चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा, बघता बघता हे वर्षही सरले. दरवर्षी नेमाने येणारा क्षण पुन्हा जवळ आलाय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. सरत्या वर्षात काय गमावले, काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. नव्या वर्षात पदार्पण करताना भूतकाळाची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते. सरते वर्ष अनेक घडामोडींनी भरलेले राहिले अनेक मार्गाने उल्लेखनीय ठरले. कुठे सामाजिक बदलांची नांदी कानी आली तर कुठे भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं वाचनात आलीत. जातीय आरक्षणासाठी पुकारले गेलेले आंदोलन, नोटा बंदीने पिडला गेलेला सामान्य नागरिक, सत्तापक्ष-विरोधी पक्षाचे अटीतटीचे राजकारण आणि त्यात ढवळून निघालेला देश. अश्या अनेक घटनांच्या खुणा गोंदल्या जात असतांना वर्षभर महिलांच्या संबंधित देश-विदेशातून चांगल्या वाईट बातम्यांची धूळही उडत राहिली. कुठे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्न झाले. नेतृत्व गुणांना वाव मिळाला, मोठ्या पदांवर ती आरूढ झाली तर कुठे बलात्कार, अत्याचाराच्या घटनाही गाजत राहिल्या. अश्याच काही मुख्य घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटा प्रयत्न.
वर्ष २०१६ महिलांना मिळालेल्या पुरस्कारांसाठी विशेष ठरले. भारतीय पत्रकार मालिनी सुब्रमण्यम हिला नक्सल प्रभावित 'बस्तर' क्षेत्रात तिने केलेल्या पत्रकारितेसाठी 'इंटरनॅशनल प्रेस फ्रिडम अवॉर्ड-२०१६' ने सन्मानित करण्यात आले. तिच्या व्यतिरिक्त हा पुरस्कार तुर्की, मिस्र आणि अल सल्वाडोर या राष्ट्रातील पत्रकारांना मिळाला. मानवाधिकारसाठी दिला जाणारा युरोपीय संघाचा प्रतिष्ठित 'सखारोव पुरस्कार-२०१६' दोन यजीदी महिला नादिया मुराद आणि लामिया अजी बशर यांना देण्यात आला. इस्लामिक स्टेट आतंकवादी संघटनेने या दोघींचे यौन उत्पिडन केले होते. त्या वेदनादायी घटनेतून बाहेर पडून या दोघीही आज पीडित महिलांसाठी समाजसेवेत कार्यरत आहेत. या वर्षीचा 'राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल हिला देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना सांप्रदायिक शांती आणि सद्भावना वाढविण्याच्या दृष्टीने दिलेल्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. मद्रास संगीत अकादमीद्वारा दिला जाणारा 'संगीता कलानिधी पुरस्कार' व्हायोलिन वादक अवसारला कन्याकुमारी हिला देण्यात आला. अवसारला गतवर्षीच्या पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित आहे. वर्ष २०१६ मध्ये १० पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये यामिनी कृष्णमूर्ती आणि गिरीजा देवी या दोन महिला शामिल आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'साऊथ एशियाई लिटरेचर पुरस्कार' भारतीय लेखिका अनुराधा रॉय हिला तिच्या 'स्लीपिंग ऑन ज्युपिटर' साहित्यासाठी देण्यात आला. बंगळुरूच्या सुभाषिणी वसंत हिला संकटात लोकांची मदत करण्यासाठी तसेच सैनिकांच्या विधवांना सक्षम करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी 'नीरजा भनोत' पुरस्काराने नावाजण्यात आले. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदावर डॉ. मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली. मंजुला या दुसऱ्या महिला मुख्य न्यायधीश ठरल्या.
गेले वर्ष सिनेक्षेत्रातल्या घटनांचाही बराच गाजावाजा होता. ऐश्वर्या, प्रियांका आणि दीपिका यांचा हॉलिवूड प्रवेश आणि अभिनयावर चर्चा झडल्याच पण अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांच्याबरोबर प्रियंकाने घेतलेले डिनर, कतरिनाला मिळालेला 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' ऐश्वर्याचे जांभळे लिपस्टिक आणि दीपिकाचा रेड कार्पेटवरचा ड्रेस हे विषय नेटिझन्सने बराच काळ चघळले. यात एक भूषणावह होते ते हे कि 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' जिंकणारी प्रियांका चोपडा हि पहिली भारतीय नागरिक ठरली.
महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका तृप्ती देसाई यांचे विविध धार्मिक क्षेत्रात महिलांच्या प्रवेशासाठी चालवलेले आंदोलन तर दुसऱ्या बाजूने मुस्लिम महिलांनी तीन तलाक विरोधात पुकारलेला एल्गार वर्षभर लोकांचे लक्ष वेधत राहिले. बंगाली सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेतादेवी ह्यांनी तसेच संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून भूमिका वठवणाऱ्या 'व्यापक अणुचाचणी प्रतिबंध करारावर' (सीटीबीटी) भारताची बाजू मांडण्यात महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अरुंधती घोष आणि १९५० पासून तब्बल ३० वर्ष आपल्या गायकीने सिनेरसिकांचे मन मोहनारी पार्श्वगायिका मुबारक बेगम तसेच वर्ष जाता जाता अम्मा म्हणून प्रसिद्ध तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या चौघींनी यावर्षात पृथ्वीतलावरचा त्यांचा प्रवास संपवला. गोव्याला परफ्युम मलिका मोनिका घुरडे तर चेन्नईत इन्फोसिसमध्ये काम करणारी आयआयटीयन स्वाथीची सर्वांदेखत झालेली हत्या आणि महाराष्ट्राच्या कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या हि काही प्रकरणं घडली, संतप्त नागरिकांच्या जखमा पुन्हा भळभळायला लागल्या, जनता रस्त्यावर उतरली, प्रकरणं चव्हाट्यावर आलीच आणि पुन्हा एकदा देशाच्या प्रतिष्ठेवर डाग लावणारी ठरली.
एकंदरीतच महिलांच्या पदरी गेले वर्ष नेहेमीप्रमाणेच संमिश्र फळ देणारे ठरले. कुठे घवघवीत यश मिळाले तर कुठे निराशा हाती लागली. जे काही घडले ते मात्र अनुभव देणारे, जाणिवा जागृत करणारे अन धडा शिकविणारे ठरेल हीच अपेक्षा.
चला तर या गुलाबी थंडीत सोनेरी प्रकाशात. नव्या स्वप्नांची नवी लाट आणूया
नवे प्रयत्न ,नवा विश्वास ...नव्या यशाचा नवा ध्यास घेऊया.
चला सख्यांनो, हसत खेळत दंगा करत नूतन वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होऊया .
रश्मी मदनकर
२८/१२/२०१६
(सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)
http://epaper1.esakal.com/28Dec2016/Normal/Nagpur/Me/index.htm