एक सुंदर संकल्पना वाचनात आली, अतिशय आवडली आणि पटली देखील.
असं म्हणतात आपला देश हा सध्या सगळ्यात तरुण असणारा देश आहे. दुसरे आजही कुटुंबव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याने टोकाची वाईट परिस्थिती आपल्या देशात उद्भवली नाहीये आणि निकटच्या काळात उद्भवणाराही नाही, तरीही मी वाचलेली ही व्यवस्था एक चांगली संकल्पना आहे. इतर देशांची स्थिती याबाबत जरा वाईट आहे. बहुतांश देशात कुटुंबसंस्थाच ढासळलेली असल्याने अमाप पैसे असूनही तिथे एकाकी राहणाऱ्या माणसांची त्यात वृद्धावस्थेत किंवा आजारी असल्यावर त्यांची सुश्रुषा करणारी माणसे त्यांना मिळणं दुरापास्त झाले आहे. त्यामुळे तिथे सुरु झालेली ही व्यवस्था अनेक दृष्टीने आपल्या देशातही करता येण्यासारखी आहे. आपण काय चांगले ते घेत जावे... तर,
स्विझर्लंडमध्ये तिथल्या सरकारच्या माध्यमातून 'टाइम बँक' ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. त्यात तुम्हाला तुमचे ''वेळ खाते'' (Time Account) सुरु करावे लागते. या खात्यात तुमच्या वेळेचा लेखाजोखा जमा राहतो.
स्विझर्लंडमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने या संकल्पनेबाबत तिचा अनुभव सांगितला...
स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना मी माझ्या शाळेजवळ एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण, क्रिस्टीना, एक ६५ वर्षांची अविवाहित महिला होती जिने सेवानिवृत्त होण्यापूर्वी माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते. स्वित्झर्लंडला पेन्शन व्यवस्था खूप चांगली आहे, त्याला त्याच्या नंतरच्या वर्षांत अन्न आणि निवारा बद्दल काळजी करावी लागत नाही, इतकी रक्कम मिळते. एके दिवशी मला कळले की तिला एका ८७ वर्षांच्या अविवाहित वृद्धाची काळजी घेण्यासाठी नोकरी मिळाली आहे. मी त्या महिलेला विचारले की या वयात कशाला दगदग, अराम करा. पैशासाठी हे करण्याची गरज नाही ? तिच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले: "मी पैशासाठी काम करत नाही, परंतु मी माझा वेळ 'टाइम बँकेत' जमा करते आहे, आणि जेव्हा मी माझ्या म्हातारपणात चालू शकणार नाही, किंवा मला फार गरज असेल तेव्हा मी ते परत घेऊ शकते."
"टाईम बँक" या संकल्पनेबद्दल मी पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मी खूप उत्सुक होते आणि घरमालकाला सविस्तर विचारले. "टाइम बँक" ही संकल्पना स्विस फेडरल मिनिस्ट्री ऑफ सोशल सिक्युरिटीने विकसित केलेला वृद्धापकाळातील पेन्शन कार्यक्रम आहे. लोक वृद्धांची काळजी घेण्यासाठी 'वेळ' देतात, पर्यायाने खात्यात वेळेची बचत करतात आणि ते वृद्ध झाल्यावर किंवा आजारी पडल्यावर किंवा काळजी घेण्याची गरज असताना ते खात्यातून काढून घेऊ शकतात.
आता हे खाते कोण काढू शकतात ह्याच्या अटी फार गमतीशीर आहेत... अर्जदार निरोगी, संवाद साधण्यात चांगला आणि प्रेमाने परिपूर्ण असावा. त्यांना दररोज मदतीची गरज असलेल्या वृद्धांची काळजी घ्यावी लागते. त्यांचे 'सेवा तास' सामाजिक सुरक्षा प्रणालीमधील वैयक्तिक 'वेळ' खात्यांमध्ये जमा केले जातात. माझी घरमालकीण आठवड्यातून दोनदा कामावर जायची, प्रत्येक वेळी दोन तास गरजूंच्या सेवेत घालवायची, म्हातार्यांना मदत करायची, त्यांच्यासाठी खरेदी करायची, त्यांच्या खोल्या साफ करायची, त्यांना उन्हात नेऊन फिरवून आणायची, त्यांच्याशी गप्पा मारायची.
नियमानुसार, एक वर्षाच्या सेवेनंतर, “टाइम बँक” सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या तासांची गणना करते आणि त्याला “टाइम बँक कार्ड” जारी करते. जेव्हा तिला तिची काळजी घेण्यासाठी कोणाची गरज असते तेव्हा ती "व्याजासह वेळ" काढण्यासाठी तिचे "टाइम बँक कार्ड" वापरू शकते. माहितीच्या पडताळणीनंतर, "टाइम बँक" रुग्णालयात किंवा तिच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकांना नियुक्त करते.
एके दिवशी, मी कॉलेजला आणि घरमालकिणीने फोन केला आणि म्हणाली की, ती खिडक्या पुसताना स्टूलवरून पडली. मी त्वरीत सुट्टी घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचा पाय मोडला होता, ज्यामुळे त्यांना चालणे शक्य होणार नव्हते. जेव्हा मी तिला सांभाळण्यासाठी माझ्या कॉलेजमधून सुट्टीघेण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मला तिची काळजी करण्याची गरज नाही, कारण तिने आधीच "टाइम बँक" कडे विनंती सबमिट केली आहे. दोन तासांपेक्षाही कमी वेळात "टाइम बँक" ने एका नर्सिंग कर्मचाऱ्याला घरमालकिणीची काळजी घेण्यासाठी पाठवले.
पुढचा महिनाभर, देखभाल कर्मचाऱ्याने घरमालकाची रोज काळजी घेतली, तिच्याशी बोलून, तिचे हवेनको ते सगळं बघून, तिच्यासाठी स्वादिष्ट स्वयंपाक बनवून तिची सुश्रुषा केली. केअरटेकरच्या सेवेमुळे घरमालकीण लवकरच ठणठणीत झाली. सावरल्यानंतर तीच पुन्हा "कामावर" देखील जायला लागली. ती म्हणाली की ती अजूनही निरोगी आहे आणि त्यामुळे भविष्यासाठी "टाइम बँक" मध्ये अधिक वेळ वाचवण्याचा तिचा हेतू आहे.
आज, स्वित्झर्लंडमध्ये, वृद्धापकाळाला आधार देण्यासाठी "टाइम बँक" वापरणे ही एक सामान्य प्रथा बनली आहे. यामुळे देशाच्या पेन्शनवरील खर्चात बचत तर होतेच पण इतर सामाजिक समस्याही सुटतात. अनेक स्विस नागरिक या प्रकारच्या वृद्धापकाळाच्या टाइम पेन्शनला खूप पाठिंबा देतात.
स्विस पेन्शन ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की निम्म्याहून अधिक स्विस लोकांना या प्रकारच्या वृद्धाश्रम सेवांमध्ये सहभागी व्हायचे आहे. स्विस सरकारने "टाइम बँक" पेन्शन योजनांना समर्थन देण्यासाठी कायदा देखील मंजूर केला. सध्या, आशियाई देशांमध्ये घरी एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे आणि ती हळूहळू एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. स्वित्झर्लंड शैलीतील "टाइम बँक" पेन्शन आपल्यासाठी देखील एक चांगला पर्याय असू शकतो..
तुम्हाला काय वाटतं ?
@रश्मी पदवाड मदनकर