Thursday, 26 February 2015

संस्कृती पतनाचा महोत्सव !!



भारतीय संस्कृतीचा विचार करायला लागलो कि मनात अनेक भाव निर्माण होतात. अनेकविध संस्कृती तसे अनेक भाव. विविधतेत एकता शोधणारा म्हणून साऱ्या विश्वात आपण ओळखले जात असलो तरी खरच अनेकतेत एकता आहे का हा अभ्यासाचाच विषय आहे.

संस्कृती म्हणजे नेमके काय ?

संस्कृती हा शब्द एखाद्या समाजाला उद्देशून उद्गारला जातो ती जबाबदारी त्या समाजातील त्या गटातील म्हणजेच देशातील सर्वांची समान आहे कि मग धर्मप्रदाय, जातनिहाय ती ज्याने त्याने आपआपली सांभाळायची असते. हे मला तरी अजून समजलेले नाही. आणि संस्कृती जपणे म्हणजे तरी काय ? पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या, ग्रंथ-साहित्यात नोंदवून ठेवलेल्या गोष्टींचा नोंदींचा तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीनुरूप विचारही न करता आजच्या आपल्या शिक्षणातून मिळालेल्या दृष्टीला गृहीतही न धरता डोळे झाकून केलेल्या अनुकरणाला धर्म किंवा संस्कृती जपणं म्हणता येईल का ?

दिवसेंदिवस आपल्या संस्कृतीचे आपल्या सणांचे बदलत जाणारे रूप पाहिले कि कसनुसंच होतं. धर्मांचे होत चाललेले विघटीकरण किंवा माणसांच्या भावविश्वातून नाहीसं होत चाललेलं संवेदन-माणूसपण कुठेतरी संस्कृती जपण्याऐवजी तिला विकृत रूप देण्यास उत्सुक झालेला आहे अस जाणवतं. विविधतेत एकत्र जगतांना एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा वाढीला लागण्याऐवजी तो एकमेकांसाठी विघातक का ठरत जातोय ह्याचा वैचारिक पातळीवर गहन अभ्यास होणे गरजेचे आहे. पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरेतील आपला सांस्कृतिक वारसा म्हणजे आपले उत्सव आपले सण. पण ह्या सर्वांना आज प्राप्त झालेले स्वरूप पाहिले कि सुन्न व्हायला होतं. सण-उत्सव हे संस्कृती जपायला म्हणून नाहीच मनवले जात हल्ली तसा तो त्याचा वास्तववादी उद्देश कधीच मागे पडलाय आज प्रत्येकाचा महोत्सव होत चाललाय … 'संस्कृती पतनाचा महोत्सव'.


उंचावत जाणारा डॉल्बीचा आवाज... तो आवाज वापरण्याची रात्रीचीही वाढत जाणारी वेळ .... मूर्त्यांची वाढत जाणारी उंची .....बळी-कुर्बानी-हलाली अश्या भंपक रीवाजांच्या नावाखाली प्राणी हत्या, दहीहंडींचे वाढत जाणारे थर ....विवाह सोहळ्याचे प्रदर्शन, भावनांचे बाजारीकरण, पर्यावरणाचे होणारे दुशितीकरण अशा अनेक गोष्टींना .. . आपली वैचारीक पातळी व मूल्ये यांच्या घसरत चाललेल्या खोलीचेच प्रतिक समजू नये काय?

नुसतीच घसरण आणि अंधारे खड्डे ….खोली कुठे आहे ? विचारांची खोली …

विचारांची आणि वागण्याची सांगड घालताच येत नाहीये बहुदा आपल्याला किंवा तसे त्याचे गांभीर्य अजून आमच्या पचनीच पडत नसावे. शिक्षणाने खरेतर समाजात सुसंस्कृती घडावी अशी किमान अपेक्षा असते आपण नुसतेच सुशिक्षित होतोय आणि इतके शिकून त्याचाही पुरता अर्थ आमच्या ध्यानात येत नसेल तर समाजात समाजासाठी समाज म्हणून जगण्याचा आम्हाला कितीसा अधिकार असावा. आता विचार करण्याची वेळ आली आहे. स्वतःपासून सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्नपूर्वक उठून उभे होण्याची वेळ आली आहे. संस्कृती जपण्याची गरज असली तरी आजच्या सामाजिक परिघाचा विचार करून जाणीवपूर्वक बदल घडवण्याची वेळ आली आहे. चला संस्कृती पतनाचा महोत्सव थांबवूया.



(24 feb 2015 ला 'सकाळ' मुख्यअंक पान क्र. ७ वर प्रकाशीत)

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...