आजा मै हवाओ में बिठा के ले चलूं .. तू हि तो मेरी दोस्त है ..
आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर येतोच तो आयुष्यात.. दुरून तुमची तगमग बघत अस्वस्थ होतो नकळत मदतीला धावून येतो. आधाराचा हात देतो, रुसलेले हसू परत खुलवतो, तुम्हाला अलगद त्या तात्पुरत्या आलेल्या कष्टातून संकटातून बाहेर काढतो अन हळूहळू पुन्हा आयुष्यातून नाहीसाही होतो. त्याचं आपल्या आयुष्यात तेवढंच औचित्य असतं. आयुष्यातून निघाला तरी आठवणीतून, मनातून मात्र निघू शकत नाही.. आयुष्य जगण्याचे अनेक धडे शिकवून, आयुष्याला नवे आयाम देऊन गेला असतो..मनात कायमची जागा ठेवून गेला असतो.
तो ..'प्रेमरोग'च्या मनोरमाला भेटलेल्या देवधरसारखा असतो..नियतीच्या नाकावर टिच्चून, प्रस्थापितांच्या हुकूमास न जुमानता मनोरमाच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा.. किंवा 'सदमा'च्या सोमप्रकाशसारखाही बालिशपणावरही निरपेक्ष निरलस प्रेम करणारा, सुरक्षा देणारा. 'इंग्लिश विंग्लिश'च्या शशीला अनोळख्या नवख्या देशात भेटलेल्या विंसेंट सारखा असतो तो कधी... तिच्या भांबावलेल्या आयुष्याला मार्गावर आणून सोडणारा, तिच्या दुर्गुणांना दुर्लक्षित करून तिच्या गुणांवर भाळणारा .. एखादा राजू 'गाईड' मिस नलीनीला रोझी मार्को होईपर्यंतच्या प्रवासात शिढीसारखा साथ देतो..तिचे स्वप्न साकार करतो आणि स्वतः मात्र भणंग आयुष्य जगायला निघून जातो.. झिलमीलला भेटलेल्या 'बर्फी'सारखाही असतो एखादा ठार वेडेपणालाही जिव्हाळ्याने सावरून घेणारा, एखादा 'अलबेला' टोनी सोनियाला गाईड म्हणून भेटतो आणि आयुष्यात खऱ्या जगण्याचा प्रवास घडवून आणतो तसा किंवा आनंदात असलेल्या गीतला दुःखी होऊन भेटलेल्या पण गीत दुःखात असताना तिला शोधून काढून आनंद वाटणारया 'जब वी मेट'च्या आदीत्यसारखा..... किंवा अंधारात कंदील लावायला येणाऱ्या विधवा राधेवर मौन प्रेम करणारया आणि काळानं ओढून आणलेल्या तिच्या अंधाऱ्या आयुष्यात मूठभर क्षण उजेडाचे देऊ करणाऱ्या 'शोले' च्या जय सारखा .. किंवा 'टायटॅनिक'च्या कडूगोड़ प्रवासात मरेस्तोवर साथ देणाऱ्या जॅक सारखा. कुणी अमृताचा इमरोज होतो, कुणी सावळ्याची राधा ..द्रौपदिचा सखा कृष्ण बनून किंवा सीतेला सोडवणारा बजरंग बनून .. तो असतोच कुठल्यातरी रूपात तिच्या अवतीभोवती.
अशी किती लोकं असतात ज्यांना असे कुठलेसे मित्र मिळतात. जे तुमच्या मैत्रीसाठी, तुमच्या थोड्या वेळेसाठी तुमच्या सोबतीसाठी, तुमच्या चेहेऱ्यावर एक हसू फुलवायला म्हणून जीव ओवाळून टाकतात. तुम्ही कुठेही असा त्याचं अस्तित्व तुमच्या भोवताल तुम्हाला जाणवत राहतं. तुमची एक हाक आणि तो हाजीर .. असे होत असेल तर तुमच्यासारखे तुम्हीच नशीबवान असता. आयुष्यात तुम्ही कितीही गोतावळ्यात राहत असले तरी शेवटी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात येणारे अपडाउन्स तुमचे तुम्हालाच झेलावे लागतात, भोगावे लागतात. इतर लोकं केवळ त्याची कल्पनाच करू शकतात. पण हे आयुष्यात अचानक चालून आलेले संकट निभावून नेतांना कुणाचातरी भरभक्कम आधार हवा असतो, मैत्रीची साथ हवी असते. आपण तळपत्या उन्हातून, काटेरी मार्गावरून किंवा अंधाऱ्या भुयारातून चालत असताना कुणीतरी कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त आपली सोबत म्हणून शेजारी चालत राहतंय, खाच खळग्यात अडखळलो कि मदतीला हात पुढे करतो ही जाणीवही किती सुंदर असते. या नात्याला काय नाव असतं माहिती नाही पण अशी सोबत मिळायला नशीब लागते मात्र. काही प्रेमकथा किंवा मैत्रीकथा खूप जेनुइन खूप निरागस असतात. काही विशिष्ट काळापुरत्या, विशिष्ट उद्देशासाठी जन्माला येतात आणि तो उद्देश संपला कि संपुष्टातही येतात. म्हणजे साथ सुटते कथा मात्र संपलेली नसते. ती आठवणीत आयुष्यभर तशीच भरभक्कम आधार देत राहते. तुही तो मेरी दोस्त है म्हणत ...
- रश्मी पदवाड मदनकर
वाह, प्रत्येकाच्याच मनात दडलेला विषय. खूपच हळुवारपणे मांडलात. अन अशी नाती फारच दुर्मिळ असतात. सुंदर लेख.💐
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)
ReplyDelete