Monday 21 November 2016

हम में है दम !

बॉलिवूड अभिनेत्रींचे सौन्दर्य नेहेमीच जगात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरही चाहत्यांबरोबरच समीक्षकांचीही करडी नजर असते. हॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या आणि तिथेही 'ब्युटी विद ब्रेन'ची प्रचिती घडवून आणणाऱ्या तीन बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवास दिपवणारा दिसत असला तरी त्यामागे किती संघर्ष आहे हे देखील जगजाहीर आहे. अश्‍याच गाजलेल्या या तीन घटना, याच वर्षी कान फिल्म फेस्टिवलला 'लॉरिएल' ची प्रतिनिधी म्हणून रेड कार्पेटवर आलेल्या ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक नेटिझन्सच्या टीकेचा विषय ठरला होता. प्रियंकाने व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामांबरोबर घेतलेले डिनर आणि हल्लीच हि सर्व चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याचे कारण म्हणजे 'एमटीव्ही एमा' अवॉर्डसाठी आलेल्या दीपिकाच्या ड्रेससिंग स्टाइलवरून पुन्हा एकदा जगभर तिच्यावर टीकेची लाट उठली आहे.

असं म्हणतात कलेला कोणतेही गाव नसते, देश, जाती धर्म, पंथ अशी कुठलीही चौकट त्यांना अडकवू शकत नाही. 'कला' हा कलाकाराचा एकच धर्म असतो, तीच त्याची जात आणि तो त्यात किती माहीर आहे त्यावरच त्याची श्रीमंतीही गणली जाते. म्हणूनच इतर देशातील कलाकार जसे आमच्या चित्रपटात येतात, झळकतात कधी टिकतात कधी गळतात. तसेच बॉलिवूड कलाकारांनाही हॉलीवूडला जाऊन दोन-चार चौकार षटकार लावून यायचे डोहाळे लागतात. तसे ते जातातही त्यांच्या अभिनय कौशल्याने चांगली कलाकृती घडवण्यात त्यांचे प्रामाणिक योगदानही देतात. हल्ली बॉलिवूड कलाकारांचे हॉलिवूड चित्रपटात झळकने प्रेक्षकांना फार अप्रूप राहिले नसले तरी एकेकाळी म्हणजेच काही वर्षांपूर्वीपर्यंत ते चांगल्या प्रतीच्या अभिनयाचे मापदंड म्हणून तसेच स्टेटस सिम्बॉल सारखे गणले जायचे. अश्‍या अभिनेत्यांची एक वेगळीच इमेज निर्माण व्हायची. तसे हॉलिवूडमध्ये प्रवेश करणे वाटते तितके सोपेही नव्हते ते आजही नाहीच. म्हणूनच बॉलिवूडमध्ये पाय रोवलेल्या आघाडीच्या कलाकारांनाही हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हॉलिवूडची पायरी चढणाऱ्या बॉलिवूड कलाकाराची यादी अजूनही फार मोठी नाही. नासिरुद्दीन शाह, अनुपम खेर, इरफान खान, अनिल कपूर अशी बोटावर मोजता येणारे अभिनेते तर मल्लिका शेरावत, हेमा कुरेशी, तब्बू या अभिनेत्री तेथील 70mm च्या पडद्याला तसे टेलिव्हिजनला निव्वळ स्पर्शच करू शकल्या आहेत.

'ब्राईड अँड प्रिज्युडीस' 'पिंक पॅंथर2' 'मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस' सारख्या सिनेमात काम करून ऐश्वर्याच्या हॉलिवूड प्रवेशानंतर आणि तिथे रुजल्या रुळल्यानंतर बऱ्याच काळाने प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड डेब्यूने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये 'क्वॉंटिको' या मालिकेत काम केले तसेच 'बेवॉच' सिनेमातही तिची प्रमुख भूमिका आहे. त्याहून अधिक वॉशिंग्टन डिसीमध्ये व्हाईट हाऊसच्या 'करसपॉंडंट डिनर'च्या निमित्ताने ती बराक दांम्पत्यांना भेटली हा विषय बराच काळ चर्चेत राहिला. याशिवायही ऑस्करसह विविध सोहळ्यांना प्रियांकाला आवर्जून आमंत्रित केले जाते. तिच्या पाठोपाठच आता दिपीकाही हॉलिवूडमध्ये प्रवेश करती झाली. दीपिका सध्या विन डिझेलसोबत 'XXX रिटर्न ऑफ झांडर केज' या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमेरिकेतील नामवंत मासिक व्हॅनिटी फेअरने 'हॉलिवूडस नेक्‍स्ट जनरेशन' ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा दीपिकाला दुसरा क्रमांक देण्यात आला होता. पण हल्लीच रोडरडॅम शहरातील 'एमटीव्ही एमा' सोहळ्यासाठी दीपिकाने मोनिषा जयसिंह आणि शालीना नथनी यांनी डिझाईन केलेला शिमरी ब्लॅक टॉप आणि सिल्क ग्रीन स्कर्ट परिधान केला होता. तिने तिचा ग्लॅमरस लूक जॅकेट आणि लांब, हिरव्या इअररिंग्जनी वाढवला होता. पण इंटरनॅशनल मीडिया डैली मेलने तिला 'बॉलिवूड ब्लॅडर' असे संबोधले आणि नेटिझन्सने देखील त्यावर टीका करून तिला ट्रोल केले.

ऐश्वर्या, प्रियांका आणि दीपिका या तिघीही तेथे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना पेलत खंबीरपणे यशाच्या चढत्या ग्राफवर स्वार आहेत. त्या पुढेही हॉलिवूडच्या बड्याबजेटच्या चित्रपटातून नामवंत निर्देशकांच्या मार्गदर्शनात स्वतःला निखारत गाजलेल्या कलाकारांबरोबर काम करतांना हॉलिवूडच्या पडद्यावर दिसणार आहेत. बॉलिवूडच्या सर्वात महागड्या या अभिनेत्रींना सातासमुद्रापार तिथे पाय रोवायला मात्र अनेक कसोटींना तोंड द्यावे लागणार आहे हे निश्‍चित.


(दैनिक सकाळच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)






No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...