Monday, 23 October 2017

मुक्ती ..



दुसरा वरीस उजाडला, यंदाच्या पारी दगा देणार न्हाई, कारल्याचा वेल लगलगून भरून येईन अन मागच्या वक्ताचं समदा गाऱ्हाना धुतला जाईन .. म्हणून मुक्तानं आस सोडली नोहोती ..

गेल्या वक्ताले सोयाबीन कहाडला अन् बजार झाल्यावर माहेराहून धनधान धाडला, तवा माह्या बाबानं शेतातल्या माळावरच्या  कारल्याच्या जराश्याक बियाबी धाडल्या व्हत्या. पुरा ऐवज कपाटात कोंबून ठेवताले कारल्याच्या बियावरून 'भिक्कार माहेर' म्हनूनस्यान वाकडं तोंड दाखवू दाखवू सासूबाईन मले केवढाला दुषना लावला होता. मामंजींनंत बाप्पा, सप्पा बिया देल्त्या टाकून पडवीतल्या कोपऱ्यात....जाता जाता पच्च्चकन! पिचकारी मारली तंबाकूची टमरेटवर, आन खाकरत निंगून गेलते चकाट्या हाकाले ...

तिच्या डोळ्यात भस्सकन पानीच आलन  ... पहासाठी व्हतच कोण ? गडी तं गेल्ता सहरात..नोकरीपाण्याचा बंदोबस्त कराले.

अर्ध्या रातचाले तिनं जाऊन बिया वेचल्यान अन पदराले गाठ बांधून ठेवून देल्त्या. समदी रात्र इचाराचाच भूत सवार रायला तिच्या डोस्क्यावर. गावचा हिरवाकंच मळा, कारल्याचा चौफेर साजरा मांडव, घराचं मोकड-ढाकळं आंगण आन बिनमायच्या लेकीचा सुखाचा संसार पाहाची मरमर करणाऱ्या बाबाची लडिवाड, मायाडू  कुशी आठवूनशान  लगीत रडाले आलं तिले. उशी ओली होत राहाली रात्रभर. सकायची कामं पटकानी आटपून.. मामंजींच्या तब्बेतीले  चांगली र्हातील असं समजावून, मुक्तानं माडीवर नेऊन पदरातल्या बिया भरल्या डोळ्यानंच पेरल्या व्हत्या. पैला पैला कोंब फुटला तवा मुक्ताच्या आनंदाले पारावर उरला नोहता, खतपाणी घालू घालू खूप मनाभावानं वेल पोसलान तिनं, थो वेलबी बहरून खोवलेल्या खुंट्यावरून जास्वदांच्या झाडाचा सहारा घेत कपडे वाळवाच्या तारेवर मांडवागत पसरू पाहे. लुसलुशीत नाजूक तरारल्या वेलीवर इवले इवले पिवळट साजरे फुलंबी दिसू लागली. आता उगवन ते माहेराच्या गोडव्याचे कारले साऱ्यायले भाजी करून खाऊ घालाची अन समद्याची तडतडणारी तोंड यका घावात बंद कराची, मुक्तानं स्वप्नातले मोनोरे बांधूनशान ठोवले होते ...

पण का झालं कोणजाणे सासरच्या कडू शब्दांईनं घायाड झालेल्या बेच्चार्या माहेरच्या बिया रूसल्यान का काजाने? गेल्या सालात दोन चार बारके कारले उगवले आन तोडण्यालायक होण्याआत पिवळेलाल होऊन वाळूनबी गेलथे ...पानायलेबी गळती लागली. वेल फळत न्हाई म्हनूनस्यान साऱ्यायच्या डोळ्यात खुपू लागला व्हता. येता जाता सासूबाई नीरे टोमने मारे, राहू राहू माहेराच्या नावानं कल्ला करें .याच्या त्याच्यावरून गाऱ्हाणी बोलून चवताडून सोडे... मामंजी तर तोंड फुगवून बसले व्हते. त्यायले तिच्या हातचं गोडधोडबी ग्वाड लागना झाला , सदानकदा तोंडावर बाराच वाजले र्हाये. मुक्ताची मोठी घुसमट होये मंग, पण त्या ना उगवलेल्या कारल्यापायी वेलीले किती परेशानी सहानं पडतेत याचं दुःख कसं का जाने मुक्ताच्या जिव्हारी लगीत लागून र्हाये ...

कसबसं वरीस निंघाला .. वेल वाळून निथळूनबी गेला. वर्षभर मुक्ताचा नशीबबी फळफळला न्हाई. पावसाचा जोर जरासक कमी झाला तसा यंदाच्या बरसलेबी वापस वेल हिरवळून आला. मुक्ताच्या आशेचा दिवा वापस उजडू लागला. पण, या सालालेबी घुमून घात केलाच तिच्यावाल्या नशिबानं, तिनं लावलेली कार्ल्याईची आस फुलता फुलता काऊनतं गळूनच पडायले लागले . सासूबाईंच्या तोंडचा पट्टा आजूकच फाश्ट धावू लागला...माहेरच्या माणसाइची आब्रू त बाप्पा अता वेसीपातूर येऊन पोचली ...बापाच्या नावाची इज्जत चिंध्यावानी टरटर फाडायले कोणालेच कई नई वाटे. मुक्ताले हे सहन झालाच नाही...तिच्या अंदरच अंदर कोंडल्या हुंद्क्याचा अन दाबल्या संतापाचा उद्रेक व्हाल लागला. यक डाव असाच तिचा डोका सरकला आन ते भरभर माडीवर गेली,  ऐसपैस पसरलेला वेल सरंसरं वढून काहाडू लागली. वोढला, तोडला, उपडला. वरपला ... खुंटीवरून, जास्वदांवरून, मांडवातून वरबाडून वरबाडुन काहाढला, मुक्त करून टाकला ... शवटची वेदना. वेलीच्या निरंतर दुःखाचा अंत झाला व्हता. न उगवणाऱ्या कारल्याच्या दुषणातून वेलीले कायमची मुक्ती मिळाली व्हती ..... मुक्ता नावाले तिनं वाईस खरंर्रर्रर्र करून दावला.

पन मंग तिची सोताची यंदाच्या बरसलेबी न उजवलेली कूस तितकी नशीबवान काहून नोहोती त कामालुम?  ...वेलीचं आनं तिचं नसीब देवादिकान यकाच लेखणीनं लिवलं व्हतं का काजाने ? ..  रोज रोजच्या वांझोट्या दुषणातून मुक्त कराले तिच्या उदरात मुक्ता अजून जन्मालेे याची होती ... पुढच्या वक्ताची आशा तिनं या वक्तालेबी सोडली नोहोती ...



रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com




Monday, 2 October 2017

झुंडीची झुंझ आणि जात-धर्माच्या अस्मिता !!



धार्मिक अस्मितेची गोंदणं आम्ही आणखी किती वर्ष स्वतःच्या मेंदूवर गोंदून घेणार आहोत हा न सुटणार प्रश्न मला मागल्या काही आठवड्यापासून जरा जास्तच भेडसावू लागला आहे. शिक्षणानं माणसाच्या विचारांची कुंपण अधिक खुली व्हायला हवी, बऱ्या वाईटाचे धडे मिळाल्याने मन मोठी होऊन संवेदनेच्या जाणिवा जागृत व्हायला हव्या खरतर. पण होतंय काहीतरी विपरीतच. शिक्षणानं वैचारिक ब्लॉकेज खुलली नाहीच पण वेगवेगळ्या अस्मितेच्या नावाखाली आम्ही स्वतःला अधिकच जखडून घेतो आहोत, भोवतालची कुंपण शिथिल करायची सोडून ती अधिक करकचून बांधून घेतो आहोत आणि एवढे कमी कि काय त्याचा अभिमानही बाळगत हिंडतो आहोत. जातीच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी 'लिबरल' हा शब्दप्रयोग बुद्धिवंतांमध्ये फेमस झाला होता. लिबरल म्हणजेच उदारमतवादी, पण आजच्या मतवाद्यांमध्ये खरंच तेवढं विचारांचं औदार्य आहे का हा संशोधनाचा वेगळाच विषय ठरेल. तर लिबरल होता होता आम्ही कधी संकुचित विचारधारेच्या विळख्यात अडकलो कळलेच नाही आणि त्याचे परिणाम बघून भोगुनही आम्ही आमच्यात बदल करून घ्यायला तयार नाही. मागल्या आठवड्यात समूहानं घडवून आणलेल्या धार्मिकतेच्या दांभिकतेचं प्रदर्शन मांडणाऱ्या, सामाजिकतेची सांस्कृतिक चौकट मोडणाऱ्या, एकांगी धर्मांध धारणांचे प्राबल्य अधोरेखित करणाऱ्या कितीतरी घटना घडल्या, अन संवेदनशील मनाला हेलावून गेल्या. व्यक्ती आणि समाज यांच्यामधले नात्याच्या नि:पाताच्या कृतिकार्यक्रमाचे हे जिवंत उदाहरण ठरावे. पहिले उदाहरण होते बाबा रामरहीम यांनी धर्मांध अनुयायांचे देशभर विणलेले जाळे. ज्याचा उपयोग या तथाकथित अध्यात्मिक बाबाने त्याला हवा तसा करून घेतला. दुसरे मराठी विनोदी अभिनेते भाऊ कदमांना गणपती बसवल्याने धमकी देणाऱ्या तथाकथित धर्मांध समाजाचे. तिसरी घटना मुस्लिम महिलांनी दाखल केलेली तीन तलाक विषयीची याचिका मेनी करण्यात आली. तोंडी तलाक देण्यावर बंदी घालण्यात आली आणि मुस्लिम लॉ बोर्डाच्या तसेच धर्माच्याठेकेदारांच्या तंबूत खळबळ माजली. या धार्मिक आणि जातीय अस्मितेची घुसळण गल्ली ते दिल्लीपर्यंत सामाजिक समीकरणांची उदाहरण म्हणून मांडली जाताहेत आणि सोशल मीडियावरून तथाकथित विचारवंत त्याचे समर्थनही करताहेत हि शोकांतिका आहे.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग यांना बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले, राम रहीम यांच्यावर त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर १५ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हा खटला होता. ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला आणि त्यांना दोन आरोपांसाठी १०-१० असे एकंदर २० वर्षांची शिक्षा झाली. आरोप सिद्ध होणं आणि त्यासाठी शिक्षा मिळणं हा भाग मोठा नाही तो तर लोकशाहीचा प्राण आहे पण त्यानंतर जे काही घडले ते समजण्यापलीकडचे होते. बाबा रहीम यांना धर्मगुरू मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी १-२ नाहीतर तब्बल ३०० लोकांचा जीव जाईपर्यंत दंगली घडवून आणल्या, आपले धार्मिक गुरु आपल्याला कशाचे मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यामुळे आपण कोणत्या मार्गाला लागतो आहे हे समजण्याइतकेही भान आजच्या धर्म अनुयायींनमध्ये राहू नये? हिंसा घडवून निष्पापांचे बळी घेणे कोणत्या धर्माची शिकवण असू शकते ?

एकीकडे जात भेदभावाने पिडला गेलेला म्हणून मागास राहिलेला आणि गरिबीचे, बेरोजगारीचे चटके खावे लागले असे छाती ठोकून सांगणारा समाज, स्वधर्मानं हक्क नाकारला म्हणून जन्म घेतलेल्या धर्माचं लेबल काढून फेकणारा आणि हक्कानं जगता यावं यासाठी दुसरा धर्म अभिमानानं स्वीकारणारा समाज. जातिव्यवस्थेच्या अपुऱ्या, एकांगी व चुकीच्या आकलनामुळे कोंडी झालेला जाणवतो आहे. विचारांच्या पातळीवरील हे अपुरेपण जेव्हा आपल्याच समाजातील बांधवांची पुन्हा धर्माच्या नावाने घुसमट करत असेल मनासारखे जगण्याचा अधिकार हिरावून घेत, ज्या  कट्टरतावादामुळे संघर्ष निर्माण झाला होता तीच आत्मसात करून जातीतून बहिष्कृत करण्याच्या धमक्या देत असेल तर ? जातिलढे हे कायमच प्रतिगामी असतात आणि त्यातून ‘जातीयवाद’च वाढतो हे आमच्या लक्षात कसे येत नाही. भाऊ कदम यांनी घरी गणपती बसवला म्हणून नवबौद्ध समाजाच्या तथाकथित धर्मरक्षकांनी त्यांना धर्मातून/समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. भाऊ कदमांकडून त्यांनी बळजबरीने जाहीर माफीनामा देखील लिहून घेतला. बहिष्काराच्या धाकाने भाऊंनी सुद्धा तो लिहून दिला. आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणवून घेणारे, संविधानाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना भाऊच्या गणपतीने दुराभिमान कसा निर्माण झाला? मूलभूत हक्कांना पारखा राहिल्यानेच संघर्ष उभा करावा लागलेल्या समाजातल्या माणसांना आपल्याच सारख्या एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा विसर पडावा..त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य नाकारून थेट बहिष्कार टाकावा हा कट्टरतावाद नव्हे? नवबौद्धधम्माचे जातीकरण होणार असेल तर पुन्हा बाहेर पडायला केलेला संघर्ष फोल ठरून एकाच जातीत स्वतःलाच बंदिस्त करून घेणारा अंतर्भेदी जातकर्मी धर्म काय कामाचा?

तिकडे तिसऱ्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.  मुस्लिम महिला शायरा बानो यांनी मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुस्लिम पर्सनल लॉचा हवाला देत मुस्लिम कट्टरपंथांनी या याचिकेस जोमाने विरोधही दर्शविला होता. देशातील धर्ममार्तंड आजही महिलांना धर्मशक्तीच्या जोरावर आपल्या दहशतीखाली आणण्याचा व त्याद्वारे धर्मच्छल करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुस्लिम महिलांना समान न्याय हक्क प्राप्त व्हावा, असा लढा उभा राहिल्याने ‘इस्लाम खतरे मे है ।’ अशी आवईही मुस्लिम धर्मगुरुंनी उठविली. अगदी काळ पर्वाची घटना , अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत मुस्लिम तरुणांकडून एका वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधीला आणि मीडियासमोर येऊन उघडपणे न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करत 'तीन तलाक' पद्धतीवर टीका करणाऱ्या सुशिक्षित तरुणींना कॅमेऱ्यासमोर बोलण्यास टोळक्यानं येऊन शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरोध केला... आणि हा सगळा प्रकार युनिव्हर्सिटीच्या परिसरातच घडत होता...समता विघातक, कर्मठ धर्मांध वैचारिक प्रवाह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही भौतिक मानसिकरीतीने परावर्तित होतो आहे हे किती दुःखद आहे.

आधुनिकतेच्या नावाखाली आणि वातावरणात धार्मिक भेदभावाच्या राजकारणामुळे सर्वच जात-धर्माच्या दुर्बळांच्या शोषणाच्या नवनव्या कहाण्या तयार होतायत. जातीजातींच्या अस्मितेखाली सद्सदबुद्धीनं विचार करण्याची  मानसिकता बळी पडत जातेय आणि वैचारिक स्पंदने भरडली जाताहेत, पण यासर्वांवर विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे आहे? आम्ही व्यस्त आहोत स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या यशावर नव्हे तर जन्मानं मोफत मिळालेल्या जात धर्मानं आलेल्या गुर्मीत हुकुमी एकाधिकारशाही मिळावी म्हणून झुंडीने प्रहार करायला. हीच झुंडीची झुंझ एखाद्या सकारात्मक बाबीसाठी झाली तर .... विचार करून बघा.

रश्मी पदवाड मदनकर - नागपूर 
rashmi.aum15@gmail.com


(दैनिक तरुण भारत नागपूरच्या रविवारीय विशेष पुरवणीत तसेच ऑनलाईन दैनिक प्रकाशन अक्षरनामात प्रकाशित झालेला लेख 
https://www.facebook.com/aksharnama/posts/1848332138811196 )

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...