प्रत्येक तंत्रज्ञानाचा शोध हा गरजेतून लावला जातो. जगणे सोपे व्हावे हा खरा उद्देश. उर्जेची बचत, वेळेची बचत आणि कमी श्रमात अधिक कार्य या गरजा लक्षात घेता त्यासाठी लागणारी सोय म्हणून नवनवीन शोध लावले जातात आणि त्यानुसार नवनवीन तंत्रज्ञान आमच्या दिमतीला तयार होत असतात. आजचे युग म्हणजे 'सोशल मिडिया'चे युग. आजची पिढी या स्वप्नील विश्वात पुरती डुंबून गेली आहे. इलेक्ट्रॉनिक जगातली हि एक नवीच कम्युनिटी तयार झाली आहे. इथेंच सगळं जग आणि हेच आमचं जगणं असं काहीसं होऊन बसलं आहे. सोशल मीडियाच्या भिंतीत गाडून घेतोय आपण सर्व स्वतःला, न दिसणारा पिंजराच पण इतकं गुरफटले जातोय कि आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने वाहवत जातोय ह्याचं भानही उरलेलं नाही. मागल्या काही दिवसात जे काही घडलं, घडतंय ते पाहता खरतर काळजीपोटी भीतीच वाटू लागली आहे.
तळागाळाला गेलेलं राजकारण, दुषित होत चाललेलं समाजकारण आणि विकृत ध्येयानं वखवखलेला अन त्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार असणारा, वैचारिक घाणीनं माखलेला एक विशिष्ट समाज. सोशल मीडियावर आपल्या वागण्याची, भाबड्या भावना, बिनबुडाच्या अस्मिता अश्या मूर्खपणाच्या वागण्याची दखल घेत असतो आणि आपण आहारी गेलो आहोत हे ताडून त्याचा फायदा उचलून राजकारणासाठी, कुठल्यातरी स्वार्थासाठी उपयोग करवून घेत असतो, आणि हे आपल्या गावीही नसते. सोशल मिडीयावर आपण व्यक्त केलेल्या भावना, हिरीरीने मांडलेले वाद विवाद , जाती-धर्म ह्यांचा आपल्याला वाटणारा सन्मान किंवा तिटकारा, कधी भाषेच्या कधी प्रांताच्या अचानक जागृत झालेल्या अस्मिता, अन्यायाची अत्याचाराची चीड जे जे काही विचार आपण आत्मीयतेने लिहितो आणि तळमळीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगासमोर मांडतो त्याच आपल्या भावनांचा, त्यातून उद्भवणाऱ्या संवेदनांचा, बौद्धिक विचारांचा हि कारस्थानी लोकं सोयीस्करपणे उपयोग करवून घेतात. आपण कुठेतरी कुणाच्या तरी दुष्ट कार्यात नकळत वापरले जातो आहोत ह्याची जाणीव होते तोपर्यंत आपण परिणाम भोगून पुरते पोळून निघालेलो असतो.
गेले कित्तेक दिवस सोशल मीडियावर आपल्या भावनांचा बाजार मंडल जातोय. जात-धर्माच्या अस्मिता अधिक चिवट करण्याचा प्रयत्न होतो आहे. भाषा, प्रांताच्या, परंपरा, अध्यात्माच्या बिनबुडाच्या चर्चा इथे रंगतात. देशप्रेमाच्या बिनकृतीच्या पताका लहारावल्या जातात एवढेच नाही तर राजकारणातल्या आपल्या मतांचे-विचारांचे प्रदर्शन चव्हाट्यावर मांडले जाते. पडद्यामागचा करता करविता फक्त दोऱ्या हलवत असतो आपण कठपुतळ्या ठरतो, व्यक्त होत होतच अभिव्यक्ती हक्काचे आंदोलनं छेडतो.... नक्की काय चालू आहे हे? आणि कशासाठी ? का करतोय आपण हे सगळं, नेमकं काय साध्य करू इच्छित आहोत? आपल्याच परंपरा आणि आपल्याच पुराण पुरुषांना, ऐतिहासिक महात्म्यांना आपल्याच संस्कारांना आणि संस्कृतीला संपूर्ण जगासमोर आपणच चुकीचं सिद्ध करायचं म्हणजे आपण फार बुद्धिवादी किंवा विचारवंत सिद्ध होऊ असं काही वाटत असेल काय ह्या नव्याच जन्मू घातलेल्या 'कम्युनिटी'ला… पण मग स्वतःला बुद्धिवादी सिद्ध करतांना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेऊन मुर्खच तर सिद्ध होताहोत ना आपण ….
आमच्या महान पुरुषांच्या पुतळ्याचा तुकडा पडला अशी पोस्ट वाचली कि आमचे राष्ट्रप्रेम उफाळून येते, शतकांपासून आमच्या प्रेरणास्थान ठरलेल्या राष्ट्र सुधारकांच्या विचारांवर कुणीतरी बोट उचलतं आणि आम्ही तुटून पडतो. आमचे हृदयस्थानं, प्रेरणास्थळं आमच्या भक्ती-भावना-अस्मिता, श्रद्धा इतक्या तकलादू आहेत कि जरा कोणी बोट लावावे, फुंकर घालावी आणि त्या डळमळीत व्हाव्या? अशा गोष्टीने महानता कमी होण्याइतके आमचे महापुरुषं खुजे नसतात, खरतर खुजे असतात ते अंध अनुयायी, त्यांचा विश्वास. त्यांच्या या अशा अंधश्रद्धाळू डगमगत्या विचारांमुळेच त्यांना हवे तसे वापरून घेणे सोपे असते, आगीची एक चिंगारी आमच्या आतला संतापाचा भडका जागृत करण्यास पुरेसा ठरतो. याचाच गैरफायदा समाजकंटक घेतात. कुणीतरी कसल्याश्या हेतूने जळकी काडी लावून देतो आणि आम्ही धार्मिक तिढे, दंगलीचे प्रयत्न, बस फोडणे, जाळ -पोळ करत सुटतो. आत्ता आत्ता तर याही पुढे जाऊन पुण्यात कुठल्याश्या “हिंदूसेनेकडून” एका मुस्लिम तरूणाची मारहाण करून हत्या केल्याची बातमी आली. सगळंच विषण्ण आणि सुन्न करणारं. खरंच आपल्याकडे दुसरे मार्ग नाहीत काय ? न्यायाच्या किंवा नैतिकतेच्या मार्गाने प्रश्न सोडवताच येणार नाहीयेत काय ? प्रत्येकवेळी दंडुक किंवा तलवारी घेऊनच बाहेर पडायला हवं? आणि असं करण्याने प्रश्न सुटताहेत कि अधिक वाढत जाताहेत, हे न समजण्याइतपत भाबडे झालोत का आपण? ज्याने धुराळा उडवून दिला असतो तो घरात गारव्यात बसलेला असतो आणि आपण त्याच्या अंगुलीनिर्देशावर नकळत आपल्याच आयुष्याची अशी धूळधाण करायला बेतलेले असतो. पुण्यातल्या तरूणाच्या मृत्यूनंतर १४ मुलांना अटक झालेली. चौदाही मुलांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड चढले. यापुढे नोकरी मिळवताना, शिक्षण घेताना, व्यवसायासाठी कर्ज घेताना प्रत्येक पावलाला हे क्रिमिनल रेकॉर्ड नावाला चिकटणार. यदाकदाचित शिक्षा झालीच तर आयुष्यचं संपलं. आणि खरतर अश्या गुन्ह्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी.
असा हा उन्मादक उत्साह आपण आपल्या खऱ्या जीवनात चांगल्या कामासाठी का दाखवत नाही? काहीतरी नष्ट करण्यापेक्षा निर्मितीसाठी. तोडण्यापेक्षा जुळवण्यासाठी किंवा स्वतःच्याच उन्नतीसाठी. सोशल मिडिया म्हणजे काही आयुष्य नव्हे तिथे घडलेल्या घडामोडी म्हणजे खरे जीवन नव्हे ते नुसतेच चर्वितचर्वण आहे. इथल्या चर्चांनी आयुष्य सावरत नाही इथल्या स्टेटसने पोट भरत नाही. आपल्या आयुष्याची राखरांगोळी अश्या फुटकळ माध्यमामुळे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.
आज संपूर्ण जगभरात १25 कोटी युजर्स फेसबुकवर आहेत. ह्यापैकी बराच मोठा आकडा भारताच्या खात्यात आहे. पण भारतातले जवळ जवळ १५ % अकाउंट फसवे आहेत फेक अकौंटचे सर्वात जास्त युजर्स भारतात आहेत असे एका सर्वेक्षणात म्हंटले गेले आहे. गैरप्रकार करण्यासाठी आणि गैरफायदा घेण्यासाठीच अशी दुय्यम खाती उघडली जातात यात दुमत नाही. सोशल मिडीयाच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी यांचे भक्ष ठरते आणि वास्तविक आयुष्य आणि भासमान जगातला फरक विसरणारी हि विशिष्ट कम्युनिटी यात बळी पडते. जाणकारांच्या मते सोशल मिडीयाचा गैरवापर हि एक वाईट प्रवृत्ती आहे ती ओळखून समजून प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे.