Thursday 21 April 2016

झंझावती नेत्या तृप्ती ताई देसाई ह्यांना खुले पत्र

 झुंझार प्रवृत्तीच्या, अथक परिश्रमी, सळसळत्या रक्ताच्या, तळमळीच्या समाजसेविका, लढवैय्या, आक्रमक आंदोलनकर्त्या, जगतजननी- जगन्माता कळकळीच्या महिला कार्यकर्ता ...अर्रर्र नाही नाही (नुकतच) पुढारलेल्या झंझावती नेत्या तृप्ती ताई देसाई ह्यांना खुले पत्र

बाई गं  ... महादेवाने तिसरा डोळा उघडावा तसे अचानक तुझे डोळे उघडले अन तुझ्यातली दुर्गा जागृत झाली. धार्मिक स्थळांतून महिलांवर होणारे अत्याचार तुला आजच दिसू लागले आणि तू मां कालीचे रौद्ररूप धारण केले. शनीच्या चौथऱ्यापर्यंत ठीक होते गं, आम्ही नाही तर नाही तू दर्शन घेतलेस याचाही आनंद कमी नव्हता. पण तू एक एक पाउल उचलत पुढे पुढे जाते आहेस आज मंदिर उद्या मस्जिद जणू धार्मिक स्थळी दर्शन घेणे हे एकमेव ध्येय एकमेव स्वप्न स्त्रियांच्या लेखी उरलंय हे त्यांच्यावतीनेही तुझ तूच ठरवून मोकळी झालीयेस. बायो ! स्त्रियांनी स्त्रीवादी असावं माजुरडी हट्टवादी झालोत तर ते स्त्रीला शोभणारं नाही. स्त्री म्हणून स्त्रीने हळवेपण, ममत्व, नम्रपण जपलच पाहिजे. स्त्रीचे शाश्वत गुण आहेत ते. तेच गमावले तर कसली स्त्री आणि कसला स्त्रीवाद मग. आपण आपले हक्क आपले स्त्रीपण आपले शाश्वत संस्कार अबाधित राखूनच मिळवायला हवे. अर्थात हे सर्व स्त्री म्हणूनच विचार केला तर राजकारण असेल तर मात्र गटारातच उतरावं लागतं हे कबूल आहे. 

पण मग तू जे काही करते आहेस ते संपूर्ण देशभरातल्या महिलांची हीच मागणी आहे आणि एवढीच गरज आहे या अविर्भावात वागू नकोस. तुझ्या वागण्याचे पडसाद सर्व महिला वर्गाच्या जगण्यावर पडताहेत हेही विसरू नकोस. विशेष म्हणजे महिलांना काहीच करू दिले जात नाही सगळं पुरुषच करतात असा आव तर अज्जीबतच आणू नकोस. हक्क मागण्याच्या बहाण्याने त्यांचा व्यापच तू वाढवते आहेस लक्षात ठेव. शिक्षणाने स्त्रीला मानसिकदृष्ट्या सक्षम केले आता आता कुठे ती परंपरेच्या सो कॉल्ड चौकटी मोडून तर्काधिष्ठित विचारांवर ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न करते आहे. बुरसटलेल्या विचारांच्या कडा मोडण्यासाठी अजूनही संघर्ष करते आहे. जिथून तिला बाहेरच पडायला हव तिथे तू तिला आणखी आत ओढते आहेस. सारया संसाराचा भार तिच्यावर असतो घरचे-बाहेरचे.नौकरी, गणगोत, मुलाचं शिक्षण, नवऱ्याची प्रगती सगळं बघता बघता तिच्याकडे वेळ कितीसा उरतो? या साऱ्यांना प्राधान्य देतांना स्वतःच्या आवडी निवडी कलागुण जपणे तरी शक्य होते का? जबाबदाऱ्या निभावतांना अनेकदा प्रगतीच्या संधींकडे निग्रहाने ती पाठ फिरवीते . किंबहुना स्वतःकडे दुय्यम स्थान घेते .स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करते. त्यात तू तिला आणखी मंदिराच्या, मास्जीदिच्या चव्हाट्यावर ओढू पाहते आहेस ..कशाला तिचे धिंडवडे काढतेस.

कामातला वेळ काढून मंदिर दर्शन देवपूजा वगैरे हे एक काम तरी पुरुषांकडे राहू दे कि, सगळं काय स्त्रियांनीच करायचं. झालच तर आणखी काही बाबी पुरुषांकडे ढकलता येतात का बघ?? आम्ही का करू नये हा काय प्रश्न झाला ?? आम्हीच का ?? असा काहीतरी मुद्दा आमच्या वतीने उचल. सकाळचा स्वयंपाक महिला तर रात्रीचापण मीच का ?? मुलांचे संगोपन, त्याचं आरोग्य मी सांभाळतेय तर अभ्यास आरोग्याची जबाबदारीही सांभाळायची मीच का ? अस काहीतरी कर. तेही नाही जमलं तरी चालेल हो एकदा पण निदान देवाच्या नावाने धर्माच्या नावाने बिनकामाचा व्याप मात्र वाढवू नकोस.

एवढंच 

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...