Tuesday, 28 January 2020

*प्रजासत्ताक आणि स्त्रीस्वातंत्र्य* -




आज आपण ७१ वा प्रजासत्ताक म्हणजे गणतंत्र दिवस साजरा करणार आहोत, पण महिलांच्या बाबतीतला  गणतंत्र दिवस अजूनही अस्वस्थतेच्या सावटाखाली जातो ही आपली शोकांतिका. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य, प्रजेचे राज्य म्हणजे आपले राज्य. जेव्हा एखाद्या राजवटीला ‘प्रजासत्ताक’ असे विशेषण लावले जाते, तेव्हा त्याचा अर्थ फार मोठा होत असतो. आपल्या घटनेच्या उद्देशिकेत ‘भारताचे एक सार्वभौम’ असे लिहिले आहे.. यातील सार्वभौम कोण? तर या देशाने सर्वाधिकार म्हणून या देशातील जनतेलाच सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. आमच्या घटनेचीच सुरुवात ''आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य (प्रजासत्ताक) व त्याच्या सर्व नागरिकांस...'' या उल्लेखाने होतो. लोकांचं लोकांसाठी लोकांनी स्थापन केलेलं सरकार, म्हणून हे आपलं प्रजातंत्र आणि त्यामुळेच या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व.

 १९५० पासून देशात अधिकार आणि कर्तव्य याशिवाय स्वातंत्र्य या विषयांवर प्रचंड उहापोह होत आलाय. अनेक आंदोलनं, संघर्ष उलथापालथी याच काही कारणास्तव घडत गेले. संपूर्ण स्वातंत्र्य ही अजूनही एक कल्पनाच वाटते. स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट झाली तर इतर अनेक प्रश्नांना आपोआप वाचा फुटू शकेल पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर कधीच स्पष्ट देता आलेले नाही. आपलं आत-बाहेर असलेलं अमर्याद अस्तित्व आणि ते मुक्तपणे स्वीकारण्याची अन तसेच वागण्याची आपली ताकद म्हणजे खरे स्वातंत्र्य असे माझे स्पष्टच मत आहे.  व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय पुढे आला म्हणून स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला. सहज शब्दकोश उचलून बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत. स्त्रियांच्या दृष्टीने पाहायला गेले कि यातला कुठला शब्द तिच्या अनुषंगाने चपखल बसतो हे व्यक्तिसापेक्ष असू शकेल कदाचित प्रातिनिधीकही असू शकेल. सामाजिक चौकटीत घालुन आपलं अस्तित्व आपण आकारात आणु पहातो, त्याला मर्यादित करु पहातो आणि मग स्वातंत्र्याच्या कल्पना सुद्धा मर्यादित होत जातात, त्यांनाही भिंती येत जातात. प्रत्येकाची असामान्यत्वाची व्याख्या बहुधा वेगळी आणि सतत बदलत रहाणारी असते. हे झालं व्यक्तिमत्व स्वातंत्र्याविषयी.

 सामाजिक स्वातंत्र्याचा विचार केल्यास स्त्रीही शिक्षणानं स्वावलंबी बनते आणि आर्थिक स्वावलंबन जिला लाभतं तिच्यावर  इतरांना फारसा अन्याय करता येत नाही. शिवाय निर्णयाचं स्वातंत्र्यही या दोन कारणाने हळूहळू मिळू लागतं. स्वत:च्या भविष्याचा विचार करता येतो. पण सर्वप्रथम हे तिला स्वतःला समजायला हवंय ती जाणीव होणे गरजेचे आहे कारण शेवटी  स्वातंत्र्य हा समजून घेण्याचा नाही तर निश्चितच अनुभवण्याचा विषय आहे. महिलांचं स्वातंत्र्य हा वादाचा मुद्दा असला तरी ही सुसंस्कृत समाजाची गरज आहे आणि विकासाची पहीली अट सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेत कुठेही स्त्री-स्वातंत्र्य असा शब्द आलेला नाही.  पण एक नागरिक, एक व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीला सर्व स्वातंत्र्ये पुरुषांच्या बरोबरीने उपभोगता येऊ शकतात. असे असूनही स्त्री अधिकारांची गळचेपी होत राहिली आहे यात शंका नाहीच. देश स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्षात पदार्पण करतांना देशाच्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतांना स्त्रियांच्या स्वतंत्र अधिकारांची चर्चा दुय्यम ठरावी ही अर्ध्या जगाची शोकांतिका आहे. अर्ध्या जीवांवर अन्याय आहे. लोकशाहीने स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारल्याचे कुठेही दिसत नाही. ही गोष्ट भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे हे ताठ मानेने सांगणार्‍या आम्हा भारतीयांचीही शोकांतिका आहे.

लोकशाहीत श्रद्धा, मूल्य, विश्वास यांचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल करण्यात आले. परंतु या सैद्धांतिक चौकटीलाच नाकारून छेद देण्याचे प्रयत्न आजही होतांना दिसत आहे. आजही महिला कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, लैंगिक शोषण, अँसिडहल्ले, बलात्कार इत्यादींची बळी ठरत आहे. भारत स्वतंत्र झाला असे म्हणतांना सामाजिक अन सांस्कृतिक बेडगी रूढी परंपरेच्या, बिनबुडाच्या नीतिमत्तेच्या पारतंत्र्यातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही. अर्धे जग पारतंत्र्य उपभोगत असतांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचा खोटा आव कुठल्याही समाजाला कुठल्याही देशाला आणता येणार नाही. भविष्यात खऱ्या स्वातंत्र्याचा पायवा रचण्याची सुरुवात आतातरी व्हावयास हवी हीच या ६७ व्या प्रजासत्ताकदिनी शुभेच्छा !!

महत्वाचे :-
 राज्यघटनेतील कलम १४ नुसार स्त्री-पुरुष यांना समान हक्क प्रदान करण्यात आले आहेत. घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला आहे. राज्यघटनेच्या कलम ३०० (क) अ नुसार स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कांपासून वंचित करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र आजही वडिलोपार्जित संपत्तीचे हिस्से करताना कुटुंबातील मुलांना जास्त हिस्सा व मुलींना कमी हिस्सा देण्याचे प्रकार घडतच असतात. घटस्फोटित, विधवा महिलांनाही या जाचाला सामोरे जावे लागते. वस्तुत: वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीचाही समान हक्क असतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिला होता. तो निकाल त्याचवर्षीपासून लागू झाल्याने त्या वर्षाआधीच्या संपत्तीवाटप प्रकरणांसाठी हा निकाल लागू होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले होते. वडिलोपार्जित संपत्ती व्यतिरिक्त विवाहित स्त्रीला पोटगीच्या रूपातही स्थावर वा जंगम मालमत्ता मिळत असते. पोटगीच्या रूपाने स्त्रीला मिळालेल्या मालमत्तेवर आयुष्यभर तिचाच अधिकार असेल. ही मालमत्ता आपल्या मृत्यूनंतर कोणाला द्यावी याचा निर्णय ती मृत्युपत्रात तशी नोंद करून घेऊ शकते. स्त्रीला पोटगीरूपात मिळालेल्या मालमत्तेवर तिच्या मृत्यूनंतरही सासरच्या मंडळींना हक्क सांगता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. हिंदू विवाह कायद्यातील तरतुदीप्रमाणे नवऱ्याने आपल्या पत्नीचा प्रतिपाळ करणे बंधनकारक असून, पतीच्या मालमत्तेत तिचाही वाटा असतो. तो नाकारणे हे कायदाबाह्य आहे. स्त्रीधन असो वा पोटगीरूपात मिळालेल्या मालमत्तेवरील स्त्रीचा अधिकार या दोन्ही बाबींबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दोन्ही स्वतंत्र निकाल हिंदू स्त्रीला तिचे हक्क शाबित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. तलाक किंवा पतीने केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे मुस्लिम महिलांशी होत असलेल्या भेदभावाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक जनहित याचिका स्वत:हून दाखल करून घेतली. राज्यघटनेने हमी देऊनही मुस्लिम महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागत असेल तर ते अयोग्य आहे, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. या जनहित याचिकेच्या तीन आठवड्यानंतर होणाऱ्या सुनावणीत न्यायालय जी काही भूमिका घेईल ती महत्त्वाची ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त निकालांमुळे स्त्रीच्या हक्कांबाबत अधिक जागृती होण्यास साहाय्यच होईल याबाबत शंकाच नाही.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानंतर तरी स्त्रीला तिच्या मनाजोगते जगता यावे आणि हक्काचे स्वातंत्र्य मिळावे या शुभेच्छेसह ...


-रश्मी पदवाड मदनकर

(सोलापूरहुन प्रसारीत दैनिक संचार वृत्तपत्रातील रविवारच्या इंद्रधनू पुरवणीत प्रकाशित लेख)


Wednesday, 8 January 2020

मरणाची ''पाळी'' ..



पापी पोटाचा प्रश्न फार मोठा असतो, इतका मोठा कि जन्मभर पाठ सोडत नाही. टीचभर पोट भरायला माणूस आयुष्यभर खस्ता खातो पोट भरत राहावं म्हणून अक्ख्या शरीराचीच हेळसांड करीत राहतो. त्यात ती स्त्री असेल आणि कुटुंबातल्या चार माणसांची, लेकराबाळांची पोटं भरण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल तर जीवाचे हाल विचारूच नका. घरातल्या चिल्यापिल्यांचे पोट भरायला कधी ती उपाशी राहते, एका कापडावर महिने काढते, हाताला येईल ती कामं करते आणि वेळ आलीच तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोटच्या गोळ्याला पोसायला पोटचा एखादा हिस्साच कापून फेकून देते.


योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या आठवड्यात देशभर साजरी केली गेली. स्वतः हाल-अपेष्टा साहून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून रीती-परंपरेच्या पार प्रस्थापित सामाजिक अन्यायी रूढींना नाकारत स्वयंसिद्ध होण्याचा धडा त्या माउलीने दिला होता.. दुसरीकडे त्याच आठवड्यात मराठवाड्यातील ३००० ऊस कामगार स्त्रियांनी पाळीच्या दिवसात रोजगार मिळत राहावा म्हणून अल्पवयात गर्भाशयच काढून टाकले या खळबळजनक बातमीने पुन्हा उचल खाल्ली.... ही काय अवस्था आहे ना, भारत जगात महासत्ता बनायला निघाला आहे.. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो परंतु आजही महिलेला तिच्या शरीरापलीकडे माणूस म्हणून पाहून तिच्याच कष्टाचं मोल द्यायला कचरतो, भेदभाव करतो, तिचं लैंगिक शोषण होतं, तिच्या आरोग्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी एक अक्ख राष्ट्र मिळूनही सुरक्षित व्यवस्था निर्माण करू शकत नाही ही अत्यंत लाजिरवाणी, दुःखद बाब नाहीये का ? या प्रश्नावर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री नितीन राऊत यांनी २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिले आणि गेली अनेक महिने काळाच्या अंधारात गुडूप झालेला हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.


मराठवाड्यातील काही जिल्हे अतिदुर्गम आहेत, रोजगार मिळवण्यासाठी या भागातील लोक अनेकदा स्थलांतर करतात. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात त्यांना मागणी असते. ऊस तोडणीचा ऑक्टोबर ते मार्च असा सहा महिन्याचा हंगाम या प्रांतातील मुख्य रोजगाराचे साधन आहे. दसऱ्यानंतरच्या काळात ऊस तोडणीच्या कामावर लाखो मजूर लागलेले असतात. नवरा-बायको दोघांनाही जोडीने काम करावे लागते ह्या दाम्पत्य जोडीला कोयता असे म्हणतात, २२८ रुपये टन याप्रमाणे त्यांना ऊस तोडणीचे पैसे दिले जातात... जास्तीत जास्त टन ऊसतोडणी होऊन जास्त रोजगार मिळवण्यासाठी प्रत्येक जोडी जिवतोडून काम करीत असते. कारण या हंगामात होणारी कमाई हीच त्यांची वर्षभराची कमाई असते. यात बाईचा खाडा झाला कि एकट्या पुरुषाला काम मिळत नाही त्यामुळे दोघांचीही रोजी बुडते. खाडा होण्याचे मुख्य कारण मासिक पाळी हे असते. पाळी आली कामावर येऊ नका असे मुकादम सांगतो.. दर महिन्याला हे परवडण्यासारखे नाही म्हणून या महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबांनीच यावर तोडगा शोधून काढला. गर्भाशयच काढून टाकण्याचा तोडगा. आता गर्भाशयच नसणाऱ्या बायकांना मुकादम खास शोधून कामावर ठेवू लागला आणि काम मिळवण्याच्या गरजेपोटी अधिकाधिक महिला त्यांच्या शरीराचे मुख्य अंगच म्हणजे गर्भाशय काढून टाकू लागल्या. गेली काही वर्ष हे महिलांच्या बाबतीत हे दृष्ट चक्रच बनत गेलं आहे. ठराविक वेळेत काम पूर्ण करून देणे गरजेचे असते म्हणून कामगारांची टोळीही पाळी येणाऱ्या महिलांना स्वीकारत नाही. या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेऊन नाईलाजास्तव कुटुंबाला हा निर्णय घ्यावा लागतो. गर्भाशय काढून टाकण्यासाठी लागणारे पैसे पुन्हा मुकादम कडूनच आगाऊ घेतली जातात आणि नंतर जास्तीचे काम करवून घेऊन ते वसूल केले जाते. फक्त हीच समस्या आहे असे नव्हे घरदार सोडून रोजंदारीवर आलेल्या या स्त्रिया उघड्यावरच झोपड्या, टेन्ट बांधून राहतात ह्यांच्या सुरक्षेबाबत, आरोग्याबाबत काळजी घेणारी कोणतीही यंत्रणा कोणतीही सोय नसल्याने २० ते ४० वर्षे वय असणाऱ्या या तरुण महिलांमध्ये आताशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.


महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे...या एका चुकीच्या रुढीपायी, तिच्या येणाऱ्या पाळीकडे समस्या म्हणून पाहायच्या मानसिकतेमुळे अनेक समस्या जन्मतात आणि त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा महिलांनाच भोगावे लागतात. गर्भाशय काढून घेणाऱ्या महिलांची संख्या ३००० हुन अधिक होत चालली आहे, यात वैद्यकीय विभागाच्या व्यवसायीकरणाचा मुद्दा सुद्धा गांभीर्याने घेतला जायला हवा. या समस्येकडे कुणाचे तरी लक्ष वेधले गेले आहे आणि त्यांनी राजकीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून समस्येला वाचा फोडली आहे हि समाधानाची बाब आहे...परंतु जेव्हा या समस्येसाठी प्रत्यक्षात उपाययोजना होऊ लागेल तेव्हाच जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या निदान मूलभूत गरजांसाठी समाजाच्या मनात संवेदनशीलता आहे हे सिद्ध करता येणार आहे.


''रजस्वलेचा जो विटाळ | त्याचा आळोन जाला गाळ |

त्या गाळाचेंच केवळ | शरीर हें ||''



समर्थ म्हणतात 'पाळी येत असलेली स्त्री जर अशुद्ध असेल तर त्याच विटाळातून निर्माण झालेले सारे सजीव, सारा संसारच अशुद्ध आहे'' तेव्हा ज्यातून या सृष्टीचीच निर्मिती झाली आहे त्या रजस्वलेचा मान प्रत्येकाने राखायला हवा .. असेच त्यांना उद्धृत करायचे होते.
-रश्मी पदवाड मदनकर







Monday, 6 January 2020

जीवन गाणे गातच राहावे ..


पुन्हा एक वर्ष सरलं, नवं वर्ष-नवे संवत्सर सुरु झाले. नव्या वर्षाचा जल्लोष वगैरे साजरा होईल नवनवोन्मेषाने भारलेली रात्र उजळून जाईल, नव्या वर्षाच्या पहाटेचा सूर्य अधिक तजेला अधिक उत्साही दिसू लागेल. दिवस पालटेल जुने कॅलेंडर भिंतीवरून उतरेल नवे चढवले जाईल आणि मग पुन्हा 'चल रे माझ्या मागल्या ..' तसं नव्या-जुन्या वर्षानं बदलत काहीच नाही तीच तशीच सकाळ उगवते आणि कामाच्या रहाटगाड्यात कधी रात्र होते कळतही नाही. दिवसामागून दिवस सरतात रात्री मागून रात्र, महिने पालटतात मग वर्षामागून वर्ष येत जातात जात राहतात.


नव्या वर्षाच्या पहिल्याच दिनी भिंतीवर चढवलेले नवे कॅलेंडर तयार असते अगदी नव्या कोऱ्या पाटीसारखे नव्या रेघोट्या ओढून घ्यायला. पुढे वर्षभर ते तारखा लक्षात आणून देणार असतं .. आठवणी अंगावर कोरून घेणार असतं, हिशेबांचे आकडे, कुणाकुणाचे जन्मदिन-लग्नदिन, दूध-पेपर न कामवाल्यांच्या उपस्थिती अनुपस्थितीच्या नोंदी, महत्वाच्या कामासाठीचे रिमाइंडर किती किती आणि काय काय.... काल उतरवलेल्या जुन्या कॅलेंडरवरच्या खाणाखुणा मात्र राहतात तश्याच, चोळामोळा होतात, रद्दीत फेकल्याही जातात .. अंह ! पण नेहमीच नव्हे कधी कधी शिल्लक राहतात..तिथेच कॅलेंडरवर किंवा आतात-मनात, सलत राहतात, सोलत राहतात किंवा आनंदाच्या आठवणींचा कोलाज होऊन मनात तरंगत राहतात सदैव.


कसं असतं ना ?? निघून गेलेल्या वेळेतल्या आयुष्यानं नोंद घेतलेल्या काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, मागे सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि स्वतःसाठी करावयाच्या राहून गेलेल्या काही गोष्टी .. जुन्या वर्षासोबत हे सगळंच मुठीतून रेती घसरावी तसे निसटून गेले असतात.. हे लक्षात येते तेव्हा पश्चाताप होतो पण या साऱ्या विचारात आता रात्र सरली असते आणि नव्या वर्षाची नवी सकाळ पुन्हा हर्षोल्लास जागवते. आणखी एक संपूर्ण वर्ष म्हणजे ३६० दिवस पदरी पडणार असतात..


आयुष्याच्या या नव्या क्षणाला- या घडीला आपण पार केलेल्या कालपर्यंतच्या प्रवासाच्या बदलणाऱ्या वळणावर जरा थांबून जरा मागे वळून बघावं... स्वतःसाठी. सगळ्या चांगल्या गोष्टींचा लेखाजोखा एकदा पुढ्यात मांडून बसावं. चांगलं जगण्यासाठी म्हणून कुठेही न केलेली तडजोड, ती करावी लागू नये म्हणून केलेला संघर्ष, भल्यासाठी केलेले प्रयत्न, बुऱ्यासाठी दिलेला लढा, जगण्यासाठी वर्षभर उपसलेले कष्ट आणि त्यातून मिळवलेले यश या साऱ्यांसाठी स्वतःवर खुश होण्याचा हा क्षण उगवलेला आहे. आज स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतलीच तर त्यात काहीच गैर नाही. या पुढे वर्षभर आनंद वाट्याला येईल ते क्षण अन क्षण वेचत जायचे आहे, या प्रवासात सुगंधी फुलांचे ताफे, उत्तुंग पहाड, रम्य हिरवळ आणि सौंदर्य न्याहाळायचे आहे. नव्या सुखद अनुभवांचा नवा सिद्धांत मांडत नवे समीकरण कायम करायचे आहे. समांतर येणाऱ्या वाटेवर अनुभूतींचा खजाना आहेच, अडचणींचा, समस्यांचा नवा अनुभव घेत हातात हात घेऊन पुढे निघू …. या कडेवरून जगण्याच्या आत डोकावतांना काय गवसतं हे बघण्यात सुख असणार आहे हे नक्की…


येणारे नूतन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबीयास सुख समाधानाचे व समृद्धीचे जावो..















Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...