(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं )
एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहायला आवडतंच त्यात तो जुना आवडत्या
अभिनेत्यांचा असेल तर क्या बात .. पण एखाद्या अत्यंत संवेदनशील नजरेने
टीपलेले चित्रपटाचे सिन आणि त्याचा उलगडा इतका हळुवार इतका विलोभनीय की
चित्रपट पाहील्यावर इतका कळला नसता तो वाचनातून झिरपतोय आपण त्या विश्वात
तन्मयतेनं रमतोय असं वाटत राहतं ...
एक अत्यंत आवडलेला लेख.
.................................................
उजेडाचा मिलन 'स्पर्श'!
संजय आर्वीकर
उजेड हा मुक्तीचा भावसंकेत असतो. आत्मज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासातला
हा एक वाटाड्या असतो. उजेडाच्या प्रकाशात अहंगंडात रूपांतरित झालेला
न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती असते. त्यागाच्या आवरणाखाली लपलेले प्रेम
सूर्यफुलासारखे उमलण्याची असते. सई परांजपेंचा ‘स्पर्श’ हा सिनेमा
उजेडाच्या जादूई मिलनाची गोष्ट सांगतो...
नवजीवन अंध विद्यालयाचा
प्रमुख असलेल्या अनिरुद्धचं घर. तो स्वतः दृष्टिहीन, पण विलक्षण
स्वाभिमानी. घरात अनिरुद्ध आणि त्याच्याच विनंतीवरून शाळेत येऊ लागलेली
कविता. कविताच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेलं. त्यानंतर
स्वतःच्याच कोषात राहणाऱ्या कविताला शाळेच्या कामात जणू नवे जीवन-प्रयोजन
गवसलेले. पण कविताची गुंतवणूक आता फक्त शाळेपुरती मर्यादित राहिलेली नाही.
अनिरूद्ध आणि कवितामध्ये नाजूक भावबंध निर्माण झाले आहेत. दोघांनाही याची
जाणीव झालेली आहेच. पण अजून दोघांनाही आपण निखळ प्रेमभावनेने एकत्र येत
आहोत, हे महा-ज्ञान व्हायला बराच पल्ला गाठायचा आहे.
दोघे एकत्र आलेली अशीच एक संध्याकाळ -
अनिरुद्ध : मै एहसान से घबराता हूं, कविता... और दिन ब दिन तुम्हारे एहसानों का बोझ भारी बनता जा रहा है.
कविता : कैसा एहसान? दो पराठे और एक केक?
अनिरुद्ध : तुम्हारा स्कूल मे आना ही एक एहसान है, हमारे बच्चों के लिये.
कविता : आपने कहा था, कि मै उन्हे कुछ दुंगी, तो वो भी मुझे कुछ देंगे.
अनिरुद्ध : वे किसे क्या देंगे बेचारे?
कविता : यह लब्ज मना था... ‘बेचारा’
अनिरुद्ध : दुसरों के लिये मना था... आखिर मैं भी तो उनमे से हूं - एक बेचारा!
कविता : दुसरा कोई हमदर्दी दिखाये, तो आप कितना चिढ उठते है. बट् यू आर
फूल ऑफ सेल्फपिटी... सच, जितनाही आपको अधिक जानती हूं, उतनाही कम समझ पाती
हूं.
अनिरुद्ध : मुझे समझनेकी कोशिश मत करो कविता. लीव्ह मी अलोन. अपनी अंधेर नगरीमें मुझे रहने दो.
कविता : अंधेरे में आप अकेले नही है, मैं भी तो अंधेरे में ही रहती हूं.
अनिरुद्ध : हां! लेकिन तुम्हारे और मेरे अंधेरे मे फर्क है.
कविता : क्या हमारा उजाला, एक नही हो सकता?
‘क्या हमारा उजाला एक नही हो सकता?’ हे ‘स्पर्श’ या या चित्रपटातलं
भरतवाक्य आहे आणि या वाक्याचा आशय अनिरुद्ध-कविता या परस्परसंबंधांपुरता
मर्यादित नाही. चित्रपटाबाहेरचा मोठा अवकाशही. ते आपल्या कवेत घेतं.
आश्वस्त करणाऱ्या प्रकाशमान दिव्यांशी एखादी माळ असावी, अशी एकमेकांना
प्रकाश देणारी नितांतसुंदर प्रसंगमालिका ‘स्पर्श’मध्ये लुकलुकत - ‘आम्ही
आहोत... आम्ही आहोत’ असं सांगत राहते. लहान मुलांचे हळूवार प्रसंग. हा
प्रकाश थेट आपल्या काळजात उतरवतात... चित्रपटाच्या प्रारंभी पपलू हा डोळस
मित्र रामप्यारेला मिडास राजाची गोष्ट सांगतो. चित्रपटाच्या अगदी शेवटच्या
टप्प्यात, रामप्यारे पपलूला गोष्ट सांगतो, ब्रेलमध्ये कविताने तयार
केलेल्या पुस्तकाच्या आधारे. हिशेबही जुनाच. एका गोष्टीसाठी दोन चॉकलेटस्.
या दोन दृश्यांच्या आंतरक्रियेतून पडलेला प्रकाशझोत थेट कविता-अनिरूद्ध
यांच्या आता काहीशा औपचारिक झालेल्या संबंधांवरही पडतो; कारण अटीतटीच्या
एका प्रसंगी मुलांसाठी ब्रेलमध्ये गोष्टीची नवी पुस्तकं का नाहीत, असा
प्रश्न विचारलेल्या कविताला-तिनं आतापर्यंत ब्रेल शिकणं आवश्यक का मानलं
नाही? असा प्रतिप्रश्न अनिरुद्धनं केलेला असतो. या नात्याची सुंदरता अशी
आहे, की काहीशा वादावादीच्या सुरात घडलेल्या या प्रसंगाची परिणती कवितानं
मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं ब्रेलमध्ये तयार करण्यात होते. या प्रसंगातून
उमललेल्या स्निग्ध प्रकाशात कविता-अनिरुद्ध यांच्यातले नाजूक भावबंध पुन्हा
क्षणभर उजळून जातात.
अगदी कविता नवजीवन अंध विद्यालयाकडे कशी आकर्षित झाली, हा प्रसंगही अंध आणि डोळसांनाही एकमेकांच्या प्रकाशात न्हाऊन टाकणारा आहे.
दिवाळीचे दिवस. कविताची मैत्रीण मंजुळ दिवाळीसाठी अंध विद्यालयाच्या
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर रंगीबेरंगी मेणबत्त्यांच्या खरेदीसाठी
कवितासह आलेली. रुपेरी पडद्यावर खूप साऱ्या झगमगत्या मेणबत्त्या. मंजुळ
त्या बघून हरखून गेलेली. एक भलीथोरली मेणबत्ती घेऊन मंजुळ पैसे देण्यासाठी
जात असतानाच दोन अंध विद्यार्थ्यांमध्ये, कोणी तयार केलेली मेणबत्ती विकत
घेतली, जाते याबद्दल विलक्षण उत्सुकता. आपली मेणबत्ती विकली न गेल्यामुळे
रामप्यारे हिरमुसलेला. कविता रामप्यारेकडे जाते-
कविता : ये पिलीवाली मोमबत्ती आपने बनायी है?
रामप्यारे : हां जी.
कविता : (स्नेहार्द्र आवाजात) अरे ये तो बहोत खूबसुरत है, बहुतही सुंदर!
कविताची बोटं जणू मेणबत्तीला गोंजारताहेत. नंतर त्यालाही ती प्रेमभरानं कुरवाळते.
कविताच्या साडीचे पोत कुरवाळत,जणू बोटांच्या स्पर्शाने बघत -
रामप्यारे म्हणतोय, ‘आपकी साडी बहुत सुंदर है.’
यानंतरच्या दृश्यात कविता एकदम प्रिन्सिपॉल अनिरुद्धच्या केबिनमध्ये
दिसते.संभाषणाच्या दरम्यान, तिने आपला इरादा बदलून अंध विद्यालयात येण्याचं
कसं ठरवलं? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ती सांगते. ‘कुछ चेहरे... कुछ
मोमबत्तीयाँ... कुछ स्पर्श...’
चित्रपटात खूप नंतर, अनिरुद्धशी
साखरपुडा ठरल्यानंतर कविता आणि मंजुळ साडी खरेदीसाठी जातात. कविता
डोळ्यांनी बघून साडीची निवड करण्याऐवजी तिला डोळे बंद करून फक्त स्पर्श
करून, साडीची निवड करते; तेव्हाही रामप्यारेबरोबरच्या त्या प्रसंगातील
मेणबत्त्यांचा प्रकाश या प्रसंगावर आणि त्यानंतरच्या अनिरुद्धबरोबरच्या
सुंदर क्षणांवरही पडलेला असतो.
आपण डोळस आहोत म्हणून आपल्यावर या
आंधळ्यांच्या शाळेत अन्याय होतोय.कविता आंटी आपल्याकडे पुरेसे लक्ष न देता
रामप्यारेचेच लाड करते, अशा भावनेने घेरलेला पपलू - रामप्यारेच्या घरी
सगळेच आजारी पडलेत, असं खोटंच सांगतो. रामप्यारेला खरं कळताच दोघांमध्ये
जोरदार मारामारी सुरू होते, दोघांची मारामारी सुरू असतानाच, आपल्याला
दृष्टी असल्याने आपण वरचढ ठरतोय, याची जाणीव पपलूला होऊन तो डोळे बंद करून
पुन्हा मारामारी करू लागतो. पपलूच्या मनात ही जाणीव निर्माण होणं, हा
त्याचा नवा प्रकाश सापडण्याचा - ‘डोळस’ होण्याचा क्षण आहे. समान
न्यायासाठी, हा ‘असलेले डोळे’ बंद करून घेण्याचा क्षण एखाद्या अक्षय
प्रकाश-कुपीसारखा मनात साठवून ठेवावा असा आहे. जेव्हाही मन काळोखाने घेरले
जाईल, पपलूने मुद्दाम बंद करून घेतलेले डोळे आपल्याला या प्रकाश-कुपीकडे
नेईल.
‘स्पर्श’मधील अनिरुद्ध आणि कविता यांच्यातले एक प्रेम-दृश्य
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील विलक्षण सुंदर, अर्थसमृद्ध दृश्य
ठरावे.
हिरवळीवर निवांत बसलेले अनिरुद्ध आणि कविता.
कविता : क्या सोच रहे हो?
अनिरुद्ध : सोच रहा हंू तुम कितनी सुंदर हो!
कविता : कैसे मालूम?
अनिरुद्ध : नही हो क्या?
.....
कविता : हा... हूं. कहते है-
अनिरुद्ध : (हळुवार हसत) तो क्यूं कहते है जो कहते है?
अनिरुद्ध तिच्यानजीक आलेला. तिच्या खांद्यावर त्याची मान.
कविता : क्योंकि मेरी आखे बडी और भुरी है.
अनिरुद्ध तिच्या डोळ्यांवरून बोटं फिरवतो.
कविता : मेरे बाल घने है,
अनिरुद्ध तिच्या केसांवरून हळुवार हात फिरवतो.
कविता : मेरे होठ... (एक अस्फुट हुंकार...) और मेरा रंग गोरा है.
.....
{ आता अनिरुद्ध त्याच्या दृष्टीने तिच्या सौंदर्याचं वर्णन करतो.
‘पता है कि तुम मुझे सुंदर क्यू लगती हो? क्योंकि तुम्हारे बदनकी, बालोकी
महक लुभावनी है. इसलिए तुम सुंदर हो, निशिगंधा के फुल की तरह... तुम्हारी
आवाज भावस्पर्शी है... सतार की झंकारकी तरह... और तुम्हारा स्पर्श बहोत
कोमल है... इसलिए तुम सुंदर हो मखमल की तरह... और इस सबसे ज्यादा
तुम्हारापन...
संपूर्ण भारल्यागत आवाजात कविता त्याला ‘बस... बस... बस...’ म्हणत थांबवते.
दोघेही एकमेकांत संपूर्ण. या दृश्यातच अनिरुद्धपणे मूर्तिमंत कविता साकारत असते.
स्त्री सौंदर्याचं समतोल-तत्व जणू दोघे मिळून साकारताहेत पंचेंद्रियांचे एकात्मीकरण साधून.
‘स्पर्श’ हा चित्रपट त्यातील बदणाऱ्या मनोवस्था एका सुंदर गाण्यानं
बांधल्या आहेत.कविता एकटेपणाच्या काळोखात असते तेव्हा तिचे गाणे असते -
खाली प्याला धुंधला दर्पन
खाली खाली मन...
आणि अनिरुद्ध बरोबरच्या, अंध विद्यालयात तिला ‘नवजीवन’ देणाऱ्या सहप्रवासात हे गाणे होऊन जाते -
प्याला छलका उजला दर्पन, प्याला छलका उजला दर्पन
जगमग मन आंगन जगमग मन आंगन
इंदू जैन यांच्या ओळींमधला हा पुनर-उच्चार, मन भरून टाकणारा हा प्रकाश
साऱ्या जगाबरोबर वाटून घ्यावा, या भावनेची पुनरुक्ती आहे. या प्रकाशात
अनिरुद्धचा अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती
आणि त्यागाच्या आवरणाखाली लपलेले तिचे प्रेम सूर्यफूलासारखे उमलण्याची
शक्ती आहे. पण या प्रकाशापर्यंत तिला आणि आणि अनिरुद्धलाही आणले आहे,
तिच्या सुरांनी-ध्वनीनं, म्हणूनच सौंदर्यशास्त्रज्ञ विदुषी सुसान लँगर
म्हणते, सर्व कलांना संगीत व्हायचं असतं...
- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com