Friday 15 May 2015

गीलासा चांद खिल गया (स्वगत)



पहिल्या पावसातली पहिलीच संध्याकाळ एक अनामिक हुरहूर घेऊन येते … अनोळखी उदासीन. मन शांत अधिक शांत होत जातं. खिडकीच्या बाहेर अवेळी दाटलेला अंधार खिडकीच्या ओट्यावर बसून बघतांना बाहेर आज वेगळंच चित्र रंगलंय असा आभास देऊन जाते, कुंपणा पलीकडचा रोज दिसणारा चाफा गडद हिरव्या पाणावल्या रंगात डोलत असतो. काळेभोर आभाळ सांजेच्या सूर्याच्या छटा झाकोळून डोकावणारे . मन अजाणत्या विचारांच्या हिंदोळ्यावर आसीन झालेलं कुठेतरी दूर बघत राहावं वाटत राहतं, नजर दूर शून्यात जाते…नाही इच्छा होत उठायची, आतले दिवे पेटवायची. बाहेरच्या अंधारल्या मंद प्रकाशात सुरु असतो 'शोध'   माहिती नसलेल्या कसलातरी. खिडकीच्या अल्याड बसून मनातल्या खिडकीच्या पल्याडचा शोध. खिडकीकडलं अर्ध शरीर ओलं होतांना मनाच्या आतही काहीतरी ओलावत राहतं …तंद्री लागते … अन एक एक आठवण पाझरू लागते … ओसरणाऱ्या धारांसोबत गारवा अन तोच ओळखीचा मृद्गंध आसमंत भारून टाकतो.…. अलगद डोळे मिटले जातात. एक लांब श्वास … अन सगळंच ओथंबून वाहायला लागतं.…. काय होतंय हे कळण्याआत एखादी वीज कडाडते, चमकून जाते. धस्स होतं मनात. पलीकडल्या घरात कुणीतरी रेडिओ लावलाय …लता गातेय सगळे सूर वातावरणात भरून उरतात.


''सिली हवा छु गई सिला बदन छील गया नीली नदी के परे गीलासा चांद खिल गया''


सूर कानातून आतआत भिनत जातात. हृदयापर्यंत ओघळतात आणि आयुष्यातला साठलेला कुठलातरी पाउस धो धो बरसू लागतो. ओघळतो गालावर, अलगद ओठांवर हसू फुलवत. सगळं नितळ स्वच्छ धुऊन निघतं … पुन्हा मन मोहरून उठतं. दडून बसलेले आनंद पक्षी भिरकावतात पुन्हा आकाशी. असा हा पहिला पाऊस क्षणात कोरड्या मनाला भिजवणारा क्षणात पुन्हा हसवणारा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच असा एखादा पाऊस. आयुष्याच्या मध्यावर झाकोळलेला अन मग कधीतरी अलगद ओथंबून चिंब भिजवणारा. …. आताशा खिडकीबाहेर पावसाचा वेग मंदावलेला असतो. घरातल्या कामाची आठवण होऊन आपण चौकट सोडतो. पलीकडल्या घरातून सूर येत राहतात. लताबाई जीव ओतून गात असतात...


'कतरा कतरा पिघलता रहा आसमाँ ..रुह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी दिलरुबा गीत गाती रही... आप यूँ फासलों से गुजरते रहे..... '




'













No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...