Friday, 18 May 2018

वेड्या माणसांच्या गोष्टी

सालं..! तर आयुष्य म्हणजे नेमकं असतं काय सांगू ... आपल्या सारखीच वेडी, अवलिया, आपापल्या छंदांना वाहून घेतलेली पॅशनेट माणसं आयुष्याच्या टप्प्याटप्प्याला भेटत राहणं .. ती भेटलीत कि त्यांच्या लाभलेल्या सहवासानं आयुष्य ढवळून बिवळून ज्या ज्या काही अंतर्गत मानसिक-बौद्धिक हालचाली होतात आणि त्यातून जो जो काही छोटा मोठा आंतरिक आनंद मिळतो ते म्हणजेच खरे आयुष्य, आणि सुख बिख काय म्हणतात ते ...बाकी सब तर मोह-माया आहे.

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे एक वेडं कुटुंब आहे. यातली हि गोंडस मुलगी आमची सक्खी मैत्रीण तृप्ती आणि तो तिचा सक्खा नवरा इंद्रनील, यांना एक यांच्यासारखंच गोडुलं लेकरू पण आहे तिचं नाव चिन्मयी.. आमची चिनू आणि विशेष म्हणजे सवयीने ती डिक्टो यांच्यावरच गेली आहे. हि तिघेही पूर्ण वेडी माणसं आहेत. उच्चशिक्षित असतांना नोकरीच्या,व्यवसायाच्या, मशिनींच्या, गाडीघोड्याच्या मागे पाळायचे सोडून ह्यांनी स्वतःला पूर्णपणे निसर्गाला बहाल केलंय.

पोटापाण्यापुरतं कमावणारी .. पैश्याच्या मागे मरमर न करता छंद जोपासण्यात पूर्ण वेळ मन भरून आनंद लुटणारी हि लोकं. इंद्रनील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, विशेषतः पक्ष्यांचे फोटो काढण्यात तरबेज. तृप्ती अगदी त्याची सावली. हि मंडळी रात्री झोपण्यापुरतं छत शोधत असावीत. बाकी सगळा वेळ ज्या देशात ज्या शहरात ज्या मोहोल्ल्यात असतील तिथले जंगल शोधून त्यात शिरून भटकत असतात. सूर्य उगवायच्या आत हे जंगलात पसार होतात तहान भूक विसरून निसर्गातले बारकावे टिपत बसतात..घरातल्या कामांची स्वयंपाकाची तमा नाही कारण त्यासाठी आपला जन्म नाही.. २ वेळचं जेवण माणूस कसाही कुठेही मिळवू शकतोच हे दोघांच्याही डोक्यात ठाण आहे... जे मिळेल ते जिथून मिळेल तिथून खायचं आणि पुन्हा मनसोक्त हवं ते जंगलात टिपता येत नाही तोपर्यंत जंगल पालथं घालायचं... एकदा आम्हीही असेच बर्ड वॉचिंगला गेलेलो तेव्हा गोगलगायसारखा यांचा सगळा संसार म्हणजे दुर्बिणी, कॅमेरा त्यांचे स्टँड्स वगैरे या दोघांच्या खांद्यावर आणि हे सगळं घेऊन एका जंगलातून दुसऱ्या जंगलात ते आम्हाला भेटायला आलेले.... इथे काय बघावे कसे बघावे याचा कोणताही मोठा बडेजाव न आणता मुलांना धडा देऊन पुन्हा दोघे संसार उचलून दुसऱ्या जंगलाकडे पसार झाले. निसर्गाला वाहिलेली यांची नैसर्गिक जडणघडण आणि तसेच साधे वागणे बोलणे अचंभित करणारेच तर आहे.

मला खूप कौतुक वाटत यांचं छंद सगळ्यांनाच असतात..त्यातल्या बऱ्याच जणांना त्याचं पॅशनही असतं पण सारेच छंद या पोटतिडकीने आणि वेडाने झपाटून जोपासता येतातच असे नाही.. ते न जोपासण्यामागे अनेक कारणं असतात. आयुष्याचा रहाटगाडा ओढतांना बऱ्याच गोष्टी मागे सुटतात त्या परत धरायला मग जमत नाही आणि सुटलेले न जमलेलं मग जमेत जमा होतच नाही.. आयुष्याच्या तडजोडी आणि संसाराची कधीही सुबकन बसणारी घडी बसवण्याच्या नादात मग वय निघून जातं, प्रकृती साथ देत नाही मग रिकामपण येत जरूर पण वेळ निघून गेलेली असते ..अश्या एकना अनेक गोष्टीच भांडवल करत माणूस पुढे पुढे निघत राहतो आणि हातच्या गोष्टी सुटल्या म्हणून पुढे हळहळत राहतो आयुष्यभर. पण तृप्ती-इंद्रनील सारखी काही माणसं असतात जी आयुष्याचं ध्येय काय, कशातून आनंद मिळतो .. नेमकं आयुष्यात कशासाठी जगायचं आहे हे स्पष्ट मनात ठेवून, ठरवून ठामपणे तसेच जगत असतात..कुठलेही एक्सक्युज न देता.

सध्या तृप्ती आणि इंद्रनील चिन्मयीला त्यांनी अनुभवलेल्या आयुष्याच्या आनंदाचे गणित शिकवत आहेत. चिन्मयी वयाच्या तेराव्या वर्षी बाबाएवढीच एक्स्पर्ट आणि अभ्यास व कलागुणात आईसारखीच हुशार झाली आहे. तिचा सुद्धा स्वतःचा ब्लॉग आहे. https://ignitedimages.com/portfolio/wildlife/#jp-carousel-४५२ ज्यात तिच्या सगळ्या कलागुणांचा स्पष्ट प्रतिबिंब दिसतं.. इंद्रनील यांनी काढलेले फोटो पाहणे हि एक पर्वणी आहे...जरूर पहा.  त्यांचे फोटो खालील लिंकवर प्रत्यक्ष पाहता येतील. 

१)  https://www.facebook.com/IgnitedImages/?timeline_context_item_type=intro_card_work&timeline_context_item_source=100009659080433

२)  https://ignitedimages.com/portfolio/wildlife/#jp-carousel-४५२








Wednesday, 9 May 2018

भयभितांचा तांडा आणि दुर्दैवाचा दशावतारी देश - सीरिया !!




 मी इकडेच का आहे ? इथे म्हणजे महाराष्ट्रात ? 
इथे याच प्रदेशात का जन्म झाला असावा ? तिकडे बिहार-आसाम एखाद्या आदिवासी नक्सली भागात जिथे स्त्रियांवर पदोपदी अन्याय होतात जीला कस्पटापेक्षाही हीन दर्जा दिला जातो जी जिवंत मरणयातना भोगते … तिकडे का नाही ? किंवा मग उग्रवाद्यांच्या, बगदादिंच्या,  तावडीतल्या भूप्रदेशात का नाही ? मी ज्यू होऊन नाझींच्या अत्याचाराला बळी पडले नाही.. सिरीया इराक जिथली महिला आज अब्रू अन जीव मुठीतला सुटू नये म्हणून एका मुठीत उरलेला संसार आणि दुसऱ्या मुठीत बंदूक घेऊन फिरतेय. 
नशीब म्हणावं का ? 

इथे जिथे मी रोज नवनवीन अनुभवातून जात असते ... विविधरंगी सुखदुःखे भोगत असते. तिथे कुठेतरी दूर माझ्याचसारखी 'ती' जीवाच्या आकांताने अब्रू हातात घेऊन जन्मापासून मरेपर्यंत लढत असते. पण मग हे सगळं उघड्या डोळ्याने बघावे वाचावे ऐकावे लागते तेव्हा आणि त्यामुळे संवेदनशील मनाला मानसिक भावनिक त्रास होत राहतो. त्याहून अधिक लिहिण्याशिवाय आपण त्यांच्यासाठी अधिक काहीच करू शकत नाही याचेही वैषम्य बोचत राहते ..तिची तिथली दशा पाहून इथला माझा जीव कळवळतो … हे कुठले ऋणानुबंध असतील तिचे आणि माझे... 


दुसऱ्या महायुद्धाच्या छाया पसरल्या तेव्हा नाझींनी ज्यू संप्रदायांच्या केलेल्या कत्तली इतिहासात काळ्या अक्षरात कोरल्या गेल्या आहेत .. त्यावेळी ६० लाखांपेक्षा जास्त ज्यू मारले गेले. या हत्याकांडाचा सरपोतदार एडॉल्फ हिटलर संपूर्ण जग पादाक्रांत करायच्या वेडाने पछाडला होता, त्याला जगजेता व्हायचे होते, पण त्यासाठी त्याने जो मार्ग निवडला तो असंख्य ज्यूंच्या यातनांमधून, वेदनेनं पिळवटून हत्या करून रक्ता-मांसाने बरबटलेला होता. वंशशुद्धी आणि राष्ट्रश्रेष्ठतेच्या आंधळ्या अहंकाराने वेड्या झालेल्या नाझींनी ज्या लाखो-कोट्यवधींचा अनन्वित छळ केला त्या सर्वांचीच  कथा भयंकर व्यथांनी भरलेली आहे. त्याच्या छळछावणीत महिला अन लहान मुलांची प्रचंड वासलात केली गेली ..कुणालाही दयेची भीक नव्हती, करुणेची आशा करता येत नव्हती. ज्यू बायका एका चक्रातून सुटायला दुसऱ्या पुरुषी सिंहाच्या जबड्यात सापडत होत्या आणि तेथेच भरडल्या-चिरडल्या जात होत्या. त्या आठवणी आजही अंगावर शहरे आणत असले तरी, आता तो भूतकाळाचा इतिहासजमा भाग झालाय...पण क्रौर्याचे दृष्टचक्र मात्र संपलेले नाही, आज या भीषण क्रूर हिंसाचाराची पुनरावृत्ती घडतेय असे वाटावे त्या इतिहासाची आठवण करून देणारा तसाच मृत्यूचा थयथयता तांडव सीरिया नावाच्या छोट्याश्या देशात घडतो आहे.

भयानक! मरण स्वस्त आहे, त्यातही स्त्रियांचे, गरिबांचे, निराधारांचे, मग लहानग्यांचे..त्यातही साऱ्या जगात स्त्री वर्गाचे आभाळ तर फारच फाटले आहे. ज्यू महिलांच्या दुर्दैवाच्या दशावतारासारखेच आज इतक्या वर्षांनी सीरिया सारख्या देशातल्या याझिदी महिलांची दुरावस्था पहिली तर स्त्रीत्वाच्या समान प्रारब्धाचा एक चेतातंतू असा कसा जीवघेणा खेचला गेलाय...याचं अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. 

दक्षिण - पश्चिम आशिया खंडाचा एक भाग असणारा सीरिया हा छोटासा देश. १९६३ पासुनच इथे आपातकाल लागु केले आहे. तेव्हापासुनच खरतर सीरियामधे गृहयुध्द पेटण्यास सुरुवात झाली होती परंतु आजच्या घडीला परिस्थिती जितकी चिघळली गेली आहे , हजारो माणसे ठार होताहेत, लहान मुलांची आणि महिलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तितकी ती कधीच नव्हती. एकंदरीतच परिस्थिती गम्भिर आहे..आज लहान मुले स्त्रिया देखील हातात बंदुकी, दारुगोळे घेऊन जिवाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरलेले दिसताहेत. इस्लाम अंतर्गत असणाऱ्या दोन पंथांच्या वर्चस्वाची लढाई, जगभरात सुरु असलेली आर्थिक वर्चस्वाची लढाई, आंतरराष्ट्रीय राजकारण हि देखील या रक्तरंजित घटनेची मुख्य कारणे आहे. सिरिअन शिया सत्तेची मुजोरी, बंडखोर, इसीस आणि संलग्न इतर सुन्नी अतिरेकी संघटना अश्या तिहेरी पेचात तेथील सामान्य माणूस होरपळत आहे. आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात मोठे रक्तरंजित, नृशंस, अमानवी नरसंहार या गृहयुद्धात घडून आलाय. दुर्दैवाने सीरियाचे भोगोलिक स्थानही युरोप आणि आशिया दोन्हीवर प्रभाव टाकणारे आहे. युद्धामुळे विस्थापित झालेले नागरिक, थेट ख्रिस्चन बहुल युरोपात आश्रय घेताहेत. मुस्लिम असल्याने स्थानिकांना त्यांच्याबद्दल वाटणारी अढी कायम आहे. अश्यात त्यांचा सहज स्वीकार होत नाहीये, त्यांना आश्रित म्हणून जगणेही कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच बऱ्याच अंशी नागरिक देश सोडून जाण्यापेक्षा तिथेच राहून सोसत का होईना लढण्यासाठी शस्त्र उचलून सज्ज होत आहे. विशेषतः स्त्रियांना स्वतःच्या जीवांसोबतच कुटुंबातल्या लहान मुलांच्या रक्षणासाठी रणचंडिकेचे रूप धारण करावे लागत आहे. 

या घटनांचे राजकीय आणि सामाजिक परिणाम तर आहेतच. पण होणारे मानसिक परिणाम अधिक घट्ट आहेत. घर आणि शहरांसोबतच मन आणि मानवतेवरचा विश्वासही कोलमडून पडतो आहे.. कुर्दीश महिलांचा संघर्ष, मध्यमवर्गीयांवर झालेले दूरगामी परिणाम, हजारो स्थानिकांचे स्थलांतरण, त्यांचे निर्वासित होणे, त्यांच्यातील सगळे व्यापून उरलेली असुरक्षिततेची भावना, जिहादींशी संघर्ष, उत्तर इराकमध्ये इसिसशी झुंज अशा अनेक घटना सीरिया होरपळून निघत असल्याचे दाखले देत आहेत. हे सगळं बातम्यांमधून निव्वळ वाचून-पाहून   आपण असे अशांत होत असेल; अस्वस्थ झालो असेल ; अंतरबाह्य ढवळून निघालो असेल. मेंदूच्या ठिकऱ्या उडवणारा, मनाच्या जाणिवा गोठून टाकणारा, हृदयाच्या संवेदना कोळपून टाकणारा हा अनुभव तिथले सगळे  कसे सहन करत असतील याची कल्पनाही करवत नाही. किंबहुना सीरियाचे युद्ध पेटण्याआधी हा देश केवळ समृद्ध नव्हता तर अनेक बाबतीत पुढारलेला देखील होता. युद्धाच्या आधी २०१० साली घेतलेल्या आकडेवारीत या देशाचे ९०% लोक मुस्लिम समुदायाचे असूनही महिलांची संख्या ४९.४%  आणि त्यातही महिला साक्षरतेचे प्रमाण, 74.2% होते. १९१९ मध्ये महिला हक्काच्या चळ्वळीनंतर स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहू लागले आणि १९६३ येतायेता कामगार आणि सरकारी-निमसरकारी क्षेत्रातही समानता कायम होत गेली. विकासाच्या मार्गावर अग्रेसर होणाऱ्या या देशाचे अचानक ग्रह फिरले. ६ वर्षाआधी  राष्ट्रपति बशर अल-असद यांचा शांतीपूर्ण विरोध करताना देशात गृहयुद्ध पेटत गेले आणि त्याचा फायदा घेत इसिसने देशभर पाय पसरून ताबा घेतला. त्यानंतर  दुर्दैवाचे दृष्ट चक्रच सुरु झाले. 

२०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना इसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. याझिदी महिलांवर बळजबरी, छळवणूक आणि लैंगिक शोषण करत क्रौर्याच्या सर्व सीमा लंघून पाशवी अत्याचार केले गेले. गैरमुस्लिम असल्याने याझिदी समाजाच्या महिलांना मरणयातना दिल्या गेल्या. आयएसच्या ताब्यात असलेल्या शहरांमधील अर्धा लाखभर महिला गर्भवती असून त्यांची मुलं आयएसचे दहशतवादी होण्याचीच दाट शक्यता असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. इसिसचे प्रस्त कायम व्हावे म्हणून या अतिरेक्यांनी दंडुके वापरून निर्दोषांचा हकनाक बळी घेऊन उच्छाद मांडला..त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून वागवले गेले. वासना शमवत, बलात्कार सहन करत, त्यातून मुलांना जन्म देऊन त्यांनाही जन्मापासूनच आतंकवादी बनताना पाहताहेत. हजारो महिला नरकयातनेत जगताहेत . त्यांच्यावर एकेक दिवसात अनेकानेक पुरुष कित्तेकदा पाशवी बलात्कार करतात, त्यांच्या शरीराचे लचके तोडले जातात, मारहाण सहन करावी लागते. बलात्कार केलेल्या पुरुषांची ओळख कधीही पटू नये म्हणून मग त्यांना जीवे मारलेही जाते. हे राक्षस अशी कृत्ये करूनच थांबत नाही तर यझिदी समुदायातील महिला-बालके यांना पकडून त्यांचे धर्मपरिवर्तनही करते, त्याला नकार दिल्यास त्यांना ठार मारले जाते. त्याचबरोबर गुरं-ढोर विकावे तसे किंमत ठरवून महिलांना बाजारात विकलेही जाते. या महिलांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.



 ‘इसिस’च्या हैवानी कृत्यांचा नागडा तांडव  सीरिया, इराक, लिबिया आदी देशांमधील निष्पाप नागरिक सतत सहन करीत आले आहे. अनेकींच्या अनेकानेक कहाण्या आहेत. अनेकींच्या अगणित जखमा-वेदना आहेत.  इतकेच काय तर एका असहाय्य मातेस अनेक दिवस उपाशी ठेवून नंतर अक्षरश: तिचेच बाळ शिजवून खाऊ घालण्याचे निर्घृण कृत्य देखील करण्यात हि नराधम जमात चुकली नाहीत. महिलेला तिचा गुन्हा न सांगताच दगडाने ठेचून मारायची शिक्षा देणं. दुरून डोक्यात असंख्य गोळ्या घालून डोक्याची अनेक शकलं पाडणं पशूंनाही लाजवेल इतके क्रौर्य. २०१६ साली दहशतवाद्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या 19 याझिदी तरुणींना या जागतिक दहशतवादी संघटनेने भर चौकात जिवंत जाळले. सेक्‍स स्लेव्हज म्हणून पकडण्यात आलेल्या या तरुणींना इराकमधील मोसूल शहरात लोखंडी पिंजऱ्यात बंदिस्त करून मोठ्या जनसमुदायापुढे जिवंत जाळण्यात आले होते. अक्षरश: दगडालाही पाझर फुटेल, अशी क्रौर्याची परिसीमा गाठली गेली.  अफगाणिस्तान फिरून त्या ठिकाणच्या वस्तुस्थितीची प्रत्यक्ष माहिती करून घेण्याकरिता ख्रिस्तिना लँब ही लेखिका अफगाणिस्तानात आली होती. तिच्या स्यूईंग सर्कल्स ऑफ हेरात (Sewing Circles of Herat, 2004, Hurper Collins) या पुस्तकात कंदहारच्या फुटबॉलच्या मैदानाची माहिती देतांना ती सांगते, कंदहारवर तालिबान्यांचा अंमल असताना तेथे उघडयावर फाशी देण्याचे, शरीयाच्या कायद्याप्रमाणे हातपाय तोडण्याचे, महिलांना दगडाने ठेचून मारण्याचे प्रकार होत असत. त्या दुर्दैवी लोकांचे रक्त त्या भागात सांडून मातीचा रंग सुद्धा बदलला होता. तालिबान्यांना हुसकावून लावल्यानंतर ते मैदान खेळण्यासाठी वापरण्याआधी धुण्यात आले, तेव्हा तेथे असलेल्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, तेथे टाकण्यात आलेले पाणी रक्ताने लाल होऊन तीन आठवडयांपर्यंत गल्ली-बोळीतून वाहत होते. क्रूरतेची परिसीमा गाठताना त्याला विकृत रूप देऊन हजारोच्या संख्येने ते पाहणे आणि करमणूक करून घेणारी हि कुठली वृत्ती हि कुठली जमात हि कोणती मानसिकता असावी? या विकृत मनोवृत्तीने आज संपूर्ण अरब जगताला घेरले आहे. त्याचे अगदी पराकोटीच्या निर्घृणतेचे उदाहरण म्हणजे आपली आई इसिसला विरोध करते यासाठी एका युवकाने अनेक बघ्यांसमोर स्वत:च्याच आईचा गळा चिरला..त्या मुळासकट लोकांच्याही संवेदना इतक्या बोथट व्हाव्या?. बाईवर बळजबरी करणे, बलात्कार, पाशवी अत्याचार करून तिला गर्भार करणे आणि त्यानंतरही तिला वेदना-यातना देत राहणे हा या क्रूरकर्मा नराधमांच्या पुरुषत्वाचा निकष असतो...पण हि मर्दुमकी नव्हे हे भय आहे आणि हा साराच भयभीतांचा तांडा आहे ... पुरुषांचा. भयभीतांच्या तांड्यांकडून दुर्बल राहिलेल्यांवर अत्याचार चालूच रहातील. का तर त्यांचे कल्पनारम्य पौरुषत्व आणि दांभिक बिनबुडाच्या धार्मिक अस्मिता अबाधित रहावे म्हणून.. हे कोणत्या मानवतेच्या, विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेत बसते?

हिंदू, मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू दे … भारत, अफगान, अमेरिका, पाकिस्तान देश कोणताही असू दे …. दंगे होऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, महायुद्धे होऊ दे , धर्मयुद्ध होऊ दे सर्वात आधी बळी पडते ती 'स्त्री' जात. पण म्हणूनच, आज कुर्दिश महिलांनी आजवरचा इतिहासच पालटायचे ठरवले, या दुर्बलतेवर मात करत भोगवट्याचा त्याग करत, सहनशीलतेची कात टाकून लढायचे ठरवले...या महिलांनी एकत्र येऊन महिलांची फौज उभारली. कुर्दिश लढवैय्या शिपायांकडून या महिला प्रशिक्षण घेऊन विविध प्रकारच्या गटातून युनिट प्रस्थापित करून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने युद्धास सज्ज झाल्या आहेत. सीरियाच्या सिंजार शहरात असाच मृत्यूचा तांडव खेळला गेला त्यानंतर तेथील महिलांना लैंगिक गुलामगिरीत ढकलून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले याच शहरात आज सिंजार वुमन युनिट (YJS) तेथील उर्वरित महिलांनी तयार केले.  कुर्दिश सीरियन डेमोक्रेटिक फौजची वुमेन्स प्रोटेक्शन यूनिट, कुर्दिश पीपल्स प्रोटेक्शन यूनिट्स (YPG) हे आणखी काही असेच योद्धा महिलांचे सशस्त्र युनिट. यातल्या कमांडर महिलेचे म्हणणे आहे “मौसूलच्या बाजारात विकली गेलेली आणि जिवंत जाळलेल्या आमच्या याझिदी भगिनींसाठी आम्ही लढणार आहोत. अजूनही इसिसच्या तावडीत दुःख भोगणाऱ्या महिला आमची वाट बघत आहेत. त्यांना सोडवून यातना भोगणाऱ्या महिलांचा सूड उगवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'' यांच्या प्रयत्नांना यशही मिळू लागले आहे.  या क्रूरकर्मा जिहादी दहशतवाद्यांना या महिलांच्या हाताने मरणाची खरतर भीती निर्माण झाली आहे. महिलेच्या हाताने मृत्यू म्हणजे जन्नतचे दरवाजे बंद होऊन जहन्नुम भोगावा लागणार असा त्यांचा  समज आहे. या रणरागिणी कुर्दीस्थानच्या वेगवेगळ्या भागातून एकत्रित आल्या आहेत.यातल्या अनेकांचे कुटुंब देखील आहे. अगदी तरुण वयाच्या या महिलांमध्ये प्रचंड ध्येयशक्ती आहे. याचे उदाहरणही नुकताच २० जानेवारी रोजी पाहायला मिळालं 20 वर्षीय अवेस्ता खाबुर या तरुणीने तुर्की सैनिकांच्या आत्मघाती टॅंक उध्वस्त करून बऱ्याच सैनिकांनाही मृत्युलोकीं पाठवले. यात अवेस्ताला मात्र जीव गमवावा लागला.

जिवंत राहण्याची लाचार धडपड आणि तगमगत जगण्याचा प्रवास  … कुठून सुरु झाला हा प्रवास? माझंच जगणं मला जगू द्या, ते असे ओरबाडून संपवू नका, यासाठी तळमळीने मागणी करण्याचा प्रवास? कधी ठासून, कधी रडून, कधी ओरडून तर कधी व्यासपीठावर उभे राहून ताठ मानेने …तरीही हुंदका गिळत, मुसमुसत कधी युद्धाला सरसावून मारून मरून विचारतेय ती...प्रस्थापितांच्या उघड आणि छुप्या संकेतांमधून स्त्रियांचे खाजगी जीवन घरात आणि घराबाहेर नियंत्रित करणे कधी थांबेल, तिच्यावर  होणारे अत्याचार माहिती आहे साऱ्यांना, दिसतंय ते पण कोण पुढे सरसावेल..कोण मदत करेल..  महत्वाचे म्हणजे स्त्रियांमध्ये प्रतिकाराचे अंगार आणि आत्मभानाची स्फुल्लिंगे कोण चेतावेल? कुठे संपेल फक्त ती स्त्री आहे म्हणून जगभर होणारे अन्याय-अत्याचार, अंत आहे का ह्याचा … आणि शेवटी मिळेल का तिला तिच्या गरजेचं, अधिकाराचं, जन्माच्या हक्काचं जिनं ?… या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाचकडे नाही. .. ते वर्षानुवर्ष अनुत्तरीतच... 

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इसिसने सीरियातून पाऊलं मागे घेतलीत अश्या बाता काही महिन्यांपूर्वी ऐकायला येऊ लागल्या खऱ्या परंतु अद्याप पूर्ण मुक्ती हे स्वप्नच आहे. संपूर्ण देश उध्वस्त झाल्यावरही आजही निर्दोषांचे हकनाक बळी जातच आहेत. सामान्य नागरिकांच्या कत्तली सुरु आहेत. पूर्वी दहशतवाद्यांचे अत्याचार आणि आता छुप्या दहशतवाद्यांना मारण्याच्या निमित्ताने शहरांवर रासायनिक शस्त्रांचा वापर आता देशाचे कायदेशीर हुकूमशाह खुद्द करीत आहेत. इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, शहर जळताहेत, लोक होरपोळुन निघतायेत. तरी युद्ध सुरूच आहे. या देशाच्या दुर्दैवाचे दशावतार आज जगभरच्या संवेदनशील माणसांना पाहणेही त्रासदायक ठरू लागले आहेत. या दुर्दैवी देशाचे कमनशिबी फासे पालटतील आणि येथील नष्टचर्य.. लोकांचे दुर्धर जगणे रुळावर येईल अशी अशा आणि प्रार्थना... विकृत मानसिकतेचा विखार एक दिवस जगभरातून संपुष्टात येईल.. महिलांचे, लहान मुलांचे जगणे सुखकर होईल तो दिवस सर्व जगासाठी सुदिन ठरेल या अपेक्षेसह ...  

(c)रश्मी पदवाड मदनकर 
(मे-२०१८ च्या 'मित्रांगण' या त्रैमासिकात प्रसिद्ध)

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...