Wednesday, 8 January 2020

मरणाची ''पाळी'' ..



पापी पोटाचा प्रश्न फार मोठा असतो, इतका मोठा कि जन्मभर पाठ सोडत नाही. टीचभर पोट भरायला माणूस आयुष्यभर खस्ता खातो पोट भरत राहावं म्हणून अक्ख्या शरीराचीच हेळसांड करीत राहतो. त्यात ती स्त्री असेल आणि कुटुंबातल्या चार माणसांची, लेकराबाळांची पोटं भरण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल तर जीवाचे हाल विचारूच नका. घरातल्या चिल्यापिल्यांचे पोट भरायला कधी ती उपाशी राहते, एका कापडावर महिने काढते, हाताला येईल ती कामं करते आणि वेळ आलीच तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोटच्या गोळ्याला पोसायला पोटचा एखादा हिस्साच कापून फेकून देते.


योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या आठवड्यात देशभर साजरी केली गेली. स्वतः हाल-अपेष्टा साहून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून रीती-परंपरेच्या पार प्रस्थापित सामाजिक अन्यायी रूढींना नाकारत स्वयंसिद्ध होण्याचा धडा त्या माउलीने दिला होता.. दुसरीकडे त्याच आठवड्यात मराठवाड्यातील ३००० ऊस कामगार स्त्रियांनी पाळीच्या दिवसात रोजगार मिळत राहावा म्हणून अल्पवयात गर्भाशयच काढून टाकले या खळबळजनक बातमीने पुन्हा उचल खाल्ली.... ही काय अवस्था आहे ना, भारत जगात महासत्ता बनायला निघाला आहे.. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो परंतु आजही महिलेला तिच्या शरीरापलीकडे माणूस म्हणून पाहून तिच्याच कष्टाचं मोल द्यायला कचरतो, भेदभाव करतो, तिचं लैंगिक शोषण होतं, तिच्या आरोग्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी एक अक्ख राष्ट्र मिळूनही सुरक्षित व्यवस्था निर्माण करू शकत नाही ही अत्यंत लाजिरवाणी, दुःखद बाब नाहीये का ? या प्रश्नावर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री नितीन राऊत यांनी २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिले आणि गेली अनेक महिने काळाच्या अंधारात गुडूप झालेला हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.


मराठवाड्यातील काही जिल्हे अतिदुर्गम आहेत, रोजगार मिळवण्यासाठी या भागातील लोक अनेकदा स्थलांतर करतात. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात त्यांना मागणी असते. ऊस तोडणीचा ऑक्टोबर ते मार्च असा सहा महिन्याचा हंगाम या प्रांतातील मुख्य रोजगाराचे साधन आहे. दसऱ्यानंतरच्या काळात ऊस तोडणीच्या कामावर लाखो मजूर लागलेले असतात. नवरा-बायको दोघांनाही जोडीने काम करावे लागते ह्या दाम्पत्य जोडीला कोयता असे म्हणतात, २२८ रुपये टन याप्रमाणे त्यांना ऊस तोडणीचे पैसे दिले जातात... जास्तीत जास्त टन ऊसतोडणी होऊन जास्त रोजगार मिळवण्यासाठी प्रत्येक जोडी जिवतोडून काम करीत असते. कारण या हंगामात होणारी कमाई हीच त्यांची वर्षभराची कमाई असते. यात बाईचा खाडा झाला कि एकट्या पुरुषाला काम मिळत नाही त्यामुळे दोघांचीही रोजी बुडते. खाडा होण्याचे मुख्य कारण मासिक पाळी हे असते. पाळी आली कामावर येऊ नका असे मुकादम सांगतो.. दर महिन्याला हे परवडण्यासारखे नाही म्हणून या महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबांनीच यावर तोडगा शोधून काढला. गर्भाशयच काढून टाकण्याचा तोडगा. आता गर्भाशयच नसणाऱ्या बायकांना मुकादम खास शोधून कामावर ठेवू लागला आणि काम मिळवण्याच्या गरजेपोटी अधिकाधिक महिला त्यांच्या शरीराचे मुख्य अंगच म्हणजे गर्भाशय काढून टाकू लागल्या. गेली काही वर्ष हे महिलांच्या बाबतीत हे दृष्ट चक्रच बनत गेलं आहे. ठराविक वेळेत काम पूर्ण करून देणे गरजेचे असते म्हणून कामगारांची टोळीही पाळी येणाऱ्या महिलांना स्वीकारत नाही. या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेऊन नाईलाजास्तव कुटुंबाला हा निर्णय घ्यावा लागतो. गर्भाशय काढून टाकण्यासाठी लागणारे पैसे पुन्हा मुकादम कडूनच आगाऊ घेतली जातात आणि नंतर जास्तीचे काम करवून घेऊन ते वसूल केले जाते. फक्त हीच समस्या आहे असे नव्हे घरदार सोडून रोजंदारीवर आलेल्या या स्त्रिया उघड्यावरच झोपड्या, टेन्ट बांधून राहतात ह्यांच्या सुरक्षेबाबत, आरोग्याबाबत काळजी घेणारी कोणतीही यंत्रणा कोणतीही सोय नसल्याने २० ते ४० वर्षे वय असणाऱ्या या तरुण महिलांमध्ये आताशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.


महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे...या एका चुकीच्या रुढीपायी, तिच्या येणाऱ्या पाळीकडे समस्या म्हणून पाहायच्या मानसिकतेमुळे अनेक समस्या जन्मतात आणि त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा महिलांनाच भोगावे लागतात. गर्भाशय काढून घेणाऱ्या महिलांची संख्या ३००० हुन अधिक होत चालली आहे, यात वैद्यकीय विभागाच्या व्यवसायीकरणाचा मुद्दा सुद्धा गांभीर्याने घेतला जायला हवा. या समस्येकडे कुणाचे तरी लक्ष वेधले गेले आहे आणि त्यांनी राजकीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून समस्येला वाचा फोडली आहे हि समाधानाची बाब आहे...परंतु जेव्हा या समस्येसाठी प्रत्यक्षात उपाययोजना होऊ लागेल तेव्हाच जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या निदान मूलभूत गरजांसाठी समाजाच्या मनात संवेदनशीलता आहे हे सिद्ध करता येणार आहे.


''रजस्वलेचा जो विटाळ | त्याचा आळोन जाला गाळ |

त्या गाळाचेंच केवळ | शरीर हें ||''



समर्थ म्हणतात 'पाळी येत असलेली स्त्री जर अशुद्ध असेल तर त्याच विटाळातून निर्माण झालेले सारे सजीव, सारा संसारच अशुद्ध आहे'' तेव्हा ज्यातून या सृष्टीचीच निर्मिती झाली आहे त्या रजस्वलेचा मान प्रत्येकाने राखायला हवा .. असेच त्यांना उद्धृत करायचे होते.
-रश्मी पदवाड मदनकर







3 comments:

  1. Hello Rashmi,

    This is really shocking! very nicely penned down. I suggest should write this in English too to reach larger audience.

    We are a women oriented media. Can you please share your thoughts on this in english and we would be glad to publish it on www.thewomenz.com

    Please give your email id to communicate further or you can write to us at editor@thewomenz.com

    regards,
    Gargi

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Gargi, Thanks for your appreciation. Actually english is not my language of writing so i may not give justice to the subject if i write in English. if you want you can translate it for your forum. Thanks again

      Delete
  2. किती भयानक आहे हे या देशाला डिझिटल इंडिया म्हणावे ?😢

    ReplyDelete

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...