Tuesday, 2 February 2016

8,365 दिवसांचा एकाकी लढा - सुनंदा मोकाशी



तिची बातमी आली आणि भावूक होऊन तिने फोन केला. ताई तुम्ही देवासारख्या भेटल्यात म्हणाली. रडत रडतच भरून आभार मानले. हिवाळी अधिवेशनात येऊन मुलभुत गरजांसाठी एकाकी लढा देणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध सुनंदा मोकाशीला ती फक्त 'बाई' आहे म्हणून किंवा मग एकटी लढतेय म्हणून इथेही असामाजिक तत्वांचा त्रास आहेच. तिला लोक वेड्यात काढतात. दात विचकून तिच्याकडे पाहून चिडवून जातात, हसतात... अश्यात आपण बोललेले दोन चांगले शब्दही तिला आधाराचे वाटतात. तिच्या हातात कोंबलेला दोन आण्याचा खाऊ तिला मोलाचा वाटतो. हातात घातलेल्या दोन पैशात ती रामटेक भ्रमण करून आली. तिथेच तिला अनोळखी माणसाने ओळखले आणि आज तुमचा फोटो मी 'सकाळ' पेपर ला पहिला तुमची बातमी वाचली म्हणाला....तिच्यासाठी हे खूप होतं. कुणीतरी सतत पाठलाग करून तिच्या अस्तित्वाची तिच्या लढ्याची दखल घेतली. त्यांचे मनापासून आभार मानावे, त्यांना धन्यवाद द्यावे इतकी सौजन्यता वृद्धापकाळात-विक्षिप्तावस्थेत आणि संघर्षाला तोंड देत असतांनाही पाळणाऱ्या महिलेला हा बेगडी समाज वेडी म्हणत असेल तर काय .......


ती दिसली तेव्हा जराशी विक्षिप्तच जाणवली. तिच्या मागण्यांसाठी आक्रमक होऊन स्वरचित गाणी गाऊन नारे लावणारी. शासनाच्या अनागोंदी करभारांवर ताशेरे ओढत मध्येच कधीतरी भावनिक हाक घालणारी .. जीव ओतून घोषणा देऊन येणाऱ्या जाणाऱ्यांच लक्ष आकर्षून घेण्यास प्रयत्नरत. पण इतक्या निदर्शन आणि आंदोलनात तिला एकटीला विचारणार कोण होत.


नागपूरमधले हिवाळी अधिवेशन सुरु होऊन इनमिन चार दिवस झाले असावेत. पटवर्धन मैदानावर आज अनिस (अंधश्रद्धा निर्मुलन समिती) च्या लोकांचा मोर्चा आणि आंदोलन होणार होते. दाभोळकर आणि पानसरेच्या मारेकऱ्यांना शोधणं हा राज्यपातळीवारील गंभीर विषय उचलून धरायचा होता त्यासाठी निदर्शन सुरु होती.. आज मेघाताई पानसरे आणि हमीद दाभोळकर येणार होतेत. त्यांना भेटायला म्हणून मी नागपूरच्या पटवर्धन मैदानावर गेले. मेघातैंना ऐकायचे होते. पण एक आवाज सारखा अडथळे आणत होता. एक विक्षिप्त जाणवणारी वृद्ध महिला उतावीळ होऊन निदर्शन करीत होती. मध्येच ती गाणे गायी मध्येच नारे. तिच्याशी बोलायला जाणाऱ्यांना शिव्याची वाखोली वाहिली जायची. येणारे जाणारे तिच्यावर हसायचे. दात विचकून चिडवून जायचे. तसतशी ती आणखी चिडायची अन गाण्यांचा आवाजही वाढायचा. का कोण जाणे माझ लक्ष सतत तिच्याकडे होते. ती बेंबीच्या देठापासून ओरडत होती सतत न जाणो किती तासांपासून उभीच .... काय चाललंय तिचं. तिनं जरा शांत व्हावं जरा वेळ खाली बसावं पाणी प्यावं अस मलाच वाटत राहिलं . पण तिला बोलायला जाणार कसं. ती अंगावर धाऊन आली तर ? एवढ्या चार चौघात शिव्या घातल्या तर... मनात विचार आला अन मी पुन्हा गप्प झाले. पण तिचे हाल बघवेना अन ती असं का करतेय हे जाणून घेण्याची उत्सुकताही शिगेला पोचली. भीतभीतच पण मी गेले तिच्या जवळ. मावशी थोडं बोलू का ? काय झालंय ? काही त्रास आहे का? कसले आंदोलन करताय.

हे काय .. ती लगेच शांत झाली अगदी जवळ आली छानसं स्मित करत बोलू लागली. आपण बसुया का बसून बोलू म्हणताच माझ्याबरोबर चक्क पालकत मांडून बसली. निदर्शनाचे आवाज भोवताली गुंजन घालत होते. म्हणून तूर्तास किरकोळ माहिती घेतली तिची. केवळ गैरप्रकाराला साथ दिली नाही म्हणून गेल्या 22 वर्षांपासून प्रशासनासोबत एकाकी लढण्याची वेळ सुनंदा गोपाळ मोकाशी या 64 वर्षीय वृद्धेवर आली. हिवाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून पटवर्धन मैदानावर ती उपोषणाला बसली होती. निराधार मानधन, उपजीविकेचे साधन अशा अगदी साधारण मागण्यांसाठी तिने लढावे आणि किती काळ, तर तब्बल 8,305 दिवस! तरीही प्रशासनाने दखल घेऊ नये, आश्‍चर्य वाटते. पण हि किरकोळ माहितीहि किरकोळ वाटली नाही. खूप काहीतरी दडलंय खूप काहीतरी सांगायचंय हिला हे जाणवत राहिले. सगळं ऐकावं वाटत असूनही वेळ अन परिस्थिती पाहता जावं लागल. थोडे खर्चाला पैसे तिच्या हातात ठेऊन मी निघाले पण आता ती खूप शांत झाली होती अनिसचा संपूर्ण कार्यक्रम संपेस्तोवर ती शांत बसून राहिली. दुसऱ्या दिवशी कागद पेन घेऊन आम्ही पुन्हा सुनंदा मावशींना भेटायला गेलोत. ती निवेदन लिहित बसली होती. तिनं लगेच ओळखलं. तिच्या हातात असणारी कागदं पाहिलीत अन मी चाटच पडले.

सुनंदा मूळची पुण्याजवळच्या फलटणनजीक असलेल्या साखरवाडी-श्रीरामपूरची. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे, के. सी. कॉलेज मुंबई येथून एम. ए. मराठी, डीबीएम, पत्रकारितेचे पदविका शिक्षण पूर्ण केले. पुढे 1978 ते 1988 अशी दहा वर्ष महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथे लेखापाल पदावर कार्य केले. तेथे चालत असलेल्या गैरप्रकाराला तिने विरोध केला आळा घालण्याचा निष्फळ प्रयत्नही केला . .हे प्रयत्नच तिला भोवले आणि  इथूनच तिच्या आयुष्याची फरपट चालू झाली. कुणीही नातेवाईक नसतांना एकटीने जगत असतांनाही तिने आयुष्यात कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी तडजोड केली नाही. गैरप्रवृत्तींसोबत लढता लढता ती थकली आणि अखेर नोकरी सोडली. समाजातील विकृती पाहून ती बेचैन झाली आणि मनःस्वस्थ्याकरिता तिने अध्यात्माचा मार्ग निवडला. तिने स्वामी रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्यत्व पत्करले अन बनारसला स्वामी विवेकानंद आश्रमात सेवा करण्यास निघून गेली. तिथल्या वातावरणात प्रकृतीने साथ दिली नाही म्हणून दोन वर्षात ती मुंबईला परतली. आता प्रश्न होता तो तिच्या निवाऱ्याचा... पूर्वी ती सरकारी नौकरीत कार्यरत होती तेव्हा आता एकट्या पडलेल्या या निराधार महिलेला हव्या असलेल्या प्राथमिक गरजांची पूर्तता शासनाने करावी किमान डोक्यावर एकटीपुरत छत्र आणि उपजीविकेसाठी एखादा रोजगार मिळावा इतकीच तिची मागणी. पण या मागण्यांसाठी निवेदन घेऊन फिरत असतांनाही तिला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते. रोजगाराच्या नावाने मंत्रालयात तिच्याकडून दिवसरात्र काम करवून घेतले गेले आणि कामाचा मोबदला म्हणून सहा महिन्याने एका माजी समाजकल्याण मंत्र्याच्या स्वीय सहायकांनी हातात ५०० रु. ठेवले. राहायला छत्र नव्हते सहा महिने तिने मंत्रालयाच्या रस्त्यावर कसेतरी काढले होते पण आता सहनशक्तीची पराकाष्ट झाली आणि सुनंदा मावशीने आंदोलन पुकारले. 13 मार्च 1993 ला तिने पहिले उपोषण केले. तीन दिवसाच्या उपोषणाने प्रकृती खालावली तिला दवाखान्यात भरती करावे लागले पण न हारता लगेच दवाखान्यातून बाहेर पडून आठ दिवसांनी दुसरे आणि नंतर उपोषणाची शृंखलाच सुरू झाली ती आजतागायत कायम आहे. कधी रस्त्यावर वर्तमान पत्र विकून तर कधी छोटी मोठी काम करत ती दिवस ढकलत राहिली. या काळात तिने अनेक समाजोपयोगी कामे केली. ती अनेक वर्ष जनजागृतीसाठी मँरेथोन मध्ये,  तिने देश हितासाठी झालेली अनेक मोर्चे , शिबिर गाजवली. दरम्यान, 2004 मध्ये "बीएमसी'चे आयुक्त अजित जैन यांनी मिलनस्टार इमारतीमध्ये तिला एक खोली देण्याची सूचना 'स्पार्क जोकीन' या एनजीओला दिली होती. त्यासाठीही बराच मोठा लढा दिल्यावर तब्बल चार वर्षांनी तिला 2 क्रमांकाच्या खोलीचा ताबा देण्यात आला. पण आता म्हातारी असली तरी ती एक स्त्री आहे म्हणून फक्त असामाजिक तत्त्वांकडून तिचा विनयभंग केला गेला पोलिस खात्याने या प्रकरणाची तक्रार घेतली नाहीच परंतु तिलाच वेड्यात काढून धमकावण्यात आले. तिने खोली सोडून द्यावी यासाठी तिला सतत त्रास दिला जातो आहे जीवाच्या भीतीने सुनंदा मोकाशी आजही तिच्या हक्काच्या खोलीत राहू शकत नाहीये.  

ती वर्षानुवर्ष झगडते आहे आंदोलन करते आहे मुंबईच्या आझाद मैदानावर एकाच जागेवर बसून मागल्या २३ वर्षांपासून तिच्या मागण्या पूर्ण होण्याची वाट ती पाहते आहे. दरवर्षी अधिवेशनांना ती उपस्थित राहून पुन्हा पुन्हा त्याच त्याच मागण्यांसाठी निवेदन देते पुन्हा पुन्हा त्याच त्याच नेत्यांना भेटते पण पुन्हा तिच्या हातात शिल्लक राहतात तूरीच. निराधार मानधन, उपजीविकेचे साधन अशा अगदी साधारण मागण्यांसाठी तिने लढावे आणि किती काळ, तर तब्बल ८३६५ दिवस! तरीही प्रशासनाने दखल घेऊ नये, ह्याला काय म्हणावे ??  

सततचे उपोषण आणि संघर्षामुळे सुनंदाच्या स्वभावावर वैचित्र्याची झाक दिसते. पटवर्धन मैदानावर ती सतत शासनाच्या अनागोंदीबद्दल बडबडत होती, गाणी गाऊन आपल्या मागण्या मांडत होती. स्वरक्षनाखातर कुणी जवळ येऊ नये म्हणून त्रास देऊ नये म्हणून आधीच बचावात्मक आक्रमक पवित्रा घेत होती.. लोक हसत होतीत तिला चिडवून जात होते, पण, तिच्याशी बोलल्यावर ती वेडी नाही, हे लक्षात आले. विविध विषयांवरील तिचे ज्ञान दांडगे आहे. ती इंग्रजी अस्खलित बोलते. आपण दाखवलेल्या आपुलकीने भारावून डोळ्यात पाणी आणत हळवी होते आणि पाठीवर हात फिरवत मायाही दाखवते.

प्रदीर्घ काळापासून सतत उपोषण करून हा लढा तिच्या जीवनाच्या दैनंदिनीचा भाग झाला आहे. या लढ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी तिची इच्छा आहे. 22 वर्षांपासून शासनाने तिच्यासोबत न्याय केला नाही. पण, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मूलभूत मागण्या पूर्ण कराव्यात. 22 वर्षांच्या लढ्यानंतर न्याय मिळणे हासुद्धा एक "रेकॉर्ड' ठरेल, आणि हा रेकॉर्ड मा.फडणवीसांनी करावा, असे तिचे म्हणणे आहे. यानंतर कुण्याही निराधार स्त्रीच्या नशिबी असे जगणे येणार नाही, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी, अशी तिची अखेरची मागणी आहे


रश्मी
१८/१२/२०१५


(पुण्यावरून प्रकाशित मासिक 'विकासकर्मी-अभियंता मित्र' च्या महिलादिन विशेष अंकात प्रकाशित लेख)  

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...