिच्या माहेरच्या माणसांनी ताबडतोब उपचारार्थ भरती केले परंतु तोपर्यंत डॉली कोमात गेली होती आणि आता नागपूरच्याच कुठल्याश्या रुग्णालयात अति दक्षता विभागात मरणासन्न अवस्थेत मृत्यूशी झुंझ देते आहे.  हल्लीच दिल्लीत आप या राजकीय पार्टीचे मोठे नाव असलेला नेता सोमनाथ भारतीच्या पत्नीने लिपिका मित्राने नवर्याकरवी  आपल्यावर घरगुती हिंसा होत असल्याची तक्रार पोलिसात टाकली होती. त्याआधी अनेकवर्ष तिने हा अत्याचार सहन केला होता. दोनेक वर्षाआधी अशीच गाजलेली घटना 70 कोटीचे चित्रपट नावावर असणाऱ्या बंगरुळुच्या सिनेइंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता दर्शन विरुद्ध त्याच्या पत्नीने 'घरगुती हिंसाचाराची' तक्रार केली. 8 वर्ष प्रचंड मारहाण आणि अत्याचार सहन केला पण जेव्हा तिच्या मुलाच्या जीवावरही तो उठला तेव्हा सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिला पुढे यावे लागले होते. सुशिक्षित सुसंस्कृत संपन्न समजल्या जाणाऱ्या घरातली हि व्यथा असेल तर निरक्षर गरीब कुटुंबाचे काय?

स्त्री सहनशील आहेच. मानसिक रीतीने सबळ देखील असते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून उभे राहून आपल्या माणसांना धीर देण्याचे कामही ती करू शकते मात्र जेव्हा अन्याय अत्याचार आपल्याच माणसांकडून होतो तेव्हा मात्र ती खचते. कोसळते. आपलीच माणसे आपले वैरी का होतात ?? हा मात्र आजतागायत कधीही न सुटलेला प्रश्न आहे.

अनादी काळापासून शोषण सहन करणारी 'कन्यादान' 'सती जाणे' 'देवदासी' 'बालविवाह' सारख्या प्रथांना मागे टाकून आकाशाला गवसणी घालायचा प्रयत्न करणारी स्त्री, आजही स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, हुंडाबळी अश्या अनेक बड्या समस्यांना तोंड देत असतांनाच कौटुंबिक हिंसाचारासारख्या दुर्लक्षित समस्येला ती रोज तोंड देते आहे. यात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक, शाब्दिक किंवा कुठल्याही प्रकारची मानहानी म्हणजे हिंसा तिच्या वाट्याला येते. गाव पातळीवरील महिला, शहरी, नोकरीपेशा, सुशिक्षित, श्रीमंत गरीब, स्वतः कमावती असणारी काय किंवा घरातील चौकटीपलीकडे स्वतःची प्रतिष्ठा असणारी काय. चार भिंतीआत मात्र अनेकदा अश्या अत्याचारांना तोंड देत असते. बऱ्याचदा भावनिक हिंसाचार हा गृहितच धरला जात नाही. त्याची तीव्रता आणि व्याप्तीही मोजता येत नाही. कारण ती व्यक्तिगणिक बदलू शकते. कुटुंबांमधला भावनिक हिंसाचार हा अधिक धारदार आणि माणसांचा कडेलोट करणारा असू शकतो. शारीरिक हिंसाचार हा बऱ्याचदा या भावनिक हिंसाचाराचंच प्रकट रूप असतं. स्त्रियां कडे बघण्याचा समाजाचा आणि काही विकृत पुरुष मनोवृत्तींना आळा घालण्या साठी लहानपणा पासून शालेय शिक्षणा बरोबरच सभ्यतेनी कसं वागावं याचं रितसर शिक्षण-धडे मुलांना देणे प्रचंड गरजेचं आहे. महिला दिना निमित्त फक्त एक दिवस ही सगळी चर्चा करून पुन्हा उरलेले दिवस समाजाच्या अन्यायापुढे गुडघे टेकणे, बचावात्मक पवित्रा घेणे जेंव्हा बन्द होईल तेंव्हा स्त्री ने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकले असे म्हणायला हरकत नाही.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतांना आपण विकासाच्या बड्या बाता मारतांना आजही स्त्रीमुक्तीच्या आंदोलनांना सामोरे जावे लागत असतांना, तिच्या प्राथमिक गरजाच पूर्ण होतं नसतांना तिच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतांना तिच्या शरीराला खुसपटसामान भोगवस्तू मानली जाऊन जागोजागी तिचे लचके तोडले जात असतांना. आम्ही भारत विश्वप्रमुख बनण्याचे स्वप्न पाहतो हा खरतर वैश्विक विनोदच नाहीये का?




 2005 च्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात असे लक्षात आले कि 15 ते 49 वयोगटातल्या 81 % स्त्रियांना शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळांना सामोरे जावं लागतं. पॉप्युलेशन कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) या संस्थेच्या  सर्वेक्षणात ८,०५२ विवाहित पुरुष आणि ९३,९१२ विवाहित स्त्रिया (१८ ते २९ वयोगट) यांच्या अभ्यासातून निष्कर्षांला आलंय की आपल्या प्रागतिक सुधारक महाराष्ट्रात 23 टक्के स्त्रियांना नवऱ्याद्वारा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये १४ टक्के अत्याचार लग्नाच्या पहिल्या वर्षांत होतात. अपमानास्पद बोलणे किंवा थप्पड खाणे 97 % स्त्रियांसोबत होते. लाथा, बुक्क्या, पट्ट्याने मार खाणे, सिगरेटचे चटके, घराबाहेर हाकलून लावणे हे प्रकार सर्रास घडतांना दिसतात. २००५ साली कौटुंबिक हिंसेपासून स्त्रियांचे रक्षण करणारा कायदा अस्तित्त्वात आला.
४९८ कलमामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळते.  हा दिवाणी कायदा असल्याने पोलिसांचा हस्तक्षेप नसतो. पुन्हा फक्त स्त्रीच नव्हे तर तिचे नातेवाईक, शेजारी, मित्र, हितचिंतक अर्ज करू शकतात. त्याकरता वकिलांची गरज नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने नेमलेल्या संरक्षण अधिकारी, नोंदणीकृत सेवाभावी संस्था, मॅजिस्ट्रेट किंवा पोलिस अधिकारी यापैकी कुणाकडेही ही स्त्री तक्रार नोंदवू शकते. पण शोकांतिका म्हणजे आज 11 वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी समाधानकारक होऊ शकत नाहीये. 




('सकाळ' नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित.  http://epaper4.esakal.com/14Sep2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm)

2 comments:

  1. Tila ti na mhanata TO mhanun pratek palkane vadhavale tar kadachi TIabala n hota sabala hoil.

    ReplyDelete
  2. Thnks 4 reply .. my thinking is different तिला 'तो' म्हणून का पाळावे?? ती तीच आहे आणि राहील. कारण तिच्यासारखा कुणीच नाही. पण तिला अधिक सबळ बनवण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न केले गेले पाहिजे. पालकांनी मुलगा आणि मुलीचे प्रशिक्षण आता पठडीच्या बाहेर येऊन करायला हवे आहे.

    ReplyDelete

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...