Saturday, 26 January 2019

रात और दिन -दिवानगी अन मदहोशी

वेगळ्या विषयांवरील चित्रपट :-

सक्तीची विश्रांती चाललीये सध्या आठवडा पूर्ण विश्रांतीत गेलाय आणि आता बोर व्हायला लागलंय. हालचाल फार करता येत नाहीये त्यामुळे गपगुमान बसून राहायचंय.. ऑप्शन नाहीये पुस्तकं वाचतेय आणि जमेल तसे बघायची इच्छा राहून गेलेले चित्रपटही हुडकून काढते आहे.  

काल असंच टीव्ही समोर बसले असतांना 'मदहोशी' सिनेमा लागलेला बिपाशा बासूचा. तसा बिपाशाचा सिनेमा म्हंटलं कि फार काही बोलण्यासारखं असेल असं वाटत नाही पण मदहोशी चित्रपट वेगळा आहे. ११सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या आतंकवादी हल्ल्यात तिने बहिणीला गमावले असते त्याचा तिच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि ती स्क्रिझोफ्रेनियासारख्या भयाण रोगाने ग्रासली जाते. आणि ती तिच्याच मनानं तयार केलेल्या एका वेगळ्याच विश्वात जगू लागते.एका काल्पनिक आतंकवादी विरोधी दस्त्याच्या सैनिकाच्या प्रेमात पडते. तो, त्याचं घर, त्याच्या सवयी सगळ्यावर जीव ओवाळून टाकू लागते. ती जे बघत असते ते इतर कुणालाही दिसत नाही .. हे सगळं लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो तोवर ती उपचारापलीकडे, पुरती वेडी होते. पुढे सिनेमाला चांगले वळण द्यायचे म्हणून तिला बरी झालेलेही दाखवले आहे .. पण नेहेमीच्या पठडीपेक्षा वेगळा असलेला हा सिनेमा पूर्ण पहावासा वाटला, एरवी सिनेमाच्या बाबतीत मी फार चुजी आहे. यासारखाच सनसनाटी अजय देवगण, उर्मिला आणि अक्षय खन्ना अभिनित 'दिवानगी' चित्रपटही येऊन गेलाय. अजय देवगणने यात स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणाऱ्या एकाच शरीरात वसणाऱ्या दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची मानसिक रोगीची भूमिका अत्यंत ताकदीने निभावली होती.



पण यासर्वांच्या पलीकडे याच विषयावर अर्ध्या शतकाआधी ५० वर्षांआधी एखादा सिनेमा बनलेला होता आणि तो याहून अधिक ताकदीचा होता असे सांगितले तर अनेकांना विश्वास बसणार नाही. मी काही वर्षाआधी पाहिलेला १९६७ सालचा ब्लॅक अँड व्हाईट 'रात और दिन' आठवला. अख्तर हुसेन यांची कथा  असलेला सत्येन बोस यांच्या निर्देशनात तयार झालेला एक अप्रतिम चित्रपट. एका वरिष्ठ लेखिका मैत्रिणीने सुचवला होता म्हणून फार मरमर करत सीडी मागवून पाहिला होता. अनेकदा ऐकलेली जिवापासची ''दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो, कोई गीत गाओ'' ''आवारा ऐ मेरे दिल जाने कहा है मेरी मंजिल'' किंवा मग 'रात और दिन दिया जले, मेरे मन में फिर भी अंधियारा है' सारखी बरीच श्रवणीय गाणी ह्याच चित्रपटातली आहेत हे तेव्हा कळाले. एक अप्रतिम सिनेमा कहर असणाऱ्या नर्गिसन या चित्रपटात अधिकच कहर केलाय.  दोन वेगवेगळे नाही खरतर एकीला विरोधी अनेक कॅरेक्टर अगदी सहजपणे सादर केले. यातही मानसिक आघात झाल्यानंतर एकाच व्यक्तीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचं जगणं तीन साकारलंय...यात नर्गिसनं वरुणा आणि पेगी..लिली, किटी, रोझी, सेल्वा.... अश्या अनेक भूमिका केल्या.
एक मउ निर्मळ, सोज्वळ वरुणा आणि दुसरी तेवढी कडक, तिसरी तिखट, चौथी श्रृंगारीक वगैरे... पण या साऱ्याच कसल्या कमालीच्या सुंदर दिसल्यायत, तशी नर्गिसबद्दल ती शंका नाहीचेय.

काय आहे सिनेमात एखाद्या स्त्रीची मनासारखं जगण्याची तगमग, घुसमट, एकटेपण, तिच्या आकांक्षा, आणि दडून राहिलेल्या सुप्त भावना पूर्ण करण्यासाठी झालेला मानसिक परिणाम त्यातून निर्माण झालेले काल्पनिक जग त्यातलं आभासी जगणं.. घरसंसार आहेच ती सांभाळण्याची तगमगही लपवली नाहीये.  काय नाहीये या सिनेमात ?



खरतर काळ बदलला आहे, विचार आणि दृष्टी ही बदलेली आहे.हल्लीच्या चित्रपटांनी अपेक्षाही अनेक वाढवलेल्या आहेत. सवयी बदललेल्या आहेत म्हणूनच हा सिनेमा या काळात आवडेलच असे नाही. पण नर्गिस आवडते तिचा अभिनय आवडतो शिवाय वेगळ्या विषयावरील चित्रपटांचे वेड असेल तर मग त्या काळात जावून तिच्या अभिनयाचा आणि या वेगळ्या चित्रपटाचा आनंद जरूर घ्यावा.
दिन गुमसुम ढलता रहता है।
वो खुद को छलता रहता है ।।

चार दीवारी छोड़कर घर की ।
क्यों दर दर फिरता रहता है ।।

आस लगी है मन में लेकिन ।
मन ही मन कुढता रहता है ।।

कुछ भी कहता नहीं किसी से ।
फिर भी सब कहता रहता है ।।

कौन से दुःख से करे किनारा।
हर गम दिल सहता रहता है ।।

चेहेरेपर रख मुस्कान नुमाया।
वो अश्क छुपाता रहता है ।।

आंख चुराकर मुझसे मेरा ।
चेहरा वो पढ़ता रहता है ।।

रश्मी मदनकर
09 feb 18

Tuesday, 8 January 2019

मखमाली आयुष्य जगावे


(वृत्त - पादाकुलक वृत्त) 

चित्र उमटते राजसख्याचे 
मनडोहाच्या पटलावरती
अन मोहाचे बिंब उमटते 
नवस्वप्नांच्या क्षितिजावरती 

प्रेमाचे अन आनंदाचे 
सूर जुळावे गीत म्हणावे 
सांजवनातून उठेल काहूर 
त्यासी गोजिरे मित म्हणावे 

उन्हकोवळ्या दिवसाचे मग 
सुरेख कातिल गीत लिहावे 
रखरखणाऱ्या संध्याकाळी
स्वरात कोमल गात रहावे

मिठीत घेता दिठीत यावे 
श्वासाचेही अत्तर व्हावे 
प्रीतफुलांच्या शेजावानी 
मखमाली आयुष्य जगावे 

कशास द्यावे कोणी उत्तर 
कशास कोणा प्रश्न पुसावे 
हात घेउनी हातामध्ये
या प्रश्नांना उत्तरे द्यावे !

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...