Friday, 9 December 2022

 कोणता तो तीर होता जो मनाच्या पार गेला 

कोण होते आपले ज्यांनी विषारी वार केला 


आटली ती ओलमाया खुंटला सारा जिव्हाळा 

कोरड्याशा भावनांचा का फुका आधार केला 


आसवांच्या वाहण्याला बांध टाकावा म्हणाला 

घाव झाला खोल तेव्हा का तमाशा फार केला  


जिंकणे ना हारणे हेतू सुखाने खेळणे हा 

जे मिळाले ओंजळी त्याचा सुखे स्वीकार केला


पावसाची वाट होती तो सुगीचा काळ होता 

घात केला प्राक्तनाने वादळाने मार केला 


झाड होते डवरले, होते नभाशी उंच गेले

वादळाने पाडले मी त्या फुलांचा हार केला


काल रात्री काय झाले कोण जाणे का पळाले

 त्या बिचाऱ्या मांजराला का असा बेजार केला


बेरजेला भागले अन् गुणेला जोडले मी

शून्य झाल्या भावनांचा मी मनोव्यापार केला


रश्मी पदवाड मदनकर

Friday, 27 May 2022

गम्य-अगम्य

 अनेकदा आयुष्य एका लयीत सगळं आलबेल असण्याच्या भ्रमात सुरु असतं..आपण रमत राहतो, गाफील होत जातो. अचानक एखादं वळण, एखादा अपघात, एखादा हादसा होतो आणि सुरळीत चालू असलेलं आपलं आयुष्य अगम्यतेच्या वाटेवर येऊन ठेपतं. होय असं घडतं बरेचदा.. फक्त ती अगम्यतेची वाट प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींचे हे असे किस्से कळतात-पचतात. काहींचे किस्से आपल्या आकलनाच्या बाहेरचे असतात म्हणून पटत नाहीत, पचत नाहीत. जे जे काही आकलनाच्या पलीकडचं आहे ते ते सर्व अशक्यतेच्या सोप्या व्याख्येत बसवून आपण मग मोकळे होण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. कारण त्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याची आपली तयारी नसते. पण जे गुढतम काहीतरी आहे किंवा शक्यतेच्या पलीकडचं आहे असं आपल्याला वाटत असतं ते तसं असतंच असं नव्हे.. हे म्हणजे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरेसारखं असू शकतं.. मांजरेनं डोळे मिटले की तिला वाटत असतं सगळीकडे अंधार आहे आपल्याला कुणीच बघू शकत नाही.. इकडे तिच्या भोवतालचं अक्ख जग मात्र तिला उघड्या डोळ्यानं बघत असतं..आणि तिच्यासाठी आपापल्या परीनं मनसुबे रचत असतं.

पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल अमोलच्या (नवरा) मित्राच्या वडिलांचा एक अजिबोगरीब किस्सा ऐकला. त्यांचे वडील प्रचंड आजारी पडले म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. वडील बऱ्यापैकी वयस्क, अल्पशिक्षित आणि खेड्यातच राहणारे.. दैनंदिन व्यवहारापुरतं आणि आयुष्याच्या पाठशाळेतून मिळालं तेवढंच काय ते शिक्षण झालेलं.. इंग्रजीशी त्यांचा नाममात्रही तसा संबंध नव्हता. त्यांना हॉस्पिटलला भरती करावं लागलं आणि जवळ जवळ दिड दिवस ते पूर्णतः बेशुद्धावस्तेत गेले, म्हणजे कोमातच. ज्या दिवशी जागे झाले त्यांच्यात अचानक आश्चर्यकारक बदल झालेले होते.. ते लहान मुलांच्या अविर्भावात इंग्रजी ऱ्हाईम्स म्हणू लागले. एक नाही दोन नाही अनेक अनेक इंग्रजी बालकविता त्यांना मुखोद्गत होत्या. त्यांच्या नातलगांसाठी हे अत्यंत विस्मयकारक होतं.. कारण वडिलांना अश्या अस्खलित भाषेत इंग्रजी येणं कसंही शक्यच नव्हतं, त्यात त्यांचा गंभीर रागीट स्वभाव बघता आता ही अशी गाणी गुणगुणणे किंवा एकंदरीत वागणेच विचित्र वाटत होते. हा काय प्रकार आहे ह्याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा कळाले वडिलांना भरती केले त्याच संध्याकाळी एका इंग्रजी शाळेच्या बसचा अपघात झाला होता.. घायाळ मुलांना याच हॉस्पिटलला भरती करण्यात आले होते, त्यातल्या काहींचा इथेच मृत्यूही झाला होता. सगळा प्रकार हळूहळू काही दिवसात आपोआपच संपुष्टात आला. सगळं नॉर्मल झालं त्यांचे वडील आता एकदम ठीक आहेत. पण ही अनाकलनीय घटना काय होती हे अजूनही गूढच आहे.
अगदी तंतोतंत अशीच एक घटना पुन्हा एकदा ऐकिवात आली. आकोटला नणंदेचे लग्न होते..खूप साऱ्या पाहुण्यांमध्ये नणंदेची एक जिवाभावाची मैत्रीण देखील होती. आमची छान गट्टी जमली होती. पण ती सतत अस्वस्थ उदास होती.. लग्नाच्या कुठल्याही सोपस्कारात तिचं अजिबात लक्ष नव्हतं आणि तिला परत जाण्याचे वेध लागले होते. काहीतरी गंभीर आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी जरा सांत्वन देत, समजून घेत खोदूनच माहिती काढली.. तर ती भळभळून रडायलाच लागली. तिचा किस्साही अगदी सेम आधीच्या किस्स्यासारखा होता. आई प्रचंड आजारी, ५ दिवस कोमात. उठली तेव्हा आई आई राहिलेलीच नव्हती. एक अत्यंत साधारण मराठी कुटुंबातली अल्पशिक्षित गृहिणी अचानक तेलगू भाषेतल्या नामवंत कवयित्रीच्या कविता गुणगुणू लागली होती. गरिबीत तडजोडीनं संसार चालवणाऱ्या बाईला, गावाबाहेरची वेसही न ओलांडलेल्या बाईला तेलगू भाषेबद्दल काहीही माहिती असण्याची शक्यताच नव्हती. कधीही पुस्तकं न वाचणाऱ्या तिला या कवयत्रीच्या कविता तोंडपाठ असणं अशक्यप्राय होतं. तोंडपाठ तर सोडा ती अत्यंत गोड आवाजात तालासुरात त्या कविता गात होती. ती तिच्या तिन्ही मुलींना विसरली होती. नातेवाईकांना ओळखत नव्हती.. मात्र ती तेलगूमध्ये बोलत होती ती काय बोलतेय हे समजणं देखील शक्य नव्हतं. ही मैत्रीण लग्नाला आली तेव्हा महिना झाला होता. आईला घरी आणले होते पण तिची अवस्था तीच होती आणि म्हणून ही अत्यंत अस्वस्थ होती. मी तीनेक महिन्यानं एकदा तिला फोन केला होता तेव्हा बऱ्यापैकी परिस्थिती सावरली होती..आणि मैत्रीण खदखदून हसत 'आमची आई इतकं गोड गळ्याने, सुरात गाते हा नवा साक्षात्कार आम्हाला या निमित्ताने झाला' असं म्हणत होती.
हे सगळं अचानक आठवण्याचं कारण म्हणजे दोन दिवसांआधी 'The In Between' नावाचा छानसा चित्रपट पाहिला आणि अनेक गोष्टी, काही ऐकलेल्या-पाहिलेल्या घटना नजरेसमोरून तरळून गेल्या. फेब्रुवारी २०२२ मध्ये म्हणजे अगदी याच वर्षी आलेला हा अमेरिकन इंग्लिश चित्रपट आहे. चित्रपटाच्या प्रारंभाचाच सिन म्हणजे एक मोठा अपघात.. एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावर निश्चल पडून आहेत. चित्रपटाची नायिका टेसा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येते तेव्हा तिला कळतं की तिचा प्रियकर स्कायलर या अपघातात ठार झाला आहे. पुढे सिनेमा १८२ दिवस मागे घेऊन जातो आणि या दोघांच्या उत्कट प्रेमाचा प्रवास आपण पाहत राहतो. त्यानंतर सुरु होतो फोटोग्राफर असलेल्या नायिकेचा म्हणजे टेसाचा अगम्य वाटेवरचा प्रवास. तिला क्षणाक्षणाला तिच्या अवतीभवती स्कायलरच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. तो तिला काहीतरी सांगू पाहतोय, काहीतरी संकेत देत असल्याचे ती अनुभवत असते.. हे कुणालाही सांगून विश्वास बसण्यासारखे नसते. तिला त्याचे शब्द ऐकू येतात, स्पर्श जाणवतात. तिच्या फोटोग्राफीतून तो तिला अनेक संकेत देत राहतो. त्याला तिला काहीतरी सांगायचे असते.. काहीतरी पोचते करायचे असते. दोघे एकत्र असताना तीव्रतेने वाट पाहिलेल्या आणि शेवटी राहून गेलेल्या कुठल्याश्या अर्धवट गोष्टीच्या पुर्णत्वासाठीची ही धडपड असते. सिनेमाच्या अंतापर्यंत पोचता पोचता आपणही त्यात कसे एकरू होऊन जातो आपल्याला कळतही नाही.

हा चित्रपट रिलीज होण्याच्या जवळजवळ १० वर्षांआधी एक अत्यंत सुंदर हिंदी सुपरनॅचरल फँटसी रोमँटिक थ्रिलर असलेला चित्रपट येऊन गेला. येऊन गेला यासाठी की फारसा हिट झाला नाही पण ज्यांनी ज्यांनी पहिला त्यांना तो आवडला मात्र नक्की.. त्या चित्रपटाची गाणी अत्यंत अर्थपूर्ण होती..अफलातून गाजली. महेश भट निर्माता असलेला हा चित्रपट होता 'साया'. जॉन अब्राहम, तारा शर्मा आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत होते. मला हा चित्रपट खूप आवडला होता.. अर्थात चित्रपट बनला ती कल्पनाच मला खूप भन्नाट वाटली होती. मी अनेक दिवस या चित्रपटाच्या हॅंगोव्हरमध्ये राहिले होते. ही स्ट्रोरीलाईन कुणाची आहे हे हुडकून काढायचे होते. मला जे आवडतं त्या गोष्टींच्या खूप खोलात जाऊन माहिती घ्यायला मला आवडतं. मी त्यावर वाचन सुरु करते, जाणकार लोकांशी चर्चाही करते. याच प्रयत्नातून कळले की ही संकल्पना मुळात भारतीय नव्हतीच; २००२ साली अमेरिकेत 'ड्रॅगनफ्लाय' नावाने चित्रपट रिलीज झाला होता. 'साया' हा या अमेरिकन सिनेमाचा रिमेक होता. ब्रॅंडन कॅम्प लेखक असलेला ड्रॅगनफ्लाय टॉम शॅडिकने निर्देशित केला होता. दोन्ही चित्रपटांची कथा-पटकथा अगदी एकसारख्या आहेत. मी तर म्हणेन फ्रेम टू फ्रेम सारख्या आहेत.... असो.

या दोन्ही चित्रपटातले नवराबायको असलेले नायक आणि नायिका डॉक्टर आहेत. ते दोघंही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात वगैरे असतात. स्वप्नवत वाटावं इतक्या आनंदात त्यांचा संसार चालू असतो. ७ महिन्याची गर्भवती असणारी नायिका आपत्कालीन परिस्थिती उद्भवली म्हणून, नायकाची इच्छा नसताना वनक्षेत्राच्या आदिवासी अतिदुर्गम भागात मदतीसाठी जातात आणि नायकाला त्यांचा बस अपघातात मृत्यू झाल्याची बातमी मिळते. प्रचंड पूर येऊन त्यात बस बुडून हा अपघात झाला असतो. अर्थातच नायक दुःखात डुंबून जातो. काही काळाने मात्र वेगवेगळ्या मार्गाने त्याला काही संकेत मिळू लागतात. मृत पावलेली नायिका काहीतरी सांगू पाहतेय हे लक्षात येऊ लागतं. मृत्यूच्या जबड्यातून परत आलेला त्यांचा एक लहान रुग्णही त्यांच्यासाठी काही सूचना काही मॅसेजेस घेऊन येतात. एकेक कडी जोडली जात असते.. हे नायक कुठेतरी खेचले जात असतात.. कुठे कसे आणि का? ह्याच उत्तर मिळतं तेव्हा आपण भावुक होतो, भारावून जातो, चक्रावून जातो. नकळत डोळ्यातून पाणी वाहू लागतं. आपण स्वतःला कितीही तर्काधिष्टित बुद्धिवादी, विज्ञानवादी समजत असलो तरी तात्पुरतं का होईना या गोष्टींवर विश्वास ठेवावा वाटतो. हे पाहून पुढे अनेक दिवस आपण एका वेगळ्याच तंद्रीत वावरत असतो. तंद्री उतरल्यावर जरी पुन्हा तर्काधारित सत्यतेत परत येत असलो तरी.. असे काही पाहून आपण चिंतनाच्या स्तरावर जातो हे मात्र मान्य करावंच लागतं.
हे सगळं असतं-दिसतं-भासतं ते खरं असतं की खोटं या वादात मी पडू इच्छित नाही. काही गोष्टी जश्या घडतात तश्याच स्वीकाराव्या लागतात त्यावर तर्क चालत नाहीत. मानवाच्या आकलनाबाहेरही अनेक गोष्टी असतील,आहेत. ज्याचा आजवर तो शोध लावू शकलेला नाही.. फक्त तो शोध लावू शकलेला नाही म्हणून त्या गोष्टी अस्तित्वातच नाही असे म्हणणे म्हणजेच अज्ञान, हे मात्र मान्य करावंच लागतं. मानवी जीवनात वास्तवापलीकडेही वास्तव असतात. त्याच्या आकलनापलीकडची काही गणितं असतील त्याची प्रमेयेंही असतील.. मानवाने ती कितीही स्वीकारली-नाकारली तरी हे ब्रह्मांड मानवी नियमांना बांधील असतेच असे नाही हे निश्चित...


©रश्मी पदवाड मदनकर ✒️

Monday, 18 April 2022

गुलाबी दिलासे



गुलाबी मनाचे गुलाबी उसासे
गुलाबी क्षणांचेच सारे दिलासे
कसा गंध वारा सुटे हा गुलाबी
गुलाबी सुरांचे तराणे जरासे

तुझ्या आठवाची कथाही गुलाबी
दिशाही गुलाबी नशाही गुलाबी
असा रंग येतो भरूनी सदेही
गुलाबी पिडेची व्यथाही गुलाबी

गुलाबी सुगंधी जरा श्र्वास होतो
गुलाबी पुन्हा प्राण दाटून येतो
पहाटे पडावे तुझे स्वप्न वेडे
गुलाबी असाही जरा भास होतो

नदी वाहते त्या किनारी गुलाबी
तिच्या वाहण्याची निळाई गुलाबी
अशी धावते भेटण्या सागराशी
मुक्या पावली वेदनाही गुलाबी

गुलाबी तुला भेटण्या ओढ दाटे
गुलाबी सरेना अशी रात्र वाटे
कुठे शोध घेऊ तुझ्या संगतीचा
गुलाबी पहारा गुलाबीच काटे

मिटू लागली पापणी ही गुलाबी
गुलाबी असे काळ वेळा गुलाबी
उजाडेल आता दिशा रंग माती
पहाटे पुन्हा रागदारी गुलाबी.

- रश्मी पदवाड मदनकर

#भुजंगप्रयात 

Wednesday, 13 April 2022

असमाधान आणि अतिमहत्वाकांक्षा हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे..

 

सतत चांगल्यातलं वाईट शोधण्याची सवय एकदिवस स्वभाव होत जातो. एकदा हा स्वभाव बनला की आयुष्याने कितीही चांगले केले तरी त्यात वाईट शोधण्याची सवय काही जात नाही. जेव्हा आपण असमाधानकारक, तक्रारयुक्त जगणं दीर्घकाळ जगायचं चालू ठेवतो, तेव्हा काय होतं? हा आपला संपूर्ण इतिहास बनत जातो. कृतज्ञ व्यक्ती समाधानाने समृद्ध असते, आणि त्या उलट कृतघ्न मनुष्य अनंत असंतोषाच्या दारिद्र्यात यातना भोगत राहतो. महत्वाकांक्षा असावी पण ती पूर्ण होण्याचं सुख भोगता येईल इतकी असावी. स्वप्नवत वाटणाऱ्या इच्छा किंवा इतरांसाठीसुद्धा सहज साध्य नसणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सहज आपल्याला मिळूनही त्याचा आनंद मानता-मनवता येत नसेल आणि ते असमाधानावर अर्धवट सोडून त्यापुढली महत्वाकांक्षा, त्यापुढलें स्वप्न आणि डोंगराएवढ्या इच्छा आपण पुढ्यात मांडून ठेवत असू, जे जे मिळालय, मिळतंय त्यातलं आणि आहे त्यातलं समाधान आनंद कधीच उपभोगता येत नसेल तर आपण या जगातले सगळ्यात दुर्दैवी, गरीब जीव आहे असे समजावे.
महात्मा गांधी म्हणतात ना ..
We notice that the mind is a restless bird; the more it gets the more it wants, and still remains unsatisfied. The more we indulge our passions the more unbridled they become. Our ancestors, therefore, set a limit to our indulgences. They saw that happiness was largely a mental condition. A man is not necessarily happy because he is rich, or unhappy because he is poor…. Millions will always remain poor.”

रंजो-ग़मसे नजात पानी हो तो
ख़्वाहिशों को ज़रासा कम कर दो !
...
ख्वाहिशों के कदम कहां किसके रुके हैं .... ?
मंजिल से बेखबर, ये ताउम्र चलते रहते हैं !!


रश्मी ...



Thursday, 7 April 2022

सावध हरिणी, सावध गं !




गेल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमजाळ्यात अडकवून विश्वासात घेऊन तिच्याकडून हेतुपुरस्सर काही आक्षेपार्ह कृत्य करून घेण्यात आले होते आणि नंतर त्याचे व्हिडीओ सार्वजनिक रीतीने प्रसारित करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैशांची मागणी केली गेली. ही मागणी पूर्ण करणे जसजसे कठीण होऊ लागले त्या मुलीने इतरांची आर्थिक फसवणूक करणे सुरु केले आणि दुष्टचक्रात खोलवर अडकत गेली.

नागपूर जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीच्या, सुशिक्षित-प्रतिष्ठित कुटुंबातल्या महिला. व्यस्त कुटुंब आणि एकांताला कंटाळून सोशल माध्यमावर हेतुपुरस्सर फुसलावणाऱ्या टोळीतील वेगवेगळ्या इसमाच्या प्रेमात पडल्या आणि भावनेच्या आहारी जाऊन आक्षेपार्ह चॅटींग, फोटो पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग या माध्यमातून नको त्या चुका करून बसल्या, आणि मग सुरु झाला जीवनमरणाचा खेळ. हे व्हिडीओ-फोटो कुटुंबाला पाठवावे किंवा सार्वजनिक करावे असे वाटत नसेल तर 'त्या' बायकांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या इशाऱ्यांवर काम करणे गरजेचे होऊन बसले. त्या टोळीच्या मागणीनुसार लाखो रुपये दिल्यानंतरही मागणी संपेचना. त्या थकल्या-रडल्या नंतर शेवटची मागणी म्हणून ४ सिमकार्ड आणि प्रत्येकी २-२ बँक खाते काढून त्याचे एटीएम कार्ड आणि इतर माहिती त्यांना बंगलोर शहरी पाठवण्यास सांगण्यात  आले..एवढं पाठवून आपण सुटलो असे या स्त्रियांना वाटत असतानाच, वर्षभरानंतर एकदिवस पोलीस घरावर येऊन धडकले आणि महिलांना बेड्या ठोकून घेऊन गेले.. ज्या बदनामीला घाबरून एक चूक लपवायला पुढे अनेक चुका या महिलांनी केल्या होत्या त्याच ह्यांना भोवलया होत्या. ह्यांनी पाठवलेल्या सिमच्या आधारे पुढे अनेक महिलांची फसवणूक केली गेली होती आणि त्या फसवणुकीतून मागवलेला पैसा, अगदी करोडो रुपयांचा खंडणीचा व्यवहार ह्यांनी पाठवलेल्या बँक खात्यावरून करण्यात आला होता. खऱ्या गुन्हेगारांचे नाव-गाव-पत्ता काहीही, कशाच्याही माध्यमातून पुढे न येऊ दिल्याने त्यांचा पत्ता लागणे कठीण होतं.. पण या करोडो रुपयांच्या फार मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात या महिला मात्र प्रमाणासह फसल्या, ही केस कोर्टात अजूनही चालू आहे.


२०१९ साली  सोशलमिडियाच्या माध्यमातून ३०० महिलांची त्यांच्या माहिती आणि फोटोंचा उपयोग करून, ते पॉर्नसाईटवर टाकून त्यांची फसवणूक आणि नंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी  हैदराबादच्या सायबर विभागाने २५ वर्षीय ठग विनोदला बेड्या ठोकल्या होत्या. विनोद मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी होता. त्याने सोशल मीडियाचा गैरवापर करत ३०० महिलांची लैंगिक आणि आर्थिक फसवणूक केली आणि त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले होते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले होते. एका तरुण मुलाच्या सायबर फसवणुकीला इतक्या महिलांनी बळी पडण्याचे हे प्रकरणही तेव्हा खूप गाजले होते.

आजही सोशल मीडिया वापरणाऱ्या महिलांकडून दबक्या आवाजात तक्रारींचे सूर उमटत राहतात. फसवणूक करणाऱ्यांमध्ये साहित्यिक, कवी, प्राध्यापक, कलावंत असणाऱ्या नामवंत पुरुषांची नावे देखील समोर येत असतात. काही दिवस गाजावाजा होतो. त्यात स्त्रियांनाच दोषी ठरवण्याची परंपरा कायम चालत आल्याने महिला संकोचतात, गप्प बसतात किंवा सोशल माध्यमातून कंटाळून पळ काढतात. त्या पुरुषांना मात्र फारसा फरक पडत नाही, अंगावर आलीच तर महिलांना दोष देऊन त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवून, चर्चेला पेव फोडून ते मोकळे होतात आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करत राहतात. तिच्या भावुक असण्याचा फायदा उचलत एकेक पुरुष एकावेळी अनेकींचे आयुष्य उध्वस्त करत सुटतो आणि त्याबद्दल त्यांना जराही खंत वाटत नाही.  

सोशल मिडीयाचा वापर काही लोकांसाठी व्यसन होऊन बसले आहे. ह्याचाच गैरफायदा काही समाजकंटक स्वतःच्या हितासाठी करून घेताहेत आणि ह्याचे प्रमाण आता चिंता वाटावी इतके वाढले आहे. थोडा काळ मन रमवण्यासाठी, विरंगुळा म्हणून होणारा सोशलमिडीयाचा वापर आता विविध पद्धतीने फसवणुकीसाठी  केला जातो आहे आणि ह्याला अनेक बाईमाणसे बळी पडताहेत. गेल्याच महिन्यात माझी समुपदेशक मैत्रीण शुभांगी देवस्थळे हिच्याशी या विषयावर बोलणे झाले आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे तिने सांगितले. आर्थिक, शारीरिक, भावनिक पद्धतीने लुबाडणूक होणाऱ्या महिला घरच्यांना न सांगता गुपचूप समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली असते, असं तिचं म्हणणं होतं. गेल्या महिन्यात सायबर क्राईमवर लेख लिहिण्यासाठी संदर्भ हवे होते म्हणून आणि खरे अनुभव लिहावे या हेतूने अनेकांशी चर्चा केली. या चर्चेतून सायबर गुन्ह्यांचे अनेक जिवंत किस्से समोर आलेच परंतु सोशल माध्यमातून होणाऱ्या बायकांचे भावनिक, लैंगिक आणि आर्थिक शोषण हा अत्यंत गंभीर गुन्हा लक्षात आला त्याबद्दल माहिती मिळवताना मी मात्र हादरून गेले.

व्यक्त होण्यासाठी, कलागुणांच्या प्रदर्शनासाठी, आवडीच्या गोष्टी शेअर करण्यासाठी, वैचारिक भूमिका बोलून दाखवण्यासाठी स्वतःचा हक्काचा एखादा प्लॅटफॉर्म असणं खरतर किती चांगली गोष्ट आहे. एकीकडे सोशल मीडियाचे स्वातंत्र्य अनुभवत असताना दुसरीकडे मात्र महिलांना याचाच उपद्रव होत असल्याने या 'व्हर्च्युअल' जगातही सावधगिरीने वागावे लागत आहे. सोशल मीडियाशी संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सायबर गुन्हेगारांकडून त्यांनाच सर्वाधिक लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. 13 मे 2021, दिवस गुरुवार. या दिवशी 'लिबरल डॉजी' नावाच्या चॅनलने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले, ज्यामध्ये मुस्लिम मुलींवर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ काढून अत्यंत अश्लील आणि अशोभनीय टिप्पण्या केल्या गेल्या. जेव्हा ट्विटरवर मुस्लिम मुलींनी या व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या विरोधात लिहायला सुरुवात केली आणि तक्रार करण्याची विनंती केली तेव्हा लाईव्ह व्हिडिओची सेटिंग बदलून खाजगी करण्यात आले. गेल्याच महिन्यात मुस्लिम महिलांचे फोटो एडिट करून, आक्षेपार्ह माहितीसह ते इंटरनेटवर व्हायरल करण्याचा आणि "बुल्ली बाई'' आणि ‘सुली डील’ नावाच्या अॅपवर त्यांचा लिलाव करण्याचा अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आणि त्याचबरोबर चिंताजनक प्रकार उघडकीस आला होता. या द्वेषाला फक्त मुस्लिम महिलाच बळी पडत नाहीत तर हिंदू महिलांच्या चेहऱ्याचे फोटो उघड्या शरीरावर मॉर्फ केले जातात, ते कुठल्यातरी पॉर्न साईटवर किंवा डेटिंग साईटवर सार्वजनिक केले जातात आणि नंतर त्यांचाच उपयोग करून सोशल मीडियावरून छळ केला जातो. अनेकदा वैयक्तिक सूद उगवण्याच्या दृष्टीने महिलांच्या सोशलमिडीयावरच्या माहितीच्या आणि फोटोच्या आधारे फेक अकाउंट सुरु केले जाते, त्यावर बदनामीकारक मजकूर-लिंक-फोटो शेअर केले जातात, महिलांचे फोननंबर सार्वजनिक केले जातात, त्यांचा लिलाव केला जातो, बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात. उच्चशिक्षित महिलांचा अपमान केला जातो, दलित महिलांची विटंबना केली जाते, राजकीय महिलांनाही टार्गेट केलं जातं, झुंड एकत्र येतो त्यांना ट्रॉल केलं जातं, पिच्छ पुरवला जातो.. कधीकधीतर माणुसकीच्या सगळ्या मर्यादा लंघून महिलांशी या सोशल प्लँटफॉर्मवर वागले-बोलले जाते.

ओळख निर्माण करण्याचा मोह, जास्तीत जास्त मित्र जमवण्याचा मोह, एकटेपणा घालवण्यासाठी संवाद वाढवण्यासाठी सगळे संपर्क शेअर करणे, त्यातून संवाद आणि विश्वास हेतुपुरस्सर वाढवला जातो.. आकर्षण-प्रभाव निर्माण केला जातो.. तो निर्माण झाला आहे ह्याची चुणूक लागताच वैयक्तिक फोटो आणि माहिती मागवली जाते. त्याचाच कधीतरी गैरवापर होतो आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागते. आपल्याच चुकीमुळे पुरवलेली माहिती किंवा आपली माहिती चोरून, अकाउंट हॅक करून मिळवून जाळं विणलं जातं. कुटुंबाला-समाजाला घाबरून तक्रार करण्यास महिला आणि मुली धजावत नाहीत, हे गुन्हेगारांनी बरोबर हेरलं असतं, त्यांची हिम्मत वाढत जाते आणि एकामागोमाग एक अनेक महिलांना फसवण्याचा त्यांचा धंदा निर्धोक चालू राहतो.

मग काय करावे ?
बोलते व्हावे, कोणीतरी अगदी ओळखीतला किंवा अनोळखीही मुद्दाम जवळीक साधतो आहे, नको तितके कौतुक करतो, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे हे लक्षात येताच हुरळून न जाता कोणतेही पाऊल उचलण्याआधी इतर महिलांचा त्या इसमाच्या बाबतीतला काय अनुभव आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. किंवा अश्या येणाऱ्या अनुभवांविषयी विश्वासातल्या माणसांशी चर्चा करावी. घरी नसेल बोलता येत तर मैत्रिणींशी बोलावे. घरात कोणी लक्ष देणारं नाही, बोलणारं नाही, एकटेपणा जाणवतो, नवरा व्यसनी आहे, संकट येताहेत किंवा इतर कोणत्याही दुःखाचं प्रदर्शन कोणाहीजवळ करू नये. कुठलीच गुपितं अनोळखी किंवा फक्त फेसबुक मित्र आहे म्हणून उघड करू नये. याच गुपितांच्या भरवशांवर तुम्हाला सांत्वना देत तुमच्या मनाचा ताबा मिळवला जातो आणि एकदा मनावर ताबा आला कि मग महिलांचे शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक शोषण करणे सोप्पे होऊन बसते. बरेचदा थोड्याश्या सुखाच्या अपेक्षेने सुखातला जीव दुःखात-धोक्यात घालण्यात काहीही अर्थ नसतो. कोणीतरी फेसबुक सेलिब्रिटी, एखादा कलाकार, व्यवसायी खूप मोठा माणूस असून त्याचे असंख्य चाहते असून तो आपल्याशी आपुलकीने बोलतो ह्यातच महिला हुरळून जातात आणि नको त्या चुका करून बसतात. तो करत असलेले कौतुक, प्रेमाचे दावे, शपथा वचनं, प्रेमबीम तो फक्त आपल्याशीच करतो आहे असे समज करून बसतात. त्याने पूर्वीही अनेक महिलांना गंडवले असते आणि आताही एकाचवेळी तो तुमच्यासह अनेकींचा गैरफायदा घेत असतो. दोन काळ प्रेमाच्या अपेक्षेने महिला स्वतःचे फोटो पाठवणे, नको त्या भाषेत चॅटिंग, व्हिडीओ पाठवणे अश्या चुका करून बसतात ज्या भरवशावर पुढे ब्लॅकमेल होतात आणि सगळीकडूनच लुबाडले जातात.  आपण फार मोठी चूक करून बसलो आहे आणि हे कोणाजवळ सांगितले तर आपली अब्रू जाईल या भीतीने त्या कोणाजवळच हे बोलत नाहीत.. इथेच सर्वात मोठी चूक करतात. त्या अपराध्यांना अधिक बळ मिळते. असे काही अनुभव येत असतील तर फसण्याआधी कुणाशीतरी हे अनुभव शेअर करावे, फसवणूक झाली असेल तरी संकोच न करता मैत्रिणींशी बोलावे. एकमेकींशी बोलण्यामुळे त्या अधिक फसायच्या बचावतीलच पण इतर महिलांनाही त्यातून धडा मिळेल..त्या जागरूक होतील, अनेकींचे आयुष्य खराब होण्यापासून आपल्याला थांबवता येईल. प्रत्येक महिलेने या व्यासपीठावर सावध राहावे, सुरक्षित राहावे व इतर महिलांनाही सावध करावे.


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 202१ दरम्यान भारतात महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, सोशल मैद्याच्या माध्यमातून लैंगिकदृष्ट्या फसवणूक झाल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये 110% वाढ झाली आहे. लैंगिकदृष्ट्या दबाव टाकणे तशी सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे यासाठी दोषी ठरण्याचे प्रमाण पूर्वी 47.1% होते, तर सायबर पाठलाग आणि गुंडगिरीच्या प्रकरणांमध्ये ते 27.6% इतके कमी होते. या अहवालानुसार, २०२० मध्ये यापद्धतीच्या गुन्ह्यांसाठी ६०० पुरुष आणि १९ महिलांना अटक करण्यात आली होती. तसेच केलेल्या आणि नोंदणीकृत सायबर गुन्ह्यांमागील हेतूचा तपशील देण्यात आला आहे, ज्यात "लैंगिक शोषण" हा आर्थिक फसवणुकीनंतरचा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा हेतू असल्याचे सांगितले गेले आहे.

- रश्मी पदवाड मदनकर





Sunday, 16 January 2022

 अनुष्काने विराटला उद्देशून लिहिलेल्या पत्राचा हा अनुवाद.

दोन हजार चौदा सालचा तो दिवस मला नीट आठवतो. त्यादिवशी तू मला सांगितलंस की एम. एस. निवृत्त होतोय आणि त्याच्या जागी तुला कप्तान केलं गेलंय.
मला आठवतं. त्या दिवशी काही वेळानंतर एम एस, तू आणि मी मिळून खूप गप्पा मारल्या. एम. एस विनोदाने म्हणाला की याची दाढी आता कशी पटापट पांढरी होऊ लागते बघच तू. आपण सगळेच यावर खळाळून हसलो होतो. त्या दिवसापासून आजवर मी नुसती तुझी दाढीच पांढरी होताना नाही पाहिली. मी तुझी वाढ होताना पाहिली. आश्चर्य वाटावे अशी वाढ. भोवतालच्या अवकाशातच नव्हे तर तुझ्या आतूनही तुला वाढताना मी पाहिलं. खरंय. भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कप्तान या नात्याने तुझा झालेला विकास पाहून आणि तुझ्या नेतृत्वाखाली तुझ्या संघाने गाजवलेले कर्तृत्व पाहून मला खूप अभिमान वाटतोय पण स्वतःवर काम करून स्वतःचा जो आंतरिक विकास तू घडवून आणला आहेस त्याचा मला कितीतरी जास्त अभिमान वाटतोय.
2014 साली आपण खूपच तरुण आणि भाबडे होतो. वाटायचं, हेतू चांगला असला, सकारात्मक हिंमत दाखवली आणि इरादा पक्का असला की झालं. माणूस सहजच पुढे जाईल. या गोष्टी आपली प्रगती घडवून आणतात हे खरंच आहे. पण वाटेत अडथळेही येतात. आव्हानांना तोंड द्यावे लागतेच. तुला तोंड द्यावी लागलेली यातली बरीच आव्हाने मैदानावरचीच होती असे नव्हे. पण यालाच तर जीवन ऐसे नाव. नाही का? तुम्ही कल्पनाही केलेली नसते अशा ठिकाणी जीवन तुमची कसोटी घेते. तिथेच तर तुमचा कस लागणे खरोखर गरजेचे असते. आणि माझ्या लाडक्या, तुझ्या सद्हेतूंच्या आड तू काही म्हणजे काही येऊ दिले नाहीस. म्हणूनच मला तुझा फार फार अभिमान वाटतो. इतरांना स्वतःचे उदाहरण घालून देत तू संघाचे नेतृत्व केलेस. मैदानात बाजी मारण्यासाठी कसलीच कसूर न करता तू तुझी सर्व शक्ती पणाला लावलीस. इतक्या प्राणपणाने झटूनही की काही वेळा हार पत्करावी लागल्यानंतर तुझे डोळे डबडबलेले पाहिलेत मी तुझ्या शेजारी बसून. आपल्या प्रयत्नात काही कमतरता तर राहिली नाही ना असा प्रश्न अशा वेळी तुला छळत असायचा. असा आहेस तू आणि सर्वांकडून अशाच वृत्तीची आणि कष्टाची तू अपेक्षा धरायचास. तुला चाकोरी मान्य नसे. तुझं वर्तन रोखठोक असायचं. ढोंगबाजीशी तुझं हाडवैर आहे आणि म्हणूनच तर माझ्या आणि तुझ्या सगळ्या चाहत्यांच्या नजरेत तुझं स्थान असं उंचावलेलं आहे. कारण या साऱ्यामागचा तुझा उद्देश नेहमी स्वच्छ असे, निर्भेळ असे. प्रत्येकाच्याच लक्षात ही गोष्ट कदाचित येणार नाही. मी म्हणाले तसं, वरवर दिसतोस त्याच्या आतल्या तुला पहायचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला ते खरे भाग्यवान. तू काही सर्वगुणसंपन्न पुरुषोत्तम नाहीस. दोष आहेत ना तुझ्यात. पण मग ते लपवायचा प्रयत्न तरी तू कधी केलास? तुझा प्रयत्न असायचा तो प्रत्येक वेळी हातून योग्य तेच घडावे याचा. योग्य त्याच्याच मागे उभे रहावे याचा. जे सर्वात कठीण तेच करत राहण्याचा. या क्षणी आणि दर क्षणी. कुठल्याच गोष्टीला तू कधी आसक्तीने चिकटून बसला नाहीस. या पदालाही नाही. मी जाणते ना. कारण अशा आसक्तीने माणसाला, त्याच्या कर्तृत्वाला सीमा पडतात. आणि तू माझ्या लाडक्या, निव्वळ असीम आहेस.
गेल्या सात वर्षातील या अनुभवांचा लाभ तुझ्या पितृत्वातून आपल्या सोनुलीलाही होईल.
छान केलंस रे!
अनुवाद: अनंत घोटगाळकर

************************************************

Original Letter



Thursday, 6 January 2022

हा लेख 2008 मध्ये मायबोली वरती प्रकाशित झालेला आहे !💐

लेखकाचे नाव :- चिनूक्स असे दर्शीवलेले आहे .. 

*********************


१९९० सालची गोष्ट. मे महिन्यात, भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगळं लावलेलं लुगडं, रुपयाएवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी काहितरी काम होतं त्यांचं. या बाईंचं मोठ्या आवाजातलं बोलणं मला आत व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे ३-४ अनाथाश्रम होते, आणि तिथे राहणार्‍या मुलांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. बाबांचा कामानिमित्ताने अनेक धार्मिक संस्थानांशी संबंध होता, आणि या बाईंना तिथून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न बाबा करणार होते. मग जरा वेळाने बाबांनी मला बोलावलं. म्हणाले, 'या सिंधूताई. यांना घेऊन डॉ. XXXX यांच्या घरी जा.'

बाहेर प्रचंड ऊन होतं. बाबांनी रिक्षेसाठी पैसे दिले आणि डोक्यावर रुमाल, खिशात कांदा असा जामानिमा करून मी निघालो. सिंधूताईंनी डोक्यावरून पदर घेतला फक्त. पायात चप्पल नव्हतीच. मे महिन्याच्या त्या भयंकर उन्हातही सिंधूताईंच्या पायांना चटके कसे बसत नाहीत, याचाच विचार मी बराच वेळ करत होतो. डॉक्टरकाकांचं घर तसं फार लांब नव्हतं, पण उन्हाच्या झळांमुळे रस्त्यावर एकही रिक्षा नव्हती. म्हणून पायीच जाणं आलं. चालता चालता मग त्यांनी नाव काय, कुठल्या वर्गात वगैरे चौकशी केली. त्यांचं बोलणं वेगळंच होतं. खूप प्रेमळ. आवाजही वेगळाच. खडा, खणखणीत, पण मऊ. उत्तर देताना त्यांना 'सिंधूताई' म्हटलं, तर मला म्हणाल्या, 'बाळ, मला माई म्हण.'


माईंना घेऊन डॉक्टरकाकांकडे पोहोचलो, तर घरात बरीच गर्दी होती. या डॉक्टरकाकांनी तेव्हा नुकतंच दक्षिणेतल्या एका बुवांचं शिष्यत्व पत्करलं होतं. अकोल्यातली प्रॅक्टीस सोडून, ते आंध्र प्रदेशातील त्या बुवांच्या आश्रमात जाऊन राहणार होते. हवेतनं अंगठ्या, घड्याळं काढणार्‍या त्या बुवांना गरिबांसाठी एक मोठा दवाखाना सुरू करायचा होता, आणि त्यासाठी म्हणून डॉक्टरकाकांनी आपला बंगला, त्याभोवतीची ८-१० एकर जमीन, ३-४ गाड्या असं सगळं त्या बुवांना देऊन टाकायचं ठरवलं होतं. आम्ही गेलो तेव्हा त्या बुवांच्या शिष्यांचा कसलासा सत्संग सुरू होता. डॉक्टरकाकांनी मला आत बोलावलं, पण माईंना बाहेरच थांबवलं. आत भरपूर कुलर्स लावलेले होते, आणि एक खूप स्थूल आजोबा 'मानवसेवा हीच माधवसेवा' असं काहीबाही बोलत होते. बाहेर माई काकांना त्यांच्या आश्रमांबद्दल सांगत होत्या. खर्च वाढले आहेत, मुलांना शिकवायचं आहे, सरकार पैसे देत नाही, वगैरे. माईंचं जोरात बोलणं इथेही आत ऐकू येत होतं. सत्संग सुरू असताना शांततेचा भंग झाल्याने ते आजोबाही बोलायचे थांबले.

काकांनी माईंना खिशातून पाच रुपये काढून दिले, आणि आत येऊन मला म्हणाले, 'एवढ्या उन्हात कशाला आलास? आता तू थांब इथेच. ड्रायव्हर घरी सोडेल तुला. त्या बाईंना मी जायला सांगितलं आहे. आणि तुझ्या बाबाला सांग की या बाई भिकारी आहेत. त्यांचा अनाथाश्रम वगैरे काही नसेल. उगीच फसवण्याचे धंदे.'


माई अजूनही बाहेरच उन्हात उभ्या होत्या. माईंना घेऊन घरी परत गेलो नाही, तर बाबा रागवतील, असं सांगून मी तिथून सटकलो. घरी परत येताना वाटेत माईंना काही घरं उघडी दिसली, आणि माई सरळ तिकडे वळल्या. माईंनी परत त्यां घरी आश्रम, मुलं असं सगळं सांगितलं, आणि 'माझ्या मुलांसाठी मला भीक घाल ग माये', असं म्हणून माईंनी पदर पसरला. मी थिजलोच. माईंनी अशी भीक मागितल्यानं मला प्रचंड शरमल्यासारखं झालं. पण माईंना भीक मागताना काही वाटत नसावं. उलट कोणीतरी दोन पाच रुपये पदरात टकल्याने त्या खुशीत होत्या. भीक मागणं, ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट, हे त्या दिवशी मला पुरेपूर कळलं.


माईंची पुढे बरीच वर्षं भेट झाली नाही. पण त्यांच्याबद्दल अनेकदा पेपरमध्ये यायचं. त्यात त्यांच्या भीक मागण्याचे, हालअपेष्टांचे उल्लेख असायचे. कधी लता मंगेशकर, मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांचे फोटो असायचे. पण तरीही 'सिंधूताई सपकाळ', म्हणजे माईंचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर यायच्या त्या हातात पाच रुपयाची नोट गच्च धरून उन्हात अनवाणी उभ्या असलेल्या, आणि माझा हात धरून भीक मागणार्‍या माई


माई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमधी गावात आले. मुलीनं शिकावं अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. माई मुळच्याच बुद्धिमान, पण जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं. अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बीळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.


अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात,"तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्‍यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली."


माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती, आणि अडाणी गावकर्‍यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवर्‍याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.

नवर्‍यानं हाकलल्यानंतर गावकर्‍यांनीही हाकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.


दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वेरुळांच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण 'लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल' म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या,


ये ऊन किती कडक तापते

बाई अंगाची फुटते लाही

दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा

चालेल आम्हा वाढा

दार नका लावू

पुन्हा येणार नाही..


माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. २१ वर्षांच्या होत्या माई तेव्हा. पण एक दिवस हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं.

त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं. पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की 'दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता.' माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवले, आणि चितेवरच्या निखार्‍यावर भाजले. कडक भाकरी तशीच खाल्ली.


माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या, आणि भीक मागत, काम शोधत चिखलदर्‍याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ-संध्याकाळ कुटकी (भात), डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक, या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदर्‍याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले, आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या.


एकदा असंच पुण्यात कुठेसं रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव 'दिपक गायकवाड' एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती. त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलीसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २-३ मुलं त्यंना रस्त्यावर भीक मागताना भेटली, आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हे त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल, असं त्यांना वाटलं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नव्हतं, आणि आता जोडीला ४ मुलं होती. आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं.


त्यावेळी भारत-रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनांत आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यंनी हळूच सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती.


कार्यक्रम संपला आणि श्री. सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलनच केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, 'खाना है क्या?' कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.


त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला, ममताला, सांभाळण्याची तयारी दाखवली, आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्‍यांना सांभाळायला का दिलं?


माई सांगतात, "रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर? मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का? मला अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता."


आकाशवाणीवर गाऊन माईंना ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.


त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.


चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. 'तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो', म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.


माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदर्‍यास आले. दिपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं, अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती. पण दिपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं, आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनर्‍यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदर्‍यातून बाहेर पडला. आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात, आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर 'ममता बाल सदन' उभं राहिलं.


आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. 'माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत', हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. मागे एकदा माईंकडे गेलो होतो, तर 'माझी मुलगी M.Phil झाली' असं म्हणून माईंनी पेढे दिले. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्नं, बारशी तर नेहमीचीच असतात. शिकून, नोकरीला लागून मुलं दूर गेली, तरी माईंच्या ओढीनं ती परत येतात. माईंशिवाय आयुष्य जगणं, त्यांच्यासाठी संभवत नाही.

याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात,

"सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय." वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे.


गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. 'या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले', असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. "वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते", माई सांगतात


माईंनी आता साठी ओलांडली आहे. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरचसं काम आता सांभाळतात. ममताने MSW केलं आहे. 'सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं, आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं', म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभ्या केलेल्या पसार्‍याचा तिला प्रचंड अभिमान आहे.


ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. 'स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी 'सत्या' झाला आहे का?' विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई 'वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा', हे असं सहजपणे सांगून जातात. 'चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.'


माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर १७२ पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं, त्या पिंपरीमधीच्या गावकर्‍यांनी माईंचं कौतुक केलं, आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावकर्‍यांना शेणासाठी महिना हजार रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावकर्‍यांना अभिमान आहे. 'जो गाव माझ्यावर थुंकला, तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर रहा. माझ्या आश्रमातली मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात'.


'हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,' असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्यातरी विवंचना सतत असतातच. जिंतूरचे एक डॉक्टर गेल्या महिन्यात माईंकडे एका १० वर्षाच्या मुलाला घेऊन आले. या मुलाच्या हृदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्याला माईंकडे आणून सोडलं. परवा माईंकडे गेलो तेव्हा या लहानग्याला भेटलो. निलेश त्याचं नाव. अतिशय तल्लख. अफाट स्मरणशक्तीचा धनी. आणि तितकाच समजूतदार. योग्य उपचार झाले नाहीत, तर तो फार जगेल असं डॉक्टरांना वाटत नाही. उपचारांसाठी लाख-दोन लाख रुपये कुठून आणायचे, याच चिंतेत आता माई आहेत.


'मला १७२ पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही'. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.

माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. 'निराश्रित', 'बेवारस' असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. 'देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस', हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.


माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,


निखार्‍यावरी दुर्दैवाच्या, पडली चिमणी पिलं,

कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं,

सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,

चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी





Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...