आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला
सुटला, आणि पुढ्यात येउन बसला
म्हंटला …
काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने
त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ??
तुही घे विश्रांती एकाच क्षणाची
होऊन दे जरा शांती मनाची
क्षण हा क्षणाने वाहून जाईल
क्षणभर जरी विसावून जाईल
दुसऱ्याच क्षणात शिरशील तू
वेडे, मला विसरशील तू
नव्याने पुन्हा जगायला शिक
विसरून मला जगाला जिंक
बघेन तुला याच धर्तीवर
यशवान होतांना कीर्तीवर
मी हळहळले, मुसमुसले
हात धरून क्षणाला... म्हणाले
क्षणा
आयुष्य क्षणांनी जगतेय मी
सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी
क्षणात सारे विखरून जाईन
तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन
क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे
जगण्याचं गणित मांडणार आहे.
आयुष्याचा क्षणही भागला तरी
जगणंच माझं थांबणार आहे .
(c) रश्मी / ५ जून २०१४
(प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)
No comments:
Post a Comment