Tuesday, 21 February 2023

दुसऱ्या लग्नाची गोष्ट...

 'एक नयी आझादी का जश्न मनाओ - Begin again with a Smile'  या टॅगलाईनने सुरु होणारी कोलगेटची एक अत्यंत सुंदर जाहिरात टीव्हीवर येते. एक ज्येष्ठ महिला अत्यंत आनंदात मुलं-सुना, लेकी आणि नातवंडांना हॉटेलमध्ये पार्टीला बोलावते.. सगळे एकत्र आल्यावर जरा वेळात एक समवयीन तिच्याचसारखा  उत्साही आनंदी इसम तिच्या शेजारी येऊन उभा राहतो. 'हा कोण?' असा प्रश्नार्थक भाव घेऊन सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघतात तेव्हा ती बोटात घातलेली अंगठी दाखवते. म्हणजे या ज्येष्ठ महिलेने तिच्यायोग्य वर शोधून स्वतःचेच लग्न जुळवले असते.. आणि या निर्णयानं संपूर्ण कुटुंब आनंदी होताना आपल्याला दिसतं. ही माझी फार आवडती जाहिरात आहे खरंतर, पण एखाद्या ज्येष्ठ महिलेने किंवा पुरुषाने त्यांचा लग्नाचा जोडीदार गेल्या नंतर स्वतः पुन्हा लग्न करणे वगैरे ही संकल्पना अजूनही या जाहिरातीत दिसते तितक्या सहजपणे आपल्या समाजाला स्वीकारार्ह नाही. सामाजिक संस्कारच या पद्धतीचे असतील तर कितीही गरज वाटली तरी घरातील एकल ज्येष्ठासाठी जोडीदार शोधून त्यांचे लग्न लावून देण्यासारखा निर्णय एखाद्या कुटुंबासाठी विचारांच्या पलीकडले, अधिक धारिष्ठ्याचे किंवा प्रस्थापितांची-गणगोतांची नाराजी ओढवून घेण्यासारखे ठरू शकते.


असेच नुकतेच कोल्हापुरात युवराज शेले या तरुणाने विधवा आईचे दुसरे लग्न लावून दिले. त्यासाठी त्याने स्वतः आईसाठी वर शोधला आणि नंतर आईला महत्प्रयासाने या लग्नासाठी राजी केले.हे एक धाडसाचे उदाहरण म्हणून सर्वत्र चर्चिले जात आहे. समाजातील रूढीपरंपरांना डावलून, अनेकांचा रोष पत्करून खुद्द मुलाने आईचे लग्न लावून देण्याइतके धाडस कुठून मिळाले असेल या तरुणाला? कुठून मिळाली ही प्रेरणा ? तर.. ह्या प्रस्थापित रूढीपरंपरांनी चालत आलेल्या रितीभातींमुळे स्त्रियांची विशेषतः एकल स्त्रियांची होत असलेली घुसमटच ह्या घटनेला कारणीभूत ठरली असे म्हंटले तर चुकीचे ठरू नये... युवराजचे वडील वारल्यानंतर आईला विधवा म्हणून मिळणारी वागणूक युवराज पाहत होता. आईसोबत अनेक अपमानाचे घोट त्यानेही प्यायले होते. नवरा सभोवती नाही म्हणून आधारहीन समजून विधवा बाईसाठी लोकांच्या नजरा, चुकीची वागणूक त्याने अनुभवली होती... शिवाय त्याच्या शिक्षण नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेल्यानंतर आईला येणारे एकटेपण ती कशी सहन करेल हा प्रश्नही त्याच्या मनाला पोखरत होता..आईच्या काळजीने, तिला आधार मिळावा म्हणून आणि योग्य सोबती असावा म्हणून त्याने नात्यातीलच एका व्यक्तीशी आईचे लग्न लावून दिले. यासाठी सर्वत्र कौतुक होत असले तरी असे धाडसी पाऊल उचलणारा युवराज शेले हा पहिला तरुण नाही. २०२१ साली देबर्ती चक्रवर्ती नावाच्या शिलॉंगच्या एका लेकीने ट्विटरवर आईसाठी वर शोधायला म्हणून जाहिरात टाकली होती ज्यावर साधक-बाधक चर्चेला पेव फुटले आणि तिची पोस्ट प्रचंड वायरल झाली होती.. देबर्तीचे वडील ती २ वर्षांची असताना वारले त्यानंतर मुलीसाठी आईने अनेक वर्ष एकटीने काढले. आईचे अव्यक्त दुःख या लेकीने समजून घेतले आणि सुयोग्य वर शोधून ५० वर्षीय आईचे लग्न लावून दिले. मार्च २०२२ साली राजस्थानच्या जयपूरमधील दोन बहिणींनी ५३ वर्षीय आईचे असेच लग्न लावून दिले. आई लग्नाला तयार नसताना मॅट्रिमोनी साईटवर आईची माहिती टाकून, सुयोग्य वर शोधून..आईला जोडीदाराचे महत्व पुन्हा समजावून सांगत, समाजाच्या दबावांची कोंडी फोडत या मुलींनी धुमधडाक्यात आईचे लग्न लावून दिले होते.  

आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित 'स्त्री-पुरुष सहजीवन' हे पुस्तक १९६०च्या आसपास विनोबा भावे आश्रमाच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले होते. यामध्ये गांधींजींच्या मांडलेल्या विचारांमध्ये स्त्रियांबाबतची समाजमानसिकता उद्धृत करण्यात आली होती. स्त्रियांचे बंदिस्त जीवन खुले करण्यासाठी समाजाची मनसिकता आधी खुली करायला हवी, असे गांधीजींनी म्हटले होते. स्त्रियांना गौण मानले जाते, त्यांची सोशिक म्हणून घडण केली जाते हे थांबवावे आणि तिला, तिच्या इच्छांना, तिच्या विचारांनाही सन्मान द्यावा, असा विचार होता. हाच विचार लक्षात ठेवत स्त्रियांसह ज्येष्ठांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगण्याची संधी देण्याचा आणि त्यासाठी समाजमन खुले करण्याचा प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात केला जायला हवा. खरतर स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करताना आणि २१ व्या शतकात मार्गक्रमण करत असताना तर्काधीष्टीत या गोष्टींची आताता फक्त सुरुवातच झाली आहे. विशेषतः तरुणांमध्ये ही जागृती येते आहे त्यामुळे पुढल्या पिढीला तरी एकल माणसांच्या व्यथा समजतील आणि ते समजुतीची कास धरतील अशी आशा वाटते.

 एकेकट्या माणसांना, विशेषतः ज्येष्ठांना मानसिक, भावनिक, शारीरिक आधाराची गरज असते. आयुष्यभर जोडीदाराच्या साथीने वाटचाल करत असतानाच उतारवयात परिस्थितीने आलेले एकाकीपण कुढत काढण्यापेक्षा समवयस्क जोडीदाराच्या साथीने ते अधिक सुखकर करण्याची संधी मिळावी; तसेच लग्नासारख्या सोपस्कारांमध्ये या वयात न अडकता संपूर्ण स्वातंत्र्यानिशी हे सहजीवन अनुभवता यावे, अडीनडीला कोणी सोबत असावे, आजारपणात कोणीतरी साथीला यावे आणि आयुष्याचा उत्तरार्ध कुणाच्यातरी सहवासाने सुखकर व्हावा या संकल्पनेअंतर्गत काही वर्षांआधी नागपूरमध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन ज्येष्ठांसाठी लिव्ह इन रिलेशनशीप मंडळाची स्थापना केली होती. 

कोरोना नंतरचा काळ देखील खूप बदलला आहे. अनेक लोकांच्या जाण्याने चाळीशीनंतरचे त्यांचे जोडीदार एकटे पडले. इतके असूनही पुनर्विवाहाचा विचार करताना मात्र त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उभे राहतात.. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय विचार करतील किंवा मिळणारा जोडीदार चांगला मिळाला नाही तर आज आहे त्यापेक्षा जास्त कुचंबणा होण्याची शक्यता, मुलं असतील तर नवा जोडीदार त्यांना स्वीकारेल का, मालमत्तेवर असलेल्या अधिकारांचे वाटप, असे अनेक प्रश्न उभे राहतात. सुखाच्या शोधात पुन्हा दुःखात पडायच्या भीतीने अनेकजण एकाकी आयुष्य ओढत काढणं पसंत करतात. या सगळ्यांवर तोडगा म्हणून लिव्ह इन रिलेशन ही एक चांगली संकल्पना ठरू शकते. दोन माणसांनी एकत्र येऊन काही काळ एकत्र घालवल्यावर त्यांना वाटले तर लग्न करावे अथवा आपापल्या वाटा वेगळ्या कराव्या. आयुष्याच्या संध्याकाळी कुणाची तरी सतत सोबत असावी असे वाटत असताना ‘लिव्ह इन’ रिलेशनकडे डोळसपणे पाहण्याची आणि स्वतःसाठी जगण्याची गरज आहे. याशिवाय जबाबदार समाज म्हणून प्रत्येकाने नव्याने जोडीदार मिळवणाऱ्या माणसांकडे समजूतदार नजरेने पाहणे गरजेचे आहे. 

रश्मी पदवाड मदनकर

21 January 2023 - महाराष्ट्र टाइम्स 'मैफल' पुरवणीत (आॅल एडीशन) प्रकाशित लेख..




Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...