Friday, 25 November 2016

केमिकल लोचा (स्वगत)

तो एमबीबीएसचा मुन्नाभाई 'केमिकल लोचा' आहे असं म्हणाला होता तेव्हा ती गम्मत वाटली होती. पण केमिकल लोचा काय असतो ते कळायला लागण्याआत आपल्या डोक्यातच केमिकल लोचा झाला हे लक्षात आले. . गम्मतच वाटते कधीकधी ...  कधीकधी कशाला 'मैं हू हि नही इस दुनिया कि' असे कायमच वाटू लागलंय हल्ली.. आता प्रश्न सतावतो तो हा कि आपल्यालाच हे असं होत का? मनाच्या कोपऱ्यात शिरलेले पण बुद्धीत अडकून पडलेले अडगळीतले असे कित्तेक जुने विचार त्याचा गुंता अजून सुटत नसतांना नव्या विचारांच्या धाग्यावर गाठी सोडवण्याचा प्रयत्न करत बसतो आपण. हे काही विचार पुसता आले तर किती बरे ? कोरी कारकरकरीत पाटी कळीकभीन्न असली तरी मिळावी ना पुन्हा एकदा.... पुन्हा रेघोट्या ओढता याव्यात आपल्या मनासारख्या. हव्या त्या आकारात-रंगात .. पण असे होते कुठे?

मानवशरीरातला हा 'बुद्धी' नावाचा प्रकार फार त्रासदायक असतो खरतर. 'अज्ञानात सुख' आहे असं म्हणतात ते उगाच नाही .... बुद्धीचा संबंध वयाशी असतो का?? कि ज्ञानाशी ...नाही नाही तो अनुभवाशी असावा. माहिती नाही पण फार बुद्धीचा वापर व्हायला लागला कि समाजाला किंवा संबंधित लोकांना त्याचा कितीसा फायदा होतो माहिती नाही पण ज्याला ती सतत वापरावी लागतेय किंवा ती उगाचच प्रगल्भ झाल्याने छोट्या छोट्या गोष्टीतही डोकं वर काढत आपलीच वापरली जातेय त्या व्यक्तीला मात्र त्याचा सतत त्रास होतो हे तितकेच खरे आहे. फार वैचारिक किंवा तात्विक बित्त्विक असू नये माणसाने हि समज येईपर्यंत त्या टोकाला पोचलेला असतो माणूस आणि या टोकापासून परतीचा मार्ग नाही हे लक्षात येईपर्यंत फार वेळ झालेला असतो. समाजात होणाऱ्या प्रत्येकच वाईट गोष्टी चटकन निदर्शनात येत असतील, समाजात वाईट गोष्टी बदलण्याचा ठेका आपणच घेतलाय असं वाटत असेल. चांगल्या गोष्टी सतत बदलाचा प्रयत्न आपल्या करवी वारंवार होत असेल. सतत उच्च विचारांची ओढ लागली असेल. निम्न स्तरीय सोच पचत नसेल आणि त्याहून अधिक त्यामुळे मनःस्ताप होऊ लागला असेल. माणसांना पारखायची सवय लागली असेल ... एकटेपणा आवडायला लागला असेल ? आपल्या IQ पेक्षा कमी बुद्धीक्षमतेची बाळबोध विचारांच्या माणसांचं सान्निध्य नकोस व्हायला लागलं असेल. गप्पांहून अधिक पुस्तक, सिनेमा सारख्या गोष्टीत मन रमायला लागले असेल. शांतता चोहीकडे असूनही जन्माची अस्वस्थता लागून राहिली असेल  तर आपण त्या स्टेजला पोचतोय असे समजायला हरकत नाही.

दिवसाच्या कोणत्याही वेळी अगदी रात्री बेरात्रीही कुठल्यातरी विचारांचा किडा मनात शिरतो. हळूहळू डोकं वर काढत जातो. त्या किड्याला पाय फुटतात. तो रेंगाळत बुद्धीत प्रवेश करतो. त्या चिवट किड्यातून चिकट स्त्राव स्त्रवू  लागतो तो भटकत राहतो आणि त्या स्रावाचे तार तयार होतात गुंतत जातात आणि त्या एका चिमुकल्या विचाराचे डोक्यात कोळिष्टकं तयार होऊ लागत. बरं इतक्यावर कुठे सगळं थांबतं ?? त्या कोळिष्टकांवर दुसऱ्या विचारांचे किडे येऊन बसू लागतात गुंफली जातात आणि बुद्धीचा भुगा होतो. विचारांच्याही अनेक छटा असतात नाही ? काही विचार आपले आपल्यालाच आलेले, काही कुणीतरी थोपलेले तर काही कल्पनेच्या अवकाशातून बरसलेले. कधी कधी वाटतं... नसतोच आपण शिकलो बिकलो तर, नसतेच पहिले रंग जगाचे, नसते दुःख मानून घेतले वाईटाचे, आनंदाच्या उकळ्या नसत्या फुटू दिल्या, वेदनेचे कढ थोपवले असते, सौन्दर्य बिंदर्य दृष्टी नसतीच जोपासली कधी ...तर काय बरं बिघडलं असतं? कुठे काय .... बेगडी माणसं जगतातच ना सुखाने? असे मस्त उंच उंच उडतांना पक्षी कुठे करत असतील विचार बिचार..झाडे डोलतातच ना विचाराविना. उन्ह-सावल्यांचा खेळ चालतोच ना ? पाऊस वारा, दिवस रात्र, चंद्र तारे सगळे सगळे युगानुयुगे कायम आहेत. ते कुठे शोधतात बुद्धीला खाद्य? ते कुठे करतात तत्वांचा विचार? आपणच मेले अतिशहाणे... 

आताही नेमकं करतोय काय आपण विचारांचे 'फुगेच' फुगवत बसलोय...पोकळ विचार निव्वळ हव्वा असलेले. अश्या फालतूच्या विचारांचाच तेवढा उजेड पाडलाय आपण आयुष्यात ते काढून टाकले तर अंधारच सगळा....हुह्ह्ह्ह ... धावतोय धावतोय आपण कायम धावतोय विचारांच्या मागे.

चला इथे लिहिलंय जरातर मन मोकळं झालंय... बघूया पुढे काय होतंय ते..    

Monday, 21 November 2016

हम में है दम !

बॉलिवूड अभिनेत्रींचे सौन्दर्य नेहेमीच जगात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरही चाहत्यांबरोबरच समीक्षकांचीही करडी नजर असते. हॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या आणि तिथेही 'ब्युटी विद ब्रेन'ची प्रचिती घडवून आणणाऱ्या तीन बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवास दिपवणारा दिसत असला तरी त्यामागे किती संघर्ष आहे हे देखील जगजाहीर आहे. अश्‍याच गाजलेल्या या तीन घटना, याच वर्षी कान फिल्म फेस्टिवलला 'लॉरिएल' ची प्रतिनिधी म्हणून रेड कार्पेटवर आलेल्या ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक नेटिझन्सच्या टीकेचा विषय ठरला होता. प्रियंकाने व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामांबरोबर घेतलेले डिनर आणि हल्लीच हि सर्व चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याचे कारण म्हणजे 'एमटीव्ही एमा' अवॉर्डसाठी आलेल्या दीपिकाच्या ड्रेससिंग स्टाइलवरून पुन्हा एकदा जगभर तिच्यावर टीकेची लाट उठली आहे.

असं म्हणतात कलेला कोणतेही गाव नसते, देश, जाती धर्म, पंथ अशी कुठलीही चौकट त्यांना अडकवू शकत नाही. 'कला' हा कलाकाराचा एकच धर्म असतो, तीच त्याची जात आणि तो त्यात किती माहीर आहे त्यावरच त्याची श्रीमंतीही गणली जाते. म्हणूनच इतर देशातील कलाकार जसे आमच्या चित्रपटात येतात, झळकतात कधी टिकतात कधी गळतात. तसेच बॉलिवूड कलाकारांनाही हॉलीवूडला जाऊन दोन-चार चौकार षटकार लावून यायचे डोहाळे लागतात. तसे ते जातातही त्यांच्या अभिनय कौशल्याने चांगली कलाकृती घडवण्यात त्यांचे प्रामाणिक योगदानही देतात. हल्ली बॉलिवूड कलाकारांचे हॉलिवूड चित्रपटात झळकने प्रेक्षकांना फार अप्रूप राहिले नसले तरी एकेकाळी म्हणजेच काही वर्षांपूर्वीपर्यंत ते चांगल्या प्रतीच्या अभिनयाचे मापदंड म्हणून तसेच स्टेटस सिम्बॉल सारखे गणले जायचे. अश्‍या अभिनेत्यांची एक वेगळीच इमेज निर्माण व्हायची. तसे हॉलिवूडमध्ये प्रवेश करणे वाटते तितके सोपेही नव्हते ते आजही नाहीच. म्हणूनच बॉलिवूडमध्ये पाय रोवलेल्या आघाडीच्या कलाकारांनाही हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हॉलिवूडची पायरी चढणाऱ्या बॉलिवूड कलाकाराची यादी अजूनही फार मोठी नाही. नासिरुद्दीन शाह, अनुपम खेर, इरफान खान, अनिल कपूर अशी बोटावर मोजता येणारे अभिनेते तर मल्लिका शेरावत, हेमा कुरेशी, तब्बू या अभिनेत्री तेथील 70mm च्या पडद्याला तसे टेलिव्हिजनला निव्वळ स्पर्शच करू शकल्या आहेत.

'ब्राईड अँड प्रिज्युडीस' 'पिंक पॅंथर2' 'मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस' सारख्या सिनेमात काम करून ऐश्वर्याच्या हॉलिवूड प्रवेशानंतर आणि तिथे रुजल्या रुळल्यानंतर बऱ्याच काळाने प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड डेब्यूने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये 'क्वॉंटिको' या मालिकेत काम केले तसेच 'बेवॉच' सिनेमातही तिची प्रमुख भूमिका आहे. त्याहून अधिक वॉशिंग्टन डिसीमध्ये व्हाईट हाऊसच्या 'करसपॉंडंट डिनर'च्या निमित्ताने ती बराक दांम्पत्यांना भेटली हा विषय बराच काळ चर्चेत राहिला. याशिवायही ऑस्करसह विविध सोहळ्यांना प्रियांकाला आवर्जून आमंत्रित केले जाते. तिच्या पाठोपाठच आता दिपीकाही हॉलिवूडमध्ये प्रवेश करती झाली. दीपिका सध्या विन डिझेलसोबत 'XXX रिटर्न ऑफ झांडर केज' या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमेरिकेतील नामवंत मासिक व्हॅनिटी फेअरने 'हॉलिवूडस नेक्‍स्ट जनरेशन' ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा दीपिकाला दुसरा क्रमांक देण्यात आला होता. पण हल्लीच रोडरडॅम शहरातील 'एमटीव्ही एमा' सोहळ्यासाठी दीपिकाने मोनिषा जयसिंह आणि शालीना नथनी यांनी डिझाईन केलेला शिमरी ब्लॅक टॉप आणि सिल्क ग्रीन स्कर्ट परिधान केला होता. तिने तिचा ग्लॅमरस लूक जॅकेट आणि लांब, हिरव्या इअररिंग्जनी वाढवला होता. पण इंटरनॅशनल मीडिया डैली मेलने तिला 'बॉलिवूड ब्लॅडर' असे संबोधले आणि नेटिझन्सने देखील त्यावर टीका करून तिला ट्रोल केले.

ऐश्वर्या, प्रियांका आणि दीपिका या तिघीही तेथे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना पेलत खंबीरपणे यशाच्या चढत्या ग्राफवर स्वार आहेत. त्या पुढेही हॉलिवूडच्या बड्याबजेटच्या चित्रपटातून नामवंत निर्देशकांच्या मार्गदर्शनात स्वतःला निखारत गाजलेल्या कलाकारांबरोबर काम करतांना हॉलिवूडच्या पडद्यावर दिसणार आहेत. बॉलिवूडच्या सर्वात महागड्या या अभिनेत्रींना सातासमुद्रापार तिथे पाय रोवायला मात्र अनेक कसोटींना तोंड द्यावे लागणार आहे हे निश्‍चित.


(दैनिक सकाळच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)






Saturday, 19 November 2016

*“ब्राह्मण हरवला आहे...!!!”*



_*स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.*_

*कांबळे*: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.

*जोशी*: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरचं !! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?

*कांबळे*: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.

*जोशी*: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?

*कांबळे*: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?

*जोशी*: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राह्मण होते.

*कांबळे*: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. “मानवता धर्म” हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.

*जोशी*: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, “नव्हे”, त्यांंचचं १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले, अभय दिले.

*कांबळे*: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकांपासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.

*जोशी*: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!

*कांबळे*: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.

*जोशी*: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे, आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राह्मणांना झोडपू लागले. कारण अगदी अलेक्झांडरच्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राह्मणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.

*कांबळे*: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.

*जोशी*: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?

*कांबळे*: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?

*जोशी*: (हसून बघत) अहो कांबळे; फुले-आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमुर्ती रानडे, रेवेरंड नारायण टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या बरोबरीने, स्वातंत्र्यवीर सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत.
सावरकरांनी स्पष्ट सांगितले, की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.

*कांबळे*: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.

*जोशी*: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ – ९ वर्ष काम करतो आहे; तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?

*कांबळे*: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.

*जोशी*: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राह्मणाने अन्याय केला का?

*कांबळे:* नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.

*जोशी*: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राह्मणांनी अत्याचार केला का?

*कांबळे*: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.

*जोशी*: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राह्मणांनी अन्याय केला, असा ओरडा का करता?

*कांबळे*: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेत ना?

*जोशी*: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात एकही ब्राह्मण होता का? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत.

*कांबळे*: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.

*जोशी*: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राह्मणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राह्मण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे
कार्यक्रम बरे.

*कांबळे*: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर – सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, “भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत”.

*जोशी*: ब्राह्मण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!

*कांबळे*: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, एस. एम. जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.

*जोशी*: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राह्मण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.

*कांबळे*: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजीना गोडसेने मारले. तोही भटच होता.

*जोशी*: गोडसेने गांधीवध केला. त्यानंतर गावोगावी ब्राह्मणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या कृत्याने हजारो ब्राह्मणांचे निःस्वार्थी बलिदान दुर्लक्षित ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.

*कांबळे*: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?

*जोशी*: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, अजिंक्य योद्धा पहिला बाजीराव, विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने – इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली.

पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राह्मण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.

*कांबळे*: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात, राजकारणात का येत नाहीत.

*जोशी*: ब्राह्मण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राह्मण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राह्मणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार? त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला खड्ड्यात.

*कांबळे*: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला, चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल.

कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी, पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.

*जोशी*: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद उकरला. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही.

*कांबळे*: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.

*जोशी*: पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय

*कांबळे*: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.

*जोशी*: ब्राह्मणांनी “मौनं खलु साधनं” हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.

*कांबळे*: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.

*जोशी*: हल्ली पाप-पुण्य, खरे-खोटे असं काही राहील आहे अस वाटत तुम्हाला?
गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.

*कांबळे*: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हवं. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.

*जोशी*: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राह्मणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राह्मण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे.

🙏🏼🙏🏼🙏🏼


Wednesday, 16 November 2016

 हे महाशय माधव कारेगावकर पोलिस खात्यातून पोलीस निरीक्षकच्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. वयवर्ष 64 .. अमरावतीच्या रस्त्यावर भेटले. तरूण सैनिक सिमेवर जीव गमावताय त्याचं प्रचंड दुःख बाळगून आहेत. वय वृद्धत्वाकडे झुकणारे असले तरी विचाराने अगदी तरुण असणाऱ्या, बोलण्यात प्रचंड उत्साह आणि काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्याशी बोलतांना सहज जाणवते.
''आमच्यासारख्या साठीच्या माणसांना रिकामपण असतं...अर्ध जगणं झालेलं असतं. मरणाची वाट पाहत बसण्यापेक्षा, सरकारनं आम्हाला सीमेवर पाठवावं आणि देशसेवेची संधी द्यावी'' अशी मागणी पंतप्रधान मोदींपर्यंत पोचवायला ते देशभर एकटेच फिरताहेत ..

अश्या माणसांना अन त्यांच्या विचारांनाही सलाम!

Sunday, 6 November 2016

एक खूबसूरत दर्द 'शरबत गुल'

फगाणिस्थान युद्धाच्या वेळी तिथून जीव वाचवून पळून आलेल्या हजारो कुुुटूूंबाात एक कुुुुटुंब हिचंही होतं. त्यावेळी अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियन आणि मुजाहिदींन यांनी युध्‍दभूमीच साकारली होती. अनेक परिवार पाकिस्तानमधल्या निर्वासित छावणीत वास्तवास आले होते. आपली घरे-दारे सोडून देशोधडीला लागलेल्या,अफगाण युद्धाच्या झळा सोसणाऱ्या शरणार्थींची बातमी करतांना 1984 साली छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्यूरीने निर्वासित छावणीत एका किशोरीचे छायाचित्र कॅमे-यात कैद केले होते. नॅशनल जिओग्राफ‍िक मास‍िकात ते प्रसिद्ध झाले आणि छायाचित्रकारालाही अपेक्षा नव्हती तेवढे ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले, हिरव्या रंगाच्या डोळ्याची 'अफगाण गर्ल' सर्वत्र चर्चेचा विषय झाली. त्यावेळी तिचे नाव कुणालाही माहिती नव्हते. 'अफगाणी मोनालिसा' अश्याच नावाने तिला ओळखले जाऊ लागले. छायाचित्रकाराच्याही करिअरचा तो टर्निंग पॉईंट ठरला. हळूहळू युद्धाचे वारे निवळले, तो काळ लोटला आणि ती हिरव्या डोळ्यांची निर्वासित मुलगी विस्मरणात गेली. पण ज्या चित्राने त्याला प्रकाशझोतात आणले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले अशी ती चित्रातील हिरव्या डोळ्याची अफगाण बाला छायाचित्रकाराच्या विस्मरणात मात्र कधीच गेली नाही. त्या छायाचित्राची आठवण सांगतांना स्टीव्ह सांगतो 'ती अफगाणिस्तानमधील तथाकथित कट्टर परंपरावादी समाजातून येत होती, जिथे अनोळखी माणसाला चेहरा दाखवणे हा गंभीर गुन्हा ठरतो.स्ट‍िव्हला तिचे डोळे आणि निष्‍पाप चेहरा आवडला होता. त्याने खूप विनंती केल्यानंतर तिने छायाचित्र काढण्‍यास परवानगी दिली होती.' ती नेमकी कोण आहे आणि सध्या कुठे असेल काय करीत असेल या प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले. आणि 2002 साली नॅशनल जिओग्राफिक टेलिव्हिजन अँड फिल्म्स आणि मॅक्युरीने पुन्हा एकदा त्या मुलीचा शोध करत अफगाण‍िस्तान पालथे घातले, आणि तब्बल 17 वर्षांनी तिचे खरे नाव जगाला माहित झाले. यानंतर मॅक्यूरीने पुन्हा एकदा त्या पश्‍तुन आदिवासी जमातीतील मुलीचे म्हणजेच 'शरबत गुलचे' छायाचित्र काढले आणि मासिकाच्या मुखपृष्‍ठावर पुन्हा ती एकदा सर्वत्र झळकली. 

शरबत गुल आता पुन्हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे. त्याचे कारण म्हणजे तब्बल दोन वर्षांच्या तपासाअंती पाकिस्तानने तिला खोटे दस्तऐवज बाळगून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात वास्तव्य करण्याच्या गुन्ह्यात 23 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तिच्यावर खटला चालू असतांना दोनदा तिची जामिन देखील नाकारण्यात आली. तिला 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. शरबतने एप्रिल 2014 मध्‍ये पेशावर शहरात शरबत बीबी नावाने ओळखपत्रासाठी अर्ज केला होता. तिने निवेदनात सादर केलेल्या कागदपत्रात घोळ असल्याचे प्रशासनाला लक्षात आले आणि शरबत गुलला अटक झाली. तिचे वकील सांगतात तिची लवकरच सुटका होणार असून त्यानंतर निर्वासित म्हणून तिच्यावर लागलेला शिक्का पुसला जाऊन तिला पुन्हा अफगाणला तिच्या मूळ गावी परत पाठवण्यात येणार आहे. 

शरबत लहानपणापासूनच संघर्षमय आयुष्य जगते आहे. अफगाणिस्तानमध्‍ये सततच्या युध्‍दाने लोकांचे सर्वकाही हिसकावून घेतल्यावर 90 च्या दशकात सोव्हिएत लष्‍कर अफगाणिस्तानमध्‍ये दाखल झाले होते. तेव्हा ती 6 वर्षांची होती. एक बॉम्ब विस्फोटात तिचे आई-वडील मृत्यू पावले. शरबतचा भाऊ कशर खान आणि ती दोघेच उरले. तेथील नागरिकांची स्थिती जनावरांपेक्षाही खराब होत चालली होती. या कारणामुळे या दोघे बहीणभावासकट अनेकांनी अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानातं आसरा घेतला होता. तेव्हापासूनच तिचा निर्वासित असण्याचा संघर्ष संपतच नाहीये. 

शरबत 16 वर्षांची असतांना तिचे लग्न झाले. सासरचे आयुष्यही सुखी नाही. विवाहानंतरही तिच्या आयुष्‍यात काही बदल झाला नाही. शरबतने तिचे पहिले सुप्रसिद्ध झालेले चित्रही पहिले नव्हते. तिचे चित्र जगभर प्रसिद्ध झाले हे देखील तिला माहिती नव्हते. जगाला वेड लावणारी शरबत स्वतः मात्र तिच्या गुरफटलेल्या संघर्षमय जीवनात कुठेतरी नावाप्रमाणेच 'गुल' आहे. तिला लवकरच जामिन मिळेल आणि तिचा हा संघर्ष संपून तिच्या गावी ती पुढले आयुष्य सुखाचे काढेल हिरव्या डोळ्याच्या या 'अफगाण मोनालिसा' ला याक्षणी याच शुभेच्छा ....  



(नागपूर दैनिक सकाळच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)




Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...