अनेकदा आयुष्य एका लयीत सगळं आलबेल असण्याच्या भ्रमात सुरु असतं..आपण रमत राहतो, गाफील होत जातो. अचानक एखादं वळण, एखादा अपघात, एखादा हादसा होतो आणि सुरळीत चालू असलेलं आपलं आयुष्य अगम्यतेच्या वाटेवर येऊन ठेपतं. होय असं घडतं बरेचदा.. फक्त ती अगम्यतेची वाट प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींचे हे असे किस्से कळतात-पचतात. काहींचे किस्से आपल्या आकलनाच्या बाहेरचे असतात म्हणून पटत नाहीत, पचत नाहीत. जे जे काही आकलनाच्या पलीकडचं आहे ते ते सर्व अशक्यतेच्या सोप्या व्याख्येत बसवून आपण मग मोकळे होण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. कारण त्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याची आपली तयारी नसते. पण जे गुढतम काहीतरी आहे किंवा शक्यतेच्या पलीकडचं आहे असं आपल्याला वाटत असतं ते तसं असतंच असं नव्हे.. हे म्हणजे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरेसारखं असू शकतं.. मांजरेनं डोळे मिटले की तिला वाटत असतं सगळीकडे अंधार आहे आपल्याला कुणीच बघू शकत नाही.. इकडे तिच्या भोवतालचं अक्ख जग मात्र तिला उघड्या डोळ्यानं बघत असतं..आणि तिच्यासाठी आपापल्या परीनं मनसुबे रचत असतं.
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Friday, 27 May 2022
गम्य-अगम्य
पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल अमोलच्या (नवरा) मित्राच्या वडिलांचा एक अजिबोगरीब किस्सा ऐकला. त्यांचे वडील प्रचंड आजारी पडले म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. वडील बऱ्यापैकी वयस्क, अल्पशिक्षित आणि खेड्यातच राहणारे.. दैनंदिन व्यवहारापुरतं आणि आयुष्याच्या पाठशाळेतून मिळालं तेवढंच काय ते शिक्षण झालेलं.. इंग्रजीशी त्यांचा नाममात्रही तसा संबंध नव्हता. त्यांना हॉस्पिटलला भरती करावं लागलं आणि जवळ जवळ दिड दिवस ते पूर्णतः बेशुद्धावस्तेत गेले, म्हणजे कोमातच. ज्या दिवशी जागे झाले त्यांच्यात अचानक आश्चर्यकारक बदल झालेले होते.. ते लहान मुलांच्या अविर्भावात इंग्रजी ऱ्हाईम्स म्हणू लागले. एक नाही दोन नाही अनेक अनेक इंग्रजी बालकविता त्यांना मुखोद्गत होत्या. त्यांच्या नातलगांसाठी हे अत्यंत विस्मयकारक होतं.. कारण वडिलांना अश्या अस्खलित भाषेत इंग्रजी येणं कसंही शक्यच नव्हतं, त्यात त्यांचा गंभीर रागीट स्वभाव बघता आता ही अशी गाणी गुणगुणणे किंवा एकंदरीत वागणेच विचित्र वाटत होते. हा काय प्रकार आहे ह्याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा कळाले वडिलांना भरती केले त्याच संध्याकाळी एका इंग्रजी शाळेच्या बसचा अपघात झाला होता.. घायाळ मुलांना याच हॉस्पिटलला भरती करण्यात आले होते, त्यातल्या काहींचा इथेच मृत्यूही झाला होता. सगळा प्रकार हळूहळू काही दिवसात आपोआपच संपुष्टात आला. सगळं नॉर्मल झालं त्यांचे वडील आता एकदम ठीक आहेत. पण ही अनाकलनीय घटना काय होती हे अजूनही गूढच आहे.
अगदी तंतोतंत अशीच एक घटना पुन्हा एकदा ऐकिवात आली. आकोटला नणंदेचे लग्न होते..खूप साऱ्या पाहुण्यांमध्ये नणंदेची एक जिवाभावाची मैत्रीण देखील होती. आमची छान गट्टी जमली होती. पण ती सतत अस्वस्थ उदास होती.. लग्नाच्या कुठल्याही सोपस्कारात तिचं अजिबात लक्ष नव्हतं आणि तिला परत जाण्याचे वेध लागले होते. काहीतरी गंभीर आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी जरा सांत्वन देत, समजून घेत खोदूनच माहिती काढली.. तर ती भळभळून रडायलाच लागली. तिचा किस्साही अगदी सेम आधीच्या किस्स्यासारखा होता. आई प्रचंड आजारी, ५ दिवस कोमात. उठली तेव्हा आई आई राहिलेलीच नव्हती. एक अत्यंत साधारण मराठी कुटुंबातली अल्पशिक्षित गृहिणी अचानक तेलगू भाषेतल्या नामवंत कवयित्रीच्या कविता गुणगुणू लागली होती. गरिबीत तडजोडीनं संसार चालवणाऱ्या बाईला, गावाबाहेरची वेसही न ओलांडलेल्या बाईला तेलगू भाषेबद्दल काहीही माहिती असण्याची शक्यताच नव्हती. कधीही पुस्तकं न वाचणाऱ्या तिला या कवयत्रीच्या कविता तोंडपाठ असणं अशक्यप्राय होतं. तोंडपाठ तर सोडा ती अत्यंत गोड आवाजात तालासुरात त्या कविता गात होती. ती तिच्या तिन्ही मुलींना विसरली होती. नातेवाईकांना ओळखत नव्हती.. मात्र ती तेलगूमध्ये बोलत होती ती काय बोलतेय हे समजणं देखील शक्य नव्हतं. ही मैत्रीण लग्नाला आली तेव्हा महिना झाला होता. आईला घरी आणले होते पण तिची अवस्था तीच होती आणि म्हणून ही अत्यंत अस्वस्थ होती. मी तीनेक महिन्यानं एकदा तिला फोन केला होता तेव्हा बऱ्यापैकी परिस्थिती सावरली होती..आणि मैत्रीण खदखदून हसत 'आमची आई इतकं गोड गळ्याने, सुरात गाते हा नवा साक्षात्कार आम्हाला या निमित्ताने झाला' असं म्हणत होती.
हे सगळं अचानक आठवण्याचं कारण म्हणजे दोन दिवसांआधी 'The In Between' नावाचा छानसा चित्रपट पाहिला आणि अनेक गोष्टी, काही ऐकलेल्या-पाहिलेल्या घटना नजरेसमोरून तरळून गेल्या. फेब्रुवारी २०२२ मध्ये म्हणजे अगदी याच वर्षी आलेला हा अमेरिकन इंग्लिश चित्रपट आहे. चित्रपटाच्या प्रारंभाचाच सिन म्हणजे एक मोठा अपघात.. एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावर निश्चल पडून आहेत. चित्रपटाची नायिका टेसा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येते तेव्हा तिला कळतं की तिचा प्रियकर स्कायलर या अपघातात ठार झाला आहे. पुढे सिनेमा १८२ दिवस मागे घेऊन जातो आणि या दोघांच्या उत्कट प्रेमाचा प्रवास आपण पाहत राहतो. त्यानंतर सुरु होतो फोटोग्राफर असलेल्या नायिकेचा म्हणजे टेसाचा अगम्य वाटेवरचा प्रवास. तिला क्षणाक्षणाला तिच्या अवतीभवती स्कायलरच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. तो तिला काहीतरी सांगू पाहतोय, काहीतरी संकेत देत असल्याचे ती अनुभवत असते.. हे कुणालाही सांगून विश्वास बसण्यासारखे नसते. तिला त्याचे शब्द ऐकू येतात, स्पर्श जाणवतात. तिच्या फोटोग्राफीतून तो तिला अनेक संकेत देत राहतो. त्याला तिला काहीतरी सांगायचे असते.. काहीतरी पोचते करायचे असते. दोघे एकत्र असताना तीव्रतेने वाट पाहिलेल्या आणि शेवटी राहून गेलेल्या कुठल्याश्या अर्धवट गोष्टीच्या पुर्णत्वासाठीची ही धडपड असते. सिनेमाच्या अंतापर्यंत पोचता पोचता आपणही त्यात कसे एकरूप होऊन जातो आपल्याला कळतही नाही.
हा चित्रपट रिलीज होण्याच्या जवळजवळ १० वर्षांआधी एक अत्यंत सुंदर हिंदी सुपरनॅचरल फँटसी रोमँटिक थ्रिलर असलेला चित्रपट येऊन गेला. येऊन गेला यासाठी की फारसा हिट झाला नाही पण ज्यांनी ज्यांनी पहिला त्यांना तो आवडला मात्र नक्की.. त्या चित्रपटाची गाणी अत्यंत अर्थपूर्ण होती..अफलातून गाजली. महेश भट निर्माता असलेला हा चित्रपट होता 'साया'. जॉन अब्राहम, तारा शर्मा आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत होते. मला हा चित्रपट खूप आवडला होता.. अर्थात चित्रपट बनला ती कल्पनाच मला खूप भन्नाट वाटली होती. मी अनेक दिवस या चित्रपटाच्या हॅंगोव्हरमध्ये राहिले होते. ही स्ट्रोरीलाईन कुणाची आहे हे हुडकून काढायचे होते. मला जे आवडतं त्या गोष्टींच्या खूप खोलात जाऊन माहिती घ्यायला मला आवडतं. मी त्यावर वाचन सुरु करते, जाणकार लोकांशी चर्चाही करते. याच प्रयत्नातून कळले की ही संकल्पना मुळात भारतीय नव्हतीच; २००२ साली अमेरिकेत 'ड्रॅगनफ्लाय' नावाने चित्रपट रिलीज झाला होता. 'साया' हा या अमेरिकन सिनेमाचा रिमेक होता. ब्रॅंडन कॅम्प लेखक असलेला ड्रॅगनफ्लाय टॉम शॅडिकने निर्देशित केला होता. दोन्ही चित्रपटांची कथा-पटकथा अगदी एकसारख्या आहेत. मी तर म्हणेन फ्रेम टू फ्रेम सारख्या आहेत.... असो.
या दोन्ही चित्रपटातले नवराबायको असलेले नायक आणि नायिका डॉक्टर आहेत. ते दोघंही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात वगैरे असतात. स्वप्नवत वाटावं इतक्या आनंदात त्यांचा संसार चालू असतो. ७ महिन्याची गर्भवती असणारी नायिका आपत्कालीन परिस्थिती उद्भवली म्हणून, नायकाची इच्छा नसताना वनक्षेत्राच्या आदिवासी अतिदुर्गम भागात मदतीसाठी जातात आणि नायकाला त्यांचा बस अपघातात मृत्यू झाल्याची बातमी मिळते. प्रचंड पूर येऊन त्यात बस बुडून हा अपघात झाला असतो. अर्थातच नायक दुःखात डुंबून जातो. काही काळाने मात्र वेगवेगळ्या मार्गाने त्याला काही संकेत मिळू लागतात. मृत पावलेली नायिका काहीतरी सांगू पाहतेय हे लक्षात येऊ लागतं. मृत्यूच्या जबड्यातून परत आलेला त्यांचा एक लहान रुग्णही त्यांच्यासाठी काही सूचना काही मॅसेजेस घेऊन येतात. एकेक कडी जोडली जात असते.. हे नायक कुठेतरी खेचले जात असतात.. कुठे कसे आणि का? ह्याच उत्तर मिळतं तेव्हा आपण भावुक होतो, भारावून जातो, चक्रावून जातो. नकळत डोळ्यातून पाणी वाहू लागतं. आपण स्वतःला कितीही तर्काधिष्टित बुद्धिवादी, विज्ञानवादी समजत असलो तरी तात्पुरतं का होईना या गोष्टींवर विश्वास ठेवावा वाटतो. हे पाहून पुढे अनेक दिवस आपण एका वेगळ्याच तंद्रीत वावरत असतो. तंद्री उतरल्यावर जरी पुन्हा तर्काधारित सत्यतेत परत येत असलो तरी.. असे काही पाहून आपण चिंतनाच्या स्तरावर जातो हे मात्र मान्य करावंच लागतं.
हे सगळं असतं-दिसतं-भासतं ते खरं असतं की खोटं या वादात मी पडू इच्छित नाही. काही गोष्टी जश्या घडतात तश्याच स्वीकाराव्या लागतात त्यावर तर्क चालत नाहीत. मानवाच्या आकलनाबाहेरही अनेक गोष्टी असतील,आहेत. ज्याचा आजवर तो शोध लावू शकलेला नाही.. फक्त तो शोध लावू शकलेला नाही म्हणून त्या गोष्टी अस्तित्वातच नाही असे म्हणणे म्हणजेच अज्ञान, हे मात्र मान्य करावंच लागतं. मानवी जीवनात वास्तवापलीकडेही वास्तव असतात. त्याच्या आकलनापलीकडची काही गणितं असतील त्याची प्रमेयेंही असतील.. मानवाने ती कितीही स्वीकारली-नाकारली तरी हे ब्रह्मांड मानवी नियमांना बांधील असतेच असे नाही हे निश्चित...
©रश्मी पदवाड मदनकर
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...
-
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...