Tuesday, 26 July 2016

वोह ना आयेंगे पलटकर ... अलविदा मुबारक

 काही माणसांच्या आयुष्याची नीट पडलेली घडी विस्कटते अन पुढे सगळी प्रमेयच चुकत जातात. गुणांची मूर्तिमंत प्रतीके असणारी हि माणसे ट्रॅजेडी मध्ये अशीकाही गुरफटली जातात की  गुणांहून अधिक त्यांच्या दुःखाचं पारडं कधी भारी होऊन पडतं कळतही नाही. 'कभी तनहाईयों में यु हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे, और बिजली कोध जायेगी ''
हे गीत गायिले तेव्हा या गायिकेला अंदाजही नसावा कधीतरी या दोन ओळींचे बोल तद्वतच आयुष्यात खरे उतरणार आहेत. आयुष्याच्या उतारवयात त्या अश्याच गुमनामींच्या 'अंधारा'त झाकोळल्या गेल्या अन आयुष्याच्या अंतापर्यंत कितीतरी दुःखाच्या 'बिजली' झेलत राहिल्या. त्यांच्या गाण्यांनी त्याकाळात मंत्रमुग्ध होणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना मात्र ह्याचा थांगपत्ताही लागला नाही. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि आपल्या आवडत्या गायिकेचे झालेले हाल ऐकून सारेच संगीत प्रेमी हळहळले.

मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानच्या सुजनगढ झुंझुनू इथला. लहानपणापासूनच चित्रपटांचं वेड होतं त्यांना. त्यातल्या त्यात सुरैय्यावर विशेष प्रेम होतं. सुरैय्याला बघणे, दिवसरात्र तिचे गाणे गुणगुणणे त्यांना फार आवडायचं. त्यांनी कधीही शिक्षण घेतले नाही त्यांना लिहिता वाचताही यायचे नाही पण संगीत शिकणे हा एकमेव ध्यास लागला. पुढे रियाजुद्दीन खान सारख्या फणकार गुरूंकडून त्यांनी गायकीचे प्रशिक्षण घेतले. मुबारकजींचे काका त्यांच्या प्रतिभेने अचंभित झाले त्यांच्याच आग्रहावरून त्यांना घरून परवानगी अन रेडिओमध्ये गाण्याची संधी मिळाली आणि मुबारक बेगम चित्रपटसृष्टीत पोचल्या. 1949 मध्ये 'आईए' चित्रपटासाठी संगीतकार नाशाद ह्यांनी गाण्याची संधी दिली  'मोहें आने लगी अंगडाई' हे पाहिले गीत रेकॉर्ड झाले.  त्यानंतर एका पार्श्वगायिकेचा यशाच्या शिखराचा प्रवास सुरु झाला. 1949 ते 1972 या काळात  काही सुरेल गाण्यांची मेजवानी मुबारकजींनी रसिकांना दिली.  त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली अन तो काळ असा गाजला की सुमधुर आवाजाच्या धनी मुबारक ह्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले . लतादिदी, कैफी आजमी, एस. डी. बर्मन, खय्याम. मो.रफी अश्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. हिंदीसोबतच मारवाडी, गुजराथी गाणीही त्या गायिल्या, त्यांच्या कंठातून उतरलेली काही गाणी जसे मधुमती चित्रपटातले 'हम हाले दिलं सुनायेंगे सुनीये की न सुनीये, हम हाले दिलं सुनायेंगे' हमराहीचे 'मुझको अपने गले लगालो ऐ मेरे हमराही' अशी अनेक सुरमयी गाणी पुढेही अनेक वर्ष संगीत प्रेमी गुणगुणत राहतील हे निश्चित.

''अगर इस जहाँ का मालिक कही मिल सके तो पूछे; मिली कौनसी खता पर हमें इस कदर सजाये'' त्यांनी गायिलेल्या या गाण्याचे शब्द खरे ठरले,  आयुष्याच्या शेवटी मुबारकजींचे आयुष्य फार हालापेष्टांमध्ये गेले. जावेद अख्तर आणि सुनील दत्त यांच्या मदतीने जोगेश्वरी इथे राहायला घर मिळाले होते पण राज्य सरकार कडून मिळणाऱ्या मासिक 700 रुपयांवर तरुण मुलीचे आजारपण अन इतर खर्च त्यांना चालवावा लागे. काही चाहत्यांनाही वेळोवेळी 'शुक्राना' पोहोचवून मदत केली होती, मधले अनेक वर्ष मात्र त्या विस्मरणात गेल्या होत्या. पण आयुष्याच्या शेवटाला आजारपणामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या. मनेका गांधींनी सरकारकडे मदतीचे आव्हान केले तर राज्यमंत्री विनोद तावडेंनीही त्यांना प्रत्यक्ष भेटून मदत दिली होती. आज मुबारक बेगम आपल्यात नसल्या तरी त्यांनी रसिकांना जगण्यासाठी दिलेल्या गीत संजिवणीमुळे त्या शतकांपर्यंत अजरामर ठरणार आहेत. 

(दि. २७/०७/२०१६ ला 'सकाळ' नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)


  

Friday, 22 July 2016

संवेदनेच्या सहाणेवर ... (स्वाथी मर्डर केस - चेन्नई )



सकाळी ६.३० ची वेळ, चेन्नईचे नूनगंबक्कम रेल्वे स्थानक... खूप गर्दी झालेली नव्हती अजून पण सामसूमही कुठे होते, निदान शंभरेक माणसे होतीच लोकलची वाट बघत. पुढल्या काहीच मिनिटात एक घटना घडते एका तरुणीवर कुणीतरी चाकूने हल्ला करतो. सर्वांच्या डोळ्यादेखत चाकूने गोंदत जातो. एक निष्पाप जीव सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्थानकावर रक्ताच्या थारोळ्यात पडली असते, बेसुध. 'मला वाचवा' अशी आरोळीही तिला ठोकता आली नसते. मारेकरी पळून जातो आणि काय आश्चर्य सारीच पांगापांग होते. उपस्थित लोकं थंड डोक्याने आपापली गाडी पकडून गंतव्याला निघून जातात. पुढे अडीच तास ती तिथेच मदतीविना तात्कळत जीव सोडते. 'ती' आई-वडिलांच्या जगण्याचा प्राण, गुरुजनांच्या अपेक्षा, कष्टानं उच्चशिक्षण घेतलेली, कुणाचा तरी आधार ठरणारी , कुणाचे तरी भविष्य साकारणारी, डोळ्यात अखंड स्वप्न घेऊन महत्त्वाकांक्षेने वावरणारी. पडलीय जमिनीवर, संपतेय ... तडफडत जीव सोडतेय. आपण मात्र chill आहोत. हे सगळं डोळ्याने पाहूनही आपल्याला cool होऊन पुन्हा वेळ मारून नेता येते आहे. कौतुक करावं का ?? की कु~~ल म्हणता म्हणता आपण खरंच इतक्या थंड रक्ताचे झालोय की अश्या कुठल्याही घटनेने मन हेलावतच नाही.

इन्फोसिसमध्ये काम करणारी आयआयटीयन स्वाथीची ही हृदय पिळवटून टाकणारी घटना. हल्लीच चेन्नईच्या सर्व चॅनलची ब्रेकिंग ठरलेली बातमी. बातमी कळली तेव्हा तुमच्या माझ्यासकट सगळेच हळहळले. अनेकांनी आंदोलनही केले. मेणबत्ती घेऊन कित्येकांनी रॅली काढली. न्यूज चॅनलवर चर्चा सत्र झडले. वाद-विवाद झाले. आरोप-प्रत्यारोप झाले आकांड तांडवही संपले. पण हे सर्व घटना घडून गेल्यानंतर घटनाबाह्य लोकांनी केले होते. प्रश्न असा उद्भवतो की त्यावेळी त्या तिथल्या उपस्थितांचे काय झाले?? ती का नाही सरसावली मदतीला? त्यावेळी ते तिथे नसते तर तीही पुढे या आंदोलनात सामील झाली असती का? किंवा आज आंदोलन करतायेत ती लोक प्रत्यक्ष तिथे असती तर धावली असती का मदतीला ??

याच वर्षी मार्च महिन्यात एकतर्फी प्रेमातून १४ वर्षीय व्हॉलीबॉल खेळाडूची कोलकात्याच्या बारासात भागात मैदानावरच तिच्या तथाकथित प्रेमीने हत्या केली. आरोपीने सर्वांदेखत चाकूने घाव करून असेच तिला भर मैदानात रक्ताच्या थारोळ्यात मरत सोडून दिले. एका उगवत्या खेळाडूचे आयुष्य संपले. एप्रिल महिन्यात मुंबई प्रभादेवीला एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, जून महिन्यात तेलंगणमधील अदिलाबाद जिल्ह्यामध्ये 17 वर्षांच्या एका मुलीचा भरदिवसा तिच्या घरासमोरच गळा चिरला...भंडारा, गोंदिया, ठाणे, उल्हास नगर किती किती आणि कुठे कुठे ?? केवळ नकार पचवता आला नाही म्हणून जीवावर उठणाऱ्या या सडकछाप मजनूंच्या दिलजले प्रेमाचं आणखी किती मुलींनी शिकार व्हायचं?

प्रेम किती अलवार अलगद, येणाऱ्या अनुभूती साठवण्याची अन निव्वळ त्या आठवणींवर आयुष्य कंठण्याची सुरेल सुंदर भावना असते. ज्यावर प्रेम केलंय त्या व्यक्तीच्या मर्जीचे तिच्या भावनांचे भान राखून तिला जिंकण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालविण्याची सुखद प्रक्रिया असते. खरतर प्रेम मनात जन्म घेते त्या क्षणापासून माणसाने हळवे व्हायला हवे त्याच्यात संवेदना जागृत व्हायला हव्या. प्रेम ही भावनाच माणसाला हलवणारी, फुलवणारी, प्रेरणा देणारी, त्याच्या मनात जगण्याविषयीची कोवळीक निर्माण करणारी असते. प्रेमात माणूस क्रूर, राक्षसी कसा होतो, विद्रुप सैतानी खेळ तो खेळूच कसा शकतो हा प्रत्येक संवेदनशील मनाला छळणारा प्रश्न आहे.

खरतर प्रेम ही देण्या-घेण्याची चीजवस्तू नाहीचेय. मालकी हक्क गाजवण्याची किंवा मला हवय ते मिळायलाच हवं असा आग्रह धरणे, मला मिळणार नसेल तर इतर कुणालाही मिळू देणार नाही असे विचार, मग तो माणूस असो किंवा वस्तू माझी नसेल तर मी मोडून टाकेन, संपवून टाकेन, मारून टाकेन, कुचकरून टाकेन, विद्रुप करेन असे विचार अन त्यातून निर्माण होणारी कृती म्हणजे निव्वळ दूषित विचार, विकृत मनोवृत्तीच लक्षण आहे. संस्कारातलं न्यून आहे. ही प्रेमभावना नाहीच ही अहंभावना आहे. कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आपण नकळत मान्य केलेलं असत तेव्हाच ते प्रेम स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचाही अधिकार दुसऱ्या व्यक्तीला असतो हे साहजिकच आहे. हे पचवता येणार नसेल तर तो माणूस नाहीच तो केवळ सैतान. हे सारे थांबवायचे असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी सहजीवनाचे, समान हक्काचे संस्कार पुढल्या पिढीत रुजवणे गरजेचे आहे. पुढल्या पिढीमध्ये पोषक मैत्रीचे अन निस्वार्थ प्रेमाचे बीज पेरणे गरजेचे आहे पण त्याहून गरजेचे आहे त्यांच्यात स्त्री-पुरुष नात्यातला मान राखून निर्माण होणाऱ्या संवेदनांचा स्वीकार करण. या सगळ्यासाठी आवश्यक आहे माणसात माणूसपणाच्या जनुकांची ओळख पटवून देण्याची. ती पुढल्या पिढीत रुजवायची असेल तर ती तुमच्या आमच्यात आता असायला हवीय ना ?? मृत्यूच्या दारात तडफडणाऱ्या आपल्याच सारख्या एखाद्या जीवाला आपण ताटकळत तसेच टाकून निघून जात असू तर आपणच गमावत चाललेल्या संवेदना पुढल्या पिढीत पेरायच्या कश्या ??
विचार करायला हवा ... नाही ??



 (दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीत बुधवारी प्रकाशित होणाऱ्या 'मी' पुरवणीत दि. २०/०७/२०१६ रोजी प्रकाशित झालेला लेख )
http://epaper3.esakal.com/20Jul2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm 

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...