Tuesday, 31 March 2015

राजकन्य़ा मस्तानी !

प्रताप गंगावणे, सौजन्य – लोकसत्ता
मस्तानीचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते? ती कायम गैरसमजांच्या झाकोळाखाली का राहिली? बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही. ‘श्रीमंत पेशवे बाजीराव-मस्तानी’ या ‘ई  टी. व्ही. मराठी’ वरील मालिकेतून सध्या तिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला जात आहे. मस्तानीच्या अगम्य व्यक्तिरेखेचे रहस्य उलगडण्यासाठी या मालिकेच्या लेखकाने सखोल संशोधन केले आहे. या लेखकाचा, मस्तानीचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारा लेख-
———————————————————————————————
‘मस्तानी’ हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. मूर्तिमंत निष्ठेची भाषा ती समस्त मराठी मुलुखाला शिकवून गेली. १७४० साली झालेल्या या घटनेला आज ३०० वर्षे होत आलीत आणि तरीही ती मराठी साहित्यात, मराठी मनात वारंवार तिच्या व्यक्तिमत्त्वाचे उल्लेख येतात. परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराला कायम  थट्टेचा, टिंगल-टवाळीचा उपसर्ग पोहोचला आणि तो अबाधित राहिला, म्हणूनच आजही या ३०० वर्षांत महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नाव ‘मस्तानी’ असे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थाना ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला. म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी, मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली, ती अशी.

मस्तानीची दुसरी ओळख आहे, ती म्हणजे रखेल मस्तानी, नाची मस्तानी, कंचन मस्तानी आणि तिची शेवटची ओळख म्हणजे तिने पान खाल्ल्यानंतर पानाची पिंक तिच्या गळ्यातून खाली उतरताना दिसायची व ती पान खाऊन सज्जात बसायची त्याला लोक ‘मस्तानीचा सज्जा’ म्हणून ओळखत. मस्तानी या पद्धतीने इतिहासपटलावर प्रतीत झाली.
परंतु खरंच मस्तानी अशी होती का? काय आहे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य?

मस्तानीला समजून घ्यायचे असेल तर प्रथम आपल्याला छत्रसाल महाराजांना समजून घ्यावे लागेल. राजा छत्रसाल महाराज हे प्रौढप्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उद्गाते, बुंदेल खंडाचे भाग्यविधाते. आजही बुंदेल खंडात परमेश्वराअगोदर त्यांची पूजा केली जाते. ‘छत्रसाल महाबली! कर दे भली! कर दे भली!’ अशी प्रार्थना म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. एवढे मोठेपण हिंदुस्थानातील कोणत्याही राजाला लाभले नाही. छत्रसाल महाराज हे प्रणामी पंथाचे होते. प्रगत, उदारमतवादी प्रणामी पंथात हिंदू-मुस्लीम या धार्मिक भेदास मान्यता नव्हती. वेद आणि कुराण यातील ईश्वर एकच असून, मनुष्यमात्राची समानता, धार्मिक सहिष्णुता आणि निरामय प्रेमभावना ही या पंथाची तत्त्वे होती. या प्रणामी पंथास निगडित असलेली खूप मोठी मोठी नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महात्मा गांधी यांचे. ते व त्यांचे कुटुंब हे प्रणामी पंथीय होते. हे ऐकले तर आश्चर्य वाटेल; परंतु हे सत्य आहे.

अशा पंथातून, अशा संस्कारातून मस्तानी आली होती. ती छत्रसाल महाराजांना यवन उपपत्नीपासून झाली होती. प्रणामी पंथाच्या तत्त्वाप्रमाणे हिंदू-मुस्लीम भेद हा तर ग्राह्य धरत नसत. त्यामुळे मस्तानी ही छत्रसालांची औरस राजकन्याच ठरते. तिचे शिक्षण, संगोपन, तिच्यावरचे धार्मिक, सामाजिक संस्कार हे छत्रसालानेच केले होते. म्हणूनच ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. वैभवात ती राहिली होती. गजान्तलक्ष्मीचा अनुभव तिला होता. तिच्या पिखादीला (अंगरखा) गुंडी म्हणून हिरे लावण्यात येत असत आणि हे हिरे त्या काळात लाख लाख रुपये किमतीचे असत.

अशा या लाडक्या, राजकन्येचा मस्तानीचा खांडा पद्धतीने बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. छत्रसाल राजाने त्या वेळी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा जहागिरीचा प्रदेश व पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील तिसरा हिस्सा भेट दिला. ही भेट म्हणजे बुंदेल खंडावर आक्रमण करणाऱ्या महमंद बंगषाला बाजीरावांनी पराभूत केल्याची कृतज्ञता होती. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा सरदार होते. मस्तानीच्या लग्नाच्या निमित्ताने छत्रसाल राजाने मराठे व बुंदेला ही सोयरीक निर्माण केली. बाजीरावांचाही या विवाहामागील हेतू पाहिला तर मस्तानी लावण्यवती होती, एवढाच नव्हता, तर  बाजीरावांनी तो एक राजकीय व्यवहारच केला होता. बाजीरावांचे दिल्ली हे निश्चित लक्ष्य होते आणि त्यासाठी त्यांना बुंदेल खंडासारखे संपन्न आणि मोगलांचे शत्रूराज्य कायम आपल्या बाजूने राहणे गरजेचे होते. ही गरज बाजीरावांनी ओळखली होती. पुढे पुढे मात्र या व्यवहारात भावनिक जवळीक निर्माण झाली. छत्रसालांनी बाजीरावांना आपला मुलगाच मानले. छत्रसालाच्या मृत्यूनंतर बाजीरावांचे सांत्वनपत्र उपलब्ध आहे. त्यात ते छत्रसाल पुत्रास म्हणतात, ‘हाल मालुम भयो, श्री श्री श्री महाराज ककाजू साहिब को वैकुंठवास हो गयो, बडी भारी रंज भयी.’

‘महाराजने हम कौ लडम्का कर कै मानो है, सो मैं वही तरह आप को अपनौ भाई समझे हो.’ पत्राची तारीख आहे शनिवार, २३ सप्टेंबर १७३२. सदर पत्रातून  बाजीरावांचा आणि मस्तानीच्या परिवाराबद्दलचा जिव्हाळा किती होता, हेच दिसून येतं. बाजीरावांनी केवळ सौंदर्यवती मस्तानीला पुण्यात आणले नाही, तर त्यांनी मस्तानीसोबत प्रणामी पंथाची भेदाभेदातीत निरामय प्रेमतत्त्वाची, अनोखी जीवनदृष्टीही आणली होती. हा नाही म्हटला तरी पुण्यातील लोकांना धक्काच होता आणि आव्हानही. त्यातच  बाजीराव-मस्तानी यांच्या परस्परासंबंधीच्या निष्ठा फारच पक्क्या होत्या. परस्परांतील प्रेमही अतूट होते.

सुरुवातीची तीन वर्षे मस्तानीची ठीक गेली. त्यातील निजामभेट, कोकण मोहीम सात-आठ महिने. त्याअगोदर डबईचे युद्ध आणि नंतर उत्तरेची मोहीम. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर मस्तानीला रायांचा सहवास असा नव्हताच. पेशवे कुटुंबाचेही तसे दुर्लक्षच होते. एक रखेल या पलीकडे मस्तानीचे अस्तित्व पेशवे कुटुंबाच्या लेखी नव्हते.

परंतु मस्तानीस जसा समशेर हा मुलगा झाला, तसे पेशवे कुटुंबास एका भीतीने ग्रासले की, कदाचित मस्तानीचा वंशज पेशव्यांच्या गादीवर हक्क सांगेल. झाले त्याच दिवसापासून मस्तानीच्या खच्चीकरणास सुरुवात झाली. त्यात तिला नाची कंचनी ठरविले. तिला मद्य पिणारी- प्राशनी ठरविले. एवढेच नाहीतर या संकटास कायमचे पंगू करण्यासाठी  बाजीराव-मस्तानी हा संबंध वैवाहिक नाही, ती पत्नी नसून रखेल आहे, शिवाय ती खानदानी नसून ती निजामाच्या रक्षेची मुलगी आहे, शहाजन खानाची कलावंतीण आहे- अशा कपोलकल्पित गोष्टींचा पुण्यात बोभाटा सुरू केला.

आणखी एक आवई अशीच उठवली गेली, ती म्हणजे मस्तानी आल्यामुळे बाजीरावांचे काशीबाईंवरील लक्ष उडाले. परंतु वास्तवात मात्र मस्तानीचे व काशीबाईंचे संबंध सौहार्दाचे होते. मस्तानी आल्यानंतर ही काशीबाईंना तीन अपत्ये झाली. यातून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे चारही बाजूंनी मस्तानीवर हल्ले होत होते. यात थोडा अंकुश होता, तो शाहू महाराजांचा.

त्यातच  बाजीरावांनी मस्तानीला तीन गावे इनाम दिली. पाबळ इथे मोठा वाडा बांधला. शनिवारवाडय़ात प्रशस्त हवेली बांधली. एवढे नव्हे तर, समशेरच्या मुंजेची तयारी सुरू झाली.

या सर्व गोष्टींनी पेशवे कुटुंब धास्तावले. त्यांचा विरोधास आणखीनच धार चढली. त्यातच या लढय़ात पुण्यातील ब्रह्मवृंद उतरला आणि बघता बघता राजकारणात व रणभूमीवर महाप्रतापी ठरलेले बाजीराव कौटुंबिक संघर्षांत मात्र पराभूत झाले.

पेशवे कुटुंबाने मस्तानीला अटक केली. मस्तानीला मारण्याचे गुप्त मनसुबे रचले गेले. खरे तर मस्तानी ही योद्धा होती. तिने दिल्लीच्या मोहिमेत बाजीरावांच्या रिकिबीला रिकीब लावून घोडा पळविला होता; परंतु इथे मात्र बाजीरावांच्या अनुपस्थितीत एकटी मस्तानी असहाय्य झाली, अगतिक झाली. ती सहनशीलतेची ढाल पुढे करून जगण्याची पराकाष्ठा करीत होती; परंतु अखेरीस ती कोसळली.
आजही मस्तानी-बाजीरावांचे इंदोर येथील वंशज म्हणतात ते खरेच! मस्तानीला मराठी मुलखाने न्याय दिला नाही. मस्तानी ही कधीच सत्तालोलुप नव्हती. महत्त्वाकांक्षी नव्हती. सुखलोलुप नव्हती. तसे असते तर एवढे बुंदेला येथील वैभव, ऐश्वर्य, आई-वडील आपला मुलुख सोडून ती हजार किलोमीटर एवढय़ा दूर पुण्यात आली नसती, यावरूनही ते सिद्ध होते. ती पुण्यात आली. राहिली. तिने इथली भाषा, पेहराव स्वीकारला. राऊंच्या पाठोपाठ काशीबाईंचे प्रेम मिळवले. मात्र ही पुण्याई तिच्यासाठी तुटपुंजी ठरली.

इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात निर्दोष समाज हा भारतात कधीच नव्हता, आजही तो नाही. आणि तो तर तीनशे वर्षांपूर्वीचा काळ होता. परंतु, बाजीरावांनी सामाजिक सौहार्दाचा प्रकाश मस्तानीच्या रूपात पाहिला होता. तो मस्तानीच्या रुपाने त्यांना मराठी मुलुखात पेरायचा होता; परंतु तत्पूर्वीच बाजीराव मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची खबर ऐकताच मस्तानीही त्या धक्क्याने पाबळ येथे मृत्यू पावली.

सर्वसाधारण समज आहे, की मस्तानीमुळे बाजीरावांची राजकारणावरील पकड ढिली झाली, दुर्लक्ष झाले. व्यसनाधीनता वाढली; परंतु तो समज निखालस खोटा आहे. मस्तानी बाजीरावांच्या जीवनात आली ते वर्ष आहे इ. स. १७२२. यानंतर ११ वर्षांत त्यांनी १२ लढाया केल्या आणि मस्तानीच्या अगोदर त्यांनी १० लढाया केल्या आहेत. दुसरी गोष्ट मस्तानीमुळे गृहकलह पेटला असतानाही परकीय नादीर शहाचे आक्रमण होताच सबंध हिंदुस्थान वाचवण्यासाठी त्यांनी नर्मदेच्या तटावर सैन्य उभे केले होते. दक्षिणेत नादीर शहा उतरला नाही, यातील एक प्रमुख कारण बाजीराव होते. नादीर शहापाठोपाठ त्यांचे नासीरजंगाशी युद्ध झाले, त्याला पराभूत केले. हे युद्ध मोठे होते. आपल्यावर व मस्तानीवर होणारी बदनामी तलवारीच्या टोकावर झेलत  त्यांनी मराठी राजकीय सत्तेची पुनर्रचना केली. त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. होळकर, पवार, खेर (बुंदेला) शिंदे या मराठा सरदारांची नर्मदेपलीकडे अभेद्य फळी उभी केली, तो त्यांच्या व्यवस्थापनाचा व दूरदृष्टीचा महनीय नमुना होता.

चारित्र्यसंपन्न, निव्र्यसनी, बुद्धिमान, कष्टाळू, अलोट देशप्रेम अशा बाजीरावांच्या अकस्मात मृत्यूने मराठी राजसत्तेवर दूरगामी परिणाम झालेले आपल्याला आढळतात. वयाच्या विसाव्या वर्षी ते पेशवे झाले आणि चाळिसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे राजकीय आयुष्य फक्त २० वर्षांचे. या २० वर्षांत त्यांनी ज्ञात २२ लढाया केल्या. आपल्या सरदारांच्या ३००च्या आसपास लढायांचे व्यवस्थापन केले व मुख्य म्हणजे ते अजिंक्य राहिले. बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही हेच. ना हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गुलाब गळून पडला, ना त्याच्या सौंदर्यास किंमत, ना त्याच्या सुगंधास. तो फक्त अणकुचीदार काटय़ांना धनी झाला.

खरे तर हा महाकादंबरीचा विषय. मस्तानीचे खरेखुरे वास्तववादी जीवन लोकांपुढे यावे, असा एक प्रयत्न प्रामाणिकपणे होण्याची गरज होती. तो प्रयत्न निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांच्या विजया राणे दिग्दर्शित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव-मस्तानी’ या ‘ई  टी. व्ही. मराठी’वरील मालिकेतून सध्या घेतला जात आहे. मस्तानीच्या अगम्य व्यक्तिरेखेचे रहस्य उलगडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

Monday, 23 March 2015

पळस … रंग माझा वेगळा



फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरु होतो आणि घरोघरी परीक्षेचे वेध लागतात. भरदिवसा वातावरणात एक गूढ गंभीरता भासू लागते,  उष्णता जाणवू लागते. अगदी याच दिवसात पानगळ झाली असते शिशिर संपून नुकतीच वसंताची चाहूल लागलेली असते इतरत्र झाडांची पानं गडद रंगाची झाली असतात काही पिकलेली तर काही गळलेली दिसतात. ऋतू बदलणार असतो आणि निसर्गही नवा रंग नवे सौंदर्य ल्यायला आसुसलेला असतो. इकडे वातावरणाच्या या जरा कोरडेपणाने मन विषन्न होतं आणि गारवा शोधायला भटकू लागतं. मग अलगद पाय बाहेर वळतात. रोजच्या धकाधकीतून दूर रोजच्या परिसरातून वेगळा असा रस्ता शोधत आपली पावले मग शहरापासून दूर जाण्यास प्रवृत्त होतात.


शहर सोडले आणि आपली गाडी हायवेला लागली कि रणरणत्या उन्हातले मखमली सौंदर्य दृष्टीपथास पडतं. ऐन ज्वानीच्या भराला आलेली , तारुण्यानं मुसमुसलेली अंगभर केसरी-लाल रंग ल्यायलेली रस्त्याच्या दोन्ही कडेची वाऱ्यावर अलवार झुलणारी आणि त्यावर फुललेली ती अगणित केसरफुलं हिरवेपणात विलीन होणारी तरीही 'रंगात सार्या रंगुनी रंग माझा वेगळा' असे ठळकपणे सिद्ध करणारी 'पळसा'ची फुलं बहरून आलेली एक एक शृंगारलेणी लेवून सज्ज झालेली दिसतात. एरवी वर्षभर कधीही न दिसणारी अतिशय रेखीव आकर्षक अशी हि फुलं. अश्या सौंदर्याचा आताशा निव्वळ मागमूस लागलेला असतो. सुरुवातीला एक दोन झाडं दिसतात आणि आपण ते नजरेने टिपतो न टिपतो तोच गाडी पुढे निघून जाते. आपण थांबायला हवं होतं का? जरा वेळ त्या केसरी रंगात विलीन व्हायला हवं होतं … काहीतरी मिस झालंय असा विचार मनात येतो न येतो आपण जंगली भागात शिरलेलो असतो आणि काय आश्चर्य गाडीच्या समोरच्या काचेतून दूर दूर दिसणारा तो उतार चढावाचा काळभोर उन्हात चमचमणारा रस्ता दोन्ही बाजूने केसरी रंगात न्हाउन निघालेला दिसतो. झाड फुलांनी गच्च लगडलेलं आणि खाली जमिनीवर पाकळ्यांची पखरण …आपण पुन्हा सावरून बसतो. एक एक फुलांनी बहरलेले झाड मागे सोडत गाडी पुढे जात राहते आणि निसर्गाची, सौंदर्याची आवड असलेले आपण आसुसलेपणाने दोन्ही काचेतून वळून वळून बघत हे रंग हे सौंदर्य नजरेनेच पीत राहतो अंगांगात भिनवत जातो. हे सगळं आपल्यासाठी आहे असा भास होऊ लागतो आणि निसर्गाने मुक्तहस्ताने लुटलेल्या या सौंदर्याचा आस्वाद घेतांना 'बहारो फुल बरसाओ मेरा महेबूब आया है' गाण्याची आठवण होते… वैतागलेले मन पुन्हा फुलून येते. हे केसरिया कोमल, निष्कलंक, सात्विक रूप पाहून आत्मिक शांत समाधानी आनंदाचे तरंग वाहायला लागतात… सुख सुख म्हणतात ते हेच तर असते असे मनाला पटवून द्यायला दिवसाच्या उत्तरायण मध्ये आपण गाडी थांबवून बाहेर येतो नजरेने वेचलेले सौंदर्य, रंग गंध आता श्वासात भरून घ्यायचे असतात …. हि फुले बघतांना अनेक हळव्या आठवणी ताज्या होतात.…मन भूतकाळात उचंबळ खातं . डोळे अलगद पाणावतात. ओठांवर अजूनही स्मित वसलेलं असतं…

नजरभर सौंदर्य, ओंजळ भरून फुलं आणि मनभरून गारवा लुटून घेऊन पुढल्या निदान महिनाभराचा उत्साह साठवत गाडी परतीच्या रस्त्याला लागते.

आठवणीचा पळस मात्र मनात उमलून फुलून बहरत राहतो.
































Tuesday, 17 March 2015

"उजाडलं आई?" - एक अतिशय आवडलेला लेख


'कारट्या, किती भूक भूक करशील...' घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे करताना बघणे यातून आईवडीलांना खूप खूप समाधान मिळत असते.
पण हे झाले सर्वसामान्य, खाऊनपिऊन सुखी घरातले चित्र. जिथे या भुकेमागे भयाण दारिद्र्याचा काळाकुट्ट भेसूर पडदा असतो तिथे ही नैसर्गिक भूक अगदी भयानक, विदारक रूप धारण करते. शाळकरी वयातला कृष्णा हा असाच वाढत्या वयाचा मुलगा. त्याचे पोरपण अजून संपलेले नाही. दारिद्र्य, गरीबी याची त्याला जाणिवही नाही. भूक लागली की खायला हवे इतक्या निरागस त्याच्या भावना. तो शाळेतून घरी येतो तोच भुकेने कलकलून. त्याचे घर म्हणजे तरी काय,एका बाजूला तट्टे आणि दुसऱ्या बाजूला रॉकेलच्या डब्यांचे गंजलेले पत्रे लावून कसाबसा केलेला आडोसा. त्यातच सतत धूर ओकणारी ओलसर चूल. खोकल्याच्या उबळीने प्राण कंठाशी आलेली त्याची आई, खंगत चाललेली त्याची बहीण दुर्गी, जिच्या दवाखान्यातल्या नोकरीच्या तीस रुपये महिना पगारावर कसाबसा संसार चालतो ती कामाने दमून चिंब झालेली दुसरी बहीण शकी आणि अठराविश्वे दारिद्र्याबरोबर झट्या घेणारा, छातीत डाव्या बाजूला तापलेली सुई खुपसावी तसे होत असताना हेडक्लार्कच्या घरी दोन गाड्या लाकडे माळ्यावर रचून लोळागोळा झालेला त्यांचा बाप दाजी....
कृष्णाला घरी खायला काही नसते. त्याचा चहाही गरम झालेली नसतो.कोमट काळसर गुळाच्या चहाचा कप त्याच्यासमोर आई आदळते. "अगदी दुष्काळात जन्मलंय कारटं.." ती करवादते. "नुसता चहाच प्यायचा? ते कालचे चिरमुरे संपले?" कृष्णा चिडून विचारतो. तेलहळद लावलेले ते मूठभर चिरमुरे कधीच संपलेले असतात. कृष्णा परसात जाऊन उभा रहातो. समोरच्या घरातली मुले पोह्याच्या ताटल्या घेऊन बाहेर आलेली असतात. भूक असह्य होऊन आपल्या घराकडे भीतभीत पहात कृष्णा एकापुढे हात करतो. तो मुलगा आपला रिकामा हात फटदिशी कृष्णाच्या हातावर मारतो....
शेजारच्या वकीलांच्या परसात दोडके, दुधी भोपळे फोफावलेले असतात. ते चोरून भटाच्या भाजीच्या दुकानात विकले की भट दोन आण्याचे बटर, बिस्कीटे देत असतो. या वेळी कृष्णा ते चोरत असताना भोपळ्याचा मांडवच कोसळतो आणि वकीलांचा गडी कृष्णाला बेदम मारतच घरी घेऊन येतो. "मी कशाला घेऊ यांची भाजी?" हुंदके देत कृष्णा खोटे बोलतो...
कृष्णाची आई कण्हत कसाबसा स्वयंपाक करत असते. स्वयंपाक म्हणजे काय..घरात भातापुरते तांदूळही नसतात. दुपारच्याच अपुऱ्या भाकरी, तुरट, बियाळ वांग्याच्या फोडी आणि मूठभर डाळ घातलेली लालसर बेचव आमटी आणि गाठी झालेल्या एवढ्याशा डांगराच्या पिठात घातलेले थेंबभर काळसर ताक.... हेच त्यांचे जेवण.तेही अपुरे. दुर्गीला अन्नाची वासनाच नसते. तिचा भाकरीचा चूर खाऊनही कृष्णाची भूक तशीच रहाते. वाढत्या वयातील मुलाच्या पोटातील न संपणारी भूक...
सगळेच अंधारात आडवे होतात. कृष्णाला काही झोप येत नाही. अंधारातच तो खुडबुड करू लागतो.चुरमुऱ्याच्या डब्यातले खालचे उरलेले तिखट, आईने ठेवलेले उपासाचे दाणे..त्याला काही काही सापडत नाही. घटघटा पाणी पिऊन तो परत आडवा होतो. शेजारची आचरट पोरे कृष्णाच्या घराच्या पत्र्यावर दगड फेकण्याचा खेळ सुरु करतात. गल्लीतली कुत्री वचावचा ओरडू लागतात..
"खीर खीर म्हणून बाळाने हट्ट धरला, म्हणून केली कपभर, पण त्याने बोटसुद्धा लावलं नाही. शिवाय ही बटाट्याची भाजीदेखील उरली" शेजारच्या घरातून आवाज येतो "काय करायचं आता?"
"आता असं कर.. सकाळी ते सगळं देऊन टाक शेजारी.."
कृष्णा एकदम खुलतो. 'सकाळी देण्याऐवजी आत्ताच का देत नाहीत? मी स्वतः जाऊन आणतो हवे तर..'पण शेजारचे घर बंद होते..
घरात घुशींची खरखर सुरु होते. आईला बरगड्या बाहेत पडतील की काय अशी खोकल्याची ढास लागते. न संपणारी लांबलचक काळी रात्र सुरु होते..
कशाने तरी कृष्णाची झोप चाळवते. "उजाडलं आई?" तो आशेने विचारतो. अजून रात्रच आहे हे पाहून तो हिरमुसतो आणि काही तरी बडबडत पुन्हा झोपतो..त्याच्या झोपेत येते ती खीर. शेवयांची, केशरी रंगाची, मधून-मधून बेदाणे असलेली चांगली पातेलेभर दाट खीर...!!!
- कथेचे नाव 'रात्र झाली गोकुळी' लेखक अर्थातच जी.ए.कुलकर्णी.


"उजाडलं आई?" हा कृष्णाचा प्रश्न कृष्णाची सारी वेदना व्यक्त करून ह्रदय कापीत जातो. अशी ही ह्रदय पिळवटून काढणारी कृष्णाची आणि त्याच्या गोकुळाची कहाणी. असे कोट्यवधी कृष्णा महान सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या भारत-भूमध्ये केविलवाणे जीवन निमूटपणे जगत आहेत. स्वातंत्र्य आले, योजना आल्या आणि गेल्या, कार्यक्रम आले, राबताहेत, पण कृष्णा आहे तिथेच आहे. रात्र संपून उजाडण्याची वाट पहात आहे... - धनंजय आचार्य...

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...