Sunday, 24 April 2016

लाडका सोनचाफा ..

एकेक क्षण महत्वाचा असतो पण एखादा क्षण किती खास असतो ना ?


आज ऑफिस मध्ये मोठ्या बहिणीसारख्या असलेल्या एका जवळच्या मैत्रिणीने तिच्यासाठी नवऱ्याने मुंबईहून खास आणलेल्या फुलांतून माझ्यासाठी निवडून जपून आणलेला 'सोनचाफा' हातात दिला आणि काय सांगू काय वाटलं....

सोनचाफा .. अतिशय आवडतं फुल . म्हणतात हे स्वर्गीय फुल आहे. देवांच लाडकं… 
सोनचाफ्याशी काही आठवणी निगडीत आहेत. मुंबईच्या...
मला आठवतं, तशी सोनचाफ्याशी माझी ओळख फारशी नव्हतीच. त्याचं कारणही तसं होतं. नागपुरात हा फारसा दिसतंच नाही. चाफ्याचे सगळे प्रकार आढळतात पण सोनचाफा क़्वचितच दिसतो....तर मुंबईत सोनचाफ्याची ओळख तेव्हाच्या तिथल्या ऑफिसातल्या एका मैत्रिणीने दादरच्या स्वामींच्या देवळात दर्शनाला जातांना करून दिली आणि मी वेडावून प्रेमातच पडले. त्यानंतर जेव्हा जेव्हा सोनचाफा दिसला तो ओंजळीत भरून घेऊन तासंतास त्या सुगंधानं तल्लीन होऊन तादात्म पावत राहिले. सोनचाफा स्वामींच्या पायाशी वाहिल्यावरही हाताला त्याचा मंद सुगंध घट्ट धरून असायचा. त्या हातांना लाभलेला तो सात्विक स्पर्श अन जीव प्रसन्न करणारा सुगंध इतका हवाहवा वाटायचा कि त्यानंतर जेव्हा जेव्हा सोनचाफा विकत घेतला तो देणाऱ्या मावशीला कागदात किंवा पानात बांधून न देता हाताच्या ओंजळीतच मागितला. तो ओंजळीत घेऊन हळुवार हाताळायचा उरभरून सुगंध घेतांना चाफ्याला इजा होऊ नये हेही जपायचं, त्याचा सोनेरी ईश्वरी रंग उतरतांना, तो कोमेजतांना बघवणार नाही अन कचऱ्यातही टाकवणार नाही हे माहिती असल्यानेच नंतर तो स्वामींच्या पायाशी समर्पित करायचा. मी सोनचाफा अन स्वामी हे अगनिताचे गणित जुळत गेले. पुढे कित्तेक वर्ष सोनचाफ्याशी हे असं भावनिक नातं अधिक घट्ट होत गेलं.

मुंबई सोडली आणि चाफ्याशी भेट अशक्यप्रायच झाली. तरीही मी शोधत असायचे, मधल्या काळात एका पानावरील लेखासंबंधी माहिती हवी म्हणून लीलाताई चितळेंना भेटायला गेले. त्यांच्या अंगणात असलेले कुठलेसे अनोळखी अतिशय सुंदर फुलांचे प्रचंड मोठे झाड पाहिले. अंगणात फुलांची पखरण आणि वातावरणात भारलेला मंद सुगंध. पुन्हा सोनचाफ्याची आठवण ताजी करून गेला. त्या झाडाबद्दल विचारले आणि लीलाताईही भूतकाळात रमत उत्साहात सांगू लागल्या, गोड योगायोग म्हणजे या झाडाच्या जन्माच्या कहाणीत सोनचाफ्याशी संबंध होताच हे विशेष. लीलाताईंनी हे झाड मुंबईहून 'सोनचाफा' समजूनच आणले होते. सोनचाफा समजूनच जपले-जगवले. झाड मोठे झाल्यावर पहिले फुल आले तेव्हा कळाले हा सोनचाफा नाही. फुलाच्या आत पराग असतात तिथे छोटी महादेवाची पिंड असावी तसा आकार अन वरून शेषनाग असतो तश्या पाकळ्या असणारे हे अतिशय सुंदर दिसणारे पांढरे गुलाबी फुल होते. मी माहिती काढली तेव्हा कळाले ते कैलासपती उर्फ कॅननबॉल होते. सोनचाफ्याहून सुंदर सुगंधी. पण ..... पण सोनचाफा नव्हताच.




















तर असे अनेक वर्षात न भेटलेला सोनचाफा माझा किती लाड्का आहे हे जाणल्यावर आपल्या एखाद्या मैत्रिणीने ते लक्षात ठेवून विशेष मिळालेल्या भेटीतून न विसरता निवडून जपून आपल्यासाठी आणावा .. अन ते बघून आपल्या आनंदात आनंद मानावा हे असे क्षण अन हि अशी माणसं नशिबानेच भेटतात.. नाही??

 स्वाती ताई यासाठी मी आभार मानणार नाही. हे गोड सुगंधी ऋण असू दे माझ्यावर कायम.

का क्षणाला हजारो पानं फुटण्यापेक्षा
एकेका पानानं हजारो क्षण जगावेत
पण प्रत्येक क्षण निखळ असावा.....फक्त त्याचा तोच
मग त्याच्याशी नातं सहज जुळतं...
क्षणाचं...जगण्याचं....क्षणाच्या जगण्याचं.....जगण्याच्या क्षणाचं.....
मग सुंदर असणं होत जातं.



रश्मी
२२ एप्रिल १६

Thursday, 21 April 2016

झंझावती नेत्या तृप्ती ताई देसाई ह्यांना खुले पत्र

 झुंझार प्रवृत्तीच्या, अथक परिश्रमी, सळसळत्या रक्ताच्या, तळमळीच्या समाजसेविका, लढवैय्या, आक्रमक आंदोलनकर्त्या, जगतजननी- जगन्माता कळकळीच्या महिला कार्यकर्ता ...अर्रर्र नाही नाही (नुकतच) पुढारलेल्या झंझावती नेत्या तृप्ती ताई देसाई ह्यांना खुले पत्र

बाई गं  ... महादेवाने तिसरा डोळा उघडावा तसे अचानक तुझे डोळे उघडले अन तुझ्यातली दुर्गा जागृत झाली. धार्मिक स्थळांतून महिलांवर होणारे अत्याचार तुला आजच दिसू लागले आणि तू मां कालीचे रौद्ररूप धारण केले. शनीच्या चौथऱ्यापर्यंत ठीक होते गं, आम्ही नाही तर नाही तू दर्शन घेतलेस याचाही आनंद कमी नव्हता. पण तू एक एक पाउल उचलत पुढे पुढे जाते आहेस आज मंदिर उद्या मस्जिद जणू धार्मिक स्थळी दर्शन घेणे हे एकमेव ध्येय एकमेव स्वप्न स्त्रियांच्या लेखी उरलंय हे त्यांच्यावतीनेही तुझ तूच ठरवून मोकळी झालीयेस. बायो ! स्त्रियांनी स्त्रीवादी असावं माजुरडी हट्टवादी झालोत तर ते स्त्रीला शोभणारं नाही. स्त्री म्हणून स्त्रीने हळवेपण, ममत्व, नम्रपण जपलच पाहिजे. स्त्रीचे शाश्वत गुण आहेत ते. तेच गमावले तर कसली स्त्री आणि कसला स्त्रीवाद मग. आपण आपले हक्क आपले स्त्रीपण आपले शाश्वत संस्कार अबाधित राखूनच मिळवायला हवे. अर्थात हे सर्व स्त्री म्हणूनच विचार केला तर राजकारण असेल तर मात्र गटारातच उतरावं लागतं हे कबूल आहे. 

पण मग तू जे काही करते आहेस ते संपूर्ण देशभरातल्या महिलांची हीच मागणी आहे आणि एवढीच गरज आहे या अविर्भावात वागू नकोस. तुझ्या वागण्याचे पडसाद सर्व महिला वर्गाच्या जगण्यावर पडताहेत हेही विसरू नकोस. विशेष म्हणजे महिलांना काहीच करू दिले जात नाही सगळं पुरुषच करतात असा आव तर अज्जीबतच आणू नकोस. हक्क मागण्याच्या बहाण्याने त्यांचा व्यापच तू वाढवते आहेस लक्षात ठेव. शिक्षणाने स्त्रीला मानसिकदृष्ट्या सक्षम केले आता आता कुठे ती परंपरेच्या सो कॉल्ड चौकटी मोडून तर्काधिष्ठित विचारांवर ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न करते आहे. बुरसटलेल्या विचारांच्या कडा मोडण्यासाठी अजूनही संघर्ष करते आहे. जिथून तिला बाहेरच पडायला हव तिथे तू तिला आणखी आत ओढते आहेस. सारया संसाराचा भार तिच्यावर असतो घरचे-बाहेरचे.नौकरी, गणगोत, मुलाचं शिक्षण, नवऱ्याची प्रगती सगळं बघता बघता तिच्याकडे वेळ कितीसा उरतो? या साऱ्यांना प्राधान्य देतांना स्वतःच्या आवडी निवडी कलागुण जपणे तरी शक्य होते का? जबाबदाऱ्या निभावतांना अनेकदा प्रगतीच्या संधींकडे निग्रहाने ती पाठ फिरवीते . किंबहुना स्वतःकडे दुय्यम स्थान घेते .स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करते. त्यात तू तिला आणखी मंदिराच्या, मास्जीदिच्या चव्हाट्यावर ओढू पाहते आहेस ..कशाला तिचे धिंडवडे काढतेस.

कामातला वेळ काढून मंदिर दर्शन देवपूजा वगैरे हे एक काम तरी पुरुषांकडे राहू दे कि, सगळं काय स्त्रियांनीच करायचं. झालच तर आणखी काही बाबी पुरुषांकडे ढकलता येतात का बघ?? आम्ही का करू नये हा काय प्रश्न झाला ?? आम्हीच का ?? असा काहीतरी मुद्दा आमच्या वतीने उचल. सकाळचा स्वयंपाक महिला तर रात्रीचापण मीच का ?? मुलांचे संगोपन, त्याचं आरोग्य मी सांभाळतेय तर अभ्यास आरोग्याची जबाबदारीही सांभाळायची मीच का ? अस काहीतरी कर. तेही नाही जमलं तरी चालेल हो एकदा पण निदान देवाच्या नावाने धर्माच्या नावाने बिनकामाचा व्याप मात्र वाढवू नकोस.

एवढंच 

Thursday, 14 April 2016

पिठाचा डबा



खाडकन झोपडीचे दार वाजले. सुंता सनसनतच आत शिरली. रम्या डोळे चोळत उठून बसला.

चुलीजवळ जाउन बसलेल्या मायला म्हणाला,

'कशी व तू? सकायपासून गेली मले एकट्याले टाकून, कै खायलेबी करून न्हाई ठिवलं, केवढी भूक लागली मले...मरतो का काय वाटे"

सुंता गप्पच होती. मनात काहीतरी भयान जाळ पेटला होता,जवळची चूल मात्र निवांत थंड पडली होती.

रमेसची भुकेने कासावीस झालेली बडबड चालूच होती.

ती चुलीजवळचा डब्बा हुसकू लागली. पिठाच्या डब्याला काठाशी लागलेलं पीठ काढायला म्हणून डबा जमिनीवर आपटू लागली हाताने खरडून खरडून पीठ पडते का पाहू लागली.

"काई बी नाई ना वो त्या भगोण्यात..डाळ-भात कर, मले पोटभर जेवाले पायजे वो माय काल रात्च्याले बी तूनं पिठाचं पाणी प्याले देल्तं तवा पासून कायबि खाल्ल नाई, पोट तोडून रायल मायवाल'' रम्या


सुंता तशीच उठली पिशवी उचलली अन बाहेर जायला निघाली तसाच ७ वर्षाच्या रमेशन तिचा पदर धरला.

'माय पयले जेवाले दे ना वो, तू जाशीन मंग कवा येशीन पत्ता नाई तवापरंत म्या कसा राऊ वं .. लई भूक लागली व माय ??"


सुंता रागानं डाफरली त्याच्या कानाखाली सटकन दिली. पहिले एक मग दुसरी ..

"मसण्या, मले खा भूक लागली तं, अर्धी त त्या भडव्या कंत्राटान खाल्ली रोज थोडी थोडी.. तीन दिसापासून त्याच्या समोर गोधडीवाणी बिछली लक्तर तोडले माहे त्यानं, त्याउपर राब राब राबून काम बी करून घेत्लन पण तरीबी माही रोजंदारी नाई देल्ली कुत्र्यानं. मजा नाई आली म्हने त्या भाडखाऊले. ...बाकी अर्धी तुह्या बापानं खाल्ली दारूसाठी..रोज खाऊ रायला, आन तरीबी काही उरली आसन त खाउन घे तू बी. तितकी बी कायले शिल्लक ठीवता संपवून तरी टाक ना यक्दाची, माह्या मागची लगलग तरी संपन" म्हणून तिने पायानेच झटका दिला. लेकरू गोधडीवर जाउन पडलं हुंदके देऊ देऊ रडू लागलं.

सुंतान पिशवी भिरकावली दूर अन गप्पकन खाली बसली. दोन पायात मुंडक घालून हमसून हमसून रडू लागली.


थोडा वेळ गेला असेल .. कोवळा नाजूक हात तिच्या डोक्यावरून फिरायला लागला.

" माय रडू नगस, गेली माही भूक पाय, खरच माय गेली माही भूक'' हुंदके देऊन म्हणू लागला.


मायनं ओढून त्याला कुशीत घेतलं. त्याचे दोन पापे घेतले. उठली अन निर्धारानं लगबगीनं चुलीजवळचा उरलेला एकुलता पिठाचा डबा पिशवीत घातला अन......

डबा विकून लेकरासाठी काय काय आनायचं विचार करतच पदराने डोळे पुसत बाहेर पडली.


रश्मी
१४/०४/२०१६

Monday, 4 April 2016

स्वसंवाद 

प्रिय स्व 

लक्षात आलंय बघ माझ्या, सगळं कस ना विरोधाभासी असतं माणसाचं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या गोष्टीतून, एखाद्या विचारापासून स्वतःला दूर करून घेण्याचा, विसरण्याचा त्यातून बाहेर पडण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत असतो ना तेव्हा जरा जास्तच अडकले जातो, आत आणखी आत ओढले जातो. नको नको म्हंटले कि त्याच गोष्टींसाठी आसुसतं मन. जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकेच जवळ खेचले जातो. जवळच्या गोष्टींच अप्रूप नसतं अन अख्त्यारीबाहेरील गोष्टींची ओढ लागून राहते. काहीतरी मिळत नाही तोपर्यंत असोशी असते अन मिळाले कि किंमत राहत नाही. जवळची माणसं जवळची वाटत नाहीत आणि जवळ नसणारी खुणावत असतात. वर्तमानात जगता येत नाही आणि भविष्याच्या स्वप्नातले मनोरे बांधत बसतं ..असं कसं ना ?? 
 हे मन नावाचं चाप्टर लैच चाप्टर असतं बघ.     

तुझीच स्व ..

Friday, 1 April 2016

स्वगत (प्रवाह)



प्रिय स्व

प्रवाहाच्या उलट दिशेने पोहायला आवडतं आपल्याला, आपले स्वतःचे तत्व आहेत, जीवनाविषयी वेगळे असे मत आहे. आणि जगण्याची पद्धतही आहेच पण मग हि आपलीच आवड आणि आपलीच निवड हे सोयीस्कर पणे विसरतो आपण ? उलट दिशेने प्रवास म्हणजे मग वाहत्या प्रवाहाच्या गतीचा सामना करायलाच लागणार ना ... वाटेत येणारा कचरा,गोटे, काचा आपल्यालाच येऊन अडकणार, आपल्यावरच मारा करणार हे गृहीतच धरलेले नसते....आणि चिडचिड होते. म्हणजे मी प्रवाहाच्या विरुध्द पण जाणार आणि गोष्टी माझ्या मर्जीने पण घडाव्या अशा अशक्य अपेक्षा घेऊन चालतोय का आपण ? आपल्या सोयीने आणि आपल्या नियमानुसार चालण्याच्या स्वभावामुळे प्रवासातले भले बुरे अनुभव हि आपली जबाबदारी असते त्याचा दोष प्रवाहाच्या, आणि प्रवाहात स्वतःला सामावून घेऊन मार्गी चालत जाणाऱ्या इतर गोष्टींच्या माथी मारण्यात अर्थ नसतो. हे ध्यानात ठेव आणि पुढे उधे चालत राहा. पुढे शंख शिंपले झालेच तर मोतीही मिळतील आणि नाहीही मिळाले तरी अपनी धून में चलने का मजा तो कुछ और है ही. नै का ??

तो चलते चलो ...




तुझीच स्व

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...