Wednesday, 27 November 2019

अरण्य वाटेचा प्रवासी - हिमांशू बागडे

तुम्ही फक्त भटकंतीचा विषय काढता..विषय रमत जंगलापर्यंत येऊन पोचतो. जंगल म्हणजे त्याचे घरच जणू आणि वाघ त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. पण माया वाघिणीशी मात्र त्याचे आत्मिक नाते आहे. तिच्याबद्दल बोलताना तो तल्लीन होऊन बोलत राहतो. कुठल्याही समयी कोणत्याही निमित्ताने कितीही वेळ तो मायाबद्दल बोलू शकतो.. तिच्या हालचालीतून तिचा मूड त्याला ओळखता येतो, तिच्या वागण्यामागची कारणे तो  समजावत राहतो. तिच्या चपळाईची, बुद्धिमत्तेची भरभरून तारीफ करतो. मी पुढ्यात बसून हे सगळं अनिमिष ऐकत असते. अचंभित करणारे अनवट वाटेचे हे किस्सेच नाही तर एखाद्या वाघीण आणि मनुष्यात असणारे हे अनोखे नाते त्याच चैतन्यमयी भटक्याकडून ऐकत सहाही संवेदनाने अनुभवत असते. सगळंच अचंभित  करणारं.

Image may contain: Himanshu Bagde, smiling, sitting, sky, ocean, outdoor, water and nature




आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात असे काहीसे असते, पण  आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला. आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही..आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.  पण तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे आणि त्याबदल्यात उदरनिर्वाहासाठी मनासारखा मोबदलाही मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?  मला नेहमीच वाटत आलंय… जगात सगळ्यात सुखद जॉब कुठला असेल तर तो भटकंतीचा .. कोणातरीसाठी कुठल्याही कारणाने, त्यांच्याच खर्चावर मुशाफिरी करावी, मनसोक्त हिंडावं, डोंगररांगा, समुद्र किनारे, हिरवाई, जंगल, प्राणी, किल्ले, लेण्या हुडकून काढाव्या. या भटकंतीतून निरनिराळ्या अनुभूती घ्याव्या, मनात साठवाव्या. मनसोक्त हिंडून झाले की घरी परतताना खिसाही भरला असावा. असे झाले तर ? स्वप्नील वाटतं ना सगळं. स्वप्न पाहायला हरकत नाही पण त्यानं पोट भरत नसते. स्वप्न बाजूला ठेवून वास्तवात जगता आलं पाहिजे. पण वास्तव म्हणजे काय शेवटी? तुमच्या इच्छा आकांक्षा मारून, स्वप्न बाजूला सारून प्रस्थापितांच्या मळलेल्या वाटेवरून मन मारून प्रवास करीत राहणे, मारून मुटकून स्वतःला एखाद्या साच्यात बसवणे आणि एक दिवस हे जग सोडून निघून जाणे .. एवढंच तर नव्हे ना?


असा विषय आला कि 'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life ' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) हमखास आठवतो. एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात.

हे अख्ख व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या अनेक भटक्यांबद्दल आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियेचे ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुख-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत. त्यातलाच एक हिमांशू बागडे.


तो तसा विज्ञान शाखेचा विद्यार्थी. एकेकाळी आर्मीत जाऊन देशसेवा करायचे स्वप्न पाहणारा.. वाचनाचे वेड असणारा, अध्यात्मात रुची असणारा, भर तारुण्यात फुगीर वाढीव पगाराच्या नोकऱ्या खुणावत असताना वर्षानुवर्षे प्रगतीच्या चढत्या पायऱ्यांचा आलेख नाकारून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले वेल सेटल कॉर्पोरेट करिअर सोडून वाट वाकडी करत गेली २० वर्ष निसर्गाचा ध्यास घेत जंगलं पालथी घालणारा हिमांशू फार कमी वयात देश विदेशात त्याच्या जंगलवेडासाठी आणि त्यासाठी केलेल्या कामामुळे नावारूपास आला.  वयाच्या अकराव्या वर्षीच मन-मेंदूने जंगलाच्या मोहात पडला. वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या निमित्ताने सहज जंगलात जाणे व्हायचे. तिथला निसर्ग, वातावरण, प्राणी आदीची ओढ निर्माण व्हायला हळूहळू सुरुवात झाली असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी नागझिऱ्याच्या जंगलात पहिल्यांदा त्याने प्रत्यक्ष वाघ बघितला. हा अनुभव रोमांच उभा करणारा होता. त्या क्षणापासून वाघांवर त्याने निरातिशय प्रेम केले. वन्यजीव संवर्धन आणि व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जाणाऱ्या वाघांची काळजी घेणाऱ्या मोहिमेत हिमांशूने कळत नकळत मोठी भूमिका निभावली…तुमच्या जाणिवा जर सच्च्या आणि प्रामाणि‌क असतील तर तुम्हाला तुमच्याही नकळत मार्ग गवसत जातात ह्याचेच जिवंत उदाहरण हिमांशूच्या रूपात नावारूपास येत होतं,
जंगल अभ्यासाचा छंद जोपासणाऱ्या हिमांशुला नकळत जंगलावर प्रेम जडले. औद्योगिक विकास आणि अन्य विकासाच्या नावावर जंगलाची मोठ्या प्रमाणात होणारी वाताहत पाहून तो व्यथित होतो. यातूनच तो नि:स्वार्थीपणे ‘जंगल वाचवा’ मोहिमेत सहभागी झाला. हळूहळू या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला. जंगल वाचवा, पर्यायाने वाघ वाचविण्यासाठी तो आज दिवसरात्र धडपडतो आहे.

हिमांशुच्या याच कार्याने त्याला ‘जंगलतज्ज्ञ’ अशी नवी ओळख दिली. जंगलाशी संबंधित कुठलीही गोष्ट असेल, हिमांशुला त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. त्याचे मार्गदर्शनात जंगलाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून जंगलप्रेमी प्रयत्नरत असतात. येथूनच हिमांशुचा जंगल अभ्यासक, गाईड, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असा नवा प्रवास सुरू झाला.



एकदा माया नावाची वाघीण तिच्या दोन शावकासोबत हिमांशुच्या पुढ्यात आली.  तिचं बेदरकार, तेजस्वी, स्वच्छंद वर्तन तिची दखल घेण्यास भाग पाडणारच होतं. तिला माणसांबद्दल संकोच नव्हता. इतर श्वापदांचे भय तिच्या वागण्यात जाणवत नव्हते. जंगलभर मुक्त संचार करणाऱ्या मायाच्या निर्भय वागण्यानं हिमांशु तिच्याकडे आकर्षित झाला. सतत मायाचेच विचार डोक्यात येऊ लागले. तिच्या अस्तित्वाभोवताल फिरु लागले. त्याने मायाचा माग घ्यायला सुरुवात केली. तिच्या हालचालीचा अभ्यास तो करु लागला.  म्हणतात ना, प्राण्याला ‘माया’ लावली की ते ही माणसाळतात. हिमांशुचे तिच्या अवतीभवती असणे आता ‘तिच्या’ही अंगवळणी पडले होते. तिलाही त्याची कदाचित सवय झाली होती.

वाघांचे वर्तन कसे असते, वाघांच्या हद्दी कशा ठरतात, त्याची आखणी कशी करतात, वाघ त्या कशा ठरवतात, त्यासाठी कशी भांडणे करतात याविषयीची अतिशय रंजन आणि  शास्त्रीय माहिती हिमांशुला आहेच. मात्र, याही पुढे जात माया कशी वागते. आपल्या बछड्यांच्या बचावासाठी काय-काय योजना आखते, त्यासाठी प्रयत्नपूर्वक काय कुटील कारस्थान खेळते, हे सगळं हिमांशुसाठीही नवीन होते. तो सांगतो ती तिच्या काळात जंगलाची सम्राज्ञी होती तरी त्याहून अधिक तिच्या बछड्यांची आई होती. पूर्वी अनेकदा साम्राज्य हासील करण्याच्या वाघांच्या लढाईत आपले शवक गमावलेली माया, त्यांच्याच राज्यात त्यांनाच गाफील ठेवून जगायला शिकली.  एकावेळी दोन नर वाघांपासून पिल्लांचा बचाव करायला म्हणून ती कुटीलपणे दोघांशीही संबंध ठेवून दोघांनाही हे तुमचेच पिल्लं आहे या भ्रमात ठेवून त्यांच्याच कडून पिल्लांचा बचाव करून घ्यायची.

‘माया’सोबतच्या भेटी जशा जशा वाढत गेल्या तशी ती हिमांशुला अधिकच उलगडत गेली. तिच्या स्वभावाचा अंदाज त्याला बांधता येऊ लागला. तिची पुढली चाल हिमांशुला ओळखता येऊ लागली. ती कोणत्या क्षणी कुठे असेल, कुठून प्रवास करेल, कुणाशी भांडेल, कुणाशी तह करेल ह्याचे आडाखे चपखल बसू लागले. एका क्षणी माया आणि हिमांशुचे नाते इतके प्रगाढ झाले कि, ‘टेलिपॅथी’ व्हायला लागली.



जंगलात भेटलेल्या हिमांशुला आता मायाच अनेक संकेत स्वतःहून देते. हिमांशुच्या हातात जेव्हा कॅमेरा असतो तेव्हा ती स्वत:हून पोज द्यायला सज्ज होते, असेच काहीसे वाटू लागले आहे. ह्या दोघांचे हे न समजणारे अनामिक नाते अनेक माध्यमसमूहांना खुणावत राहिले. ह्यातूनच 'लोनली प्लॅनेट'च्या निवडक लेखांच्या आवृत्तीत या दोघांवर सविस्तर लिहिले गेले. हिमांशुनेही 'माया इन्चान्ट्रेस' (माया एक जादूगारिणी) या नावाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये चरित्र मालिका लिहिली. त्याचे अनेक फोटोग्राफ्स आंतराष्ट्रीय पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आणि गाजलेही. त्याच्या कामातून, लिखाणातून च्याट्या छायाचित्रांतून त्याचे जीवनानुभव, संवेदनशील आणि तितकेच प्रगल्भ जीवनदर्शन घडते हे निश्चित.

जंगलांचा मागोवा घेत फक्त भारतच नव्हे तर विदेशातील अनेक जंगल पालथे घालून कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची अपेक्षा न करता तो अनेक वर्ष जंगलसेवा  निगुतीने करीत आहे.  दक्षिण भारत, लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर-पूर्वेतले सगळे राज्य, मध्य भारतातील ताडोबा, मेळघाट, नागझिरा, पेंच, कान्हा, बांधवगढ , सातपुडा, पन्ना, गोवा, कर्नाटका, तामिळनाडू, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि भूतान येथील जंगलांना त्याने भेट देऊन तिथल्या प्राण्यांचा, निसर्गाचा अभ्यास केला या प्रवासात अनेक जंगलप्रेमींच्याही भेटी घेतल्या आणि त्याचा हा मुलखावेगळा संसार अनेक पटींनी मोठा करीत नेला आहे.



हिमांशूच्या अतुलनीय कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१२ सालचा  ''Sanctuary Asia Wildlife Photographer', 'पुरस्कार, महाराष्ट्र राज्य बायोडाइव्हर्सिटी बोर्ड अवॉर्ड',  '२०१३ चा नॅशनल बायोडाइव्हर्सिटी फोटोग्राफर अवॉर्ड',  २०१९ साली UK ने आयोजित केलेला 'Winner of Lanka Challenge' अश्या अनेक पारितोषिकाचे तो मानकरी ठरला. त्याच्या श्रमसेवेच्या आस्थेपोटी मिळालेले अनेक सन्मान आणि सत्कार त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला अभिमान बाळगण्यास उद्बोधक असेच आहेत.

असे हे हिमांशु आणि जंगलाचे अतूट नाते म्हणजे मानवाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गावर, वन्यजीवावर प्रेम करून त्याचे रक्षण करावे, हाच संदेश देणारे आहे. या गोड, अनामिक नात्यापासून आपणही प्रेरणा घेऊ या. नाही जंगल, किमान आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एका प्राण्यावर तरी प्रेम करुया. झाडे लावून पक्षांना आमंत्रण देऊ या…त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी……!





मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर
(प्रतिबिंब-२०१९ च्या पर्यटन विशेष दिवाळी अंकात प्रकाशित )

Monday, 18 November 2019

लेखकांच्या गोष्टी



#लेखकांच्या_गोष्टी


''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.''


परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं.. शिवाय दोनेक वर्षाआधी पाहिलेला 'गॉन गर्ल' चित्रपटही आठवला. तसा हा सिनेमा गूढ कॅटेगरीतला डेविड फिंचर ह्याने २०१४ साली निर्देशित केलेला ह्याच शीर्षकाच्या कादंबरीवर बनवलेला स्मार्ट सिनेमा आहे. चित्रपटातली नायिका एमी (रोसमंड पाइक) ही तिच्या लहानपणी तिच्या आई-वडिलांनी लिहिलेल्या, प्रचंड गाजलेल्या, लोकप्रिय कादंबरीची खरीखुरी नायिका आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या तिच्याशी भावना जुळल्या आहेत. ती स्वतःही लेखिका आहे आणि त्याच अनुषंगाने तिला रोजनिशी लिहायची सवयही आहे. एमीचा नवरा निक डन (बेन अफ्लेक) त्याच्या जुळ्या बहिणीसोबत मिळून एक बार चालवतो. सगळं काही सुरळीत चालू असतांना लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाला निक घरी पोचतो तेव्हा त्याला लक्षात येतं एमी गायब आहे .. सर्वत्र तूट-फूट, रक्ताचे शिंतोडे, पसारा घरातल्या एकंदरीत परिस्थितीवरून एमीसोबत काहीतरी भयंकर घडले असल्याचे लक्षात येते. इथून सुरु होतो रोमांच. इन्वेस्टीगेशन टीम, माध्यम समूहांची गर्दी, एमीचे चाहते ह्यांच्या भन्नावून सोडणाऱ्या प्रश्नांनी आणि तपासणीत पुढे येणाऱ्या विरोधातल्या पुराव्यांनी एमीचा खून झाला असल्याची आणि तिचाच नवरा निक त्याला कारणीभूत असल्याची खात्री पटत जाते. एमीच्या रोजनिशीवरून चित्रपट उलगडत जातो. काही क्ल्यू मिळतात आणि निक अधिकाधिक गाळात फसत जातो.


एमीच्या रोजनिशीवरून लक्षात येतं कि, एमीच्या लोकप्रियतेला भाळून निकने तिच्याशी लग्न केले असते परंतु त्यांच्यातले संबंध मात्र फार दिवस चांगले राहत नाही. निकचा बाहेरख्यालीपणा, दुर्लक्ष करणे शिवाय इतर महिलांशी संबंध एमीच्या दुःखाचं कारण असतं. तिच्या रोजनिशीतून निक कमालीचा विलन वाटायला लागतो. एमीच्या खुनाच्या आरोपात निकला शिक्षा होते .. गूढ मात्र काहीतरी वेगळंच असतं. ही लेखिकेशी प्रेम केल्याची किंवा तिला दगा देण्याची शिक्षा भोगल्याचीच योजनाबद्ध कहाणी असते. हे प्रेक्षकांना अगदी शेवटच्या एकमेव सीनवरून लक्षात येतं.


२०-२५ वर्षाआधी कधीतरी टीव्हीवर वेगवेगळ्या कथांचे एपिसोड असलेली सिरीयल पहिली होती. 'मिट्टी के रंग' मधेच असावी बहुदा नेमके आठवत नाही पण ती देखील अशीच काहीशी. एक लेखक असतो प्रचंड लोकप्रिय वगैरे. पण त्याच्या लोकप्रियतेमागे, त्याच्या पुस्तकांचा खप प्रचंड वाढण्यामागे त्याच्या लिखाणापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चाच कारणीभूत असतात. अत्यंत साधी वेशभूषा, मितभाषी असणारा हा लेखक बायकोच्या अत्याचारांनी पिडलेला असतो. तिच्या अत्यंत वाईट वागणुकीचा तो बळी असतो. त्याच्या लिखाणाची किंमत ती ठरवते, त्यानं कुठल्या कार्यक्रमांना किती मानधन घ्यायचं हे ती सांगते .. मानधन न मिळणाऱ्या कार्यक्रमांना ती लेखकाला जाऊच देत नाही. एवढंच नाही तर दारावर आलेल्या आयोजकांना चक्क हाकलून लावते हे पडद्यावर दिसत राहते. लेखक महाशय कार्यक्रमांमध्ये डोळ्यातून आसवे गाळून या चर्चांना पुष्टी जोडत राहतो. जनतेत हळहळ पसरते, चर्चांना उधाण येतो, त्याच्या बायकोबद्दल समाजात प्रचंड घृणा पसरते.. लेखकाची प्रतिष्ठा मात्र वाढतच जाते. कार्यक्रमाला लेखक हवा पण बायकोकडून नकार येऊ नये म्हणून मानधन वाढवून दिले जातात, कार्यक्रमांना गर्दी वाढत राहते.. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा काहीतरी क्ल्यू मिळेल म्हणून वाचकांत जिज्ञासा शिगेला पोचते त्यांच्या पुस्तकांचा खप गगनाला जाऊन भिडत राहतो.


हे सगळं पाहून आपणही हळहळतो, बायकोचा राग राग येऊ लागतो, आपल्या संवेदना आपली सहानुभूती पूर्ती लेखकाच्या बाजूने झुकलीच असते आणि शेवटचा सिन येतो... गूढ उकलत..पचनी पडणार नाही असं सत्य समोर येतं, हा सगळा लेखकानेच रचलेला सापळा असतो..बायको स्वतःही त्यात पिडलेली प्यादीच असते.


लेखकांवर लिहिणारे लेखकही किती क्रिएटिव्ह असतात .. लेखक हा स्वप्नील विश्वात रमणारा.. सत्यही कल्पनेत रंगवून पाहणारा आणि शब्दांच्या जादूने वाचकांना असणाऱ्या - नसणाऱ्या दुनियेचीही सफर घडवून आणणारा. त्याचीही उलटी-सुलटी रूपे असू शकतात सत्यात किंवा एखाद्या लेखकाच्या कल्पनेतही हे बघणे गमतीशीरच आहे... नाही ?


- रश्मी पदवाड मदनकर







रश्मी पदवाड मदनकर -

Saturday, 16 November 2019




तसे रोजचेच तर असते जगणे 

अंधारातही उजाडले अंगण बघणे 
मनात चांदणं असतं फुललेलं तोवर 
झाकोळला राहतो अंधार सारा ..

तेव्हा एक करावं  ..

रोज थोडं थोडं चांदणं 
मनातून काढून गोळा करावं 
कुपीत घालून जपून ठेवावं .. 

रात्र उलटेल .. दिवस पालटतील
कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन ..
आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर 

कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून, 
पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या 
उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या ..

मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या 
कारण 

मनात चांदणं असतं फुललेलं तोवर 
झाकोळला राहतो अंधार सारा !

- रश्मी पदवाड मदनकर

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...