"तुमच्या एव्हाना एक गोष्ट लक्षात आली असेल की, आपण जे जगतो ना,
ते आपले मन, आपण कुणीतरी आपल्याला भरून दिलेल्या किंवा आपणावर
लादलेल्या ध्येय, महत्वाकांक्षा किंवा आदर्शाच्या काल्पनिक आराखड्यात गुरफटून
टाकून जगत असतो. अशा स्थितीत आपले मन स्वतःच्या स्वतः निर्णय घ्यायला
स्वतंत्र असत नाही. सारी बौद्धिक शक्ती आपण समोर ठेवलेल्या ध्येयाकडे लागलेली
असते. आपल्या जीवनाभोवती आपल्या दुराभिमानी व अहंकारी वृत्तीने विशिष्ट
जीवन जगण्याची लक्ष्मणरेषा आपणच आखूनरेखून घेतो. त्या चाकोरीतच राहिल्याने
तुमचे मन, तुमच्या र्हदयस्थ भावना, बुद्धीची टोचणी व दुराभिमानाचे नि अहंकाराचे
फुत्कार यांच्या जरबेत हालचाल करीत असते. मोठी केविलवाणी स्थिती आहे ही.
त्याने मनाचा गोंधळ इतका होतो की काही विचारू नका. अशा गोंधळलेल्या
मनःस्थितीत अप्रसन्नता, अशांतता आणि असुख यापेक्षा अन्य कशाची अपेक्षा करता
येईल ! जेंव्हा तुमच्या मनावर कसलेही दडपण नसेल किंवा कसल्याही जुनाट परंपरेचे ,
विशिष्ट जीवनसरणीचे, कौटुंबिक रुढींचे किंवा चालीरीती आखण्याचे, काही
गमावण्याचे काल्पनिक किंवा तत्वतः ओझे बुद्धीवर लादलेले नसेल, तेंव्हा मन
नि बुद्धी आपापले काम करायला स्वतंत्र असू शकतील. तशी ती मोकळी असतील,
तरच कुठलाही अडथळा वा निर्बंध न येत आत्मसंशोधन करण्याचे त्याचे सामर्थ्य
वाढेल. विचारात प्रामाणिकपणा येईल. निरीक्षण अव्यभिचारी राहील आणि या
सर्वांतूनच जी 'कृती' घडेल, ती खरी 'मनःपूत' ! अशा स्वतंत्र मनालाच जीवनात
अत्यंत महत्वाचे ठरणारे अनुभव ऐकता येतात, पाहता येतात. अनुभवता येतात
आणि हा जो साक्षात्कार, हे जे आत्मदर्शन त्यालाच म्हणतात देव ..."