माणूस हा फार चक्रम प्राणी आहे.. प्रत्येक मानवी प्रवृत्ती गुणदोषांनी भरलेली असते हे तो मान्य करतो. आपल्या माणसांना गुण-दोषांसह स्वीकारावे हेही पटवून देतो, स्वतःला मात्र कधीच जोखायला जात नाही, किंवा स्वतःच्या बाबतीत माणूस अत्यंत सहिष्णू वगैरे असतो आणि इतरांकडूनही त्याची तशीच वागण्याची अपेक्षा असते. ..मात्र वास्तवात इतरांकडे पाहताना स्वतःचा दृष्टिकोन मात्र अत्यंत एकसुरी राखतो. दुसऱ्यांकडे पाहतांना तो प्रचंड जजमेंटल वगैरे होतो. पुढला एकतर अगदीच देव हवा असतो किंवा टोकाचा दानव. आपण कितीही प्रगल्भ झालो तरी आपण हे मान्य करायला तयारच नसतो की, माणूस चांगला का वाईट हे आपण कधीच ठरवू शकत नाही. माणूस ज्या वेळी जसा वागतो ते त्या त्यावेळी घडणाऱ्या परिस्थितीमुळे ..आणि परिस्थितीमुळे माणूस जसा वागतो तो तसा असतोच असे नाही ...ते वागणे तात्पुरते असते तेवढ्या परिस्थितीपुरते. आपण नेहमी फक्त माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा.
आल्फ्रेड हिचकॉकच्या एका चित्रपटात एक दृश्य होतं ज्यात एक मवाली एका पादचाऱ्याच्या खिशातल्या तुटपुंज्या पैशांसाठी त्याचा निर्घृण खून करतो, त्याच्या अंगावरल्या, खिशातल्या वस्तू ओरबाडून घेऊन शांत चालू लागतो......पुढे गेल्यावर त्याला एक आंधळी म्हातारी कशी बशी रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात दिसते..तर धावत जाऊन तो तिला रस्ता क्रॉस करायला मदत करतो. हे सगळं अवघ्या पाच मिनिटात घडतं आणि हे सगळं पाहणारा लांबवर उभा असलेला सिनेमातला माणूस किंवा आपण प्रेक्षकही बुचकळ्यात पडतो की यातला नेमका खरा माणूस कोणता?? खून करणारा की म्हातारीला मदत करणारा??
रॉबिनहूड नावाचं एक मिथ आहे... श्रीमंतांकडून संपत्ती लुटून ती गरीबांमध्ये वितरण करणारा एक लोकप्रिय लोकनायक म्हणजे रॉबिनहूड. या संकल्पनेवर जगभरातील सगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवले गेले. असे ऐकिवात आहे कि एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन असणाऱ्या हाजी मस्तानीची रॉबिनहूड सारखी प्रतिमा होती. श्रीमंत, व्यावसायिक, बॉलिवूड कलावंतांमध्ये त्याची दहशत होती. अनेक असंवैधानिक अन्यायी कामे तो करीत होता म्हणून एका वर्गासाठी गुन्हेगार आणि क्रूर होता.. मात्र त्या शहरातील गरिबांसाठी मात्र तो एक देवच होता..दोन्ही बाजू नीट अभ्यासला कि हा व्यक्ती नेमका होता कोण ? ह्यास व्हिलन म्हणावे का हिरो हा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो. प्रत्येक माणसांत चांगल्या आणि वाईट गोष्टी वास करून असतात. कोणत्या वेळी कोणती गोष्ट बाहेर पडेल आणि दर्शन देईल हे सांगणे मुश्कील आहे. इतरांचे राहो बाजूला ... ज्याचे त्याला देखील हे नक्की सांगता येणार नाही... त्यामुळेच फक्त एखाद्या कृतिवरून व्यक्ति जोखणे चुकीचे ठरते.. पण मानवी स्वभाव असा आहे की आपण वाईट गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतो आणि एखाद्या व्यक्तिची एखादी वाईट कृति त्याच्या आधीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी धुळीस मिळवते आणि आपण त्या व्यक्तिला वाईट किंवा चुकीचे संबोधू लागतो ..
खरतर परिस्थितीला दोष देऊन केलेल्या किंवा करीत असलेल्या चुकीच्या क्रियेचे समर्थन नाहीये हे. परिस्थिती म्हणजे दारू नव्हे जिच्या आहारी जाऊन माणूस विपरीत कृती करतो. दोन्ही ठिकाणी हे क्षम्य नाही. कृती माणूस करतो आणि दोष परिस्थितीला? संधी माणूस घालवतो आणि दोष नशीबाला? खरतर हे असे व्हायला नको .. वारंवार घटना घडत असतील तर ती प्रवृत्तीच आहे असे म्हणता येईल, परिस्थितीला बळी पडणारा पण माणूस आणि परिस्थिती निर्माण करणारा पण माणूसच, एक उदाहरण आठवत, महाभारताच्या युद्धात ज्या वेळी 'अश्वत्थामा' नावाचा हत्ती मारला जातो आणि द्रोणांची युधिष्ठिराला विचारणा होते की, 'अश्वत्थामा मृत्युमुखी पडलाय हे खरे आहे का?' तेंव्हा नेहमी सत्य बोलणारा म्हणून प्रचिती असणारा धर्मराज युधिष्टिर 'हो' असेच म्हणतो, नंतर तो 'नरो वा कुंजरो वा' असे पुटपुटतो अशी कथा आहे... वास्तविक ज्यांच्या सोबत कृष्ण-सखा, सारथी आणि मार्गदर्शक होता त्यांचा विजय अटळ होता ... तरीही परिस्थितीला वश होऊन खोटे बोलण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तरी ही अशी बुद्धी व्हावी हे कशाचे लक्षण आहे? ..... ... हे परिस्थितीला शरण जाणेच नव्हे का? खरतर असेही होता काम नये.
एकाच्या परिस्थितीला दुसरा माणूस कारण ठरतो आणि हे कारण ठरण्यामागे सुद्धा कुठलीतरी परिस्थिती कारणीभूत ठरलेली असते, प्रत्येकवेळी परिस्थितीला दोष देत बसणे बरे नसले तरी कधीतरी हातून घडून गेलेल्या भल्या-बुऱ्या गोष्टी समजून घेता येतातच.. माफही करता येतात. पण यामागे त्या व्यक्तीला झालेल्या चुकीची जाणीव असणे आणि त्यातून हेतुपुरस्सर प्रयत्नपूर्वक बाहेर पडण्याची इच्छाशक्ती मात्र असायला हवी असते. कारण परिस्थिती ही अनेक कारणांची परिणती असते. ती अचानक वरुन पडत नाही किंवा अचानक निर्माण होत नाही. माणूस आपल्या कर्माने त्यात ओढला जातो, बाहेर यायची किल्ली मात्र त्याच्याकडेच असते... ती त्याने प्रयत्नपूर्वक वापरायला मात्र हवी असते.
- रश्मी पदवाड मदनकर