लव जिहाद -
मागल्या काही महिन्यांपासून प्रचंड उहापोह होणारा विषय चावून चावून चोथा झालेला पण अजूनही चर्वित चर्वण सुरूच असलेला. चर्चा, वाद, संवाद आणि काय काय पण अजूनही विषयाला खरा संदर्भ न लाभलेला गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलं आणि सर्व देशात जरथंड झालेल्या धार्मिक चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. पण प्रश्न निर्माण होतो तो हा कि कुठून पेव फुटलं या विषयाला आणि किती सत्यता आहे त्यात ?
ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि गट यात सामील असल्याचे निदर्शनात आले तसेच ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सॉफ्ट टार्गेट ठरतात . त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. …. यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्तानी पुरुषांचे आकर्षण हा खरा मुद्दा नहिये. बहुतेक शाळकरी मुली विस्कळीत कुटुंबातून आलेल्या, सिगारेट, ड्रग्स आणि दारूच्या व्यसनाधीन असलेल्या अशा आहेत. तिथल्या संस्कृतीचा तो एक भाग आहे परंतु त्याचा परिणाम म्हणजे पैशांसाठी, एका दारूच्या बाटलीसाठी यातील कोणाही बरोबर त्या जात असत. हे प्रकरण गंभीर होऊ लागले तसे प्रशासन जागे झाले. यावर सखोल चौकशी झाली आणि समोर आलेले वास्तव कल्पनेपेक्षा भयानक असल्याचे जाणवले. अगदी पद्धतशीरपणे आधी एका बॉयफ्रेंड शी संबंध आणि त्यातून पुढे त्यान्चे लैंगिक शोषण अशी साखळी. पाकिस्तानी पुरुष गोऱ्या मुलींना कस्पटासमान लेखून त्यांचे शोषण केल्याच्या संघटीत घटना शंभर टक्के खऱ्या होत्या. स्त्रिया - मुली त्याही दुसऱ्या समाजाच्या ह्या उपभोग्य आणि दासीसमान हा टोळीकाळचा समज आणि स्वभाव बदललेला दिसत नाही . मिद्लंड आणि एकूणच ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या अश्या घटनेला उग्र स्वरूप प्राप्त झाले इथल्या शासनाने दखल घ्यायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरु आहे. ऑक्सफर्ड प्रकरणातल्या १३ जणांना शिक्षा झाली. जिथे जिथे या घटना घडल्या तिथल्या पोलिस आणि child protection मधील उच्च अधिकारी बडतर्फ केले गेले. याबरोबरच सामाजिक पातळीवर अजूनही प्रयत्न चालू आहेत. या विषयाला खरी वाचा फुटली ती इथूनच.
भारतात लव जिहादची पहिली लाट उसळली ती केरळात. एकूण ६००० मुली गायब झाल्याची बातमी होती. सुब्रम्हणीयन स्वामीच्या भाषणातील संदर्भ खरे मानल्यास २००८-०९ मध्ये केरळ न्यायालयात स्थानीक हिंदुत्ववाद्यानी धाव घेतली. न्यायालयाने लव जिहाद प्रकरण खरच असते का याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मल्याळी पोलिसांनी जिवाचे रान करत शोधमोहीम व तपास यंत्रणा राबवीली. सरते शेवटी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली कागद पत्रे हेच सांगतात की हे लव जिहाद निव्वळ अफवा असून हिंदुत्ववाद्यांनी संगठना बळकट करण्यासाठी वापरलेले एक तंत्र आहे. ‘दि व्हॉईस फॉर जस्टिस’ या चेन्नईस्थित मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणार्या अ-राजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने केरळमधील हिंदू घरातील मुली गायब होण्याच्या घटनांवर आधारित बातम्या, जन्मभूमी तसेच मल्याळम मनोरमा या प्रतिष्ठित नियतकालिकात वारंवार प्रकाशित झाल्यानंतर या बातम्यांच्या आधारे ‘लव जिहाद’चा अभ्यास करायचे ठरवले. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ने या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या समिती मधे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या 7 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा प्रा. सुवर्णा रावळ यांचा समावेश होता. आंतरारष्ट्रीय पातळीवर मुलींच्या Human Trafficking मध्ये दरवर्षी भारतातून पुरवठा होणाऱ्या मुलींची संख्या वाढतच आहे हि अतिशय गंभीर समस्या असूनही ते समजून घ्यायला, नियंत्रण घालायला ना तर आपल्याकडे पुरेसे कायदे, ना यंत्रणा.
लव जिहादची आवई उठविणाऱ्या काही संस्था कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे नाकारता येत नाही. नुकतंच कर्नाटक पोलिसानी त्यांचा अहवाल सादर करत लव जिहाद प्रकरण सपशेल फेटाळले आहे. पण त्याच बरोबर कर्नाटक पोलिसांनी हे सुद्धा मान्य केले की मागच्या पाच वर्षात २३० हिंदू मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तपासाअंती यातल्या १५० मुलींनी धर्म बदलवून मुस्लीमांशी लग्न केल्याचे आढळले. पण वरील विवाह निव्वळ प्रेम विवाह असून त्याचा लव जिहादशी कोणताही संबंध नाहि. पण हिंदुत्ववादी मात्र याच आकड्यांकडे बोट दाखवत "हा बघा लव जिहाद" अशी अरोळी फोडतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पण तरीही अजूनही विचार पडतो हिंसा आणि नकारात्मक घटनांचा प्रवाह कधी कधी एखाद्या विशिष्ट समाजाकडून होत असलेला का दिसत असावा कि तशी निव्वळ आरोळी ठोकली जाते हा अभ्यासाचा विषय असला तरी त्यामागे काही करणे असू शकतात. दक्षिण आशियायी समाजात एकूणच स्त्रिया आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. दहा बारा वर्षात आर्थिक प्रगतीसाठी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी तरुण असलेला हा वर्ग आणि या आधी वसलेला आता ५०-६० त असलेला, दुसऱ्या महायुद्धानंतर कामगार म्हणून आलेली आधीची पिढी यात कमालीचे अंतर आहे. कौटुंबिक हिंसा आणि वाढता धार्मिक कट्टरपणा ही सर्वच समाजात - श्रीलंकन, भारतीय ( पंजाबी, गुजराती, दक्षिणात्य ), पाकिस्तानी आणि बांगलादेशी समाजात पाहायला मिळतो .आणि इस्लामिक मुलतत्ववादाला तर एक जागतिक परिमाण आहे आणि त्याचे प्रतिबिंब इथल्या कट्टर मुस्लिम समाजात प्रकर्षाने दिसते.
समस्या अनेक आहेत विशेषतः होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मागल्या काही वर्षात सर्वच भागात सर्वच समाजात वाढल्या असल्याचे आता दृष्य स्वरुपात जाणवू लागले आहे. बलात्कार, स्त्री भृणहत्या आणि आता लव जिहाद इतकंच नाहीतर हरवणाऱ्या, बेपत्ता होणाऱ्या मुलींमधील निम्म्याच्यावर मुली वेश्याव्यवसायात विकल्या जातात. पुढे त्यांचे काय होते हे तर पूर्ण वेगळंच प्रकरण ठरेल. प्रश्न नुसत्याच लव जिहाद चा नाहीच आहे समस्या अनेक आहेत आणि त्या धर्मांच्या वेष्टणाने झाकून चालणाऱ्या सुद्धा नाहीयेत. आजही आणि अजूनही भारतात ग्रामीण किंवा शहरी भागात आपापल्या जात पंचायती आणि समुदाय यांची अगदी घट्ट पकड लग्न आणि नातेसंबंधांवर आहे. त्यामुळे मुलगी किंवा बाई कुटुंब आणि त्या पलीकडे त्या त्या समुदायाची संपत्ती असेच समजले जाते. ज्यांनी कुणी या जाती -पातीच्या कुंपणापलीकडे जावून आपापले लग्न किंवा नात्याचे निर्णय घेतले त्यांना थोड्या फार प्रमाणावर समाजाचा रोष स्वीकारावाच लागतो, त्यांच्या कुटुंबीयांनातर अनेक काळ अनेक प्रकारचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष छळ सोसावे लागतात. जात, उपजात, पोटजात असे सर्व धर्मात आहेत आणि अगदी हिरीरीने आपापल्या समाजातल्या मुलींच्या फक्त रक्षणाच्या नावाखाली त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात. समस्या धर्म, जातीपातीचा पण नाहीये. त्यातले नीतीनियम अक्षरशः स्त्रियांवर लादल्या जातात हा सुद्धा नाही आहे. प्रश्न स्त्रिया आणि मुलींच्या स्वातंत्र्याचा मुख्यत: निर्णय स्वातंत्र्याचा आहे. प्रश्न मुळातच पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांना समुदायाची संपत्ती मानण्याचा आहे. स्त्री, मुलगी म्हणून ती स्वतः तिचे निर्णय घेऊ शकते, किंवा तसे करण्यासाठी तिने सक्षम व्हावे - ही मान्यता गेल्या ३०-३५ वर्षात मुख्यत: मध्यमवर्गीय, शिक्षित समाजात दिसून येत असली तरी अजूनही स्वतंत्रपणे आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य ही आपल्या धर्म आणि समुदायाच्या कक्षेतच कुंपणाच्या आत आणि जे कोणी या पलीकडे जाउन आपले जोडीदार निवडतात तिथेही नवऱ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक रितीरिवाजांचा प्रभाव दैनदिन जीवनात स्त्रियांना स्वीकारावा लागतो.
हो बदल हवेतच कठोर का होईना बदल हवेत समाजाच्या बदलत चाललेल्या धार्मिक संकल्पनेच्या बदलाखातर बदल हवेत. त्यासाठी आधी सर्वांचे एकमत होणे गरजेचे आहे. हे विचार काल्पनिक वाटत असले तरी निदान प्रयत्न करता येऊ शकतातच ना. जात धर्म, स्त्री पुरुष आणि अनेक भेदाभेद सोडून नको त्या गोष्टींचा नसता अभिमान सोडून राष्ट्रीयता राष्ट्रप्रेम जागृत होणे आता काळाची गरज आहे.
(टीप : प्रस्तुत लेख दैनिक सकाळ च्या फास्टट्रॅक पानावर प्रकाशित झाला आहे )
No comments:
Post a Comment