Tuesday, 23 February 2016

स्वतःस पत्र (स्व-संवाद)

प्रिय स्व,

तुला आठवत का गं  .. मागल्या पहिल्या पावसातली ती पहिलीच संध्याकाळ,  एक अनामिक हुरहूर घेऊन आलेली बघ … अनोळखी उदासीन सांज. नुकतच ऑफिस मधून आले होते आधीच सकाळ पासून शांत झालेलं  मन अधिक शांत होत गेलं . खिडकीच्या बाहेर अवेळी दाटलेला अंधार खिडकीच्या ओट्यावर बसून बघतांना बाहेर आज वेगळंच चित्र रंगलंय असा आभास होत होता, कुंपणा पलीकडचा रोज दिसणारा चाफा गडद हिरव्या पाणावल्या रंगात डोलत होता.  काळेभोर आभाळ सांजेच्या सूर्याच्या छटा झाकोळून डोकावले आणि मन अजाणत्या विचारांच्या हिंदोळ्यावर आसीन झालं, कुठेतरी दूर बघत राहावं वाटत राहिलं, बाहेर निसर्ग सौंदर्याची लयलूट करत असूनही माझी नजर मात्र शून्यात कुठेतरी लांब विसावली होती. घरातली कामं खुणावत असूनही इच्छाच झाली नाही उठायची आतले दिवे पेटवायची. बाहेरच्या अंधारल्या मंद प्रकाशात सुरु होता 'शोध'  माहिती असल्या-नसलेल्या कसलातरी. खिडकीच्या अल्याड बसून मनातल्या खिडकीच्या पल्याडचा शोध. खिडकीकडलं अर्ध शरीर ओलं होतांना मनाच्या आतही काहीतरी ओलावत होतं…त्या ओल्या गारव्यात तरी हरवलेल्या पण रुखरुख लावून गेलेल्या, मनात रुतून बसलेल्या त्या क्षणांचा शोध लागेल म्हणून चाचपडत होते गं मी, साहवल नाही म्हणून डोळे मिटले आणि ...आणि तंद्री लागली.  एक एक आठवण पाझरू लागली.  ओसरणाऱ्या धारांसोबत गारवा अन तोच ओळखीचा मृद्गंध आसमंत भारून टाकत होतां.…काय झालं कुणास ठावूक एक लांब श्वास घेतला अन बंद डोळ्यातून सगळंच ओथंबून वाहायला लागल.…. काय होतंय हे कळण्याआत वीज चमकून कडाडली. धस्स झालं मनात.   पलीकडल्या घरात कुणीतरी रेडिओ लावला होतां  …लता गातेय सगळे सूर वातावरणात भरून उरतात. मनाचा ठाव घेतात. 

''सिली हवा छु गई सिला बदन छील गया नीली नदी के परे गीलासा चांद खिल गया''

सूर कानातून आतआत भिनत गेलेत. हृदयापर्यंत ओघळले आणि आयुष्यातला साठलेला हा कुठला पाउस धो धो बरसू लागला कळलेच नाही गं. बरस बरस बरसला अन मग भरल्या डोळ्यानेच अलगद ओठांवर हसू फुलवत गेला. सगळं नितळ स्वच्छ धुऊन निघालं होतं … पुन्हा मन मोहरून उठलं. दडून बसलेले आनंद पक्षी भिरकावले पुन्हा आकाशी.

 पाऊस क्षणात कोरड्या मनाला भिजवणारा-क्षणात पुन्हा हसवणारा, असा एखादा पाऊस आयुष्याच्या मध्यावर झाकोळलेला अन मग कधीतरी अलगद ओथंबून चिंब भिजवणारा. असा एखादातरी पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात असेलच ना गं ??

आताशा खिडकीबाहेर पावसाचा वेग मंदावलेला होतां. घरातल्या कामाची आठवण होऊन मी चौकट सोडली . पलीकडल्या घरातून सूर येत राहिले. लताबाई जीव ओतून गात होत्या ...

'कतरा कतरा पिघलता रहा आसमाँ ..रुह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी दिलरुबा गीत गाती रही... आप यूँ फासलों से गुजरते रहे..... '





Monday, 15 February 2016

संघर्ष दारूबंदीसाठी !!

 दारूचा विषय आला की बव्हंशी पुरुषांची त्यावर एकछत्री मक्तेदारी असते. महिलांचा त्याच्याशी संबंध आलाच तर तो संघर्षाचा, दुःखाचा. दारूने आयुष्य उध्वस्थ होतात, संसार पणाला लागतात हे कितीही ओरडून सांगितले तरी त्याचा परिणाम नेहमी शून्यच. निव्वळ प्रबोधनाने बदल घडत नाही त्यासाठी लढा द्यावा लागतो, संघर्ष करावा लागतो, वेळ पडलीच तर त्यागही करावे लागतात. आणि असा लढा देणे सगळ्यांनाच शक्‍य होत नाही. नागपुर शहरालगतच्या हिंगण्यामध्ये निलडोह-डीगडोह परिसर आहे. तसे सुखासुखी जगणारी लोकं. भांडणतंटा नाही किंवा फार मोठ्या अडचणी नाहीत. एकदिवस मात्र अचानक मिळालेल्या एका बातमीने हादरला. गजानननगर मध्ये रहिवासी भागात जिथे सभ्य लोकांची वस्ती आहे, तिथेच शेजारी प्रार्थनास्थळ, शाळा आहे. अशा ठिकाणी दारूदुकान लागणार असल्याचे कळले आणि गावातील महिलांसमोर मोठा प्रश्‍न उभा ठाकला. सुखासुखी चाललेल्या आयुष्यात चटकन कुणीतरी मिठाचा खडा टाकावा, अशी स्थिती झाली. कुणालाच हे दुकान नको होते. पण पुढे होऊन लढणार कोण हा मोठाच प्रश्न होता. अशावेळी रचना कन्हेर पुढे सरसावल्या.

रचना मागील तीन वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. हिंगणावासीयांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. प्लास्टिक बंदी, बाजारात महिलांसाठी शौचालय, महिलांसाठी व्यवसाय सुरु करून दिला, महिला समस्या निवारण आणि समुपदेशन केंद्र उभारलं, फिरते लोकन्यायालय उपलब्ध करून दिले. असे अनेक समाजपयोगी कामे त्यांनी केलीत. आणि आता दारू दुकानाच्या विरोधात सर्व महिलांना सोबत घेऊन त्यांनी लढा उभारला. नियमांची पायमपल्ली करून, खोट्या कागदपत्रांवर परवानगी मिळवून दुकान सुरु करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथून सुरू झाला रचना आणि टीमचा संघर्ष. पहिला लढा द्यावा लागला तो यांच्याच सौरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या स्थानिक पोलिस स्टेशनशी. स्थानिक पोलिसांचे सहकार्य तर मिळत नव्हतेच परंतु ह्यांचा लढा विचलित करण्याचा प्रयत्न होत होता म्हणून रचनाच्या पुढाकारात महिलांनी जिल्हा अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि सोबतच पालक मंत्र्यांना आणि पुढे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांना भेटून निवेदन दिले. दरम्यान दारू दुकानदाराचे आडून धमकावणे, प्रलोभनं देण सुरूच होते. जेवढा महिलांचा लढा तीव्र होत गेला तेवढेच विरोधकही आक्रमक होत गेले. गावात अफवा पसरून रचनावर आरोप झाले, लांछनही लावण्यात आले पण रचना न डगमगता झगडत होती. खोट्या कागदपत्रांचा आणि त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा भांडा फोड केल्यावरही आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती मिळवूनही त्याच रात्री दुकान सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला. ते थांबवण्याचा प्रयत्न केला असता महिलांवर खोटे आरोप लावून त्यांना अटक करून पोलिसी कलमा लावण्यात आल्या. दुकान पेटवून देऊन त्याचा आरोप महिलांवर लावण्याचे निष्फळ प्रयत्न झाले, माध्यमांना हाताशी धरून या आंदोलनाला चुकीचे स्वरूप देण्याचा महिलांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले. गावातल्या लोकांमध्ये राजकारणी खेळी सुरूच होती. महिलांच्या एकीचे बळ तोडण्याचा प्रयत्नही झाला पण रचना न डगमगता एक एक पाउल पुढे जात राहिली. महिलांनी रात्री बेरात्री सभा घेतल्या. रात्र रात्र जागून गश्त घातल्या.  हे सगळ कठीण होत, त्रासदायक होत पण महिलांनी रचनाला साथ दिली आणि संघर्ष सुरु ठेवला .प्रशासन, शासन, अधिकारी आणि नेते प्रत्येकांनी आश्वासन दिलीत. दुकान सुरु होऊ देणार नाही त्यासाठी आंदोलनात सहभागी असल्याचेही वर्तवले पण प्रत्यक्षात मात्र क्षणाक्षणाला विरोधक जिंकत असल्याचे जाणवत होते. त्याच्या हालचाली वाढल्या होत्या. आंदोलनकारी महिलांना दूर ठेवण्यासाठी कुटील खेळी खेळून त्यांचे मानसिक खच्चीकरण करून शेवटी दुकान उघडले गेले. या प्रकरणाला जवळ जवळ १० महिने होतायेत रचना आणि त्यांच्या महिला अजूनही लढा देत आहेत. निव्वळ एक गाव नाहीतर संपूर्ण तालुका दारूबंद करायचा असा त्यांचा ध्यास आहे. मुलींवर अत्याचार, घरगुती हिंसा, चोरी, दंगे या सर्व विकृतींच्या मागे दारू हे मुख्य कारण असेल तर मुळावरच घाव घालायला हवा असे रचनाचे मत आहे.

 ''खरतर नियमातच बदल करायला हवेत. नव्या दारू दुकानासाठी परवाने लागतात परंतु दुकान बदलीसाठी कुठलेही नियम नाहीत एकीकडे शासनाद्वारा व्यसनमुक्तीसाठी मोहीम राबवली जातात आणि दुसरीकडे नवनवीन दुकान नको त्या परिसरात थोपवली जातात त्यासाठी नियम शिथिल केले जातात. आणि याबाबत ग्रामपंचायतीकडे कसलेही अधिकार नसतात '' हे खरतर रचनाचं दुःख आहे. तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीची मदत घेऊन त्या या नियमांमध्ये बदल व्हावा यासाठीही प्रयत्नरत आहेत. आणि जोपर्यंत तालुका दारूमुक्त होणार नाही तोपर्यंत हे सेवाव्रत निगुतीने करत राहण्याचे त्यांचे मानस आहे . श्रमसेवेच्या आस्थेपोटी सर्वस्व झोकून देऊनही प्रशंसा आणि प्रसिद्धीपासून दूर समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणाऱ्या नागपूरच्या मुठभर माणसांमध्ये आज रचनाचे नाव गणल्या जातंय ते त्यांच्या सेवाभावी लढवैय्या प्रवृत्तीमुळेच.     

     
(दैनिक 'सकाळ' च्या ''हिरोज ऑफ द सिटी'' मालिकेसाठी लिहिलेला लेख.)                

Tuesday, 9 February 2016



मौन म्हणजे उणीव, उणीव शब्दांची

जशी उजेडाची उणीव अंधार म्हणजे

अंधारात नसतात पण 'सावल्या' दिसतात उजेडात

उजेडात दिसणारी सावली अंधारासारखीच … काळीकभिन्न

तश्या सावल्या असतील का शब्दांना

शब्दांना मौनाच्या सावल्या … शांतसुन्न !!

Thursday, 4 February 2016

संदर्भ - तुझ्या असण्या नसण्याचे ! (स्फुट)

तुझ्या असण्या नसण्याचे संदर्भ शोधत
फिरण्याचा प्रवास थांबवलाय मी
तू असावाच आणि असलास तर दिसावाच
हा हट्टही सोडून दिलाय हल्ली .

खलबत चाललेल्या रात्रीच्या गप्पांची
विणलेली गोधडी ओढून झोपायची सवय....
 त्या गार रात्रींना उष्ण स्पर्शांचा आभास लागायचा
तू निघून गेलास अन जातांना गुंडाळून ठेवलस सारंच


एका ओलावल्या रात्री गार शब्दांना कैचीची धार दिली मग मीही,
गोधडीच्या चिंध्या केल्या अन भिरकावल्या कट्ट्यावर
त्याच गप्पांचे गुंतून कोळीष्टके जमलेय तिथे


स्पर्शातून उभा राहणार शहाराही
रुसला कसा …. कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसला
अंग शहारत नसे कुठल्याही घटनेने
ओरबाडून काढल्यात आठवणी सगळ्या
गुंडाळून गोळा केल्या अन
भिरकावून दिल्या त्याच कट्ट्यावर

प्रेम बिमाच्या बाता नको वाटू लागल्या
अन वचन-शपथा झूट
तू लिहिलेल्या सगळ्या पत्रांना रद्दीत दाखल केलं
अन सगळी रद्दी गुंडाळून भिरकावून दिली कट्ट्यावर

पण ….

कट्ट्यावर अनेकदा खुडबुड होते हल्ली
कोण जाणे … 
कसली खलबतं चालतात … रात्री-बेरात्री
गार वारा सुटतो गंध गंध पसरतो  
अन पुन्हा आठवणी जाग्या होऊन अंगही शहारतं

तू हवा होतास तेव्हा नव्हतास
आता नाकोयेस तर काय होतंय हे ….

 तुझ्या असण्या नसण्याचे संदर्भ शोधत
फिरण्याचा प्रवास म्हणूनच थांबवलाय मी
तू असावाच आणि असलास तर दिसावाच
हा हट्टही सोडून दिलाय हल्ली .

 तू दूर नजरे पल्याड आहेस कुठेतरी
एवढी जाणीवही पुरे आहे ….


रश्मी / ३ फेब. १६





जीवन एक कोडं आहे, कधीही न सुटणार...सुटल्यासारख वाटता वाटता सोडविणाराच

त्यात कसा गुरफटला जातों कसा फरपटला जातो? ते त्यालाही समजत नाही. आणि मागे

फिरण्याचाही मार्ग नसतो......सापशिडीच्या खेळासारखी शिडी मिळालीच तर ठीक,

नाहीतर अजगराशी गाठ पडली कि खेळ संपला समजायचे.....इथे खेळाडूच्या

पात्रतेचा किंवा अपात्रतेचा भेदभाव नाही, शिडी विद्वानालाही वर नेते आणि

बिनडोक माणसालाही नको त्या ठिकाणी नेऊन बसवते....आणि अजगर विद्वानालाही

गिळतो आणि बिन्डोकालाही गीळ्तोच.........


(मना दुर्जना )



Tuesday, 2 February 2016

8,365 दिवसांचा एकाकी लढा - सुनंदा मोकाशी



तिची बातमी आली आणि भावूक होऊन तिने फोन केला. ताई तुम्ही देवासारख्या भेटल्यात म्हणाली. रडत रडतच भरून आभार मानले. हिवाळी अधिवेशनात येऊन मुलभुत गरजांसाठी एकाकी लढा देणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध सुनंदा मोकाशीला ती फक्त 'बाई' आहे म्हणून किंवा मग एकटी लढतेय म्हणून इथेही असामाजिक तत्वांचा त्रास आहेच. तिला लोक वेड्यात काढतात. दात विचकून तिच्याकडे पाहून चिडवून जातात, हसतात... अश्यात आपण बोललेले दोन चांगले शब्दही तिला आधाराचे वाटतात. तिच्या हातात कोंबलेला दोन आण्याचा खाऊ तिला मोलाचा वाटतो. हातात घातलेल्या दोन पैशात ती रामटेक भ्रमण करून आली. तिथेच तिला अनोळखी माणसाने ओळखले आणि आज तुमचा फोटो मी 'सकाळ' पेपर ला पहिला तुमची बातमी वाचली म्हणाला....तिच्यासाठी हे खूप होतं. कुणीतरी सतत पाठलाग करून तिच्या अस्तित्वाची तिच्या लढ्याची दखल घेतली. त्यांचे मनापासून आभार मानावे, त्यांना धन्यवाद द्यावे इतकी सौजन्यता वृद्धापकाळात-विक्षिप्तावस्थेत आणि संघर्षाला तोंड देत असतांनाही पाळणाऱ्या महिलेला हा बेगडी समाज वेडी म्हणत असेल तर काय .......


ती दिसली तेव्हा जराशी विक्षिप्तच जाणवली. तिच्या मागण्यांसाठी आक्रमक होऊन स्वरचित गाणी गाऊन नारे लावणारी. शासनाच्या अनागोंदी करभारांवर ताशेरे ओढत मध्येच कधीतरी भावनिक हाक घालणारी .. जीव ओतून घोषणा देऊन येणाऱ्या जाणाऱ्यांच लक्ष आकर्षून घेण्यास प्रयत्नरत. पण इतक्या निदर्शन आणि आंदोलनात तिला एकटीला विचारणार कोण होत.


नागपूरमधले हिवाळी अधिवेशन सुरु होऊन इनमिन चार दिवस झाले असावेत. पटवर्धन मैदानावर आज अनिस (अंधश्रद्धा निर्मुलन समिती) च्या लोकांचा मोर्चा आणि आंदोलन होणार होते. दाभोळकर आणि पानसरेच्या मारेकऱ्यांना शोधणं हा राज्यपातळीवारील गंभीर विषय उचलून धरायचा होता त्यासाठी निदर्शन सुरु होती.. आज मेघाताई पानसरे आणि हमीद दाभोळकर येणार होतेत. त्यांना भेटायला म्हणून मी नागपूरच्या पटवर्धन मैदानावर गेले. मेघातैंना ऐकायचे होते. पण एक आवाज सारखा अडथळे आणत होता. एक विक्षिप्त जाणवणारी वृद्ध महिला उतावीळ होऊन निदर्शन करीत होती. मध्येच ती गाणे गायी मध्येच नारे. तिच्याशी बोलायला जाणाऱ्यांना शिव्याची वाखोली वाहिली जायची. येणारे जाणारे तिच्यावर हसायचे. दात विचकून चिडवून जायचे. तसतशी ती आणखी चिडायची अन गाण्यांचा आवाजही वाढायचा. का कोण जाणे माझ लक्ष सतत तिच्याकडे होते. ती बेंबीच्या देठापासून ओरडत होती सतत न जाणो किती तासांपासून उभीच .... काय चाललंय तिचं. तिनं जरा शांत व्हावं जरा वेळ खाली बसावं पाणी प्यावं अस मलाच वाटत राहिलं . पण तिला बोलायला जाणार कसं. ती अंगावर धाऊन आली तर ? एवढ्या चार चौघात शिव्या घातल्या तर... मनात विचार आला अन मी पुन्हा गप्प झाले. पण तिचे हाल बघवेना अन ती असं का करतेय हे जाणून घेण्याची उत्सुकताही शिगेला पोचली. भीतभीतच पण मी गेले तिच्या जवळ. मावशी थोडं बोलू का ? काय झालंय ? काही त्रास आहे का? कसले आंदोलन करताय.

हे काय .. ती लगेच शांत झाली अगदी जवळ आली छानसं स्मित करत बोलू लागली. आपण बसुया का बसून बोलू म्हणताच माझ्याबरोबर चक्क पालकत मांडून बसली. निदर्शनाचे आवाज भोवताली गुंजन घालत होते. म्हणून तूर्तास किरकोळ माहिती घेतली तिची. केवळ गैरप्रकाराला साथ दिली नाही म्हणून गेल्या 22 वर्षांपासून प्रशासनासोबत एकाकी लढण्याची वेळ सुनंदा गोपाळ मोकाशी या 64 वर्षीय वृद्धेवर आली. हिवाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून पटवर्धन मैदानावर ती उपोषणाला बसली होती. निराधार मानधन, उपजीविकेचे साधन अशा अगदी साधारण मागण्यांसाठी तिने लढावे आणि किती काळ, तर तब्बल 8,305 दिवस! तरीही प्रशासनाने दखल घेऊ नये, आश्‍चर्य वाटते. पण हि किरकोळ माहितीहि किरकोळ वाटली नाही. खूप काहीतरी दडलंय खूप काहीतरी सांगायचंय हिला हे जाणवत राहिले. सगळं ऐकावं वाटत असूनही वेळ अन परिस्थिती पाहता जावं लागल. थोडे खर्चाला पैसे तिच्या हातात ठेऊन मी निघाले पण आता ती खूप शांत झाली होती अनिसचा संपूर्ण कार्यक्रम संपेस्तोवर ती शांत बसून राहिली. दुसऱ्या दिवशी कागद पेन घेऊन आम्ही पुन्हा सुनंदा मावशींना भेटायला गेलोत. ती निवेदन लिहित बसली होती. तिनं लगेच ओळखलं. तिच्या हातात असणारी कागदं पाहिलीत अन मी चाटच पडले.

सुनंदा मूळची पुण्याजवळच्या फलटणनजीक असलेल्या साखरवाडी-श्रीरामपूरची. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे, के. सी. कॉलेज मुंबई येथून एम. ए. मराठी, डीबीएम, पत्रकारितेचे पदविका शिक्षण पूर्ण केले. पुढे 1978 ते 1988 अशी दहा वर्ष महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथे लेखापाल पदावर कार्य केले. तेथे चालत असलेल्या गैरप्रकाराला तिने विरोध केला आळा घालण्याचा निष्फळ प्रयत्नही केला . .हे प्रयत्नच तिला भोवले आणि  इथूनच तिच्या आयुष्याची फरपट चालू झाली. कुणीही नातेवाईक नसतांना एकटीने जगत असतांनाही तिने आयुष्यात कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी तडजोड केली नाही. गैरप्रवृत्तींसोबत लढता लढता ती थकली आणि अखेर नोकरी सोडली. समाजातील विकृती पाहून ती बेचैन झाली आणि मनःस्वस्थ्याकरिता तिने अध्यात्माचा मार्ग निवडला. तिने स्वामी रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्यत्व पत्करले अन बनारसला स्वामी विवेकानंद आश्रमात सेवा करण्यास निघून गेली. तिथल्या वातावरणात प्रकृतीने साथ दिली नाही म्हणून दोन वर्षात ती मुंबईला परतली. आता प्रश्न होता तो तिच्या निवाऱ्याचा... पूर्वी ती सरकारी नौकरीत कार्यरत होती तेव्हा आता एकट्या पडलेल्या या निराधार महिलेला हव्या असलेल्या प्राथमिक गरजांची पूर्तता शासनाने करावी किमान डोक्यावर एकटीपुरत छत्र आणि उपजीविकेसाठी एखादा रोजगार मिळावा इतकीच तिची मागणी. पण या मागण्यांसाठी निवेदन घेऊन फिरत असतांनाही तिला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते. रोजगाराच्या नावाने मंत्रालयात तिच्याकडून दिवसरात्र काम करवून घेतले गेले आणि कामाचा मोबदला म्हणून सहा महिन्याने एका माजी समाजकल्याण मंत्र्याच्या स्वीय सहायकांनी हातात ५०० रु. ठेवले. राहायला छत्र नव्हते सहा महिने तिने मंत्रालयाच्या रस्त्यावर कसेतरी काढले होते पण आता सहनशक्तीची पराकाष्ट झाली आणि सुनंदा मावशीने आंदोलन पुकारले. 13 मार्च 1993 ला तिने पहिले उपोषण केले. तीन दिवसाच्या उपोषणाने प्रकृती खालावली तिला दवाखान्यात भरती करावे लागले पण न हारता लगेच दवाखान्यातून बाहेर पडून आठ दिवसांनी दुसरे आणि नंतर उपोषणाची शृंखलाच सुरू झाली ती आजतागायत कायम आहे. कधी रस्त्यावर वर्तमान पत्र विकून तर कधी छोटी मोठी काम करत ती दिवस ढकलत राहिली. या काळात तिने अनेक समाजोपयोगी कामे केली. ती अनेक वर्ष जनजागृतीसाठी मँरेथोन मध्ये,  तिने देश हितासाठी झालेली अनेक मोर्चे , शिबिर गाजवली. दरम्यान, 2004 मध्ये "बीएमसी'चे आयुक्त अजित जैन यांनी मिलनस्टार इमारतीमध्ये तिला एक खोली देण्याची सूचना 'स्पार्क जोकीन' या एनजीओला दिली होती. त्यासाठीही बराच मोठा लढा दिल्यावर तब्बल चार वर्षांनी तिला 2 क्रमांकाच्या खोलीचा ताबा देण्यात आला. पण आता म्हातारी असली तरी ती एक स्त्री आहे म्हणून फक्त असामाजिक तत्त्वांकडून तिचा विनयभंग केला गेला पोलिस खात्याने या प्रकरणाची तक्रार घेतली नाहीच परंतु तिलाच वेड्यात काढून धमकावण्यात आले. तिने खोली सोडून द्यावी यासाठी तिला सतत त्रास दिला जातो आहे जीवाच्या भीतीने सुनंदा मोकाशी आजही तिच्या हक्काच्या खोलीत राहू शकत नाहीये.  

ती वर्षानुवर्ष झगडते आहे आंदोलन करते आहे मुंबईच्या आझाद मैदानावर एकाच जागेवर बसून मागल्या २३ वर्षांपासून तिच्या मागण्या पूर्ण होण्याची वाट ती पाहते आहे. दरवर्षी अधिवेशनांना ती उपस्थित राहून पुन्हा पुन्हा त्याच त्याच मागण्यांसाठी निवेदन देते पुन्हा पुन्हा त्याच त्याच नेत्यांना भेटते पण पुन्हा तिच्या हातात शिल्लक राहतात तूरीच. निराधार मानधन, उपजीविकेचे साधन अशा अगदी साधारण मागण्यांसाठी तिने लढावे आणि किती काळ, तर तब्बल ८३६५ दिवस! तरीही प्रशासनाने दखल घेऊ नये, ह्याला काय म्हणावे ??  

सततचे उपोषण आणि संघर्षामुळे सुनंदाच्या स्वभावावर वैचित्र्याची झाक दिसते. पटवर्धन मैदानावर ती सतत शासनाच्या अनागोंदीबद्दल बडबडत होती, गाणी गाऊन आपल्या मागण्या मांडत होती. स्वरक्षनाखातर कुणी जवळ येऊ नये म्हणून त्रास देऊ नये म्हणून आधीच बचावात्मक आक्रमक पवित्रा घेत होती.. लोक हसत होतीत तिला चिडवून जात होते, पण, तिच्याशी बोलल्यावर ती वेडी नाही, हे लक्षात आले. विविध विषयांवरील तिचे ज्ञान दांडगे आहे. ती इंग्रजी अस्खलित बोलते. आपण दाखवलेल्या आपुलकीने भारावून डोळ्यात पाणी आणत हळवी होते आणि पाठीवर हात फिरवत मायाही दाखवते.

प्रदीर्घ काळापासून सतत उपोषण करून हा लढा तिच्या जीवनाच्या दैनंदिनीचा भाग झाला आहे. या लढ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी तिची इच्छा आहे. 22 वर्षांपासून शासनाने तिच्यासोबत न्याय केला नाही. पण, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मूलभूत मागण्या पूर्ण कराव्यात. 22 वर्षांच्या लढ्यानंतर न्याय मिळणे हासुद्धा एक "रेकॉर्ड' ठरेल, आणि हा रेकॉर्ड मा.फडणवीसांनी करावा, असे तिचे म्हणणे आहे. यानंतर कुण्याही निराधार स्त्रीच्या नशिबी असे जगणे येणार नाही, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी, अशी तिची अखेरची मागणी आहे


रश्मी
१८/१२/२०१५


(पुण्यावरून प्रकाशित मासिक 'विकासकर्मी-अभियंता मित्र' च्या महिलादिन विशेष अंकात प्रकाशित लेख)  

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...