मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Friday, 25 March 2016
Friday, 18 March 2016
ग्लोरिफिकेशन - आत्महत्यांचे उदात्तीकरण
'आत्महत्या' खरतर गंभीर विषय. कायद्याने म्हणाल तर गुन्हाच. कुठल्याही माणसाला जसा जन्म कुठे घ्यायचा हा अधिकार नसतो तसे प्रत्येक जन्मलेल्या माणसाला स्वतःला संपवण्याचे अधिकारही न्यायालयाने, शासनाने दिलेले नाहीत. जन्म घेतलाय तर जगावेच लागते मरण येत नाही तोपर्यंत. हे सगळे खरे असले तरी आत्महत्या होत नाही असे नाहीच. रोज अगदी रोज आत्महत्या होतात आणि शेकड्याने होतात. माणूस हा अगम्य प्राणी आहे. ज्या गोष्टींकडे जाण्यास त्याला आळा घालाल त्याच गोष्टींकडे तो जास्त आकर्षित होतो खेचला जातो. आकर्षणाच्या नियमात हे सटीक बसत असले तरी आत्महत्या हा डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही. सध्या देशात जे काही चाललंय ते फार खेदजनक आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि दलितांची आत्महत्या हा देशातील सध्य:स्थितीत सर्वात गाजत असलेला विषय. परिस्थितीने गांजलेल्या कुणीही आत्महत्या करणे हे संवेदनशील मनाला त्रासदायकच आहे. असा कुठलाही मनुष्य नसेल ज्याला अश्या घटनांचे, या परिस्थितीचे वैषम्य वाटणार नाही. पण अशी परिस्थिती उद्भवली असेल तर तिला तेवढ्याच संवेदनशीलतेणे आपण हाताळतोय का हाच मुळात कळीचा मुद्दा आहे. आज देशात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात जे काही वैचारिक चर्चेच्या नावाने चाललंय ते पाहता प्रश्न उद्भवतो तो हा कि
''आपण आत्महत्यांचे उदात्तीकरण करतोय का??''
२००९ मध्ये पराग पाटील यांचा एक लेख वाचनात आला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूनंतर जी आत्महत्यांची लाट उसळली त्यावर त्यांनी लिहिले होते
''आत्महत्त्या या केवळ वैयक्तिक घटना नसून त्या सामाजिक फिनोमना आहेत, असं तत्ववेत्ते सांगत आले आहेत. जेव्हा एखादा करिझ्मॅटिक नेता जातो तेव्हा त्याच्या दु:खात स्वत:चं जीवन संपवणाऱ्या लोकांचं उदात्तीकरण म्हणजे समाज आजारी असल्याचं लक्षण आहे.''
हेच अगदी हेच निव्वळ आंध्र नाहीतर सगळ्याच आत्महत्यांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात लागू होत नाही का ??शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत मागल्या अनेक वर्षांपासून होत आहेत, त्या होऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असले आणि त्यासाठी शासनाने धोरणे राबवावी हि इच्छा असली तरी 'शेतकऱ्याने आत्महत्या का करावी हा प्रश्न शिल्लक राहतोच. चार माणसाचे पोट भरण्यासाठी त्याने काहीही करावे अगदी कष्ट उपसावे, हमाली करावी पण आत्महत्या करू नये. त्याच्या गेल्यानंतर त्याची बायको हाच फोर्मुला नाही का वापरत? आपल्याच घरी अस्मानी संकटाने भिउन चार माणसाची जबाबदारी आपण उचलू शकत नाही आणि देशभरातल्या लाखो शेतकऱ्यांची जबाबदारी शासनावर टाकून मोकळे कसकाय होतो ? आत्महत्या म्हणजे पळपुटेपणा.आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, संकट अडचणींना कसोटी समजून त्यांना तोंड द्यायचे सोडून घाबरून आत्महत्या करणाऱ्यांचे समर्थन कसकाय करू शकतो आपण?? हा झाला एक विषय.
''आंध्रातले शेतकरी आपला नेता मृत झाला म्हणून आत्महत्या करतात, तर महाराष्ट्रातले शेतकरी नेते जिवंत आहेत म्हणून आत्महत्या करतात'' हा त्यावेळी गाजलेला मराठी मुलखातला एक जहरी विनोद खिन्न हसूनही हा विनोद सोडून देता येत नाही. तो मनाच्या तळाशी डुचमळत राहतो.
रोहित विमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे राजकारण तर अतिशय दीनवाणे अन खेदजनक आहे. ऊच्च शिक्षण घेऊन, गुण अंगात बाणवून, मोठी कामं करूनही जिवंतपणी तर जिवंतपणी पण मेल्यावरही एखाद्याची ओळख फक्त 'दलीत' म्हणुन रहावी यासाठी त्याचीच लोकं जीव ओतून प्रयत्न करित असतील तर .. त्याच्या कर्तृत्वाहून जास्त तो दलित म्हणूनच शिल्लक राहणार हे त्याच्यासाठीही अभिमानाचे ठरले असते का प्रश्नच आहे. आणि हे असेच होणे आम्हाला समाजमान्य असेल त्यात काहीही गैर दिसत नसेल तर एक काय चार राष्ट्रपूरुषही आम्हाला यातून कधीच बाहेर काढू शकणार नाही....आपलं कर्तूत्व आपल्या योग्यता ही आपली ओळख का असू नये..? एका दलिताला मारलं म्हणूनच शिक्षा व्हावी असा हट्ट का? एका कर्तूत्ववानाला संपवलं असा लढा नाही देता येणार का?? विचार करा एकदा आपण काय करतोय आणि आपल्याला नेमकं हवय काय ??
विषय नुसताच आत्महत्यांचा असता तर तो संवेदनशीलतेच्या सहाणेवर घासून पाहता आलाही असता .... पण प्रश्न इथे थांबत नाही, समस्येच मूळ शोधून त्यावर उत्तर शोधायला वेळ देत नाही तोपर्यंत घडतं काहीतरी वेगळंच. आत्महत्या कुणाचीही असो आत्महत्येनंतर एवढी प्रसिद्धी इतकी प्रशंसा आणि प्रतिष्ठा मिळणार असेल; संपूर्ण देशाच सांत्वन, सोबत शासनाच्या सोयी सवलती आणि देशपातळीवर उदोउदो होणार असेल तर हे मिळवायला उद्याची पिढी पुढे सरसावेल हि भीती नाही का वाटत?? आपण काय आदर्श ठेवतोय आपल्या पुढल्या पिढीसमोर. त्यांना आत्महत्येस प्रेरीतच करीत नाहीयोत का आपण ?? वर्षभरापूर्वी दिल्लीच्या 'आप' नेत्यांच्या धरणा कार्यक्रमात घडलेला लज्जास्पद प्रसंग आठवतो. ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही धरण्यावर होतात त्यातल्याच एखाद्याने तुमच्या डोळ्यादेखत आत्महत्या करावी आणि तरीही भाषणगिरी सुरु ठेवून सत्तेवरील नेत्यांनी हातात ताकद असतांना त्याचा मृत्यू होईपर्यंत राजकारणात लीन राहणे किती हीन दर्जाचे होते. याहून वाईट होते ते त्याला वाचवायचे सोडून ते शूट करणे आणि ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली त्याचे लाइव शो टीव्ही वर दाखवले जाणे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येने देशाची हळहळ टिपून त्यात तिखट मीठ लावून प्रसारित करणे.
आत्महत्यावर होणारे राजकारण आणि राजकारणाचे विघटीकरण होत झालेले समाजकारण. आम्ही आमच्या संवेदना गमावतोय कि काय अशी भीती वाटायला लागलीय हल्ली. आणि हि भीती कायम करून त्याचेही राजकारण करणारे लोक आहेतच. टाळूवरचे लोणी खाणे ह्यालाच म्हणत असावे बहुदा ... नाही का ?
रश्मी / १७ मार्च 16
Thursday, 17 March 2016
मैत्रीच्या प्रवासात उतार चढाव चालतातच गं, किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्यालाच ठरवायचं असतं. आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांनी चांगलंच वागावं, मित्रच असावं असं थोडंच आहे
चालून आलेल्या जाणत्या-अजाणत्या माणसांची, त्यांच्या आपल्या नात्याची
त्या ओळख असलेल्या नसलेल्या लोकांच्या सहवासातल्या वेगळ्या प्रवासाची
वेगळीच कहाणी लिहू शकतो …. त्याचाही इतिहास घडू शकतो.
पटणारी किंवा न पटणारी , आवडणारी वा न आवडणारी
कुठल्याही वर्गात बसेल न बसेल ….पण कहाणी तर असेल
तेवढंच समाधान !!!
चालून आलेल्या जाणत्या-अजाणत्या माणसांची, त्यांच्या आपल्या नात्याची
त्या ओळख असलेल्या नसलेल्या लोकांच्या सहवासातल्या वेगळ्या प्रवासाची
वेगळीच कहाणी लिहू शकतो …. त्याचाही इतिहास घडू शकतो.
पटणारी किंवा न पटणारी , आवडणारी वा न आवडणारी
कुठल्याही वर्गात बसेल न बसेल ….पण कहाणी तर असेल
तेवढंच समाधान !!!
Wednesday, 9 March 2016
स्त्रीची आत्मिक सौंदर्यापर्यंतची वाटचाल !!
सृजनशीलता आणि सर्जनशीलता या दोन भिन्न पारिभाषिक संज्ञा आहेत.सृजन म्हणजे उत्पत्ती आणि सर्जन म्हणजे निर्मिती. प्रतिभेने सर्जनशीलता अंगात भिनवता येऊ शकेनही कदाचित पण सृजनशील असणे किंवा होणे कठीणच. म्हणूनच पु. भा. भावे म्हणतात ...
''दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे''
जन्मदात्री असणाऱ्या मातेचे म्हणजेच स्त्रीचे म्हणूनच सृजनशील म्हणून सर्वात मानाचे स्थान आहे. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी हे सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी अन अपरिहार्य अशी उदाहरण आहेत. आई नवा जीव जन्माला घालते. सृष्टी पर्यावरणात नवजागृती करते अन पृथ्वी उत्पन्न करते. म्हणून निसर्गाने निर्मिलेल्या या तिन्हीचे सृजनाशी हे असे शाश्वत नाते आहे. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वात्सलतेचा उपजतच वारसा मिळाला असला तरी या सर्वांपलीकडे ती स्वतःही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे विसरून कसे चालेल??
'स्त्री' हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कधी आकर्षणाचा तर कधी वादाचा. स्त्रीचं विश्वच वेगळं असतं किंवा ''women itself a different world '' असे म्हणाले तरी वावगं ठरणार नाही. पुरातन काळापासून ते आजतागायत तिच्या जगण्याशी संबंधित तिढा सुटायचे नाव घेत नाही. कुठे स्त्री उच्च शिक्षण घेऊन दर्जेदार नौकरी करतांनाही तिचे स्त्री असणे हा तिच्या गुणवत्तेपेक्षा मोठा विषय ठरतो तर कुठे अजूनही ती अठराव्या शतकातले अठरा विश्वे वैचारिक दारिद्र्याच्या लक्ष्मण रेषेत अडकून पडली आहे. तिने कितीही मोठी झेप घेतली किंवा कितीही मोठ्ठी उडी घेतली तरी परतीची उडी काटेरी कुंपणाच्या आतच येउन पडावी हे दुर्दैव आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या पुढे जात स्त्रीत्वाच्या कक्षा रुंदावणाऱ्या आधुनिक विश्वात आपण नेमक्या कुठे आहोत व कुठे जाण्याची गरज आहे ती आजही या प्रश्नांची उत्तर शोधत भरकटतेच आहे.
आजही प्रत्येक क्षेत्रात स्त्री असण्यापलिकडल्या कर्तृत्वाच्या खुणा तिनं उमटवल्या असल्या, तरी ती एक स्त्री आहे हिच तिची ओळख प्रीसाइज्लि शिल्लक राहते, आज विश्वभरात व्यवसायाचं दार ठोठावणारी स्त्री पूर्वी म्हणजे अगदी एक पिढी आधीपर्यंत तर अस्तित्वाचीच लढाई लढत होती. बाह्य जगाने आपला स्वीकार करावा, आपला योग्य मान ठेवावा आपल्या बुद्धिमत्तेची, कलागुणांची आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यावी यासाठी धडपडत असायची. तिची लढाई तिलाच लढावी लागायची. मला माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, विचार आहे स्वातंत्र्य आहे, ह्याची जाण शिक्षणातून येत गेली आणि अस्मितेचा शोध लागला. स्त्री मधलं स्त्रीत्व जागं झालं पण समाजातल्या जाणीवा जागृत होणे बाकी होते, समाजात वावरतांना येणाऱ्या मर्यादा कायम होत्या. स्त्री बदलू शकते पण विकृती आणि बुरसटलेल्या विचारांच्या लोकांसोबत काम करणे सोप्पे नव्हते. त्याहून कठीण होते ते परंपरेच्या सो कॉल्ड चौकटी मोडून तर्काधिष्ठित विचारांवर ठामपणे उभे राहणे. हा संघर्षाचा काळ होता. शिक्षणाने स्त्रीला मानसिकदृष्ट्या सक्षम केले परंतु तरी ती पुरुषी वर्चस्वाला थेट आव्हान देण्याइतकी समर्थ झाली नव्हती. मधल्या काळात स्त्रीने सगळ्यांना सुखी करण्याच्या नादात सुपर वुमन बनण्याच्या प्रयत्नात स्वतःची फरफट करून घेतली. परिणामी अनेक मुलाचं संगोपन, ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या, नातलग, पतीची प्रगती यांना प्राधान्य देतांना स्वतःच्या आवडी निवडी कलागुण आणि प्रगतीच्या संधींकडे निग्रहाने पाठ फिरवीत राहिली. किंबहुना स्वतःकडे दुय्यम स्थान घेत राहिली. स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करत राहिली. पण आजची स्त्री बदलली . आजच्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढून स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला काय हवय हे शोधण्याचे तिने ठरवले आणि त्यासाठी प्रयत्नही करू लागली. म्हणूनच आज तिच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी ती स्वतः आहे . प्राधान्य आहे ते तिच्या ती असण्याला आत्मसन्मानाला आणि तिच्या मनातील शाश्वत संस्कार मूल्यांना त्याची जपणूक करतांना संसार मुलबाळ नातेसंबंध ह्यांना बरोबर घेऊनच तिला पुढे जायचे आहे. आणि हे सगळ करत असतांना तिच्या सर्वांगीण प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक दूर सारण्याचा ती प्रयत्न करते आहे. अर्थात हे स्थित्यंतर सहज घडलेले नाही. सोंदर्य आणि सौष्ठव यांचे मापदंड असलेल्या स्त्रीची आत्मिक सौंदर्यापर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे हे नक्की.
''स्त्रीजन्मा स्त्रीजन्मा तुझी ही कहाणी... बाईचा जन्म नको घालू शिरीहरी, रातन् दिस पुरुषाची ताबेदारी. ''
कुठल्याश्या लोकगीताच्या या ओळी ऐकलेल्या आठवतात. आयुष्याच्या दाहक अनुभवातून उद्भवलेल्या या ओळी असाव्या यात शंका नाही . निव्वळ स्त्रीभ्रूण हत्या किंवा हुंडाबळी हेच ज्वलंत विषय म्हणून आम्ही हाताळतो. पण समाजात पावलोपावली तिला मिळणारी वागणूक, तिच्याकडे पाहण्याचा इतर वर्गांचा दृष्टीकोन, तिच्याकामाच्या ठिकाणी तिच्या कामाशिवाय तिच्याकडून केली जाणारी अपेक्षा आणि त्यासाठी होत असलेले प्रयत्न, स्थळी काळी नको वाटणारे स्पर्श-भाषा,अनेकदा नातलगांचा असहकार, बुरसटलेल्या नजरा आणि बरच काही. स्त्रीने तक्रार करू नये. केली तरी तिचे तिने तसेच जगायचे आहे. कालची स्त्री तसेच जगली, आजची जगतेय उद्याच्या स्त्रीनेही तेच करायचे आहे. किंबहुना तिला तसेच करावे लागणार दुसरा पर्याय नाही. स्वतःच्या हक्कासाठी लढणारी स्त्री अतिशाहणी ठरते. पण स्त्रियांवर वर्चस्व दाखवणारा पुरुष मात्र मर्दमाणूस म्हणून गणला जातो. हे सगळे सहन करूनही तिच्याच चारित्र्यावर घेतली गेलेली शंका अश्या एकनाअनेक समस्या. आणि ती मात्र रोजच्या आयुष्यातल्या अनेक आघाडींवर लढतांना स्वतःला सिद्ध करण्यास धडपडते आहे... नसलेल्या आठ हाताने चारही दिशेने येणाऱ्या या संकटांवरही वार करत पुरून उरते आहे. ती हे करते आहे यासाठी तिला कौतुक नको, सहानुभूती तर अजिब्बातच नको तिला हवंय ते तिच्या हक्काचं जीण... तिच्या गुणवत्तेची तिच्या कार्याची खरी पावती. स्त्रीला स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून या समाजाने बघावे वागवावे हि एवढी साधी अपेक्षा असणे रास्त नाहीये का ??
(महिला दिन विशेष :- मासिकासाठी लेहिलेला लेख)
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...
-
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...