पुन्हा नवे वर्ष सुरु झाले दरवर्षीप्रमाणे. नव्या वर्षात नवे संकल्प सोडतात म्हणे. काहीतरी ध्येय ठरवायचे अन ते गाठायला मग धावत राहायचे वर्षभर. हे ध्येय गाठल्या गेले म्हणजे गंतव्य गाठलं समजायचं Final Destination ...achievement वगैरे. आणि मग त्यात सुख सुख मानायचं. मग पुन्हा नवे वर्ष नवे संकल्प अन नवे ध्येय पण गंतव्य गाठलं ह्यात कसलं आलंय सुख ते म्हणजे निव्वळ ego satisfaction किंवा शक्तीप्रदर्शन वगैरे ...कदाचित. मी ठरवलं अन मी करून दाखवलं असं काहीसं. पण 'दाखवलं' म्हणजे ? कुणाला दाखवायचं असतं नेमकं ?
एखाद्या पाखराने उडत येउन एखाद्या वृक्षावर बसण्यात नसाव तेवढं उडत येतांना घेतलेल्या अनुभवांचं सुख मोठं असेल … गंतव्यावर पोचण्यापेक्षा वाटेतल्या प्रवासाचे, प्रवासातल्या अनुभवांचे सुख अधिक. ठरवण्यापासून ते मिळवण्यापर्यंतचं प्रवास. प्रवास दोन बिंदुंच्या मधल्या पोकळीचा प्रवास. ''between the line'' दडलेल्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रवास. .....प्रवास अथ: ते इति पर्यंतचा . कधी सुखद कधी काटेरी प्रवास. उन्ह अन सावल्यांचा प्रवास. कधी खडतर कधी मखमली स्पर्शाचा प्रवास. कधी ओला प्रवास तर कधी दुष्काळी. सहज प्रक्रियेचा - स्वतःत होऊ घातलेल्या बदलांचा प्रवास.
कुठेतरी वाचलंय ''आयुष्याचे रस्ते चुकल्याशिवाय वास्तवतेकडे घेऊन जाणारी पायवाट सापडत नाही, आणि रस्ते ठरवून चुकताही येत नाही'' पण एखादवेळी वाट चुकावी...अनावधानाने किंवा मग ठरवूनच आणि अनवट वाटेवरून वळून अनोळखी प्रवासाला निघावे. कोवळा अनुभव ... पहिल्यांदाचा. उत्साहाचा, आश्चर्याचा अन आनंदाचा सहज परावर्तीत झालेल्या उत्सवाचा प्रवास. सहाही इंद्रियांना जागृत करणारा प्रवास. नवा स्पर्श, नवे नजारे, नवाच गंध. नवे स्वर आणि नव्याच संवेदना. जगण्याला संदर्भ देणारा प्रवास. जगण्याचे मर्म ठरवणारा प्रवास. प्रवास तृप्तीचा अन अत्रुप्तीचाही. सृष्टीचा अन वृत्तीचाही. प्रवास कर्तव्याचा-कार्याच्या यशापयशाचा तसाच हृदयाचा हृदयाकडे घेऊन जाणाराही असतो प्रवास. मिळवण्यापासून जपण्या-जोपासण्यापर्यंत अन मग मिळवलेले गमावण्याचाही असतो प्रवास. हसण्या नंतर रडण्याचा अन रडता रडता हसण्याचाही असतो प्रवास. ओळख मग मैत्री अन मैत्रीतून प्रेमात पडण्याचा प्रवास मग ऋणानुबंधांचा अन अलगद पाय न वाजवता विरहात घेऊन जाणारा,,, मग अखंड छळणाऱ्या आठवणींचा ही प्रवासच तर असतो .... थांग- अथांगतेचा प्रवास … चिंतनाचा; आत्मप्रकटीकरणाचा प्रवास.
जगणे काय आहे. मी कोण आहे ? कशासाठी आलेय इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं यातच दडलीय . मी फक्त एक प्रवासी आहे. प्रवास करायला आलेय अखंड अनंत प्रवास जमिनीपासून ते क्षितिजापर्यंतचा प्रवास. कदाचित त्याही पलीकडचा. स्थळ-काळ न ठरलेला. अनादी-अनंत... अटळ प्रवास. अनुभवातून मिळणाऱ्या अनुभूतींचा प्रवास … या प्रवासातच सांर आलं म्हणून प्रवास महत्वाचा. प्रवासात येणाऱ्या साऱ्या साऱ्या अनुभवांची गाठोडी बांधून ठेवावी अन तेवढीच जपावी. संसारातून प्रवास संपवून अखेरचे जावे लागलेच तर एवढेच काय ते सोबत नेता येईल.
रश्मी
9/01/16
apratim
ReplyDelete