प्रत्येकाचं एक दु:ख प्रत्येकाची एक स्टोरी .. अजाणत्या वयापासूनच नियतीनं यांच्या पुढ्यात अगणित दुखणी वाढून ठेवलेली. हसण्याखेळण्याच्या वयात आयुष्याशी दोन दोन हात करावे लागत असताना निरागस चिमुकल्यांची किती दमछाक होत असेल ..जिथे मोठमोठ्यांची हीम्मत हात टेकते, तीथे ह्यांच्याकडून काय अपेक्षा करावी..पण ही लढतात खुप ताकदीने संघर्ष करतात आणि यातले अनेक जिंकतातही.
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून मोठमोठ्यांना वैताग येतो त्याचे उपचार अत्यंत कठीण असतात. वर्षानुवर्षे उपचार चालू असल्याने या रोगाचे पेशंट त्रासून जातात. ही मोठ्यांची अवस्था असतांना या छोट्या पाखरांचं काय होत असेल. घोडेले परिवारातील धनुष्य हा ३ वर्षाचा मुलगा आणि त्याचीच सक्खी बहीण जान्हवी ५ वर्षांची दोघांनाही डोळ्यांचा कँसर असल्याचे कळले तेव्हा या परिवारावर दुःखाचा कुठला डोंगर कोसळला असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. अत्यंत साधारण कुटूंबातील हे आई-बाबा दोन्ही मुलांना यातून बाहेर काढायला किती काय सहन करत असतील हे विचारण्याची हिंमतही मी करू शकले नाही. ही दोन्ही चिमुकली आई-बाबांचा हात धरून मेट्रो राईडसाठी आले होते. पूर्वा पराठे या ११ वर्षाच्या अत्यंत हुशार चुणचुणीत चिमुरडीला २ वर्षाआधी फायब्रॉईडचा कॅन्सर असल्याचे समजले खडतर परिस्थितून उपचार घेऊन ती आज पूर्णपणे बरी होण्याच्या मार्गावर आहे परंतु पुढे अनेक वर्ष तिला हे उपचार चालू ठेवावे लागणार आहे. प्रवासादरम्यान ह्या चिमुरडीने नागपूर मेट्रो बद्दलची संपूर्ण माहिती इतरांना ठणठणीत आवाजात करून दिली. विजया खेर्डेकर या द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ओव्हरीचा कॅन्सर होता त्यानं शिक्षणावर परिणाम झाला ह्याचे तिला वैषम्य आहे. काहीतरी करून दाखवायचे आहे ही जिद्द तिच्या बोलण्यात ठायी ठायी जाणवत होती. ह्याच सफरीवर आलेली आणखी बरीच ४ ते ७ वर्षाआतील मुलं ब्लड कॅन्सरला लढा देत असल्याचे डॉक्टर आणि संस्थेच्या लोकांनी सांगितले. दर महिन्याला शरीरातील रक्त बदलावे लागते ही कल्पनाही जीथे अत्यंत भयावह वाटते तीथे प्रत्यक्ष भोगणाऱ्या या देवदुतांबद्दल काय बोलावे. ५ वर्षाच्या आद्याला तीचा ८ वर्षांचा सख्खा भाऊ आॅपरेशनानं बोर्नमेरो देणार आहे.. इतक्या लहान वयात केवढं हे दायित्व केवढं थोरपण. आयुष्याने अश्या कठीण प्रसंगावर आणून उभे केल्यावर आयुष्याशी दोन दोन हात केल्याशिवाय उपाय नसतो. अश्यावेळी या चिमुकल्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंदही फार महत्वाचा असतो. हाच आनंद त्यांना मिळावा म्हणून नागपूर मेट्रोचा सफर ह्यांना घडवण्यात आला.
पोटच्या लेकराचा जिव वाचवण्यासाठीचा संघर्ष या पालकांना काय बनवून सोडतं हे प्रत्येकाच्या डोळ्यात वाचावे. तरी त्यांच्या चेहेऱ्यावर एक हास्य उमटावं म्हणून चाललेली धडपड नुसतंच टिपत राहावी. आजवर अनेक सफरी केल्या पण ही सफर काही औरच होती.. खुप खोल रूतलेली खुप शिकवून गेलेली.
शेवटचं इतकंच या मुलांना सलाम यांच्या पालकांना सलाम ... 🙏🙏🙏🙇